Get it on Google Play
Download on the App Store

मोरी गाय 2

मोरीचे जीवन गेले. तिचे जणू पंचप्राण गेले. तिचे दूध शोकाग्नीने आटले. शामरावांनी थोडा चारा मोरीसमोर आज टाकला. कारण आज वासरु नाही, तेव्हा गाय लाथ मारील. ते दूध काढायला बसले. ज्या मातेचे वत्स मेले आहे, एका क्षणापू्र्वी मेले आहे. तिच्या डोळ्यांसमोरुन ओढले आहे, तिचे दूध काढायला ते बसले. गाईचे हृदय त्यांना कसे कळावे? तिला भावना होत्या. तिला दुःखामुळे पान्हा फुटेना. शामराव आचळ जोरजोराने ओढू लागले. मोरीला वेदना होऊ लागल्या. कधी वर न केलेला पाय तिने जरा वर केला. पण पुन्हा खाली घेतला. आपल्या धन्याला लाथ लागेल. याच्या आईने व बापाने माझ्या आईची पूजा केली. त्यांचा हा मुलगा. त्याला पाय कसा लावू, असे वाटून मोरीने पाय खाली घेतला होता. शामरावांनी एक काठी पाठीत मारली. जी तिची पाठ आईकडून चाटली असे. तिच्यावर आता काठ्या बसत होत्या. परंतु अशाही प्रसंगी बसावी ! मोरी शोकाने वेडी झाली. तिने लाथ मारली. शामरावांना लागली. सपासप दोन-तीन काठ्या बसल्या. शामरावांचा मुलगा वामन तेवढ्यात बाहेर आला. “बाबा, तिचं वासरु मेलं. म्हणून नसेल हो ती दूध देत. राहू दे आजचा दिवस. मारु नका.” वामन आवर्जून म्हणाला.

“अरे, मग मात्रा कशात घेऊ ? गायीच्या दुधात मात्रा घ्यायची आहे ना ? औषधाला नको थोडं तरी दूध ? आणि वासरु असलं तरी किती देते म्हणा !” शामराव रागाने बोलत होते.

मोरीने ते शब्द ऐकले, ती आपले दुःख विसरली, ती सत्त्वशील गाय होती. धन्यासाठी आपली आई रात्री अपरात्री दूध घ्यायची हे तिला आठवले. हा धनी कसाही असला तरी त्याच्या पूर्वजांची पुण्याई थोर आहे. माझी आई व आजी वरुन मला शिव्याशाप देत असतील. मी सत्त्व गमावले म्हणत असतील. तांबूआई, बघ मी दुःख गिळते. माझी दुग्धधारा असेल तेवढी देते शामरावांच्या भांड्यात धार वाजली, “बघ पान्हाळली ! अरे, सोटे-पान्हवण पाहीजे तिला. हेच तिचं आंबोण. या लबाड असतात रे उनाड गाई. आता वासरु नाही. तिला वाटलं, आज पाय उचलला की उद्यापासून कटकट बंद. पण माझ्याशी आहे म्हणावं गाठ. उद्यापासून दोन काठ्या लगवायच्या व मग बसायचं कासेखाली.” शामराव म्हणाले.

मोरी ऐकत होती. आपण थोडा सत्त्वभंग केला. त्याचे हे प्रायश्चित्त. ही शिक्षा भोगलीच पाहिजे असे तिने मनात ठरवले.