Get it on Google Play
Download on the App Store

चाळीस हजाराचा सूड – अतुल वेलणकर

ऑफिस मधून निघताना आज जरा उशीरच झाला. साडेसहा वाजून गेले होते. मी बांद्रा कुर्ला संकुलातील माझ्या ऑफिस मधून घरी अंधेरीला जायला निघालो. उशीर झाला म्हणून रिक्क्षा पकडली आणि निघालो. आधीच निघायला उशीर ....त्यात पावणेसातच ट्राफिक...म्हणजे अंधेरी गाठायला अर्धा पाउण तास कुठेच गेला नाही, कदाचित जास्तच ..मला घड्याळात आठ वाजलेले दिसू लागले..मी गप्प बसून होतो रिक्क्षा मध्ये..

रिक्क्षा पहिल्या सिग्नलला थांबली होती. ही आतली गल्ली..जवळचा रस्ता आणि दोन सिग्नल टाळणारी..रस्ता निमुळता होत गेलेला त्यामुळे ह्या सिग्नल पाशी ट्राफिक नेहेमीचाच ... रिक्क्षा थांबली होती. रस्त्याच्या बाजूला एके ठिकाणी नवीन इमारत बांधण्याच काम चालू होत, तिथे काम करणाऱ्या गवंडी लोकांच्या रस्त्याच्या कडेलाच झोपड्या होत्या. ही मंडळी बहुधा आंध्र मधून येतात..गरीब लोक ...मुंबईत राहण्याची सोय नाहीच ... जिथे काम मिळेल तिथे तात्पुरत्या झोपड्या उभ्या करायच्या, काम आटोपल, की संसार पुन्हा काम मिळेल तिथे हलवायचा!!

मी थंड नजरेने बघत होतो.(ट्राफिक मध्ये दुसरा पर्यायही नव्हता ..) एका झोपडी पुढे एक माणूस उघडा, फक्त लुंगी लावून अक्षरश: दगडाची उशी करून पडला होता. बहुदा गवंडी असणार..नुकताच कामावरून आलेला आणि प्रत्येक भारतीय पुरुषाप्रमाणे आडवा झालेला.. समोरच एक बाई ..बहुधा त्याची बायको ..एक चूल रस्त्यावरच मांडून भाकऱ्या करत होती (पोळ्या लाटत होती म्हणायची माझी हिम्मत नाही..), शेजारीच एक संपूर्ण नागड, शेंबड पोर खेळत होत. दोन – अडीच वर्षाच असेल ....खेळता खेळता ते मूल उठलं आणि त्या माणसाच्या उघड्या पोटावर जावून बसलं..
मला वाटल आता तो माणूस खेकसणार त्याच्यावर.. पण नाही. तो गालातल्या गालात हसला, त्याचच मूल असणार.. आता त्या पोराने त्या बापाच नाक खेचल.. केस ओढले.. तो आणखीच जोरात हसला... मग ते पोर बापाच्या उघड्या पोटावरच उडया मारू लागलं, आणि बाप अधिकच खूश होऊन हसत होता. ते सार ती बाई जवळूनच स्वयंपाक करता करता बघत होती. तीही खूश झाली होती. कौतुकाने तिने पोराला पहिल आणि मग प्रचंड कौतुकाने तिने नवऱ्याकडे सुद्धा बघितलं.. दोघांची नजर भेट झाली आणि दोघही सुखावले.

काय सूख? रस्त्यावरचा संसार, तोही तोकडा..कधीही हलणारा..पण संध्याकाळी साडेसहा पावणे साताला बाप पोराच्या बरोबर खेळतो आहे, आणि आई स्वयंपाक करताना .. नवऱ्याला मुलाला खेळवतांना पाहून नवऱ्याकडेच कौतुकाने नजर टाकते आहे. डोक्यात विचारांच काहूर माजल! सालं तोच नशीबवान...मलाही दोन अडीच वर्षांचा मुलगा आहे, मीही नोकरी करतो पण सालं तो पोराबरोबर खेळतोय आणि मी? सव्वा आठला घरी पोचणार ...मग दमलोय म्हणून टीव्ही वर काय वाटेल ते चालू असणार बघणार...माझं मूल कुठेतरी शेजाऱ्याकडे खेळत असणार... मग जीव जगवण्यासाठी गिळणार आणि दुसऱ्या दिवशी उठून कामावर जायचय म्हणून शरीर रात्री झोपेच्या हवाली करणार. छ्या ....!! शेवटचं बायकोन कधी कौतुकाने पाहिल होत मला? बहुदा मुलगा झाला त्याच दिवशी वाटत.. नंतर नाही..तिची काय चूक? तीही कामावर जाते आणि दमून घरी येते. काय उपयोग त्या गवंड्या पेक्षा जास्त पैसे मिळवून ?

पण मी हरायला तयार नव्हतो... मी त्याच्या पेक्षा श्रीमंत होतो ना!.. मी स्वतःकडे पहिल.. ऑफिस मध्ये जायचा ब्रँडेड शर्ट दीड हजार रुपये, पँट सव्वा दोन हजार, पट्टा पाचशे, बूट दीड हजार.. हातात दोन हजाराच घड्याळ, खिशात मोबाईल तीस हजार , पेन..आतले कपडे आणि रुमाल, मोजे धरून चाळीस एक हजार होणार... आणि त्याच्याकडे काय लुंगी? हत्...! त्याच्या महिन्याचा पगार नसणार दहा हजार आणि मी नुसता अंगावर मिरवत होतो तेव्हढे .. (मी सोन्याची चेन, अंगठी काही घालत नाही आणि म्हणून "साधेपणाच" लेबल देखील मेडल सारख मिरवतो)

पण छे.. नाही नाही!! ..साला मी पोराबरोबर कुठे खेळतो? तोच श्रीमंत ... आता ते चाळीस हजार मला बोचायला लागले ... उघड्या पोटावर पोराला कस खेळवणार? आणि कधी ? तो तर आणखीच सतावणारा प्रश्न.. वेळ कुठे आहे? विचार करून वेड लागायची पाळी आली. आमच्याकडे वेळ नाही हे त्या मुलाचं आणि आमच दोघांच दुर्दैव...छे छे .. दैव दुसर काय? काय उपयोग चाळीस हजाराचा? रस्त्यावरच्या संसारा इतकही सुख नाही!

माझी रिक्क्षा आता पुढच्या सिग्नलला आली आणि परत थांबली. माझा मोबाईल खणखणला, बायकोचा फोन..
"काय करतोयस? कुठे आहेस?" कुठल्याही नवऱ्याला न आवडणारा प्रश्न बायकोने विचारला (बऱ्याच नव-यांना ह्या दोन प्रश्नापाठी "कुणाबरोबर आहेस?" हां ही बायकोने न विचारलेला प्रश्न ऐकू येतो..खास करून संध्याकाळी.. ऑफिस मधल्या काही मित्रांनी मला हे "डीकोडिंग" सांगितल्याच स्मरते.. असो)
"मी घरी निघालोय रिक्क्षातून" .. मी

"ठीक आहे, मला उशीर होईल..प्रोजेक्टच काम आहे. नऊ वाजून जातील, जेवायचं थांबू नकोस "... इति बायको !!

घ्या ... म्हणजे कौतुकाची नजर राहिली दूर, उलट जेवायला सुद्धा थांबू नकोस...आता मला त्या गवंड्याच्या बायकोची कौतुकाची नजरही बोचायला लागली होती. चाळीस हजार तर भलतेच अंग तापवत होते. उन्हाळा असल्यामुळे खरोखरी आणि डोक्यात चाललेल्या विचारांनीही !!
पण दैवाने चिमटे काढायला सुरुवात केली की थांबतच नाही...

आता मी सांताक्रूझ आणि पार्ल्यामध्ये कुठेतरी पोचलो होतो.. परत एकदा फोन खणखणला..घरून फोन..फोनवर माझी आई, "अरे तुझ्या लेकानी आठवण काढली म्हणून केला फोन, थांब त्यालाच देते"...आई!! मग फोन आपटल्याचा आवाज; नुकतेच छोटी छोटी वाक्य पूर्ण बोलायला शिकलेला माझा मुलगा फोनवर
"बा ......ऽऽऽ............बा ऽऽऽ"............" मुलगा !

"का.....ऽऽऽ.....य ?".......अर्थात मी !!

"विचार कधी येताय?" आजीच प्राँम्पटिंग

"क..ढी ऽऽऽऽ येतात?" ...मुलगा...! मी स्तब्ध ....!!
माझ्या हाताला घाम फुटतो, मोबाईल खाली पडतो आणि कट होतो!! रात्रभर डोळ्याला डोळा नाही.. ते नागड पोर.. बापाच्या उघड्या पोटावर त्याच्या उड्या...सर्वात महत्वाची बाब त्या बायकोची कौतुकाची नजर ... पण मी हरायला तयार नव्हतो दुस-या दिवशी मुद्दाम ऑफिस मधून उशीरा निघालो. त्या सिग्नल पाशी रिक्क्षा थांबणार होतीच... मी आता मुद्दाम वाकून बघितल... कालचाच माझा वेष..चाळीस हजाराचा ...कालचंच ते नागड पोर...कालचाच बाप...कालचीच ती त्याची स्वयंपाक करणारी बायको...आणि कालचीच तिची ती कौतीकाची नजर .... आता मी हरायला आलो होतो..रडू फुटायचं बाकी होत ..सारं काही कालच्या सारख... अगदी माझ्या मुलाचा फोन देखील... फरक फक्त एकच.... बायकोने फोन नाही केला.. आज सकाळीच निघताना सांगून निघाली होती "उशीर होईल म्हणून"....!!

मी आता हरलो होतो. विचार करून थकलो होतो..उत्तर अर्थात मिळतच नव्हत...आज तिसरा दिवस .. परत कालचाच प्रयोग करायचा ठरवला..परत उशीरा निघालो..परत रिक्क्षा ..परत सिग्नल....पण आज थोडा वेगळा प्रकार पाहिला...ते मूल कुठेतरी खेळताना पडल होत....मी मुद्दाम बघत होतो आता त्यांच्या कृतीकडे...तो बाप मूल पडल तसा उठून धावला ....मुलाने अर्थात भोकाड पसरल होत .... बापाने त्याचा पाय पाहिला.. बहुदा खरचटल असाव....त्याच्या बायकोच्या डोळ्यात आता कौतुक नव्हत...काळजी होती....बाप मुलाला कडेवर घेउन झोपडीत शिरला.. आणि पुढच्या क्षणाला बाहेर आला..माझ्या शिकून सवरून मिळवलेल्या नवश्रीमन्तीला दिलासा मिळत होता? त्याच्याकडे साध बँड एड सुद्धा नव्हत ..हळद देखील नसेल चिमूटभर लावायला ....मी थोडासा सुखावत होतो.. मी असतो तर?नक्कीच पटकन औषध केल असत....मिळवलेल्या पैशाचा उपयोग काय नाही म्हणा? पण हा आनंदही नाही टिकला...औषध नव्हतच त्यांच्याकडे..मूल तर भोकाड पसरून रडत होत... त्या बापाने त्याला हातात वर उंच धरल, आणि हवेत उडवल.... आणि हवेत झेलल...दोनच झेलात मूल हसायला लागल...दैव माझ्याकडे बघून फिदी फिदी हसल...बापाचा हाताच्या पाळण्यातच त्याच औषध होत.. आता मात्र मी हार लिहून दिली... चाळीस हजार आता नुसते दुखत नव्हते तर चांगलच जाळत होते. मी खिन्न झालो...रिक्क्षा पुढे गेली...
आता रिक्क्षा अंधेरीच्या सिग्नलला उभी होती. एक वळण घेतल की तीन मिनिटात घरात...बाजूला एक "बी एम डब्लू" येउन उभी होती.. अश्या गाड्या पहिल्या की नेहेमी येणारा एक फुकाचा विचार; "मला कधी आपल्या पगारात अशी गाडी घेता येईल काय ?" मी आत डोकावून बघितल..बहुदा मालकच चालवत असावा... त्याच्या ऐटीवरून तरी तसच वाटल...त्याच्याही बहुदा लक्ष्यात आल..मी लाळ घोटून बघतोय गाडीकडे... त्याने एका तुच्छ नजरेने पाहिल मला...मी जस पाहिल होत त्या गवंड्याकडे पहिल्या दिवशी...चाळीस हजाराचे कपडे घालून...

आणि एकदम मला हसू फुटल... दैवाच्या प्रश्नाला दैवानेच उत्तर दिले...मी तीन मिनिटामध्ये घरी पोहोचणार होतो..माझ्या मुलाकडे...हा किमान बोरिवलीला जाणार.. "बी एम डब्लू" असून सुद्धा आणखी तास कुठे गेला नाही ....हा हा उत्तर मिळाल..आणि मी सूड घ्यायचा ठरवला...दैवावर......!!

दुसऱ्या दिवशी लवकर ऑफिस मधून निघालो..पाच वाजता.. कुणाला काही बोललो नाही.... रिक्क्षा केली..बसल्या बसल्या मोबाईल मधली बॅटरी काढून टाकली.. बंगलोर वरून बॉसचा फोन येणार... पण दुसऱ्या दिवशी मारायची थाप आधीच ठरवली होती "मोबाईल हात से गीर गया .... बॅटरी बाहर आया ..बाद में फोन बिगड गया" .. रिक्क्षा त्या सिग्नल पाशी आली ..मी सवयीने वाकून पाहिलं , तिथ
झोपडीपाशी कोणी नव्हत; साधी बाब ..कामावरून परत आले नसणार ...आज लवकर निघालो त्यामुळे ट्राफिक ही नाही... झटपट घरी पोचलो...आई अवाक झाली ...इतक्या लवकर ? मी काहीच बोललो नाही. शर्ट काढून वॉशिंग मशीन मध्ये फेकला, पँट काढून वॉशिंग मशीन मध्ये फेकली (पट्ट्या सकट),बूट फेकले कपाटात....बनियन काढून फेकली....आंघोळीचा टॉवेल काढला ..कमरेला गुंडाळला...आणि पोराला खेचला...पोटावर ठेवला....आणि खो खो हसलो..... पोराला मजा वाटली...पोराने माझे नाक ओढल...मी परत हसलो.....आई माझ्याकडे वेड्यासारखा बघत होती.........

पण माझा चाळीस हजाराचा सूड पूर्ण झाला होता

– अतुल वेलणकर