Get it on Google Play
Download on the App Store

श्रीआनंद - अध्याय बारावा

श्रीगणेशायनम: ॥ सांगलीग्राम पुण्यक्षेत्र ॥ तेथें आनंदमूर्तीं पवित्र ॥
वस्ती करोन सत्पात्र । नाना चरित्रें दाखविलीं ॥१॥
एकदा भाद्रपद मासीं । शुद्ध द्वितीयेचे दिवशीं ॥
गोपाळस्वामी वडगांववासी । निघाले सांगलीस यावया ॥२॥
सवें रंगनाथ निधान । आवडीं केलें प्रयाण ॥
आज पुण्यतिथी म्हणोन । मार्ग क्रमिती तांतडी ॥३॥
मार्गांत झाली पर्जन्यवृष्टी । वेरळापूर भरला नेहटीं ॥
क्षण खोळंबून संकटीं । वेदानदी लंघिली ॥४॥
दोन घटिका झाली रात्र । भिलवडी सन्निध सत्पात्र ॥
भुवनेश्वरी स्थान पवित्र । आटोपिलें ते वेळीं ॥५॥
तेथें केला विचार । सांगलीस आज सत्वर ॥
पोहोंचावयाचा निर्धार । खूण अंतरीं समजणें ॥६॥
भोजनसमयावधी पथ । लक्षिती आमुचा आनंदसंत ॥
न पोंचावें तरी कृपावंत । उपोषण करिती निश्चयें ॥७॥
पायमार्गीं जावें सत्वर । तरी कृष्णा चालली महापूर ॥
वेरळेस तुंब पडला फार । कैसे पार होतसों ॥८॥
येथेंचि कृष्णेंत टाकूनि उडी । पोहून जळमार्गीं तांतडी ॥
जाऊन पोहचूं येचि घडीं । तरीच उत्तम गमतसे ॥९॥
यापरी बोलले श्रीरंग । कैसें जावें जळमार्गें ॥
येरू बोले नि:संगें । निर्भय व्हावें अंतरीं ॥१०॥
माझे कौपिनीस धरावें । स्वस्थ उदकांत पहुडावें ॥
स्वामी तारक स्वभावें । तारूनिया नेतील ॥११॥
घोडीं मनुष्य ठेऊन । नदींत पहुडले दोघे जण ॥
गोपाळजीची कौपीन । धरिली श्रीरंगनाथें ॥१२॥
पडले दोघे धारेस । सांगली सरळ चार कोस ॥
बाकानें नदी सहा कोस । विस्तार याचा वदतसे ॥१३॥
क्रोशार्ध पश्चिमवाहिनी । अंकलकोप - सन्निधानीं ॥
तेथोन दक्षिण कृष्नाजननी । तुंगापर्यंत क्रोशत्नय ॥१४॥
तेथून पूर्वेस क्रोशार्ध । वेदासंगम प्रसिद्ध ॥
तेथून सांगली सन्निध । सार्धद्वय कोश दक्षिणे ॥१५॥
एवं सहावर अर्ध जाण । असे साधू जलमार्गानें ॥
पाणोथ्यास येऊन । लाग्ले सांगली घटकेंत ॥१६॥
तये वेळीं आनंदमूर्ती । जेववोन ब्राम्हाणपंक्ती ॥
वाढप्या सहित स्नानाथीं । आले कृष्णा - तटाकातें ॥१७॥
प्रज्वलित दिवटया समीप भागीं । इतुक्यामाजि उभय योगी ॥
बाहेर निघतां तयांलागी । आनंदमूर्तींनीं देखिले ॥१८॥
केला साष्टांग प्रणिपात । पुसिलें ऐसें कां विपरीत ॥
येरीं कथिला सर्व वृत्तांत । प्रयाण - वेळे पासोनी ॥१९॥
आश्चर्य करिती संतोत्तम । केवढें कृत्य हे दुर्गम ॥
धन्य यांचा पराक्रम । गुरुकृपा पूर्ण संपादिली ॥२०॥
आश्चर्य पाहती श्रेष्ठ । सकळ होती विस्मयाविष्ट ॥
ऐसी करणी श्रुत दृष्ट । नेणों कधीं सहसाही ॥२१॥
जों जों वाढे संत महिमा । तवं तवं चढे भक्ति - प्रेमा ॥
निशिदिनीं भजती मंगल - धामा । श्रीरघुनाथा आवडी ॥२२॥
श्रीमन्महाराज छत्रपती । शिवाजीचा पुत्र सुमती ॥
राजाराम म्हणोनी ख्याती । वाखाणिती चहूंकडे ॥२३॥
गेले चंदी चंदावरा । मागें प्रळय एकसरा ॥
झाला तोचि अवधारा । विजापूर सुभ्याकडोन ॥२४॥
द्वादश सहस्त्र पठाण । क्रूर निष्ठुर पूर्ण ॥
तोफा पायदळ निर्दय जाण । सामान सरंजाम मजबूत ॥२५॥
बाण कैच्या उष्ट्रखाना । अश्वस्वार पीलखाना ॥
धडकत नौबती निशाणा । फडकती बहू जरीपटके ॥२६॥
महाराजाकडील सरदार । श्रीपतरावजी रणशूर ॥
पंतप्रतिनिधी महशूर । असते झाले राज्यांत ॥२७॥
त्यावरी अविंधांनीं फौज । रवाना केली बांधोनि पैज ॥
पंताजीस धरूनि मौज । द्दष्टी दावूं जनातें ॥२८॥
रायास कळतां समाचार । प्रस्थानभेरी ठोकिल्या सत्वर ॥
संगें बाराशें हे स्वार । सडे बादडे नरपागा ॥२९॥
बहिर अथवा बुणगें कांहीं । फौजेंत सहसा त्यांचें नाहीं ॥
फक्त सडे करोल कांहीं । एक दिल सर्वांचा ॥३०॥
रायगड पन्हाळेयास । यवनें घरोन दिधला त्रास ॥
हें समजोन पतास । कोपाग्नी ह्रदयीं धडकला ॥३१॥
शत्रुमुखावर आपुलें दळ । भिडोन केलें रण तुंबळ ॥
गलीमाची जमात प्रबळ । मोड झाला पंताचा ॥३२॥
तोंडें फिरविलीं माघारीं । पठाण शेर होऊनी भारी ॥
चढला पाठलागावरी । पंतें काढावा काढिला ॥३३॥
पुढें यांनीं पळावें । यवनें पाठी लागावें ॥
ऐसें करीत स्वभावें । एक महिना लोटला ॥३४॥
तवा तोबरा उतरती जेथें । लूट करोनि आणितो तेथें ॥
ओझें तिळमात्र घोडयावरतें । कोणी कांहीं न घेती ॥३५॥
बातमी राखून शत्रुची । तयारी नित्य दरकुचाची ॥
पुढें उमेद झुंजायाची । नाहीं राहिली फौजेंत ॥३६॥
डिग्रज सन्निधानास । तुंग कृष्णातटाकास ॥
तेथें पातले मुक्कामास । एके दिवशीम सायान्हीं ॥३७॥
यवना कडील फौजेचा । मुक्काम कलढोण मायणीचा ॥
ऐशी बातमी शोधल्याचा । कळला यांस मुक्कामीं ॥३८॥
चार क्रोश नित्य नित्य । जास्ती हे मजल चालत ॥
यास्तव अंतर पडलें बहुत । बारा कोसांचें तयांसी ॥३९॥
तुंग मुक्कामीं डेरे दिले । कोणी स्वयंपाक सिद्ध केले ॥
पंतांचेंही भोजन जाहलें । तोबरे दिधले घोडियांसी ॥४०॥
बाबाजी आणि शिवाजी डफळे । पंतांचे मानकरी पहिले ॥
शिलेदार एकांडे भले । रणशूर आणि प्रतापी ॥४१॥
ते शिष्य आनंदमूर्तींचे । दर्शन इच्छोन स्वामींचें ॥
स्नान करोन श्रीकृष्णेचें । वृंदावनीं पातले ॥४२॥
करून साष्टांग नमना । वृंदावनासी प्रदक्षिणा ॥
स्वस्प करोनी अंत:करणा । क्षणैक तेथें स्थिरावले ॥४३॥
आले तुंगास परतोनी । येतां देखिलें श्रीमंतांनीं ॥
पुसिलें स्वागतें करोनी । कोठें गेला होतां तुम्ही ॥४४॥
सर्वत्रांनीं भोजनें केलीं । तुमची पाकसिद्धी नाहीं जाहली ॥
येरीं प्रशंसा सांगितली । स्वामी श्रीगुरुनाथांची ॥४५॥
आमुचे गुरुंचे गुरुनाथ । कृष्णा - पुलिनीं श्रीरघुनाथ ॥
बृंदावनीं समाधिस्थ । ब्रम्हानाळा निकट पैं ॥४६॥
तेथें जाऊन स्नान करून । घेतलें पादुकांचें दर्शन ॥
आतांच आलों परतोन । भोजन करूं यावरी ॥४७॥
ऐसें प्रतिनिधीयें ऐकून । श्रीगुरुनिंदापर भाषण ॥
केलें डफळेस निखंदोन । कैचे गुरु वदतसां ॥४८॥
कलीमाजि देव विनायक । किंवा चंडी भवानी देख ॥
आम्ही शक्ति उपासक । अन्य देवास न मानूं ॥४९॥
जगदंबिका परमेश्वरी । निजभक्तांची सहकारी ॥
तेथें गुरुवासराची थोरी । काय कैसी वद्तसां ॥५०॥
गुरुनिंदेचें भाषण केलें । येरेंसी नाहीं सोसवलें ॥
नि:सीम गुरुभक्त हे भले । उत्तर केलें निष्ठुर ॥५१॥
इतर देवां ऐसा देव । नोहे माझा सद्‌गुरुराव ॥
सच्छिष्याच्या भक्तीस्तव । वृंदावनही डोलतसे ॥५२॥
सहस्त्रावधी पाषाण । घालोन रचिलें वृंदावन ॥
तैसेही डोलती, निधान । श्रीगुरु माझा दयाळू ॥५३॥
तैशा गुरूची निंदा । ऐकोन न सोसूं आम्ही कदा ॥
एक वेळ सोशिलें शब्दा । इत:पर ऐसें न वदावें ॥५४॥
आधींच युद्धप्रसंग भारी । हे तों मानकरी त्यावरी ॥
जमातीवर भिस्त भारी । सरदाराची सर्वथा ॥५५॥
ऐसें झालिया भाषण । पंत बोलले नम्र वचन ॥
तुमचे गुरूंचें वृंदावन । पाहूं कैसें डोलतें तें ॥५६॥
येथून आहे किती दूर । येरें कथिलें अर्ध कोसावर ॥
जवळीं असे कृष्णा - तीर । ब्रम्हानाळा सन्निध ॥५७॥
मग बोलिले ते पंत । थोरपणाच्या गोष्टी बहुत ॥
बोलतां परंतु उदयीक तेथें । जाऊन पाहूं वृंदावनीं ॥५८॥
डोल दृष्टी पडलिया । बरेंचि झालें नातरी सखया ॥
वृंदावनातें खाणोनिया । कृष्णेंत टाकूं निश्चयें ॥५९॥
ऐसे बोलले कठिणोत्तरीं । डफळे क्रोधावले भारी ॥
भाषण झालें बरोबरी । ते रात्र तेथें क्रमियेली ॥६०॥
प्रात:काळीं मोगलांची । बातमी आली दहा कोसांची ॥
गोष्ट आठवोन रात्रीची । पंत डफळेस बोलले ॥६१॥
तुमचे गुरूचें वृंदावन । पाहूं चला म्हणवोन ॥
तुंगाहून कुच करोन । ब्रम्हानाळा पातले ॥६२॥
येवोनि उतरले वृंदावनीं । रम्य स्थळ तें पाहूनी ॥
समाधान झालें मनीं । म्हणती उत्तम स्थळ असे हें ॥६३॥
छत्रपतींचा कोठीवाला । रक्तरोगें आथिला ॥
उदास होवोनी प्रपंचाला । गृह सोडिलें तयानें ॥६४॥
काम दिधलें आपल्या पुत्रा । आपण करीत तीर्थयात्रा ॥
फिरत फिरत या पवित्रा । स्थानासी तेणें लक्षिलें ॥६५॥
रोग - शमनाचा उपाय । कल्पून सेविले गुरुपाय ॥
एक वर्षपर्यंत पाहे । सेवा करीत राहिला ॥६६॥
पंतें तयास ओळखून । आणिला समीप बोलावून ॥
पुसते झाले वर्तमान । कैसें माहात्म्य येथींचें ॥६७॥
वाणियें कथिलें प्रतिनिधीसी । ब्राम्हाण - संतर्पणाचे दिवशीं ॥
किंवा कीर्तन - समयासीं । डोल होतो वृंदवनीं ॥६८॥
अथवा होतां वेदाध्ययन । हर्षें डोले वृंदावन ॥
विपरीत पंतें ऐकून । विचार केला अंतरीं ॥६९॥
संतर्पण या समयीं । करणेचा योग होणें नाहीं ॥
अथवा वेदाध्ययन तेंही । दुर्मीळ असे या घडी ॥७०॥
कीर्तन मात्र करावयास । मजलाच आहे अभ्यास ॥
त्यापेक्षां कर्तिनास । व्यवधान आतां न करावें ॥७१॥
ऐसा चित्तीं विचार करून । वेगें केलें कृष्णेंत स्नान ॥
सारिलें संध्या - जपध्यान । कीर्तन - उद्योग मग केला ॥७२॥
आणिला वीणा मृदंगटाळ । समागमें पावले सकळ ॥
श्रवणास भलें लोकमंडळ । प्रारंभ केला कथेसी ॥७३॥
गायनीं कीर्तनीं पंत सुगर । रंग जमला बहुत सुन्दर ॥
स्मरण भजन वारंवार । गर्दी उडविली कीर्तनीं ॥७४॥
कीर्तनप्रिय रघुराजमुनी । कथा झाली आनंदें करूनी ॥
रंग भरला कीर्तनीं । डोलूं लागलें वृंदावन ॥७५॥
तयेवेळीं डफळेयांनीं । डोलातें अवलोकूनी ॥
पंतप्रतिनिधी लागोनी । संकेतें तेव्हां सुचविलें ॥७६॥
पंत चित्तीं संशयाविष्ट । तयांचे प्रत्यया नये ती गोष्ट ॥
म्हणती मजला स्पष्ट । दिसोन नये खातरजमा ॥७७॥
मळीमध्यें भोपळे होते । आणोन वृंदावनावरूते ॥
ठेवितां सर्व पडती ते । डोल होतां सरसाची ॥७८॥
तरी ही संशयनिवृत्ती । न होय पंतांचे चित्तीं ॥
सर्व लोक साक्ष देती । डोल होतो म्हणोनि ॥७९॥
लष्करामाजि होते भाले । आणोन समाधीस लाविले ॥
घर्षण होऊं लागले । डोला सरसे एकमेकां ॥८०॥
दिसों आलें निर्मळ । फिटला चित्ताचा विटाळ ॥
अंतर धुवट प्रांजळ । पश्चाताप मग जाहला ॥८१॥
प्रेम - बाष्पें कंठ भरे । रोमांच अंगीं थरारे ॥
नेत्रीं प्रेमाश्रूंचे झरे । अभिषेक केला श्रीपदीं ॥८२॥
पडले साष्टांग दंडवत । मुखें त्राहे त्राहे म्हणत ॥
कृपासिंधू रघुनाथ । साक्षात्कार दाविला ॥८३॥
आजानु - बाहू दिग्गजपुरुष । द्विभुज आलिंगी समाधीस ॥
डोल होतां तयासरिसें । तदंग डोलूं लागलें ॥८४॥
पुन्हां उतरोन कीर्तन । करिते झाले घटिका दोन ॥
मग आरती करोन । कथा समाप्त पैं केली ॥८५॥
इतुक्यांत शत्नूची बातमी । आली भिलवडी ग्रामीं ॥
सर्वांचिया अंतर्यामीं । धाक पडोन गडबडले ॥८६॥
सर्वां चितीं पळोन जावें । पंत म्हणती ऐसें न करावें ॥
उसणें घाई झुंजावें । आतां नि:शंक होऊनी ॥८७॥
आलों सिद्धस्थानाप्रती । तेचि स्वामी कृपा करिती ॥
त्यांचें नाम धरितां चित्तीं । यशस्वी होऊं निश्चयें ॥८८॥
किती पळावें याचेपुढें । वांचोन कीर्ती काय जोडे ॥
अपर्थंशाचें सांकडें । निवारिता श्रीरघुनाथ ॥८९॥
जे आमुचे सांगाती । द्वादश शतांमाजि असती ॥
त्यांहीं आतां निश्चितीं । स्पष्ट बोलून निघावें ॥९०॥
एकचि दिल असा । भीड धरूं नका सहसा ॥
आम्ही वोपिलें देहग्रासा । काळाचिया दाढेसी ॥९१॥
निमालों स्वर्गवासा लागूं । त्यांस जिंकितां राज्य भोगूं ॥
आठवोनी ऐसा बुद्धियोगु । सिद्ध जाहलों रणागंणीं ॥९२॥
हें ऐकतांचि समस्त । हौनिया एकचित्त ॥
पादुकांवरील आपुल्या हस्तें । तुळशी उचलोन घेतल्या ॥९३॥
सर्व हौनी एक दिल । भोजन करून सिद्ध जाहले ॥
डंक्यावर टिपरूं पडलें । स्फुरण चढलें रणशूरां ॥९४॥
जय जय श्रीरघुनाथ । म्हणोन चढले घोडयावरुते ॥
सडे एकांडे बाराशत । भल्लस्वार घोडियांचे ॥९५॥
पठाणांचे लष्करांत । कोणी चुलीतें पेटवीत ॥
कोणी गेले बाजारांत । कोणी नदीस पैं गेले ॥९६॥
ऐसी झाली पांगापांग । इतुक्यांत पंतांनीं केला लाग ॥
हौनी निर्भय नि:संग । दीन सर्वीं गाजविला ॥९७॥
तया समयींची गडबड । बोलतां बहू अवघड ॥
पठाण सर्व झाले वेडे । कोणी घोडे सवरिती ॥९८॥
येरीं गपागप मारिले भाले । कितीएक यवन रणा आले ॥
कितीएक पळोन गेले । कितीएक शिरले नदींत ॥९९॥
ऐसी जाहली वाताहत । मग पंचवीस स्वारांसहित ॥
मुख्य सरदार निघोन त्वरित । जीव घेऊन पळाला ॥१००॥
हरिले नगारे निशाण । हत्ती घोडे बहुसाल धन ॥
पंतें दौलत लुटोन । जयवाद्य भेरी ठोकिल्या ॥१०१॥
ब्रम्हानाळ - मार्गें मागें फिरले । पंता अंतरीं एक सुचलें ॥
कारकून सांगलीस पाठविले । पालखी दिधली समागमें ॥१०२॥
तया कथिला अंत र्भाव । आनंदमूर्तींसी भेटावें ॥
सकळ वृत्त निवेदावें । घेऊनि यावें वृंदावनीं ॥१०३॥
ऐसें सांगोनि कारकुनासी । दिधलें धाडोन सांगलीसी ॥
आपण ब्रम्हानाळासी । येते झाले मुक्कामा ॥१०४॥
पुढें रसाळ आहे कथा । परिसावें गा सद्‌गुरुभक्ता ॥
आनंदचरितामृत ग्रंथा । अववानीं वाण न करणें ॥१०५॥
गोपाळतनय संतां प्राथीं । लडिघाळ आपुला विद्यार्थी ॥
श्रोते आपण कृपामूर्ती । सनाथ कीजे स्वामिया ॥१०६॥
आनंदचरितामृत ग्रंथ निर्मळ । बापानंद - विरचित प्रेमळ ॥
परिसोत साधू सकळ । द्वादशोध्याय गोड हा ॥१०७॥

॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

श्रीआनंद - चरितामृत

भगवान दादा
Chapters
श्रीआनंद - अध्याय पहिला श्रीआनंद - अध्याय दुसरा श्रीआनंद - अध्याय तिसरा श्रीआनंद - अध्याय चवथा श्रीआनंद - अध्याय पांचवा श्रीआनंद - अध्याय सहावा श्रीआनंद - अध्याय सातवा श्रीआनंद - अध्याय आठवा श्रीआनंद - अध्याय नववा श्रीआनंद - अध्याय दहावा श्रीआनंद - अध्याय अकरावा श्रीआनंद - अध्याय बारावा श्रीआनंद - अध्याय तेरावा श्रीआनंद - अध्याय चवदावा श्रीआनंद - अध्याय पंधरावा श्रीआनंद - अध्याय सोळावा श्रीआनंद - ओव्या श्रीआनंद - निर्याणाचे श्लोक श्रीआनंद - पद १ श्रीआनंद - पद २ श्रीआनंद - अभंग श्रीआनंद - भूपाळी १ श्रीआनंद - भूपाळी २ श्रीआनंद - भूपाळी ३ श्रीआनंद - भूपाळी ४ श्रीआनंद - भूपाळी ५ श्रीआनंद - भूपाळी ६ श्रीआनंद - स्फुट पदे श्रीआनंद - विशेष