Get it on Google Play
Download on the App Store

पावसाळ्याचा एक दिवस : १० राजांचे युद्ध

- अक्षर प्रभू देसाई

पाऊस आणि माणूस ह्याचे अजब नाते आहे. मेघदूताची सुरुवात कालिदास "आषाढस्य प्रथम दिवसे... " म्हणून करतो आणि त्यानंतर एक अजरामर प्रेम कथा लिहितो. चातक पक्षी आणि त्याचे पर्जन्यप्रेम ह्याला अलंकारिक दृष्टीने वापरून अनेक लेखकांनी प्रेमी युगुलांचे वर्णन केले आहे. मे महिना संपायला आला कि सारे न्यूस चॅनेल शुष्क जमिन आणि लंगोट घातलेला शेतकरी पावसाची वाट पाहतोय अश्या प्रकारची चित्रे दाखवू लागतात. पावसाची पहिली सर कोसळली कि सगळीकडे उल्हासाचे वातावरण दाखवले जाते. लहान मुले पावसांत बागडतात, शेतकरी आनंदित होतो तर आजूबाजूचे वातावरण हिरवा शालू घालून नटू लागते. दूरदर्शनवर टीप टीप बरसा पाणी म्हणत रविना नाचू लागते.

पण प्रेमात लोक पडतात, उठत नाहीत. दिव्याच्या वातीला प्रेमिकेचे विभ्रम समजणार कीटक आलिंगन देतात आणि भस्म होऊन जातात. चातक पक्षी पाऊस पडल्यानंतर काय करतो ह्याचे विशेष वर्णन कुणीही करत नाही. पावसांत नाचल्यानंतर प्रेमी लोक नंतर कुठे जाऊन कपडे बदलतात .मी त्यांना न्यूमोनिया वगैरे होत नाही का ह्यावर कुणीही  जास्त उलगडा करत नाही. पाऊस कितीही पडला तरी भारतीय शेतकरी काही श्रीमंत होत नाही. उलट पाऊस म्हटले कि मुंबई सारख्या शहरांत लोकांच्या उरांत धडकी भरते. आमच्या देशांत पाणी वाहून जाण्यासाठी गटार व्यवस्था सर्वांत शेवटी हरप्पा मोहेंजोदारो मध्ये बांधली गेली होती. ज्याप्रमाणे शून्याचा शोध लावल्यानंतर हल्ली भारतात कुठलाही इतर महत्वाचा गणिती शोध लागला नाही त्याच प्रमाणे हरप्पा मोहेंजोदारो नंतर आमची कुठलीही शहरे पाणी वाहून जाण्यासाठी गटारे वगैरे  व्यवस्थित बांधण्याच्या भानगडीत पडली नाही. पाणीच ते, कसे ना कसे तरी वाहून जायचेच. आकाशे पतितम तोयं समुद्रम प्रति गच्छति हा निसर्ग नियमच आहे, त्याला हातभार लावण्यासाठी गटारे वगैरे बांधून कशाला उगाच निसर्गाच्या कामांत आपण लक्ष्य घालायचे असे आमच्या नगरपालिकांचा विचार असावा.

पाऊस हा सर्वांसाठीच चांगला नसतो. पाऊस म्हटले कि अपघात आलेच. रस्त्यावर गाड्यांचे अपघात, समुद्रांत बोटीचे अपघात, तर नदी, समुद्रकिनाऱ्यावर लोकांचे अपघात हे होतातच. मुंबईत तर पाऊस मोठा पडला कि घरी असलेल्या सर्वच मंडळींच्या उरांत प्रियजनांच्या काळजीने जीव वर खाली होत असतो. धरण वगैरे ज्या भागांत असतात तिथे धारण भरले कि पाणी सोडले जाते आणि सुकलेल्या नदीच्या पात्रांत कोणी असेल तर वाहून जातो. पाऊस नाही पडला तर गरमीने गरीब लोक त्रस्त होतात तर पाऊस पडायला लागला कि भिजून गरीब लोक त्रस्त होतात. पाऊस पडायला लागला कि आपल्या झोपडीचे छप्पर कुठे कुठे फाटले आहे हे लक्षांत येते. मग धडपड करून ते झाकायची तयारी सुरु होते. काही ठिकाणी दरडी कोसळतात तर काही ठिकाणी अक्खी घरे पावसाच्या माऱ्याने कोसळतात. शेवटी अजापुत्रं बलिं दद्यात् न्यायाने किंवा ममता बॅनर्जींच्या भाषेंत सांगायचे तर गरीब लोकांचा सर्वत्र बांबू लागतो.

वरुण हा पावसाचा देव. हा देव आणि आम्हा भारतीयांचे नाते पावसाप्रमाणेच कभी ख़ुशी कभी गम प्रमाणे आहे.  वरुण हा खरे तर इराण मधील देव तर इंद्र हा आम्हा भारतीय लोकांचा देव. दोघांत विस्तव जात नसे. भारतीय लोक इंद्र किती पावरफुल आहे ह्यावर लिहीत असत तर ईराणी लोक त्यांचं प्रमाणे वरून देवाचा उदो उदो करीत असत. मुळात इराणी भाषेंत "देव" शब्द म्हणजे राक्षस असा अर्थ होत असे तर "असुर" ह्या शब्दाचा अर्थ देव असा होत असे. पारसी लोकांचा देव म्हणूनच अहूर माझदा आहे. स चा उच्चार इराणी भाषेंत ह असा होतो. पण काळाच्या ओघांत  शेवटी इराणी लोकांना भारतांत आसरा घ्यावा लागला आणि हळू हळू वरूण हा देव ज्या प्रमाणे बॅटमॅन बरोबर रॉबिन असतो त्याप्रमाणे इंद्राबरोबर देव म्हणून राहू लागला.

ह्याची कथा सुद्धा मजेशीर आहे आणि पावसाळ्याचा तो दिवस कदाचित भारतीय इतिहासातील सर्वांत महत्वाचा दिवस असावा. हि कथा ऋग्वेदातील आहे. कथा असली तरी इतिहासकारांच्या मते हि खरी ऐतिहासिक घटना होती. ह्या कथांतील जमाती आज सुद्धा इराण मध्ये आहेत.  तृत्सु ह्या भारतीय जमातीचा राजा त्या काळी सुदास हा होता. ह्याचे गुरु वसिष्ठ. ह्याचे राज्य रावी नदीच्या किनाऱ्यावर होते. तर अनु, अलिन, भ्रिगु, भलान, धृयु, मत्स्य, परसू, पुरु, पाणी  ह्या एकूण नऊ जमाती रवी नदीच्या दुसऱ्या वाजूला म्हणजे आजचा अफगाण, इराण ह्या बाजूला होत्या. ह्यातील अनु ह्या जमातीचे गुरु होते विश्वामित्र. दोन्ही बाजू मध्ये अनेक मतभेद होते पण अगदीच वैमनस्य होते असेही नाही. त्यांच्यात लग्न वगैरे संबंध होत असत, ते एकमेकांना भेटत असत. पण वसिष्ठ ह्यांच्या मते ह्या जमाती जादूटोणा इत्यादी करतात आणि त्यामुळे भारतवर्षांत त्यांचे आगमन होणे बरोबर नव्हते. तर विश्वामित्र ह्यांच्या दृष्टीकोनातून ते जास्त शक्तिशाली असल्याने निव्वळ बळाने ते सुदासला हरवू शकत होते.

इथे विश्वामित्र, वसिष्ठ, जमदग्नी हे नेहमीचे एक ऋषी नसून एक जमात किंवा परंपरा आहे. ज्याप्रमाणे आम्ही वारकरी म्हणून पंढरीला जाणार्या विठ्ठल भक्तांना संबोधितो त्या प्रमाणे.

एका दृष्टीने वरूण आणि इंद्र ह्यांतील हा संघर्ष होता. एक दिवस विश्वमित्र राजा सुदासला सिंधू नदी पर्यंत जाऊन आपले राज्य प्रस्थापित करायला मदत करतात. त्या आनंदात सुदास एक प्रचंड यज्ञ घालतो आणि ह्या यज्ञांत विश्वामित्र, वसिष्ठ आणि जमदग्न्य परंपरेतील ऋषी येतात. त्यांचा काही तात्विक मुद्यावर प्रचंड वाद होतो आणि ह्या वादांत जमदग्न्य मंडळींना बराच मार झेलावा लागतो. म्हणून जमदग्न्य सुदासला भयंकर शाप देऊन निघून जातात. हा शाप इतका भयंकर असतो कीं नंतर सर्व पुराणात जमदग्नी ऋषी हे अत्यंत कोपिष्ट दाखवले गेले आहेत. पण त्यांच्या कोपाचे मूळ ह्याच कथेत आहे.

ह्याच वादाने विश्वामित्र आणि वसिष्ठ ह्यांच्या मध्ये सुद्धा दुरी निर्मान होते आणि शेवटी त्याचे पर्यावसन ९ जमाती विरुद्ध सुदास अश्या युद्धांत होते. आता ह्या युद्धाच्या निकालाचा संपूर्ण भारतीय इतिहासावर प्रचंड प्रभाव पडतो. कारण विश्वामित्र जिंकले तर त्यांची विचारसरणी आणि वरून देवतेची उपासना वेदोत्तर काळांत झाली असती तर सुदास जिंकला तर इंद्र देवाची महती वाढली असती. त्याशिवाय वसिष्ठ अन विश्वामित्र ह्यांच्यांत योग, मोक्ष ह्या विचारांतील जे मतभेद होते त्यातील कुठलीही एक बाजू जिंकली असती. वसिष्ठ आणि विश्वामित्र ह्यांतील वैर इतके प्रचंड होते कि विश्वामित्र ह्यांनी वसिष्ठ ह्यांचे १०० पुत्र मारले होते आणि काही दानव पाठवून फसवून वसिष्ठ ह्यांना मांस खायला भाग पडले होते.

युद्ध सुरु होते तेंव्हा सुदास चा पराभव निश्चित होता. ९ जमाती मध्ये अपरंपार सैन्य तर सुदासचे सैन्य मोजकेच होते. युद्ध रावी नदीच्या पात्राच्या जवळ सुरु होते. प्रचंड मोठ्या सैन्याला सुदास चे सैन्य भिडते आणि रणकंदन माजते.सुदासचे लोक मारले जाऊ लागतात. इतक्यांत वसिष्ठ इंद्र देवाचे आवाहन करतात आणि पाऊस पडू लागतो. पाऊस इतका प्रचंड असतो कि नदीच्या पात्राची पातळी अचानक वाढते आणि नदी च्या पात्रांत असलेले प्रचंड सैन्य वाहून जाते. सुदास ह्यांतून वाचतो पण इतर ९ जमातीचे जवळ जवळ सर्व लोक वाहून जातात. ह्या युद्धाची हानी इतकी मोठी असते के पुन्हा ह्या ९ जमाती सुदास वर हल्ला करायच्या नादात पडत नाहीत उलट सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा हार मानून मूळ "भारत" संस्कृतीशी एकरूप होतात.

हीच कथा काही प्रमाणात अवेस्ता ह्या पारसी ग्रंथात आढळते. अवेस्ता हा प्राचीन ग्रंथ असला तरी रिगवेदाच्या सर्वांत जुन्या ऋचा पेक्षा जुना नाही. अवेस्ता प्रमाणे त्यांच्या लोकांचा उगम ऐरण्या वेजः ह्या भागांत झाला. हे लोक म्हणजे रिग्वेदांतील अनु जमात. अवेस्ता प्रमाणे ह्या लोकांनी आधी पंजाब (तेंव्हाचा हप्त हिंदू) आणि नंतर अफगाणिस्तानच्या दिशेने कूच केले.

सुदासला युद्धांत कावासा आणि कवी चायमन ह्या दोघांशी युद्ध करावे लागले होते. पण अवेस्तांत ह्या दोन्ही लोकांना एकाच मानून कवी कावासा म्हटले आहे. आणि हाच कवी कावासा अवेस्तान राजघराण्याची स्थापना करतो. पुढे इराण मध्ये पारसी हा नवा धर्म उगम पावतो.

आज काल आम्ही पारसी लोकांना बाहेरचे लोक समजतो पण प्रत्यक्षांत पारसी लोक मूळ भारतीयच आणि अगदी रिग्वेदकालीन भारतीय आहेत. त्यांनी भारतात आश्रय नाही घेतला तर उलट ते माघारी घरी आले असेच आम्ही समजू शकतो.

पण त्याचे वेळी त्या एका दिवशी जो पाऊस पडला त्यामुळे संपूर्ण भारतवर्षाच्या इतिहासाला वेगळे वळण लागले. त्यानंतर पुराणे, इतिहास, स्मृती जे काही लिहिले गेले त्यावर ह्या युद्धाचा परिणाम जाणवतो.