Get it on Google Play
Download on the App Store

संपादकीय

दोन महिन्यांपूर्वी आयपीएलने सर्वांचे मनोरंजन केले. मनोरंजनाच्या या खेळामध्ये अनेक कंपन्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपले हात धुवून घेतले. कोणताही संघ जिंको, खऱ्या अर्थाने नफा हा अनेक कंपन्यांना होत असतो. यात वाईट काहीच नाही. जगभरात अनेक ठिकाणी मंदीचे वातावरण असताना असा एखादा खेळ येतो आणि सर्व स्तरांवर मनोरंजन करतो, तेव्हा कुठेतरी रोजगार उपलब्ध होत असतो. माझे हे बोलणे व्यवसायाशी संबंधित होते, खेळाशी नव्हे.

आता मूळ विषयाकडे वळूया, आपल्या देशामध्ये खरंच क्रिकेटला एवढे महत्व का असावे? हॉकी, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो असे बरेच खेळ आहेत की, प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आवडीनुसार जो-तो खेळ आवडत असतो, आपल्या देशामाधेय फुटबॉलचा देखील मोठा चाहतावर्ग आहे. आता तर सुनील छेतरीच्या रूपाने एक चेहरा देखील मिळाला आहे. कधी नव्हे ते काही दिवसांपूर्वी भारताच्या फुटबॉल सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती. सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, सानिया मिर्झा, मेरी कोम, अभिनव बिंद्रा, फोगट भगिनी, साक्षी, सुशीलकुमार यांच्यासह सर्व विजेत्यांचे मेडल मिळाल्यावर जंगी स्वागत केले जाते. शासनाकडून या खेळाडूंना भरघोस बक्षिसे दिली जातात. तरीही हे सर्व बाजूला ठेवून आपण पुन्हा क्रिकेट सामना पाहू लागतो.

यात दोष कुणाचाही नाही, जसे युरोपीय देशांमध्ये फुटबॉल, अमेरिकेत बेसबॉल हे खेळ सहज समजून घेता येतात, तसा आपल्या देशामध्ये क्रिकेट हा खेळ कोणत्याही वयातील व्यक्ती सहज समजून घेऊ शकतो. हा खेळ फक्त ग्राउंडवरच नव्हे, तर गल्ली, गच्ची, रस्त्यावरदेखील मनमुरादपणे खेळता येतो. इथे आसपासच्या गोष्टींनुसार सहज पटतील असे नियम बनवता येतात. जसे वन-डी, टू-डी. दोन खेळाडूंपासून ते २२ खेळाडू एकावेळी खेळू शकतात. एक खेळाडू कमी झाला तरी विशेष काही फरक पडत नाही. या तुलनेत इतर खेळ समजायला आणि खेळायला जरा कठीण जातात. जसे बॅडमिंटन एकाच वेळी जास्तीत जास्त ४ सक्रिय खेळाडू खेळू शकतात. फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉलसाठी विशिष्ट मैदान आवश्यक असते. हॉकीसाठी प्रत्येकाच्या हातात स्टिक? कबड्डी आणि खो-खो मध्ये पुन्हा खेळाडूंची संख्या समोर येते.

कारण हेच आहे. म्हणून आपल्या देशात इतर खेळ समजून घ्यावे लागतात, आणि क्रिकेट सहज अनुभवता येतं. या एका खेळाचा अतिरेक होतोय हे मान्य करायला हवे. पण मोबाईलला चिकटलेली हल्लीची पिढी जर मैदानावर जाऊन शारीरिक खेळ खेळत असेल आणि तो खेळ जर क्रिकेट असेल तर यात मला गैर काहीच वाटणार नाही.

लोभ असावा.

धन्यवाद!

अभिषेक ज्ञा. ठमके

संपादक