Get it on Google Play
Download on the App Store

सुंदर पत्रे 38

परवा झोप येईना म्हणून मी आरामखुर्ची बाहेर टाकून एकटाच पडलो होतो. आकाश स्वच्छ होते. निळ्या-काळ्या आकाशातील तारे धुतल्यासारखे स्वच्छ दिसत होते. सर्वत्र शांत होते. मी आकाशात पाहात होतो. ता-यांचे मुके सकंप संगीत अनुभवीत होतो. वेदामध्ये वरुण ही आकाशाची देवता आहे. वरुण म्हणजे आच्छादन घालणारा. हा आकाशाचा देव पुढे समुद्राचा कसा झाला कोणास कळे. वेदांत वरुण ही नीतीची देवता आहे. ता-याच्या हजारो डोळ्यांनी तो तुमच्याकडे बघत आहे असे वर्णन येते. मला त्या वर्णनाची परवा आठवण झाली. जणू विराट विश्वंभर बघत आहे असे वाटले. ते सहस्त्र डोळे माझ्या जीवनात घुसत आहेत असे वाटले. मी घाबरलो. आपले सारे जीवन कोणी बघावे असे आपणास वाटत नाही. जीवनात नाना खळमळ असतात. दडून राहिलेल्या शेकडो गोष्टी. वरून रंगीत दिसणारे कृत्रिम फळ आत मातीचे वा शेणाचे असते. मी डोळे मिटले आणि उठून घरात आलो. केव्हा मग झोप लागली कळलेही नाही. उठलो तो मन शांत होते. झोप म्हणजे जणू अमृत, नवजीवनदायी अमृतांजन! विश्वमातेचा प्रेमळ हात ! झोपेचा केवढा उपकार! परंतु झोप म्हणजे लहानसे मरण. मोठी झोप म्हणजे मोठे मरण ! म्हणून मरणाचाही उपकार ! मरणही सुंदर, जीवनही सुंदर ! गंमत.

सुधामाई, तू म्हणशील अण्णा लिहितो ते सारे कळतही नाही. न कळू दे. रवीन्द्रनाथांनी म्हटले आहे की, मुलांसाठी लिहाल त्यात काही समजणारे असू दे, काही न समजणारे. जे समजेल त्याच्या आधाराने न समजणा-याकडे त्यांची विचारशक्ती उडी मारील !

तुम्ही कोकणात या हां. करवंदीच्या जाळया शोधू. काळयाभोर जाळी. सोमेश्वराच्या देवळाजवळ केवढाल्या जाळ्या. ती काळी करवंदे खाऊ. मध्येच एखादा साप फण् करीत जाईल. जरा घाबरू; परंतु पुन्हा गंमत करू, हसू. कोकिळा हाका मारील, आपणही कुऊ करू. तुम्ही याल तर चार दिवस निसर्गाचा आनंद लुटू. सर्वांस प्रणाम ! चि. प्रिय अरुणास दोन करवंदी चिमटे.


अण्णा

साधना, ६ मे १९५०

सुंदर पत्रे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सुंदर पत्रे 1 सुंदर पत्रे 2 सुंदर पत्रे 3 सुंदर पत्रे 4 सुंदर पत्रे 5 सुंदर पत्रे 6 सुंदर पत्रे 7 सुंदर पत्रे 8 सुंदर पत्रे 9 सुंदर पत्रे 10 सुंदर पत्रे 11 सुंदर पत्रे 12 सुंदर पत्रे 13 सुंदर पत्रे 14 सुंदर पत्रे 15 सुंदर पत्रे 16 सुंदर पत्रे 17 सुंदर पत्रे 18 सुंदर पत्रे 19 सुंदर पत्रे 20 सुंदर पत्रे 21 सुंदर पत्रे 22 सुंदर पत्रे 23 सुंदर पत्रे 24 सुंदर पत्रे 25 सुंदर पत्रे 26 सुंदर पत्रे 27 सुंदर पत्रे 28 सुंदर पत्रे 29 सुंदर पत्रे 30 सुंदर पत्रे 32 सुंदर पत्रे 33 सुंदर पत्रे 34 सुंदर पत्रे 35 सुंदर पत्रे 36 सुंदर पत्रे 37 सुंदर पत्रे 38 सुंदर पत्रे 39 सुंदर पत्रे 40 सुंदर पत्रे 41 सुंदर पत्रे 42 सुंदर पत्रे 43 सुंदर पत्रे 44 सुंदर पत्रे 45 सुंदर पत्रे 46 सुंदर पत्रे 47 सुंदर पत्रे 48 सुंदर पत्रे 49 सुंदर पत्रे 50 सुंदर पत्रे 51 सुंदर पत्रे 52 सुंदर पत्रे 53 सुंदर पत्रे 54 सुंदर पत्रे 55 सुंदर पत्रे 56 सुंदर पत्रे 57 सुंदर पत्रे 58 सुंदर पत्रे 59 सुंदर पत्रे 60 सुंदर पत्रे 61 सुंदर पत्रे 62 सुंदर पत्रे 63 सुंदर पत्रे 64