Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १: आम्रखंड

"लेका, अरे आहेस कुठे? किती वेळ झाला तुझा फोन ट्राय करतोय. लवकर ये चल. आज दुपारी अभिजीत जेवायला येतोय." मनोहरचे बाबा लक्ष्मण फोनवर बोलू लागतात.

"अहो, सकाळीच म्हणालो होतो ना! आपल्या कारखान्याजवळ एका गावात जागा बघण्यासाठी जातोय म्हणून. इथे रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे." मनोहर बोलू लागतो.

"ते ठीक आहे. काम आटोपून लवकर ये. अभिजीत जेवायला येतोय. येताना आम्रखंड घेऊन ये." लक्ष्मण बाबा बोलतात.

"त्या पंडिताला काही कामधंदे नाहीत, तुम्ही त्यालाच सांगा आम्रखंड आणायला. इथे मी एका कामासाठी आलो आहे." मनोहर म्हणतो.

"भावाबद्दल असं बोलतात का?" लक्ष्मण बाबा.

"भाऊ कसला, येऊ द्या त्याला. त्याने काय करामती केल्या आहेत हे तुम्हाला माहित नाही. तो आला की तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला काय, तो जे करतो तेच तुम्हाला बरोबर वाटणार." मनोहर.

"पुरे आता, त्याने फोन करून सांगितलं आहे, आम्रखंड पाहिजे म्हणून, काम झालं की लवकर ये. मी बाजारात जातोय." एवढं बोलून लक्ष्मण बाबा फोन ठेवून देतात.

फोनवर बोलून झाल्यावर मनोहर आलेल्या गावी कारखान्यासाठी नवी जागा बघू लागतो. जागेचा व्यवहार लवकरात लवकर व्हावा यासाठी तो सकाळीच घरातून निघाला होता, पण दुपार झाली तरी त्याला मनासारखी जागा मिळाली नव्हती, आणि आता लहान भाऊ त्याला भेटायला आल्याने तो जागा बघण्याचा उर्वरित कार्यक्रम दुसऱ्या दिवसावर ढकलून घराच्या दिशेने आपली गाडी वळवतो.

कर्जत येथे मनोहरचा बॅग बनवण्याचा व्यवसाय असतो. टिकाऊपणा आणि सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवत त्याने विविध प्रयोग करून नाविन्यपूर्ण बॅग तयार केल्या होत्या. जीपीएस, मोबाईल चार्जर, पाणी-आग प्रतिबंधक, आकर्षक डिझाईनस् अशा अनेक सुविधांमुळे त्याच्या बॅगस् अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मनोहरच्या बॅगांना भारतासह परदेशातून देखील चांगलीच मागणी आली होती. अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपनीसोबत करार केल्याने त्याला आपल्या बॅगा विकणे सोपे जात होते. दोन दिवसांपासून त्याच्या बॅगांना चांगलीच मागणी येऊ लागली होती. मागणीपुढे उत्पादन कमी पडू लागल्याने त्याला आपल्या कारखान्यासाठी नवी जागा घ्यायची होती. जेणेकरून मोठ्या प्रमाणात बॅग बनवता याव्या. पण त्याला मनासारखी जमीन मिळत नव्हती.

काही वर्षांपूर्वी मनोहरचे बाबा सरकारी कर्मचारी होते. ठाणे येथे ते पत्नी आणि दोन मुलांसह निवासी वसाहतीत राहत. पत्नी शिक्षिका होती. लहानपणापासून मनोहरला बॅग बनवण्याची आणि अभिजीतला गायनाची आवड होती. ग्रामीण राहणीमान आवडत असल्याने लक्ष्मण बाबांच्या निवृत्तीनंतर मनोहरने ठाणे सोडले व आई-वडिलांसह कर्जत येथे येऊन राहू लागला. अभिजीतला कार्यक्रमाच्या वेळा सांभाळण्यासाठी डोंबिवली येथे घर घ्यावे लागले. मनोहरने बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण केले आणि युनिक बॅग बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. आधी शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी बॅग बनवत त्याने चांगलाच जम बसवला. नंतर त्याने प्रयोग करायला सुरुवात केली. जसे की, मोबाईल चार्जर, सोलर चार्जर, मुलींसाठी जीपीएस आणि बरेच काही. हळहळू नोकरदार वर्ग आणि गिर्यारोहकांकडून मागणी वाढत गेली तसा त्याने स्वतःचा बॅग बनवण्याचा कारखाना सुर केला. आज मनोहर लक्ष्मण फडके कर्जत येथील प्रतिष्ठीतांपैकी एक आहे आणि अभिजीत लक्ष्मण फडके एक नावाजलेला गायक आहे.

आम्रखंड घेऊन मनोहर घरी पोहोचतो ते त्याला अभिजीतची गाडी आधीपासून पार्क केलेली दिसते. घरात प्रवेश करताच त्याच्या कानांवर अभिजीतचे सुर पडतात. लक्ष्मण बाबा आणि आईंना तो आपल्या नव्या कार्यक्रमाचे गीत ऐकवत होता. अभिजीत गाण्यात इतका हरवून गेला होता की, मनोहर कधी त्याच्या बाजूला येऊन बसला हे त्याला कळलं देखील नाही.

"दादा, कधी आलास?" अभिजीत.

"तू गात होतास तेव्हाच आलो, तुला थांबवावंस वाटलं नाही. ऐकतच रहावसं वाटलं." मनोहर म्हणतो.

"माझ्या नवीन कार्यक्रमाचे गीत आहेत. म्हटलं, आधी आई-बाबांना ऐकवू." अभिजीत म्हणतो.

"खूप छान लेका, तुझ्या गळ्यात सरस्वती, घरात लक्ष्मी आणि मनात साक्षात गणेशजी आहेत, म्हणूनच पद्मश्री मिळून देखील तुझे पाय जमिनीवरच आहेत. इतका मोठा झालास तरी नवीन गीत सर्वात आधी मला ऐकवायचं कधीच विसरला नाहीस." लक्ष्मण बाबा डोळ्यातील अश्रू पुसत बोलतात.

"असं काही नाही बाबा, मला आवडतं तुम्हाला ऐकवायला आणि तुमच्या तोंडून माझी स्तुती ऐकायला." अभिजीत म्हणतो.

"ते सर्व ठीक आहे, प्रेमाचे बोल थांबवून तुम्हाला जमलंच तर या पंडिताला जरा समज द्या. पद्मश्रीचा गैरवापर करतोय तो." मनोहर अभिजीतच्या डोक्यावर हळुवार टपली मारत म्हणतो.

"मी? आणि पद्मश्रीचा गैरवापर? छे, काहीतरीच." अभिजीत.

"हो. परवा इटलीमध्ये जाऊन काय ओकून आलास सांगशील का?" मनोहर विचारतो.

"नाही, मला नाही समजलं." अभिजीत म्हणतो.

"मी सांगतो, हा एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून इटलीला गेला होता. गेला ते ठीक आहे, याच्या अंगात कमी मस्ती नाही. तिथे कार्यक्रमात मी बनवलेली बॅग घालून वावरू लागला. आता एवढा मोठा माणूस बॅग घेऊन का वावरतोय हे तिथली माणसं विचारणारच ना! तर तो कार्यक्रम बाजूला ठेवून तिथल्या सर्वांना बॅगेबद्दल माहिती देऊ लागला. सोबतच माझा नंबर सुद्धा दिला. आता इटली मधून दोन दिवसांत ४०० बॅगांची ऑर्डर आली आहे. बॅग बनवायला वेळ लागणार म्हणून ते लोक थांबायला तयार आहेत. पण या माणसाला उगाच नको तो शहाणपणा करायला कोणी सांगितलं? म्हणून मी कालपासून नवीन कारखान्यासाठी जागा शोधतोय." मनोहर म्हणतो.

"काय रे अभिजीत, खरं आहे का हे?" लक्ष्मण बाबा विचारतात.

"हो, म्हणजे मला असंच सांगावंसं वाटलं. आपण नवीन काही घेतलं ते आपल्या मित्रांना सांगत नाही का? तसंच मी तिथल्या लोकांना सांगितलं. पण तिथले लोक लगेच बॅग ऑर्डर करतील असं मला वाटलं नव्हतं." अभिजीत स्वतःला सावरत म्हणतो. बोलता बोलता तो हळूच मनोहरच्या हातातला आम्रखंडचा डब्बा काढून घेतो.

"अरे, लोक मित्रांना सहज भेटल्यावर जे असेल ते सांगतात. तुझ्यासारखी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगत नाहीत. तू जे काही केलंस ते मला आवडलं नाही." मनोहर म्हणतो आणि अभिजीतच्या हातून आम्रखंड हिसकावून घेतो.

"पण जर अभिजीत तुझ्या बॅगबद्दल काही चांगलं बोलला असेल तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे?" लक्ष्मण बाबा विचारतात. अभिजीत पुन्हा आम्रखंड घेतो आणि आता खाऊ लागतो.

"हा विचार मी दिल्ली, बंगलोर, फ्रान्स आणि मलेशियाच्या वेळी केला होता, पण आता वाटतंय, मी माझ्या बॅग विकण्यासाठी याचा वापर करतोय, जे मला पटत नाही." मनोहर म्हणतो.

"तू डोक्यातून असे विचार काढून टाकशील का? भाऊ भावासाठी एवढं नाही करू शकत का?" अभिजीत म्हणतो.

"बाबा, आता तुम्हीच याला समजवा." एवढं बोलून मनोहर अभिजीतच्या हातून आम्रखंडचा डबा घेऊन तिथून निघून जातो.

"जा बाळा, मोठ्या भावाची समजूत काढ." लक्ष्मण बाबा म्हणतात.

"हो, म्हणजे तो आम्रखंड घेऊनच गेला आहे." बोलत अभिजीत सुद्धा निघतो. अभिजीतला माहित असतं मनोहर कुठे आहे ते. राग आला की मनोहर बागेतील पाळण्यावर जाऊन बसतो.

"रागावला आहेस का?" मनोहर फक्त अभिजीतकडे रागाने बघतो. "बरं, आता मी तरी काय बोलणार? तुला वाटतं मी काही चुकीचं केलं, तर ठीक आहे. पण तू आणि आई-बाबांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यापुढे हे काहीच नाही. बाबांनी एका अनाथ मुलाला स्वतःच नाव दिलं आणि तुम्ही तिघांनी मनात कुठल्याही प्रकारचा परकेपणा न ठेवता मला तुमच्या कुटुंबात घेतलं. एका अभिजीतला तुम्ही अभिजीत लक्ष्मण फडके नाव दिलंत, यापुढे मी जे करतो ते काहीच नाही ना!" अभिजीत म्हणतो.