Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

उर्वशी


उर्वशी व पुरूरवा यांचे राजा रविवर्मा यांनी काढलेले तैलचित्र.

उर्वशी ही इंद्राच्या दरबारातील सर्वात सुंदर गणली जाणारी अप्सरा होती.

हिंदू पौराणिक कथांनुसार नर व नारायण हे हिमालयात उग्र तपश्चर्येला बसले होते. त्यांच्या तपश्चर्येने आपले इंद्रपद डळमळते आहे अशी भीती वाटल्याने इंद्राने आपल्या दरबारातील अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्यासाठी पाठवले. इंद्राचा कावा लक्षात आल्याने संतापलेल्या या ऋषींनी आपल्या मांडीवर थाप मारली व त्यातून इंद्राच्या दरबारातील इतर अप्सरांपेक्षा अतीव सुंदर असणार्‍या उर्वशीचा जन्म झाला. (संस्कृतात 'उरू' म्हणजे मांडी.) तिचे स्वर्गीय सौंदर्य पाहून इंद्राने पाठवलेल्या अप्सरांचे गर्वहरण झाले आणि त्या लाजेने चूर झाल्या. स्वतः इंद्राने नर व नारायणांची क्षमा मागितली. या ऋषींनी राग विसरून उर्वशीला इंद्राच्या दरबारात पाठवले.

उर्वशी पुढे पुरूरव्याची पत्नी झाली.

महाभारतात वनपर्वात अर्जुन व उर्वशीमधील संवाद येतो. उर्वशी ही कुरुवंशातील राजा पुरुरव्याची पत्‍नी असल्याने आणि अर्जुन हा पुरूरव्याचा वंशज असल्याने, कामातुर उर्वशीचा स्वीकार करण्यास अर्जुन नकार देतो. यावर उर्वशी सांगते, "अप्सरा या नीतिनियमांतून मुक्त असून आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरुष निवडतात. यामुळे मी जरी कुरुकुलातील तुझी पूर्वज असले तरी कालांतराने जी पुरूरव्याची मुले-नातवंडे येथे स्वर्गात आली त्या सर्वांनी माझ्याशी संग केला आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर." अर्जुन या मागणीचा अव्हेर करतो. तेव्हा संतप्त होऊन उर्वशी त्याला शाप देते. हा शाप पुढे बृहन्नडेच्या रूपाने खरा ठरतो.

ऋग्वेदात पुरूरवा-उर्वशी संवाद आहे (ऋग्वेद १०/९५). पुरूरवा करुणपणे तिची विनवणी करीत असताना ती त्याला परत जाण्यास सांगते. तिला त्याची जराही दया येत नाही. अठरा ऋचांच्या या सूक्ताची सुरुवातच मुळी "हये जाये मनसा तिष्ठ" अशा विनवणीने होते. हे निष्ठुर पत्नी, जरा थांब! पुरूरव्याला नकार देताना पंधराव्या ऋचेत उर्वशी "न वै स्त्रैणानि सख्यानि" असा उपदेशही करते. स्त्रियांशी मैत्री करू नये असे सांगणारी उर्वशी नक्की कशी आहे हे समजण्यास या सूक्ताची मदत होते.

उर्वशी ही कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका आहे.

अरुणा ढेरे यांनी उर्वशीवर एक कादंबरी लिहिली आहे.

रवींद्रनाथ टागोरांची उर्वशीवर एक कविता आहे. पु.शि. रेगे यांचीही या विषयावर एक कविता आहे.

हिन्दी कवी रामधारीसिंह 'दिनकर' यांचे उर्वशीवरील महाकाव्य आहे.