Get it on Google Play
Download on the App Store

आपले नेहरू 14

समाजवादी पक्षाबद्दल प्रेम

१९५३ मध्यें जयप्रकाशजींना त्यांनीं भेटीसाठीं बोलावलें. देशांत समाजवाद वाढविण्यांत नेहरूंचा फार मोठा हात होता. त्यामुळें प्रथमपासून यांना समाजवादी पक्षाबद्दल प्रेम. नवभारताच्या निर्मितीच्या कामांत समाजवादी पक्षाचें सहकार्य त्यांना हवें होतें म्हणून त्यांनीं जयप्रकाशजींना आवर्जून बोलावलें. दुर्दैवानें या वाटघाटी अयशस्वी झाल्या.

महाराष्ट्राचे गुण

१९५३ आणि १९५४ या दोन्हीं वर्षीं उत्तर हिंदुस्थानांत सर्वत्र जलप्रलयानें हाहा:कार उडवला. कोट्यवधि रुपयांचे नुकसान झालें. लक्षावधि लोक निराश्रित झाले. नेहरूंना दिल्लिंत चैन पडेना. आपद्ग्रस्त जनतेची परिस्थिति समक्ष पाहून त्यावर उपाययोजना करण्यासाठीं नेहरू स्वत: धांवले. महाराष्ट्रांतील दुष्काळाच्या वेळीं, एप्रिल १९५३ मध्यें नेहरू महाराष्ट्रांत आले. एप्रिल-मेचा महाराष्ट्रांतला कडक उन्हाळा. पण त्यांत नेहरूंनीं संकटग्रस्त जनतेच्या भेटीसाठीं दौरा काढला. दुष्काळी कामें पाहिलीं. लोकांना धीर दिला. त्यांचें सांत्वन केलें. दौर्‍याच्या शेवटीं ते म्हणाले : “या दौर्‍यांत मला जनतेच्या दुर्दम्य जीवनशक्तीचें दर्शन घडलें. लोकांत क्रियाशीलता आहे; जडता नाहीं. संकटाला भिऊन, हताश होऊन, निष्क्रिय रहाण्याची दीन व पराभूत वृत्ति मला महाराष्ट्रांत कोठेंच दिसली नाहीं. कणखरपणा, नम्रता व प्रेम हे तीन गुण मला महाराष्ट्रांत आढळले.”

भारत-चीन मैत्री

१९५४ मध्यें चीनचे पंतप्रधान चाऊ-एन्-लाय यांनीं भारताला भेट दिली. त्यांनीं नेहरूंना चीनला भेट देण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन नेहरूंनीं ऑक्टोबर १९५४ मध्यें चीनचा १२ दिवसांचा दौरा केला. चीनचे अध्यक्ष माओ यांनीं नेहरूंची भेट घेतली व चर्चा केली. चीनमध्यें नेहरूंचा प्रचंड सत्कार झाला. भारत व चीन या दोघांची मिळून लोकसंख्या सबंध जगाच्या लोकसंखेच्या निम्मी. एवढे प्रचंड देश मित्रांच्या नात्यानें एकत्र आले ही केवढी महत्त्वपूर्ण घटना आहे !

पंचशील


दिल्ली आतां जणुं जगाची राजधानी बनली आहे. नाना देशांचे राजे, अध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री वगैरे मोठमोठे लोक दिल्लीला येतात. नेहरूंना भेटतात व जागतिक शांततेच्या प्रश्नावर चर्चा करतात. नेहरूंनीं जागतिक शांततेसाठीं एक नवा सिद्धान्त मांडला आहे. राष्ट्राराष्ट्रांनीं आपापसांत कसें वागावें याचें त्यांनीं पांच नियम सांगितले आहेत. या पांच नियमांनाच ‘ पंचशील ’ असें म्हणतात. शील म्हणजे वर्तन किंवा वागण्याची पद्धत.

(१) प्रत्येक राष्ट्रानें दुसर्‍याचें सार्वभौमत्व मान्य करावें.

(२) प्रत्येक राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा व प्रादेशिक एकत्मतेचा आदर राखावा.

(३) कोणत्याहि राष्ट्राच्या अन्तर्गत कारभारांत दुसर्‍या राष्ट्रानें ढवळाढवळ करूं नयें.

(४) दुसर्‍या राष्ट्रावर आक्रमण करूं नये.

(५) सर्वांनीं शांततापूर्ण सहजीवन उपभोगावें.

हे ते पांच नियम. या पांच नियमांचा सर्वांनी काटेकोरपणें अवलंब केला कीं जागतिक शांतता प्रस्थापित होण्यास किती वेळ लागेल ? या पंचशीलांना रशिया, चीन, ब्रम्हदेश इत्यादि अनेक राष्ट्रांनीं पाठिंबा दिला आहे. १८ एप्रिल १९५५ रोजीं इंडोनेशियांत बांडुंग येथें आशिया व आफ्रिका या खंडांतील २९ राष्ट्रांची परिषद भरली होती. ती परिषद भरविण्याला नेहरूंचेच परिश्रम कारणीभूत होते. या परिषदेंत वसाहतवादाचा व साम्राज्यवादाचा धिक्कार करण्यांत आला. अणुबाँबचा वापर बड्या राष्ट्रांनीं करूं नये, सर्व परतंत्र राष्ट्रें स्वतंत्र व्हावींत, असे ठराव पास झाले. भारताच्या ‘ पंचशील ’  तत्त्वांचाच हा विजय होय.