Get it on Google Play
Download on the App Store

आपले नेहरू 12

गांधीजी गेले

परंतु फाळणीनेंहि शान्ति नाहीं आली. हिंदू, शीख ठेवायचे नाहींत असें जणूं पाकिस्ताननें ठरविलें. निर्वासितांचे लोंढे येऊं लागले. इकडचे तिकडे जाऊं लागले. अश्रु व रक्त यांची किंमत स्वातंत्र्यासाठीं निरपराधी जनता देत होती. गांधीजी सर्वांना शांत करीत होते. कलकत्त्यांत उपवास करून त्यांनीं शांति आणली. ते दिल्लींत आले तों तेथेंहि ज्वाळा भडकलेल्या. काश्मीरवरहि पाकिस्तानी आक्रमण. नेहरूंनीं फौजा पाठवल्या. गांधीजी काय म्हणतील त्यांच्या मनांत येई. परंतु गांधीजींनीं आशीर्वाद दिला. एकदां आघाडीवरून परत येतांना नेहरूंनीं गांधीजींसाठीं सुंदर काश्मिरी फुलें आणलीं. प्रार्थनाप्रवचनांत बापूंनीं त्या फुलांचा उल्लेख केला. परंतु दिल्ली शान्त नव्हती. राष्ट्रपित्यानें उपवास आरंभला. ‘ मरो गांधी ’ कोणी ओरडला. नेहरू ताड्कन् मोटारींतून उतरून म्हणाले : “तुम्हांला असें बोलवतें कसें ? आधीं मला मारा.” एकानें गांधींवर बाँबहि फेंकला. मरण जणूं जवळ येत होतें. १९४८ ची ३० जानेवारी तारीख आली. शुक्रवार. सायंकाळचे ५।। वाजलेले. जरा उशीर झाला होता म्हणून गांधीजी झपझप जात होते. तों कोणी नमस्कार करण्याच्या निमित्तानें पुढें आला व गोळ्या झाडता झाला. मारणार्‍याला प्रणाम करून ‘ हे राम ’ म्हणून महात्मा परमात्म्यांत विलीन झाला.  

गांधीजींचे संदेशवाहक

त्या रात्रीं सकंप आवाजांत नेहरू राष्ट्राला म्हणाले : “सभोंवतीं अंधार आहे. परंतु नाहीं ! तो प्रकाश आहे. गांधीजींनीं दिलेला प्रकाश या देशाला, मानवजातीला हजारों वर्षें पुरेल.” सरदार व नेहरू अश्रु पुसून उभे राहिले. राष्ट्राला त्यांनीं धीर दिला. “हें राष्ट्र सर्व धर्मांसाठीं आहे. ज्यांना ज्यांना येथें प्रामाणिकपणे रहावयाचें आहे त्या सर्वांसाठीं आहे” अशी नेहरूंनीं घोषणा केली. 

महात्माजी म्हणायचे : ‘ जवाहर माझा वारस ! ’ किती खरें. ते सर्वांना सांभाळून नेत आहेत. राष्ट्रकुलांत राहिले तरी बंधनें स्वीकारलीं नाहींत. ते भारताच्या स्वातंत्र्याचेच कैवारी आहेत असें नाहीं तर जे जे गुलाम आहेत त्या सर्वांच्या. साम्राज्यवाले डच इंडोनेशियाला स्वातंत्र्य देत ना, तर गांधीजी असतांनाच १९ आशियाई राष्ट्रांची त्यांनीं परिषद बोलाविली. आणि आज डच सत्ता सोडून गेले आहेत. नेहरूंच्या धीरोदात्त नीतीचा हा विजय आहे.

अमेरिकेचा दौरा

कांही वर्षांपूर्वी भारताचा हा सुपुत्र अमेरिकेलाहि जाऊन आला. किती मनमोकळें तेथील त्यांचें बोलणें ! ते मानसन्मानांना भाळले नाहींत. कृतज्ञता दाखवून म्हणाले : “भारत तटस्थ राहील.” तेथील कारखाने, शेतें बघते झाले. कारण भारत त्यांना सुखी, समृद्ध करायचा आहे. प्रे. रूझवेल्टच्या पत्‍नी म्हणाल्या : “नेहरूंच्या संदेशाची आपणांस जरूर आहे.” सॅनफ्रॅनसिस्कोचे स्वागताध्यक्ष म्हणाले : “तुम्ही जगाचे नागरिक आहांत, आमचेहि व्हा.”

अमेरिकेचा चाळीस दिवसांचा दौरा आटोपून जवाहरलाल १४ नोव्हेंबर १९४९ ला मुंबईला परत आले. अमेरिकेंत असतांना त्यांनीं संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्य कचेरीला भेट दिली. कॅनडांतहि ते जाऊन आले.