Get it on Google Play
Download on the App Store

पोलिसांच्या जीवनाची दुसरी बाजू

पोलीस.... हा शब्द ऐकताच आपल्या मनामध्ये सुरक्षेततेची भावना निर्माण व्हायला पाहिजे पण लोक पोलीस हे नाव ऐकताच त्यांच्या मनात भीती निर्माण होते, ते पैसे खातात, नीट काम करत नाही अशी कुजबुज करतात. पण हा सर्व चुकीचा समज आहे. ज्याप्रकारे आपल्याला एकाच कलर च्या चष्म्यातून सगळं काही त्यात कलरच दिसत त्याचप्रकारे आजवर आपण पोलिसांना एकाच चष्म्यातून पाहत आलोय यामुळेच आपल्या मनात त्यांच्याबद्दल गैरसमज आहेत. पोलिसांची फक्त एकच बाजू आपण पहिली आहे, त्यांच्या जीवनातील दुसरी बाजू आपण पाहिलेली नाही. पोलिस...सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून आपल्या संरक्षणासाठी सदैव तपर असतात, ज्याप्रकारे सीमेवर देशाचे संरक्षण करणारे सैनिक महत्वाचे असतात, त्याचप्रकारे देशातील आंतरिक सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस महत्वाचे असतात. आपला प्रत्येक सण,उत्सव आपण आनंदात आणि उत्साहात साजरा करतो कारण आपल्या सुरक्षिततेसाठी पोलीस २४ तास सज्ज असतात. मला मोठमोठ्या अधिकाऱ्यांबाबत काही माहीत नाही पण आपला पोलीस जो ग्राउंड झीरो ला काम करतो तो तुम्हा आम्हा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी किती कष्ट करतो, किती त्रास सहन करतो आणि स्वतःच्या कौटुंबिक जीवनातील सुख आणि आनंदाचा किती त्याग करतो हे मी जवळून पाहिलंय. आपण सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने साजरे करत असतो पण आपली सुरक्षा करणाऱ्या पोलीसांना मात्र कुठलाच सण उत्सव आपल्या कुटूंबियासोबत साजरा करता येत नाही, आपल्या कुटुंबाला ते वेळ देऊ शकत नाहीत. पोलिसांचं हे दुःख केवळ पोलीस आणि त्यांचे कुटुंबीयच जणू शकतात. घरी वेळ देत नाही म्हणून घरच्यांची तक्रार, तुटपुंज्या पगारात घर चालवायचं टेन्शन आणि यासगळ्यात भर म्हणून २४-२४ तास ड्युटीची भर...या सगळ्याचा समतोल राखताना त्याची किती दमछाक होते हे केवळ त्यालाच माहीत असते. कौटुंबिक जीवन आणि नोकरी यांच्यातील समतोल राखताना त्याला दोरीवरची मोठी कसरत करावी लागते. यातून त्यांना मानसिक त्रास, कामाचा ताण या सगळ्यांना समोर जावं लागतं... आज लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, नोकरीनिमित्त लोकांचं शहरांकडे स्थलांतर वाढत आहे, गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या सगळ्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर कामच ताण निर्माण झाला आहे मात्र तरीसुद्धा पोलिसांची संख्या काही वाढवत नाहीत... पोलिसांच्या ८ तास ड्युटीची योजना आजून तर कागदावरच आहे या सर्व परिस्थितीमुळे पोलिसांवर कामाचा मोठा ताण आहे....रोजची १२ तास ड्युटी ही ठरलेलीच आहे शिवाय हा बंदोवस्त तो बंदोवस्त,निवडणूका सण समारंभ, परिक्षा बंदोवस्त यासाठी २४ तास ड्युटी ठरलेलीच असते हे सगळं कमी की काय म्हणून या काळात साप्ताहिक सुट्ट्याही रद्द असतात.... या कामाच्या व्यापात सकाळचं जेवण संध्याकाळी मिळत, कधी कधी तर ते पण मिळत नाही... अन्नाबद्दल अशी तक्रार करू नये पण कधी कधी काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाते पण त्या जेवणाचे प्रमाण आणि गुणवत्ता याबद्दल बोलायलाच नको...कित्येकदा खराब झालेल्या, कमी दर्जाच्या अन्नाची पाकिटे दिली जातात... पोलीस नीट काम करत नाहीत अशी तक्रार नागरिक करतात पण पोलिसांच्या जीवनातील ही दुसरी बाजू त्यांचा त्रास , त्यांची व्यथा मात्र कोणी जाणून घेत नाही. बरं कामाचा एवढा त्रास असतानाही पोलिसांच्या कुठल्या संघटना नाही ना ते कधी संप करतात.... आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच सज्ज असतात. लोक नेहमी तक्रार करतात की पोलिस पैसे खातात पण सर्वचजण असे नसतात...कित्येक पोलीस आपलं काम प्रमाणिकपणे इमानदारीने करत असतात त्यामुळे एक दुसऱ्याच्या चुकीमुळे सर्वच पोलिसांना दोषी ठरवणं चुकीच ठरेल. आणि कित्येक मोठे अधिकारी आणि नेते कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करतात त्याबद्दल मात्र आपण तितकी चर्चा करत नाही मात्र पोलिसांनी घेतलेल्या पाच पन्नास रुपायबद्दल १७ वेळा बोलत राहतो पण हेच पोलीस आपल्यासाठी किती कष्ट करतात, त्रास सहन करतात हे मात्र आपल्याला दिसत नाही. त्यामुळे पोलिसांच्या कामाबाबत तक्रार करण्यापूर्वी एकवेळ त्यांच्या या दुसऱ्या बाजूचाही विचार करावा... आणि शासनानेही पोलिसांची व्यथा पाहून त्वरित त्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करावा... आशिष अरुण कर्ले. ३२ शिराळा (सांगली) ९७६५२६२९२६ ashishkarle101@gmail.com