Get it on Google Play
Download on the App Store

भाग ३

खाली पडलेला मोबाईल घेण्याची हिम्मत आता समीरच्यात नव्हती. तो तसाच समोरच पडलेला मोबाईल नुसता भेदरलेल्या नजरेने बघत रहातो. मोबाईलची Caller tone तर सलग वाजतंच रहाते..त्या वाजणा-या tone ने त्याची अवस्था तर आणखीनच केवीलवाणी करून टाकली होती. रडवेल्या चेह-याने तो हे सारं पहात होता..थोड्या वेळाने Ring वाजून-वाजून मोबाईल पुन्हा Switch off होतो. आता कसलीच Ring आसपासची शांतता भंग करण्यासाठी वाजत नव्हती. क्षणार्धातंच तिथे भयाण शांतता पसरते. मग समीर खाली वाकून मोबाईल थर-थरत्या हाताने ऊचलतो. पण, नं बघताच मोबाईल तसाच खिश्यात टाकतो आणि पुन्हा बाकड्यावर येवून बसतो.

तो जळालेला चेहरा, जळून कुरतळल्यागत झालेली केसं आणि त्यात ते तिचं विक्षिप्त  हसणं, हे सारंच समीरला आता डोळ्यासमोर दिसत होतं. भातीने घामाघूम झालेला समीर आता पार सुन्न झाला होता. तो कसलाच तर्क लावण्याच्या मनस्थ्तितीत नव्हता. बाकड्यावर बसून स्वतःचं डोकं पायामध्ये लपवून तो ओठांतल्या ओठांत काहीतरी पुटपुटायला लागतो. अर्थातच हे सारं तो भितीमुळेच करत होता. रात्रीचे आता अडीच वाजून गेले होते. काही वेळ तसाच शांततेत जातो. थोडा वेळ तसाच गेल्यानंतर अचानक कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू येवू लागतो. समीर कुत्र्यांच्या विचित्र रडण्याने दचकून जागा होतो. जाग आल्याबरोबरंच त्याला समोर रस्त्याच्या पलीकडे 3-4 कुत्रे दिसतात. ती एकसारखी एका ठराविक जागेकडे बघून रडत असतात,जसं काही तिथे कोणी ऊभा आहे. पण, समीरला तिथे कोणी असल्याचं दिसत नव्हतं. तरीसुद्धा तो तिथेच नजर रोखून पहात रहातो.. आता समीरला प्रत्येक क्षणाला कुत्र्यांच्या आवाजामध्ये चढ-उतार जाणवायला लागला होता. कारण ते कुत्रे रडता-रडता अचानकच गुरगुरायला लागली होती. आताही ते कुत्रे त्या ठराविक जागेकडे बघूनच गुरगुरत होती. समीर घाबरलेला असला तरी ही नक्की काय भानगड आहे, आणि हे सर्व कुत्रे त्या एका जागेकडे बघूनच का गुरगुरत आहेत हे जाणून घ्यायचं ठरवतो. मग घाबरत घाबरतंच तो त्या बाकड्यावरून उठतो..बॅग तशीच बाकड्यावर ठेवून तो पाऊलं त्या कुत्र्यांच्या दिशेने वळवतो…त्याच्या पडणा-या प्रत्येक पाऊलागणिक ते कुत्रे त्या जागेकडे बघून अजूनंच जोर-जोरात रडायला लागतात..तो रडण्याचा आवाज ऐकून मग मात्र समीर जागच्या जागीच थांबतो. भितीने तर आता त्याला काही सुधरतंच नव्हतं..हृदयाचे ठोके तर आता सेकंदाला वाढत जात होते. पुढे जावू की नको हा साधा निर्णय घेण्याइतपतसुद्धा त्याच्यात भान ऊरलं नव्हतं..आणि अश्या वेळीच माणूस चुकीचा निर्णय घेवून एक मोठी चूक करतो..!! समीरनेही तेच केलं. तो त्या जागेच्या दिशेने जायचं ठरवतो..आणि मग पुन्हा त्याची पाऊलं त्या जागेच्या दिशेने पडू लागतात..त्याच्या पडणाया प्रत्येक पाऊलांचा आवाज त्या भयाण शांततेत खुपच घाबरवणारा वाटत होता. चेह-यावरचा घाम पुसत समीर आता कानोसा घेत त्या जागेच्या दिशेने चालत होता..कुत्रेसुद्धा आता अचानकंच रडणं बंद करतात.  त्या कुत्र्यांच्या विक्षिप्त वागण्याने समीर त्याची नजर त्या जागेवरून हटवून कुत्र्यांच्यावर वळवतो. तेव्हा मग त्याला त्या कुत्र्यांचे हावभाव बदलताना दिसतात..ते कुत्रे रडणं आणि गुरगुरणं थांबवून, घाबरत शेपूट दुमडून दबक्या चालीने मागे सरकत होते..दबक्या चालीने मागे सरकत असताना अचानक कोणी दगड मारावा तसं ते क्यावऽऽ क्यावऽऽ करत ओरडत पळत सुटतात आणि काही क्षणातंच नजरेआड होतात…

(क्रमशः)

लेखक- सतीश रमेश कांबळे