Get it on Google Play
Download on the App Store

सोहोराब काका

सोहोराब काका नावालाच पारशी राहिले होते. त्यांचं सखलाततवाला हे आडनाव त्यांच्या तरी लक्षात राहिलं होतं की नाही कोण जाणे.

सोहोराब काका आणि सावंत काकू अशी त्या दोघांची जोडी आमच्या गल्लीतल्या लोकांनी सहज स्वीकारली होती. त्यात अनैतिक वगैरे असं काही नव्हतं. सोहोराब काकांनी आणि सावंत काकूंनी रीतसर लग्न केलं होतं. चारचौघांसारखा संसार थाटला होता. त्यांना दोन मुलगे झाले. ते आमच्याचबरोबर आमच्याच पुढेपाठी वाढत होते, तरी गोरेगोरे पान, उंच, धिप्पाड सोहोराब काका, सोहोराब काकाच राहिले आणि काटकुळ्या, बारीक चणीच्या सावंत काकू... सावंत काकूच राहिल्या. सोहोराब काकांचं बालपण फार खडतर गेलं होतं. ज्याला ते आपला बाप समजत होते, त्याने कधीच त्यांना आपला लेक मानलं नाही, आई तर त्यांच्या लहानपणीच वारली होती. मग आमच्या चाळीच्या.... आधारानेच पडेल ते काम करत ते वाढले. सावंत हे गिरणी कामगाराचं कुटूंब... पाठीला पाठ धरून आलेल्या पाच मुली घरात, काकूंचे वडील दमेकरी... तेव्हा काकूंच्या आईनेच व्यवहारीपणा दाखवून या सोहोराबला घराबाहेर व्हरांड्यात झोपायला परवानगी दिली. असा ताडमाड वाढलेला अजस्र साहोराब दाराबाहेर झोपल्यावर कुणाची टाप होती सावंतांच्या मुलींकडे बघायची?

मग एक एक करत चौघींची लग्ने झाली. धाकटी राहिली निर्मला, चाळीत तिला सगळे निमा म्हणायचे... तिने साफ सांगून टाकलं, ''मला सोहोराबशीच लग्न करायचंय...'' सोहोराबला याचा पत्ताच नव्हता. काकूंचे वडील हयात नव्हते. आई म्हातारी झाली होती... थोडी खळखळ झाली; पण शेवटी त्या अनाथ मुलाचं सावंतांच्या पाचव्या मुलीशी लग्न झालं.... आणि सोहोराबला बायकोबरोबर राहायला हक्काचं घर मिळालं, सोहोराब गृहस्थ झाला आणि त्याला त्याची ही नवी भूमिका मनापासून भावली, त्यात तो रमला. चाळीतल्या सगळ्या लोकांनी मिळून सोहोराबला सायकल दिली, तर निमाला दुधदुभत्याचं कपाट दिलं... पण तरी तो सोहोराबच राहिला आणि ती सावंतच राहिली. दोघांचा संसार सुरू झाला, तसा दिनक्रमही ठरून गेला.

सोहोराब काका एका काचेच्या कारखान्यात कामाला होते. सकाळी ९ वाजता ते सायकलला डबा अडकवून बाहेर पडायचे ते संध्याकाळी सातला घरी परतायचे. ते डब्यात दहा-बारा चपात्या नेतात, यावर आम्हा मुलांत चर्चा असायची.आता ही माहीती कोणी कशी पुरवली हे आठवत नाही पण  या चर्चेत त्यांचा मोठा मुलगाही असायचा.

मोठ्याचं नाव श्रीपाद आणि धाकट्याचं प्रसाद. दोन्ही नावं सावंत काकूंच्या बहिणीनंच ठेवली. नावं ठेवायला सोहोराब काकांच्या घरचं होतंच कोण म्हणा.

श्रीपाद अगदी आपल्या बाबांच्या वळणावर गेला होता. गोरागोरापान, उंच, धिप्पाड. वयानुसार थोडा हूड होता. सोहोराब काकांना त्याची थोडी काळजी वाटायची. आपल्या दोन्ही मुलांनी खूप शिकून टाय लावून ऑफिसात जावं, अशी त्यांची इच्छा होती. जिद्द का हट्ट होता माहीत नाही; पण मनातल्या मनात सारखं ते हेच घोकत असायचे.

सावंतकाकू जितक्या बडबड्या, तितके सोहोराब काका अबोल. त्यांच्या मनात काय चालायचं हे फक्त काकूंनाच कळायचं. रोज सकाळी अंघोळीनंतर सोहोराब काका घरी गणपतीला आणि मग चाळीतल्या औदुंबरला एक उदबत्ती अर्धी अर्धी तोडून लावायचे. त्यांनी सायकलवर ढांग टाकली की, श्रीपाद पण खेळायला पसार व्हायचा. मग त्याला शोधत सावंत काकू चाळभर फिरायच्या त्यामुळे प्रत्येक दाराशी त्यांचं थोडं थोडं बोलणं व्हायचं... त्यात श्रीपाद मिळायचा नाहीच. त्याचं दर्शन व्हायचं ते डायरेक्ट शाळेच्या वेळी ताटावर बसताना.

पण धाकट्या प्रसादचं तसं नव्हतं. तो आपला बापाला भिऊन म्हणा किंवा स्वभावानेच गरीब म्हणा... हातात पुस्तक घेऊन असायचा; पण प्रसाद आठवीत गेला आणि त्याला क्रिकेटचं वेड लागलं आणि चित्र बदललं. त्यात त्याला शाळेच्या टीममध्ये निवडलं; मग चाळीतही त्याचा भाव वाढला. तोपर्यंत टीव्हीवर क्रिकेटचे सामने दाखवायला सुरुवात झाली होती, हायलाईट्स बघायलाही क्रिकेटप्रेमी तडफडायचे. मग प्रसाद तरी कसा वेगळा वागणार?

मुलांच्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून सोहोराब ककांनी घरात टीव्ही घेऊ दिला नव्हता... पण चाळीत सगळ्यांची दारं सताड उघडी असायची आणि कुठल्याही घरात शिरायला कुणालाच मज्जाव नसायचा; पण प्रसाद नेहमी आमचंच घर निवडायचा. कारण एक तर त्याची लहानपणची आजारपणं आमच्या आईने काढली होती. दुसरी गोष्ट म्हणजे सोहोराब काका चौकातून चाळीकडे वळताना ते आमच्याच घरातून दिसायचे आणि तिसरं म्हणजे प्रसाद आमच्याकडे आहे, त्याला पाठवते मग, असं साहेराबकाकांना ठणकावून सांगायची हिंमत आमच्याच आईमध्ये होती.

तर असेच दिवस जात होते. साधी, सामान्य चाळकरी माणसं आम्ही. आमच्या आयुष्यात घडून घडून काय घडणार? पण तरी एक दिवस असा येतो.... की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. श्रीपादने दहावीला अवघे चोपन्न टक्के घेतल्यावर सोहोराब काकांचं पूर्ण लक्षं प्रसादवर केंद्रित झालं. प्रसाद नववीत गेल्यावरच काकांनी त्याचं क्रिकेट बंद करून टाकलं. त्याची बॅट नीट सुती कापडात गुंडाळून माळ्यावर नेऊन टाकली. प्रसादचं खरंच आपल्या आई-बाबांवर खूप प्रेम होतं म्हणून त्याने ते सगळे मान्यही केले; पण शेवटी क्रिकेट हा त्याचा ध्यास होता आणि दिवसरात्र, अवतीभवती, इकडेतिकडे क्रिकेटच चालू असायचं. तो स्वतःला आवर तरी किती घालणार? पण तरी तो नेटाने अभ्यास करतच होता. त्याची दया येऊन सावंत काकू... काका घरात नसताना त्याला आमच्याकडे क्रिकेट पाहायला पाठवायच्या आणि आमच्याकडेही तो आला की आम्ही त्याला टी व्ही लाऊन द्यायचो

सोहोराब काकांचा दिनक्रम ठरलेला असायचा. त्यामुळे गोंधळ व्हायचा प्रश्‍नच नसायचा. काका घरी यायच्या वेळी त्यांना प्रसाद हातात पुस्तक घेऊन बसलेला दिसायचा; पण तो दिवस खरंच दबा धरून उगवल्यासारखा उगवला होता. सोहोराब काकांचा त्यांच्या काच कारखान्यात अपमान झाला होता. त्यांच्या मालकांनी काकांना दोन्ही मुलांना कामगार म्हणून कारखान्यात भरती करायचा सल्ला दिला होता... काका ठामपणे म्हणाले, ''माझी मुलं शिकणार आहेत. छान पैकी टाय लावून ऑफिसला जाणार आहेत. त्यावर काही जण हसले होते आणि उंच, धिप्पाड सोहोराब काका त्यामुळे मनातून हालले होते. हादरले होते...

कधी नाही ते काका बेचैन झाले आणि सायकलवर टांग टाकून उन्हं उतरायच्या वेळीच घराकडे परतले. पुढच्या वर्षी पन्नास हजार रुपये भरुन ते प्रसादला क्लासला घालणार होते. त्यासाठी एकदोघांशी त्यांनी पैशाचं बोलूनही ठेवलं होतं, त्या शिवाय अपेक्षित प्रश्‍नसंच, आदर्श प्रश्‍नावली अशी काय काय पुस्तकांची माहिती त्यांनी घेऊन ठेवली होती.

काकांना चाळीत शिरताना बघितलं आणि मीच गांगरलो, जणू माझीच चोरी पकडली गेली. कारण तेव्हा नुकता प्रसाद आईची परवानगी घेऊन आमच्याकडे मॅच बघायला आला होता. सकाळपासनं तो जरा नरमच होता, काकू म्हणाल्या तापही आहे थोडा... मी काकांना बघून तसाच घराकडे पळालो. काकांची अपेक्षा, आपण घरी गेल्या गेल्या समोर हातात पुस्तक घेतलेला प्रसाद दिसेल... पण तसं झालं नाही... सायकल जिन्याच्या कठड्याला लावतानाच त्यांनी काकूंना विचारलं प्रसाद कुठंय?... काकू गांगरल्या... त्यांनी घरात डोकावलं. प्रसाद नव्हता... प्रसाद कुठंय? काकू कसंबसं बोलू शकल्या, 'गोखल्यांकडे...'

दाण दाण पावलं टाकत सोहोराब काका आमच्या घराकडे वळले. वामनाने एका पावलात पृथ्वी, दुसर्‍या पावलात स्वर्ग पादाक्रांत केलं म्हणतात; पण रागाच्या भरात सोहोराब काकांचं पाऊल सगळच गिळंकृत करायला निघाल्यासारखं पडलं

सोहोराब काकांना दारात बघून प्रसाद गलीतगात्रच झाला. आई स्वयंपाकघरात होती, मी दारात होतो. त्या दोघांच्या मध्ये कोणीच नव्हतं. सोहोराब काकांचा हात जो पसरला तो डायरेक्ट प्रसादपर्यंत पोहोचला. क्षणाची झटापट झाली. प्रसादला सरकायलाच मिळालं नाही. काकांच्या थोराड हाताची पहिली कानफटात बसल्यावरच प्रसादला चड्डीत लघवी झाली. नववीतल्या मुलावर दुसर्‍याच्या घरात अशी वेळ यावी आणि त्यात त्याची विशेष चूक नसताना, बापाचा अट्टहास आणि मुलाचं पोरवय... सगळेच विचित्र .... तरी प्रसाद सटकायला बघत होता आणि काकाना चेव आला होता. त्या झटापटीत घड्याळाचा स्टीलचा पट्टा प्रसादच्या कानावर चांगलाच घासला. कोवळी कातडी टचकन फाटली. क्षणात रक्ताची चिळकांडी उडाली. रक्ताचं थारोळ बघूनच प्रसाद बेशुद्ध पडला. काका स्तब्ध झाले... नक्की कुठं काय झालंय कळायला मार्ग नव्हता. इतकं रक्त वाहत होतं. क्षणात जे सुचलं ते काकांनी केलं. त्याला उचलून ते सरळ बाहेर धावले... त्यांच्या मागे मी. रिक्षेत झेप घेत आम्ही हॉस्पिटल गाठलं.... पोलीस केस समजून डाँक्टर हात लावायला तयार होईनात आणि काय योग बघा धावर्‍या मुंग्या अन्न शोधत फिरत असतात, तसे बातमीच्या शोधात चॅनलवाले तिथे येऊन थडकले. त्यांना घटना एवढीच कळली की, अभ्यासावरून एका बापाच्या हातून मुलाचा कान फाटला. लगेच त्या घटनेची बातमी झाली. बापाने मुलाला मरेपर्यंत मारले... लडका घायल... कशाचं काय होऊन बसलं! एकाचे दोन, दोनाचे चार चॅनलवाले आले आणि तासाभरात ही बातमी जगभर पसरली. इतकी वर्षं चिन्नीभाई चाळीला कोणी कुत्रं विचारत नव्हतं आणि आज? आणि आज आमच्या चाळीला प्रेक्षणीय स्थळाचं स्वरूप प्राप्त झालं... सोहोराब काकांच्या घराला बघायला ही गर्दी जमली. आयुष्यभर नाकासमोर बघून, पापभिरू वृत्तीने जगणारे सोहोराब काका क्षणात जल्लाद ठरले.

मग वृत्तवाहिन्यांवर तर लगेच परिसंवाद सुरू झाले. शिक्षक, पालक, मानसोपचारतज्ज्ञ सगळेजण आपापली मतं मांडायला लागले आणि सगळ्यांनी मिळून सोहोराब सखलातवाल्याला दोषी करार देऊन टाकला.

त्या गदारोळात प्रसाद पुन्हा पुन्हा सांगत राहिला, ''मेरे बाबा बहोत अच्छे है | उनकी कोई गलती नाही है |'' पण त्याकडे कुणाचंच लक्षं नव्हतं.

चाळीतले सगळे काकांच्याच बाजूने उभे होते; पण मीडिया त्यांना हवे तेच बाईट ठेवत होते. सगळ्यात वाईट झालं ते म्हणजे सावंत काकू त्यांच्या कचाट्यात सापडल्या. आयुष्यभर टुकीनं संसार करण्यात गुंतलेल्या काकू अचानक चॅनलचे माईक समोर आल्यावर बावचळल्या आणि मनातली खंत, जपत लपवत त्या काही बोलून गेल्या त्याचा मथितार्थ एवढाच होता

की, या माणसाने आयुष्यभर फक्त स्वतःचाच विचार केला... बायकामुलांना काय हवं, याची दखलच घेतली नाही. हे प्रत्येक चॅनलवर हॅमर झालं आणि जितकं हॅमर झालं, तितकं काका अगदी एकटे एकटे पडत गेले. जे आपलं आपलं म्हणून जिवापाड जपलं ते एका क्षणात त्यांच्या हातून निसटलं.

तो गदारोळ चार दिवसांत शांत झाला, प्रसादची जखम दहा दिवसांत भरली. पण सोहोराब सखलातवाला या धिप्पाड पारशी बाबाचे खांदे जे वाकले ते कायमचेच. म्हातारपणाने लोक कंबरेत वाकतात. हा पारशी नाउमेदीने खांद्यात वाकला. जल्लाद अशी त्यांना उपाधी मिळाली. येता जाता त्यांच्याकडे लोक चोरट्या नजरेने बघायचे. शेवटी सोहोराब काकांनी ती नोकरी सोडली. शनिवार-रविवार येत जाईन, सांगून ते नवसारीला गेले. काकूंना त्यांच्या बरोबर जायचं होतं; पण त्यांनी नेलं नाही आणि स्वतःही फारसे फिरकले नाहीत.

हळूहळू सावंत काकूंच्या डोक्यावर परिणाम झाला, त्यांना सांभाळायचं म्हणून श्रीपादने लग्न केलं नाही. पुढे प्रसाद ही शिकून सिंगापूरला स्थायिक झाला. त्याने तिथेच कुणाशी तरी लग्न केलं. श्रीपाद खडकवासला स्थायिक झाला. सोहोराब काका नवसारी सोडायला तयार नव्हते.

आता चिन्नीभाई चाळीचं टॉवरमध्ये रूपांतर होणार आहे. त्याकरता बिल्डरने भाडेकरूंची मीटिंग ठरवली आहे. त्यासाठी श्रीपाद  यायचाय, असं ऐकलंय. काका तर येणं शक्यच नाही... काकूंनाही खूप वर्षांत बघितलं नाही... मीटिंगला श्रीपाद येईल, त्याच्याशी काय बोलायचं? या विचाराने मी अत्तापासूनच बेचैन आहे.

Chandrasekhar Gokhale

मराठी कथा नि गोष्टी

परम
Chapters
कुटुंब सोहोराब काका शाॅपींग फेस्टिव्हल... मामा गुरूमूर्ती यांचे नोटबंदीवरिल विचार अत्यंत सोप्या शब्दात शंभू तरुण रामस्वामी चोरकाका... #कुटुंब प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन सोबत रसायन साबून स्लो हैं क्या? "या सूरांनो चंद्र व्हा...." कोजागरी पौर्णिमा दरमहा पैसे वाचविण्याच्या सात टिप्स... जादूगर ची बायको प्रेम प्रेम आणि विश्वास निरोगी राहण्याचे काही नियम लेखन संकष्टी महात्म्य समाधान श्रीमंतीचं दुसरं नावं मला वाटायच गोष्टी परीक्षण करतानाच्या (supervisionच्या) !! लेखन !! अखेर श्रीखंडाच्या वड्यांची रेसिपी सापडली गोष्टी परीक्षण करतानाच्या लक्ष्मी पंगिरा मधुमालतीचा वेल अप्रूप मसालेभात स्पर्श अखेरचा डाव.... आजी आईचा आत्मा जड झालेले आई-बाप दुर्दैवी मराठीची होरपळलेली पानं... निरोप.. हुरहुर दिवाळीची.... कळीचा नारद जन्याच पोर. ऍपल छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही.. आरोग्यम धनसंपदा श्रीमंत वृद्धाश्रम