Get it on Google Play
Download on the App Store

गायकवाड घराणे

मराठेशाहीतील एक सुप्रसिद्ध घराणे म्हणजे गायकवाड घराणे. त्याचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील धावडी हे होय. या घराण्याचे पूर्वज दमाजी हे खंडेराव दाभाड्यांच्या सैन्यात एक सरदार होते. पुढे ते गुजरातवर स्वतंत्रपणे स्वाऱ्या करीत. दमाजी यांनी निजामाबरोबर बाळापूर येथे झालेल्या लढाईमध्ये बराच नावलौकिक मिळविला. म्हणून खंडेराव यांनी त्याची शाहू छत्रपतींकडे शिफारस केली. तेव्हा त्यांना समशेर बहाद्दर हा किताब देण्यात आला आणि दाभाड्यांचा मुतालिक म्हणून त्यांची १७२० मध्ये नेमणूक झाली. 

त्यांच्या मृत्यूनंतर १७२१ मध्ये  त्यांचा पुतण्या पिलाजी हे मुतालिक झाले. ते खानदेशात नवापूर येथे प्रथम राहत असत. परंतु तेथील एक मराठा सरदार पोवार याच्याशी त्यांचे जमेना म्हणून त्यांनी सोनगढ येथे किल्ला बांधून तेथे आपली राजधानी नेली. पुढे बरेच दिवस गायकवाडांच्या राजधानीचे हे ठिकाण होते. 

या वेळी गुजरात दिल्लीच्या मोगल बादशाहाच्या ताब्यात होता. त्यांच्या उत्तरेकडील सुभेदारांत वैमनस्य असे. मोगलांच्या भांडणांत मराठे सरदार भाग घेत. यांतून पिलाजी यांनी  माहीचा चौथाईचा अधिकार मिळविला आणि सद्रुद्दीन यास बडोद्यात येण्यास मज्जाव केला. या सुमारास पहिला बाजीराव व दाभाडे यांत १७३१ मध्ये डभई येथे युद्ध झाले. त्यात पिलाजी यांनी दाभाड्यांकडून भाग घेतला. यात त्यांचा एक मुलगा मारला गेला आणि ते  स्वतः जखमी झाले. 

पुढे यशवंतराव दाभाडे यांस सेनापतीची वस्त्रे मिळाली, तेव्हा पिलाजीस मुतालिक म्हणून कायम करण्यात आले आणि समशेरबहाद्दर व सेनाखासखेल हे दोन किताब बहाल करण्यात आले. या लढाईच्या वेळी त्याच्या ताब्यात डभई व बडोदे ही दोन्ही गावे होती. पुढे ती त्याच्याच घराण्यात अखेरपर्यंत राहिली आणि त्यातूनच पुढे बडोदे संस्थान जन्मास आले. 

सर बुलंदखानाने मराठ्यांस चौथाई-सरदेशमुखीच्या सनदा करून दिल्यामुळे बादशाहाची त्यावरील मर्जी कमी होऊन त्याच्या जागी जोधपूरच्या अभयसिंग या राजपुताची गुजरातचा सुभेदार म्हणून नेमणूक झाली. त्याने १७३२ मध्ये पिलाजी यांचा दग्याने खून केला. यामुळे चिडून जाऊन दाभाडे यांची विधवा पत्नी, पिलाजी यांचा मुलगा दमाजी व भाऊ बडोद्यावर चाल करून गेले. त्यांना भिल्ल व कोळी यांनी मदत केली. या सामूहिक फौजेने १७३४ मध्ये बडोद्याचा कबजा घेतला. 

एकूण परिस्थितीस न डगमगता दमाजी यांनी गुजरातवर आपला सर्वत्र पक्का अंमल बसविला. ते सामान्यतः पेशव्यांशी एकनिष्ठ होते. तथापि शाहूच्या मृत्यूनंतर (१७४९) ताराबाई यांनी रामराजास हाताशी धरून सत्ता बळकाविण्याचा प्रयत्न केला, त्यात दमाजी यांनी ताराबाई यांच्या बाजूने भाग घेतला. त्यामुळे पेशवे व दमाजी यांमध्ये काही काळ वितुष्ट निर्माण झाले; पण लवकरच दमाजी यांनी या प्रकरणातून आपले अंग काढून घेतले. त्या वेळी (१७५२) पेशव्यांनी त्यास सेनाखासखेल हा किताब दिला. पानिपतच्या लढाईत भाग घेऊन जे परत आले, त्यांपैकी दमाजी हा एक होते . ते १७६७ मध्ये मरण पावले. 

दमाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चार मुलांमध्ये वारसा हक्काबद्दल तंटे माजले. गोविंदराव, सयाजीराव, फत्तेसिंहराव व मानाजी हे अदलून बदलून बडोद्याच्या गादीवर आले. मानाजी १७९३ मध्ये मृत्यू पावल्यावर गोविंदराव पुन्हा गादीवर आले. त्याचे आसन पेशव्यांच्या साहाय्याने स्थिरस्थावर होते न होते,  तोच १७९३ मध्ये त्यांच्या  कान्होजी नावाच्या एका अनौरस पुत्राने अरबांच्या मदतीने बडोदे संस्थानात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. या कारवायांस तोंड देता देता गोविंदराव यांच्या नाकीनऊ आले. त्यातच १८०० मध्ये गोविंदराव मरण पावले. 

त्यानंतर त्याचा आनंदराव हा दुबळा मुलगा गादीवर आला. साहजिकच कान्होजीच्या बंडास जोर आला. तेव्हा १८०२ मध्ये इंग्रजांनी हस्तक्षेप केला आणि अरबांना बडोद्यामधून हाकून लावले. मेजर वॉकर हा रेसि़डेंट म्हणून बडोद्यात राहू लागला. १८०२ मधील वसईच्या तहाने इंग्रजांचा गुजरातमध्ये पाय पक्का रोवला गेला. पहिल्या फत्तेसिंहाने इंग्रजांबरोबर १८०२ व १८०५ मध्ये तैनाती फौजेचा तह केला. बडोद्याचा सर्व राजकीय कारभार त्यामुळे इंग्रजांच्या तंत्राने होऊ लागला. पुढे बडोद्याने १८१७-१८ मध्ये इंग्रजांशी तह केला. यामुळे पेशवे व बडोदे यांमधील दुवा कायमचा तुटला. १८३० मध्ये रेसिडेंटचे ऑफिस रद्द होऊन तेथे गुजरातच्या आयुक्ताची नेमणूक करण्यात आली. 

या वेळी दुसरे सयाजीराव गादीवर आले. या कर्तबगार राजाने संस्थानात अनेक सुधारणा केल्या. इंग्रजी अधिकार्‍यांच्या लाचलुचपतीस आळा घालण्याचा प्रयत्न केला.  तसेच इग्रजांच्या पकडीतून सुटण्याचाही यत्न केला. इंग्रजांनी बळकावलेला आपला मुलूख त्यांनी पुन्हा सोडविला. प्रसंगी इंग्रजांचा रोषही पतकरला, पण आपला स्वाभिमान यत्किंचितही घालविला नाही. ते १८४७ मध्ये मरण पावले. 

त्यांच्यानंतर गणपतराव गादीवर आले.गणपतराव यांच्या कारकीर्दीत रेल्वे आली.  पण त्यांची कारकीर्द फारशी गाजली नाही. ते १८५६ मध्ये मरण पावले. त्यानंतर काही वर्षे त्यांचे बंधू खंडेराव आणि पुढे मल्हारराव बडोद्याच्या गादीवर आले. 



मल्हाररावाच्या पश्चात तिसरे सयाजीराव दत्तक पुत्र म्हणून १८८१ मध्ये गादीवर आले. सयाजीरावांनी बडोदे संस्थानात शिक्षण, राज्यकारभार, ग्रंथालय, वाचनालय, विविध खेळ वगैरे अनेक बाबतींत सुधारणा करून एक आदर्श संस्थानिक म्हणून नाव मिळविले. इंग्रजी राज्यकर्त्यांबरोबर स्वाभिमानाने वागण्याबद्दल त्यांची ख्याती होती. बडोदे संस्थानातील हा सर्वांत कर्तबगार राजा म्हणावा लागेल. सयाजीराव ६ फेब्रुवारी १९३९ रोजी मुंबईला मरण पावले.

 त्यानंतर त्यांचे नातू प्रतापसिंह गादीवर आले. बडोदे संस्थान १९४९ मध्ये त्या वेळच्या मुंबई राज्यात विलीन करण्यात आले. त्यानंतर प्रतापसिंह व भारत सरकार यांचे फारसे पटले नाही. तेव्हा प्रतापसिंहांनी फत्तेसिंह या आपल्या मुलाकडे सर्व सूत्रे दिली. प्रतापसिंह १९६९ मध्ये मृत्यू पावले. फत्तेसिंह हे गुजरातच्या राजकारणात आघाडीवर होते.