Get it on Google Play
Download on the App Store

जानी दुश्मन - एकांकिका : प्रवेश 7

( दिवाणखाण्याची रचना. विजय लॅपटॉपसमोर बसलेला. दादा ऑफीसची फाईल चाळतोय.)

(पार्श्वभूमीवर
एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात....)

रंगमंचावर प्रकाश.

दादा : ( फाईल मांडीवर ठेवून हातात पेन)
अरे विजय, तुला एक सांगायचंच राहून गेलं.

विजय : काय दादा?

दादा : अरे ते रिबीन फूल दिल्यापासून माझा बॉस काय बदलला.....
अगदी अंतर्बाह्य बदलून गेला. ऑफीसातले सगळे चकीत आहेत.
सगळ्यांशी आता प्रेमाने वागतो.
एवढंच काय, सगळ्यांसोबत कॅबीनच्या बाहेर येउन बसतो.
अधूनमधून एकदम हळवा होतो.
खळखळून हसतो.....पण त्याच्या आत एक वेदना लपलेली दिसते.....
त्याची  पत्नी वारल्यापासून दगडासारखा कडक झाला होता.....

आता त्याच्या मुलाबद्दल सतत काही ना काही सांगत असतो.

विजय : म्हणजे जानी दुश्मनची प्रेमाची मात्रा लागू पडली म्हण की....

दादा : अरे, एखाद्या क्षणी माणूस असा अंतर्बाह्य बदलू शकतो हे मान्यच होत नाही.

बाकी तुझा जानी दुश्मन एक अवलीया आहे......
कसं सुचतं रे हे त्याला?

विजय : दादा, तुला आठवतं ...... आम्ही त्या दिवशी थर्मोसफ्लास्क मध्ये चहा घेउन गेलो होतो.....

दादा : अरे हो.....कुठे गेला होता तुम्ही दोघं?
मला वाटलं कुणी दवाखाण्यात आहे की काय?

विजय : दादा, त्या दिवशी आकाशवाणी चौकातल्या वाहतूक पोलीसाला देखील रडवलं ह्या भाउने.....
खूप हळवा झाला होता तो!
मलाही भरून आलं होतं.....

दादा : अरे हा असा मस्तमौला माणूस तुझा मित्र आहे.....मला फार हेवा वाटतो तुझा.....
सांभाळ त्याला....

विजय : हो दादा.....
पण मी काय सांभाळणार?
तोच मला सांभाळतो.....

दादा : अशा हळव्या लोकांच्यात एक लहान अत्यंत निरागस मुल लपलेलं असतं. अत्यंत भावनिक आणि सरळ असतात अशी लोकं! तेवढीच लवकर कोलमडून पडतात.
तुझ्यावर फार जीव आहे त्याचा.....
त्याला जप....

विजय : दादा, त्या मागणा-या बाईच्या मुलाला शाळेत पाठवलं त्यानं.

दादा: काय सांगतोस?

विजय : त्याचा शाळेचा खर्च भरतोय हा भाउ....
मीही माझा वाटा उचलला त्यात.....
पण हा असा वेगळाच आहे. म्हणून कधी कधी एकटा पडतो....फारसे मित्रही नाहीत त्याला...
असंही फेसबूकवरच्या शेकडो मित्रांपेक्षा मोजके का होईना ..... असे असावेत!

दादा : अरे आपल्या सगळ्या बगळ्यात राजहंस आहे तो.....
ती ग. दि. मांची ती कवीता आठवते का तुला?
एका तळ्यात होती
बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक....

पार्श्वभूमीवर ही कवीता चालू...
मागे पडद्यावर श्रेयनानावली.....

समाप्त.