Get it on Google Play
Download on the App Store

उद्योगपर्व

अभिमन्यूच्या विवाहामध्ये पांडव व त्यांचे मित्र-राजे एकत्र जमले असताना श्रीकृष्णाने मित्र-राजांना सांगितले की, युद्धाची वेळ आल्यास तुम्ही पांडवांना साहाय्य केले पाहिजे. पांचालराजा द्रुपद याने सांगितले की, दुर्योधन सामोपचाराने पूर्वीप्रमाणे राज्याचा अर्धा वाटा देणार नाही; तरी मित्र-राजांकडे आपले दूत पाठवावेत; नाहीतर दुर्योधन अगोदरच त्यांच्याशी करारमदार करून बसेल. माझा पुरोहित धृतराष्ट्राकडे संदेश घेऊन सामोपचाराकरिता आपण पाठवू या. युद्धाची तयारी मात्र वेगाने केलीच पाहिजे. द्रुपदाचा पुरोहित हस्तिनापुरास रवाना झाला.

दुर्योधनाला मात्र युद्ध हवे होते. श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेला होता. कौरव व पांडव देशोदेशींच्या राजांना दूतांतर्फे संदेश देऊन आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करू लागले. अर्जुन आणि दुर्योधन हे श्रीकृष्णाचे साहाय्य मिळविण्याकरिता द्वारकेस गेले. श्रीकृष्ण निद्रा घेत होता. त्याच्या डोक्याशी दुर्योधन बसला व पायांशी अर्जुन. श्रीकृष्णाला अर्जुन अगोदर दिसला; नंतर दुर्योधन. दोघांनी साहाय्य मागितले.

श्रीकृष्णाने आपल्या साहाय्याचे दोन भाग केले. एका बाजूला स्वतः म्हणजे श्रीकृष्ण आणि दुसऱ्या बाजूला त्याचे नारायणनावाचे सैन्य; यांपैकी दुर्योधनाने नारायणसैन्य मागून घेतले आणि अर्जुनाने श्रीकृष्णाला स्वीकारले. श्रीकृष्णाने या युद्धात शस्त्र धरणार नाही असे सांगितले होते; परंतु अर्जुनाने योग्य उपदेश व सारथ्य करणारा असा निःशस्त्र श्रीकृष्णच पतकरला. द्रुपदाचा संदेशवाहक पुरोहित जेव्हा कौरवांकडे आला तेव्हा त्याने सामोपचाराचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु धृतराष्ट्राचा सारथी संजय धृतराष्ट्राचा संदेश घेऊन आला. संदेशात एवढेच होते की, युद्ध वाईट म्हणून टाळा आणि शांततेने रहा.


युधिष्ठिरांनी उलट संदेश पाठविला, की आम्हांला आमचे इंद्रप्रस्थाचे राज्य द्या; आम्ही युद्धाला इच्छुक नाही. युधिष्ठिर केवळ पाच गावे घेऊनही समाधानाने राहण्यास तयार होते. संजयाने परत आणलेला संदेश धृतराष्ट्राकडे पोहचल्यावर भीष्म, द्रोण आणि विदुर यांनी दुर्योधनाचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; पण काहीच उपयोग झाला नाही. तो  काहीच द्यायला तयार नव्हता. सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनदेखील द्यायला तयार नव्हता. दुर्योधनापुढे धृतराष्ट्राचाही इलाज चालला नाही.

 पांडव शक्य तितका प्रयत्न करून युद्ध टाळावे असा दृष्टिकोण बाळगून चर्चा करीत होते. दुर्योधनाचा नकार कळल्यावर श्रीकृष्णाने आपण शिष्टाई करतो व तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले. पांडवांना ही श्रीकृष्णशिष्टाई मान्य झाली. भीम एरवी स्वभावाने अत्यंत संतापी आणि निग्रही; त्यालाही हे मान्य झाले.

द्रौपदी मात्र या शिष्टाईला नाकबूल होती. तिने युद्धाशिवाय मार्ग नाही; शांततेचा बोल फोल आहे; लढलेच पाहिजे, असे म्हटले. श्रीकृष्ण शिष्टाईकरता निघाला तेव्हा युधिष्ठिरांनी सांगितले, माता कुंती विदुराच्या घरी राहिली आहे, तिचेही क्षेमकुशल विचारून यावे. श्रीकृष्ण कौरवांकडे गेला. धृतराष्ट्राने त्याचा आदरपूर्वक सत्कार केला; परंतु श्रीकृष्णाने आतिथ्याचा स्वीकार विदुराच्याच घरी केला.

कुंतीची भेट झाली. युधिष्ठिरांचा प्रणाम स्वीकारून ती भडकली आणि म्हणाली, तुम्ही क्षत्रपुत्र आहात. असा शांतीचा आणि सामोपचाराचा मार्ग तुमच्या भेकडपणाचा दर्शक ठरतो. मी क्षत्रियपत्नी आहे. वीरपत्नी पुत्रांना ज्या कार्याकरता प्रसवते, ज्या उद्देशाने प्रसवते, तो उद्देश पूर्ण करण्याची ही वेळ आहे. श्रीकृष्णासह भीष्म, द्रोण, विदुर ह्यांनी दुर्योधनाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि वाद मिटवावा असे सांगितले. परंतु या सगळ्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले, श्रीकृष्ण संतापला आणि म्हणाला, की कौरवांच्या पैकी जे समंजस व शांततावादी असतील त्यांनी दुर्योधनाला आणि त्याच्या मताच्या सहकाऱ्यांना बंदी करून कुलक्षय टाळावा.

धृतराष्ट्राने कौरवांच्या मातेला म्हणजे गांधारीला सांगितले, की तूही दुर्योधनाचे मन वळविण्याचा प्रयत्न कर; परंतु तिचाही प्रयत्न सफल झाला नाही. उलट दुर्योधनाने श्रीकृष्णाला बंदिवासात टाकण्याचा कट केला. या कटाची बातमी अगोदरच फुटली. धृतराष्ट्र व विदुर यांनी दुर्योधनाचा खूप निर्भत्सना केली. कृष्णशिष्टाई फुकट गेली.

कृष्णाने कर्णाचे मन पांडवांच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. कर्ण हा कुंतीला तिच्या विवाहापूर्वी सूर्यापासून झालेला पुत्र होता; पण कुंतीने तो जन्मताच त्याचा त्याग केला होता. ह्या कौटुंबिक रहस्याचा कृष्णाने कर्णाजवळ स्फोट केला. परंतु कर्ण म्हणाला, अशा स्थितीत पांडव हे माझे बंधू असले, तरी मी दुर्योधनाचा पक्ष सोडू शकत नाही.

 श्रीकृष्ण पांडवांकडे परतला आणि युद्धाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट युद्धिष्ठिरांना पटली. युधिष्ठिर युद्धाविरूद्ध होते, परंतु व्यथिथ मनाने आपल्या भावांना त्यांनी युद्धाची संमती दिली. उभयपक्षाच्या सेनादलांची शिबिरे भरली. पांडवांचे ७ अक्षौहिणी आणि कौरवांचे ११ अक्षौहिणी असे एकूण १८ अक्षौहिणी सैन्य युद्धासाठी सज्ज झाले.भारतातील सर्व देशांचे राजे आपापल्या चतुरंग सेनादलासह आपापल्या पक्षाच्या बाजूने उपस्थित राहिले.

धृष्टद्युग्म पांडवांचा सेनापती म्हणून नेमला गेला. भीष्म कौरवांचे सेनापती म्हणून ठरले. धृतराष्ट्राला या युद्धाच्या वार्ता मिळाव्या म्हणून सारथी संजयाला व्यासांनी दिव्य दृष्टी दिली. रणांगणापासून दूर, धृतराष्ट्राच्या महालात बसून, संजयाला युद्धभूमी संपूर्ण दिसू लागली व धृतराष्ट्राला सविस्तर वृत्त मिळेल अशी व्यवस्था झाली.