Get it on Google Play
Download on the App Store

आदिपर्व

पांडू व धृतराष्ट्र यांचा जन्म नियोगविधिने अंबालिका व अंबिका ह्या विचित्रवीर्याच्या पत्नींपासून झाला. येथपर्यंतचा कथाभाग वर आलेलाच आहे. धृतराष्ट्र हा जन्मांध म्हणून त्याला राजपद मिळाले नाही. पांडू हा युद्धविद्यानिपुण म्हणून हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर भीष्मांनी त्याची स्थापना केली. धृतराष्ट्र, पांडू व विदुर या तिघांचेही शिक्षण झाले व विवाहही झाले. धृतराष्ट्राने गांधारीला वरले. आपला पती अंध आहे, असे समजताच तिने आपल्या नेत्रांवर कायमची पट्टी बांधली. कुंती आणि माद्री यांच्याशी पांडूचा विवाह झाला. त्याने अनेक दिग्विजय करून आपले राज्य वाढविले.


एकदा अरण्यात तो मृगया करीत असता मृग आणि मृगीच्या रूपाने एक मुनिदांपत्य कामोपभोग घेत होते. पांडूचा बाण लागून मुनी मरण पावला. मरताना पांडूला त्या मुनीने शाप दिला की, तूही स्त्रीसंग करताच तत्काल मरशील. त्यानंतर पांडूने विजनवास पतकरला. वनात असताना पांडूने कुंती आणि माद्री या दोन्ही पत्न्यांना नियोगविधिने अन्य पुरूषांपासून पुत्रप्राप्ती करून घ्यावी, अशी आज्ञा केली.

कुंतीला एका ऋषीने पुत्र प्राप्तीकरता मंत्रविद्या शिकवली होती. तिच्या योगाने कुंतीने यम, वायु  व इंद्र यांचे मंत्रांनी आवाहन करून त्यांच्यापासून धर्म, भीम व अर्जन हे पुत्र प्राप्त करून घेतले; माद्रीने आश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव हे दोन पुत्र मिळविले.

धृतराष्ट्राची पत्नी गांधारी याच सुमारास गर्भवती होती. आपल्या आधी कुंतीला पुत्र झाल्याचे ऐकून तिच्या मनाला धक्का बसला आणि तिचा गर्भ पतन पावला. धक्का बसण्याचे कारण आपला पुत्र राज्याचा वारस होणार नाही; कुंतीचाच पुत्र वारस होईल, हे लक्षात आले. तिचा गर्भ लोखंडासारखा टणक मांसपेशी होता. व्यासांच्या सांगण्यावरून त्यावर थंड पाण्याचा शिपका मारला. त्याचे एकशे एक भाग झाले. ते भाग एकशे एक घृतकुंभांमध्ये जपून ठेवले. त्यांतून दुर्योधन, दुशाःसन इ. शतपुत्र आणि एक कन्या अशी एकशे एक अपत्ये निपजली.

एके दिवशी माद्रीशी रममाण झाला असताना पांडू पंचत्वाप्रत गेला; कारण असा शाप होता. त्याच्याबरोबर माद्रीने सहगमन केले आणि कुंती पाच पांडवांसह राजधानीला म्हणजे हस्तिनापूरला परतली.

पांडवांना परतलेले पाहून भीष्मांना संतोष झाला. भीष्मांनी कौरव-पांडवांना धनुर्विद्या शिकविण्यासाठी प्रथम कृपाचार्यांची नेमणूक केली. त्यानंतर द्रोणाचार्य आपला पुत्र अश्वत्थामा याच्यासह हस्तिनापूरला आले. ते शस्त्रास्त्रविद्येत पारंगत असल्यामुळे भीष्मांनी कौरव-पांडवांचे आचार्य म्हणून त्यांची योजना केली.

पांडूशी विवाह होण्याच्या अगोदर कुंतीला कुमारी असतानाच सूर्यमंत्राने कर्ण हा पुत्र झाला होता. तोही द्रोणाचार्यांच्या हाताखाली शिकला. कुंतीने त्याचा जन्म झाल्याबरोबरच त्याला नदीत सोडले होते. एका सूतजातीय व्यक्तीने त्याचा सांभाळ केला होता. कर्णही धनुर्विद्येत पारंगत झाला. अर्जुन व कर्ण यांचे आपसात पटत नव्हते; पण कर्ण व दुर्योधन यांचे सख्य होते. दुर्योधनाने कर्णाला अंग देशाचा राजा केले. कृतज्ञतेमुळे कर्ण दुर्योधनाचा कायमचा मित्र बनला.

 धनुर्विद्या समाप्त झाल्यावर द्रोणाचार्यांना शिष्य गुरूदक्षिणा देऊ लागले. काय गुरूदक्षिणा पाहिजे, असे विचारले. आचार्य द्रोण म्हणाले, लहानपणी पंचाल देशाचा राजा द्रुपद आणि मी एकत्र शिकलो; मित्र होतो. कालांतराने आम्ही एकमेकांपासून दूर गेलो. द्रुपद हा राजपदावर अभिषिक्त झाल्यावर मी त्याच्याकडे जाऊन त्याला म्हटले, की आपण जुने मित्र आहोत; परंतु द्रुपदाने ओळख दिली नाही व म्हणाला, की तू दरिद्री कफल्लक आणि मी ऐश्वर्यसंपन्न राजा.आपली मैत्री कशी असू शकेल? समानांची मैत्री असते. असा द्रुपदाने माझा अपमान केला. त्याला तुम्ही जिवंत पकडून माझ्यापुढे आणावे. हे काम अर्जुनाने पार पाडले. द्रोणांनी द्रुपदाचे अर्धे राज्य हिरावून त्याला क्षमा केली.

ही घोर मानखंडना द्रुपदाच्या मनात सलत होती. द्रोणाचा वध करील असा पुत्र प्राप्त होण्याच्या कामनेने द्रुपदाने यज्ञ केला. अग्निदेव प्रसन्न होऊन पुत्र धृष्टद्युग्म आणि कन्या द्रौपदी त्याला झाली. द्रौपदीलाच याज्ञसेनी, पांचाली किंवा कृष्णा अशा अनेक नावांनी संबोधितात. तिसरे अपत्य म्हणजे शिखंडी हा होय. तो पहिल्यांदा कन्येच्या रूपाने उत्पन्न झाला. पश्चात स्थूणाकर्ण यक्षाच्या कृपेने तो पुरूष बनला.

 दुर्योधनाने बलरामाकडे गदायुद्धाचा व कर्णाने परशुरामाकडे अस्त्रविद्येचा अभ्यास केला. हस्तिनापूरच्या राज्याचे सूत्रधार भीष्म होते. त्यांनी त्यांच्या घराण्यातील ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर यास बौवराज्याचा अभिषेक केला, त्यामुळे राज्यव्यवहार पांडवांकडे आपोआप गेला. धृतराष्ट्र व त्याचे पुत्र कौरव हे मत्सरग्रस्त झाले आणि पांडव-कौरवांचे वैमनस्य वाढीस लागले. दुर्योधन, शकुनी, दुःशासन आणि कर्ण यांनी गुप्त खलबत करून कुंतीला पुत्रांसह दग्ध करण्याचा कट रचला आणि तो कट त्यांनी धृतराष्ट्राला सांगितला. धृतराष्ट्रही पांडवांचा सर्वांगीण उत्कर्ष पाहून मनात जळतच होता. त्याने विरोध केला नाही. कौरवांनी वारणावत या सुंदर नगरीमध्ये जतुगृह म्हणजे लाखेचा महाल तयार करविला. त्वरित ज्वालाग्राही अशा लाखेच्या ह्या महालात कुंतीसह पांडव राहतील अशी योजना केली. दुर्योधनाचा हस्तक पुरोचन योग्य वेळी लाक्षागृहाला आग लावणार होता. विदुराच्या हा सगळा कट लक्षात आला. धृतराष्ट्राने कुंती आणि पांडवांना सांगितले होते, की वारणावत ही नगरी फार सुंदर आहे. ती पहायला तुम्ही तिकडे जा. या कटाचा सुगावा विदुराला लागला होता. त्याने आपल्या कुशल कारागिराकडून त्या जतुगृहातून गुप्त रीतीने बाहेर पडण्याकरता एक भुयार खोदून घेतले.

वारणावनात आल्यावर एके दिवशी कुंतीने ब्राह्मणभोजनाचा व दानधर्माचा कार्यक्रम केला. संतुष्ट अतिथी आणि पुरोचिन रात्री झोपी गेले. त्या लाक्षामहालात एका बाजूला आपल्या पाच पुत्रांसह एक निपादी उतरली होती. रात्री भीमानेच लाक्षागृहाली आग लावली. पांडव लगेच उठून त्या भुयारातून कुंतीसह गुप्तपणे सुखरूप बाहेर पडले आणि वनात गेले. पुरोचन ह्या आगीत जळून मेला. तसेच दुसऱ्यात दिवशी पाच पुत्रांसह एक स्त्री जळलेली पाहून कौरवांना वाटले की, पांडवांचा योग्य निकाल आपण लावला.

 वनामध्ये हिंडत असताना रात्र झाली आणि पांडव, कुंती हे झोपी गेले. राक्षस हे रात्री हिंडत असतात. त्याप्रमाणे हिडिंबनामक राक्षस व त्याची भगिनी हिडिंबा यांना माणसांची चाहूल लागली. हिडिंब राक्षसाने हिडिंबेला ती माणसे हुडकून काढण्याकरता पाठवले. तिला पांडव दिसले. त्यातला भीमसेन तिला फार आवडला. भीमसेनावर ती आसक्त झाली. हिडिंबा परत गेली नाही. हिडिंब हा तिचा भाऊ तेथे आला व खवळला. त्याचे आणि भीमसेनाचे युद्ध झाले व त्यात हिडिंब ठार झाला. हिडिंबेने भीमाशी विवाह करण्याची अनुज्ञा कुंतीपाशी मागितली. दोघांचा विवाह झाला. हिडिंबेला घटोत्कच नावाचा पुत्र झाला.

 पांडव त्या वनातून ब्राह्मणवेश धारण करून एकचक्रा नगरीत आले आणि एका ब्राम्हणाच्या घरी राहिले. या नगरीला बकनामक असुराने आपल्या ताब्यात घेतले होते आणि प्रतिदिनी घरटी एक माणूस खाण्याकरता तो जबरदस्तीने घेत होता. पांडव जेथे राहिले होते, त्या ब्राम्हणाच्या कुटुंबावर पाळी आली. ते सबंध कुटुंब शोकाकूल झाले. कुंतीने त्या ब्राम्हणाची समजूत घालून भीमसेनाला बकासुराकडे पाठविले. त्याने बकासुराला गरगर फिरवून भूमीवर आपटले व त्याचा निकाल लावला. त्या नगरीवरचे संकट नष्ट झाले.

 थोड्या दिवसांनी द्रुपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर मांडिले. ही गोष्ट पांडवांच्या कानावर आल्यावर ते द्रुपदाच्या राजधानीस गेले व स्वयंवराच्या मंडपात म्हणजे रंगभूमीत येऊन दाखल झाले. ब्राह्मणसमुदायाच्या कक्षेत बसले. क्षत्रियांच्या कक्षेत दुर्येधन, कर्ण, शकुनी, श्रीकृष्ण, बलराम इ. मंडळी विराजमान झाली होती. धृष्टद्युम्नाने स्वयंवराचा पण घोषित केला. मंडपात एक फिरते मत्स्ययंत्र खूप उंचीवर बसविले होते. जो उच्च कुलोत्पन्न त्या फिरत्या मत्स्ययंत्रातील लक्ष्याचा वेध करील आणि भूमीवर पाडील त्याला माझी बहीण कृष्णा वरील. हे ऐकून उपस्थित असलेल्या बहुसंख्य राजपुत्रांनी मत्स्यवेधाचा प्रयत्न केला; पण कोणालाच जमले नाही. हे पाहून कर्ण पुढे आला व धनुष्य सज्जल करून वेधणार, तोच द्रौपदीने म्हटले, की तो हलक्या जातीचा म्हणजे सूतपुत्र आहे. त्यामुळे मी त्याला वरणार नाही.

पांडवांना माहीत होते, की कर्ण जरूर यशस्वी होईल. कर्ण मागे सरल्यावर अर्जुन पुढे आला व त्याने मत्स्यभेद करून पण जिंकला. एका ब्राम्हणाने द्रौपदीसारखे महारत्न हस्तगत केले, हे पाहून सर्व राजमंडळ क्षुब्ध झाले; पण श्रीकृष्णाने मध्यस्ती करून युद्धाचा प्रसंग टाळला. अर्जुन द्रौपदीला घेऊन कुंतीकडे आला व म्हणाला, आई आज मी अपूर्व भिक्षा आणली आहे. इकडे तिकडे न पाहता ती एकदम उद्‌गारली, पाचही जण वाटून घ्या. त्याचप्रमाणे पांडवांनी द्रौपदीशी विवाह केला.

 पांडव जिवंत असून अर्जुनाने द्रौपदीस्वयंवरातला पण जिंकला, ही वार्ता हस्तिनापुरात कळली. धृतराष्ट्राने पांडवांना विदुरातर्फे निरोप देऊन हस्तिनापुरात पुनश्च आणले. कौरव-पांडवांचे अंतर्वैर वाढू लागले. भीष्मांनी राज्याची त्यांच्यात वाटणी केली व पांडवांना इंद्रप्रस्थ ही राजधानी दिली.

 नारदमुनींच्या उपदेशाप्रमाणे पांडवांनी द्रौपदीबरोबर प्रपंच एकत्र न करता दिवस प्रत्येकाला वाटून घ्यावे; एकमेकांशी एकमेकांच्या एकांतवासात विक्षेप आणू नये; विक्षेप जो आणिल त्याने एक वर्ष वनवास पतकरावा; असे ठरले. परंतु एका महत्त्वाच्या कारणास्तव अर्जुनाकडून नियमभंग झाला. अर्जुन वनवास पतकरून अनेक देश हिंडला. या यात्रेत उलुपी नावाची नागकन्या व मणिपूरची राजकन्या चित्रांगदा यांच्याशी विवाह करून त्यांच्यापाशी काही दिवस राहिला. या यात्रेत द्वारकेलाही त्याने भेट दिली व रामकृष्णांची भगिनी सुभद्रा हिच्या प्रेमात सापडून तिला पळवून नेले. याला कृष्णाची संमती होती; पण बलरामाची नव्हती. बलरामानेही अखेर संमती दिली. दोघांचा विवाह झाला आणि अर्जुन सुभद्रेला घेऊन इंद्रप्रस्थास परतला.

 द्रौपदीला पांडवांपासून पाच पुत्र झाले. सुभद्रेला अभिमन्यू झाला. एकदा कृष्णासह अर्जुन वनविहाराला गेला असता त्याने खांडववन पाहिले. कृष्णार्जुनांपाशी अग्निदेवाने ते वन भक्षणार्थ मागितले. अग्निला संमती मिळाली. वणवा पेटला; ज्वाळा भडकल्या. त्यातील प्राणिमात्र वणव्याच्या वेढ्यात सापडले आणि जळून खाक झाले. त्या वनात मय नावाचा स्थापत्यविशारद असुर रहात होता. तो शरण आला आणि अर्जुनाकडून त्याला जीवदान मिळाले. खांडववन भक्षून अग्नी तृप्त झाला. अग्निदेवाने अर्जुनाला दिव्य रथ, अभंग धनुष्य व अक्षय्य भाता या वस्तू दिल्या.