Get it on Google Play
Download on the App Store

अरे कृष्णा अरे कान्हा

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी ह्मणे हरी हा गुप्‍तची ओळखावा
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना