Get it on Google Play
Download on the App Store

भगवंत - डिसेंबर ११

परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे . थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो . जो पंत असेल तोच संत बनेल . प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी , पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे . खरोखर , भगवंताला ‘ सर्व ’ देण्यापेक्षा ‘ स्व ’ द्यायला शिका . ‘ स्व ’ दिल्यावर ‘ सर्व ’ न दिले तरी चालेल . कारण ते आपले - आपल्या मालकीचे राहातच नाही . उलट , ‘ सर्व ’ देऊन ‘ स्व ’ द्यायचा राहिला , तर ‘ सर्व ’ दिल्याचे समाधान मिळत नाही . भगवंताला ‘ स्व ’ देणे म्हणजे ‘ मी त्याचा आहे ’ ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय .

वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते . परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करावयाची , त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल , तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणामध्ये होते . शिवाय , सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्याकारणाने , वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत . म्हणून , आपण कर्ममार्गाने जात असता , कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे . कर्ममार्ग मनापासून करणार्‍या माणसामध्ये , नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते , त्याबद्दल माझा आक्षेप आहे . एरवी , कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल माल आदरच आहे .

एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात हा समज खरा नाही . परंतु , कर्माने चित्त शुद्ध होत असताना नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहाते . इतकेच नव्हे , तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते , आणि भगवंताशी एकरुप झालो की ते त्यामध्ये मुरुन जाते . रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे , तर तो सिद्धमंत्र आहे . तो भगवंतापर्यंत नेतो ; नव्हे , तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो , हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे . वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहावे . रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे . रामनाम हे ओंकाराचेच स्वरुप आहे . ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे . श्रीशंकरांपासून तो श्रीसमर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले . रामनामाचा साडेतीन कोटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही . रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा . नाम घेत असता , जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे , असा भरवसा ठेवावा .

ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास

स्तोत्रे
Chapters
भगवंत - डिसेंबर १ भगवंत - डिसेंबर २ भगवंत - डिसेंबर ३ भगवंत - डिसेंबर ४ भगवंत - डिसेंबर ५ भगवंत - डिसेंबर ६ भगवंत - डिसेंबर ७ भगवंत - डिसेंबर ८ भगवंत - डिसेंबर ९ भगवंत - डिसेंबर १० भगवंत - डिसेंबर ११ भगवंत - डिसेंबर १२ भगवंत - डिसेंबर १३ भगवंत - डिसेंबर १४ भगवंत - डिसेंबर १५ भगवंत - डिसेंबर १६ भगवंत - डिसेंबर १७ भगवंत - डिसेंबर १८ भगवंत - डिसेंबर १९ भगवंत - डिसेंबर २० भगवंत - डिसेंबर २० भगवंत - डिसेंबर २२ भगवंत - डिसेंबर २३ भगवंत - डिसेंबर २४ भगवंत - डिसेंबर २५ भगवंत - डिसेंबर २६ भगवंत - डिसेंबर २७ भगवंत - डिसेंबर २८ भगवंत - डिसेंबर २९ भगवंत - डिसेंबर ३० भगवंत - डिसेंबर ३१