Get it on Google Play
Download on the App Store

समाधान - ऑगस्ट २५

आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते . त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही , तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण भ्रमाने सत्यच मानीत असतो . जे चिरकाल राहते तेच खरे सत्य होय . आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते . मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार . समाधान जिथे भंगते तो मार्ग खास चुकीचा आहे . मुंगळा गुळाच्या खड्याला चिकटतो , मान तुटली तरी सोडीत नाही . त्याचप्रमाणे , आपण विषयसुख सोडीत नाही , याला काय करावे ? जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते या विषयसुखाचा त्याग करतात ; आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येते .

आपले समाधान का बिघडते ? आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून ! जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही ; त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधले तरी ते आपल्याला मिळत नाही . समाधान फक्त भगवंताजवळ आहे . खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहात नाही ; म्हणून आपल्याला समाधान नाही . मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून , सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचेच होते . म्हणून , आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे .

आपण ज्या कार्यासाठी आलो , ते कार्य झाले की समाधान होते . मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत , आपण त्या कार्यासाठी आलो नाही असे म्हणायला काय हरकत आहे ? आपण भगवंतासाठीच आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे . जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही , किंवा ते नेऊ शकत नाही . मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल . त्याकरिता नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे , त्याचे गुणवर्णन ऐकावे , त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये . मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचे होऊन राहावे . नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये . कोरडा वेदान्त ऐकू नये . प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते . म्हणून नामच सर्वस्व मानावे . नामात काय आहे हे , ते घेतल्यानेच सर्व काही कळून येते . तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते , आणि हे नामस्मरणाच्या योगानेच घडून येते .