Get it on Google Play
Download on the App Store

जून २७ - परमार्थ

असे पाहा , एखादा प्रवचन करणारा घ्या , किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या ; त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही , तो असमाधानातच असतो . कळू लागल्यापासून आपण सचादाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही , याचे कारण काय ? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते . आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने ; कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील . लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही . पापकर्म करणार्‍यालाही समाधान लाभत नाही , कारण त्यालासुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते . एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला , " देवापाशी काही न्याय नाही ; तो अगदी अन्यायी आहे . " मी त्याला विचारले , " असे झाले तरी काय ?" त्यावर तो म्हणाला , " मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही , सदाचरणाने वागलो ; पण मी फक्त एकमजली घर बांधू शकलो , आणि माझ्या हाताखाली काम करणार्‍या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले ! " मी त्याला विचारले , " मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला ? " त्यावर तो म्हणाला , " मला तसे आवडत नाही ; लोक नावे ठेवतील . " तेव्हा , जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही . प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो , आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो ; मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल ? अंगावर चांगले दागिने घातले , उत्तम लुगडे नेसले , परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत ? तसेच , जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही . याउलट , देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल , तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही .

खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे , विद्वान लोक तो उगीचच अवघड करुन सांगतात . चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल . परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल ; एक , देहाने साधूची संगत ; दुसरी , संतांच्या वाड्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण ; आणि तिसरी , भगवंताचे नामस्मरण . नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल . संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी , आणि ते पुढे निश्चयाने , श्रद्धेने , आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी . हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे .