Get it on Google Play
Download on the App Store

जून ९ - परमार्थ

पुष्कळदा भक्ती म्हणजे काय , किंवा परमार्थ कशाला म्हणतात , हेच आपल्याला कळत नाही . ज्याला प्रपंच नीट करता येत नाही , त्याला नाही परमार्थ करता येणार . प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार . कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा , विषयांचा आला पाहिजे . मला सुख व्हावे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो . मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय . ‘ जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती ’ अशी मोक्षाची व्याख्या करता येईल .

खरोखर , भगवंताजवळ काय कमी आहे ? एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी . काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे होय . प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यासवृत्ती होय . वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही , त्याला काय करावे ? माझे समाधान माझ्याजवळ असताना , दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते , हेच आपले चुकते . हवेपण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही . हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही , हे सर्व रोगांचे मूळ आहे ; आणि म्हणूनच , ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा . आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार . आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी . प्रत्येकाला वाटते , मी श्रीमंत व्हावे . पण कितीजण तसे होतात ? म्हणजे ही निराशाच नाही का ? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे . नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय , प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही . उलट , भिकार्‍याचे काम करणार्‍याने जर ते उत्तम केले , तर लोक त्याचे कौतुक करतात . तसे , प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय आणि कुणी गरीब असला काय , याला महत्त्व नसून , त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्त्व आहे . आपण पैसा साठविला तर गैर नाही ; पण त्याचा आधार न वाटावा . अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये . विषयावर जोपर्यंत तुमचे सुख अवलंबून आहे , तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही . एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले , म्हणजे तो प्राप्त होतो . ‘ मी करतो ’ असे कधीच म्हणू नये . मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहीन असे जो म्हणतो , त्याला भगवंताचे दर्शन होणे कठीणच असते . विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते , त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी . आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे , हे प्रथम पाहावे . परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील , त्याला तो लवकर साधेल . त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही .