Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह २

२६

भरली कृष्णाबाई काय पाण्याचा कालवा

इष्णुच्या देवळाला कांचेचा गिलवा

२७

भरली कृष्णाबाई पानी दिसे दुधावानी

जटा धुतल्या गोसायानी

२८

शनिवार गेला आइतवार आला

देव जोतिबाचा घोडा सभेला निघाला

२९

आईतवार गेला सोमवार आला

दुरडया बेलाच्या महादेवाला

३०

सोमवार गेला मंगळवार आला

माझ्या यल्लमाला चोळीपातळ शिखराला

३१

मंगळवार गेला, बुधवार आला

डोंगराइची डोंगराई तुला मोंगली साज केला

३२

बुधवार गेला बृहस्पतवार आला

द्या ग पिराला, खडीसाखर मलिद्याला

३३

बृहस्पतवार गेला, शुकीरवार आला

आई लक्षुमीला हिरवी शेलारी नेसायाला

३४

शुकीरवार गेला, शनिवार आला

देव मारुतीला रूईटीच्या माळा घाला

३५

अटंग्या वनामंदी कोन कोयाळ गीत गाई

कारंड यल्लमा परशुरामाला झोका देई

३६

यल्लुच्या डोंगरावर झगाला झगदाट

माझ्या देवीवर, चवरी डुलते, तीनशेसाठ

३७

मंगळ्वारादिशी येते कोन तांब्याच्या घागरीची

माझी वाणीण डोंगरीची

३८

मंगळवारदिशी करूं साखरेचं लाडू

यल्लू, तुला जोगव्याला वाढू

३९

आठा दिसा मंगळवारी, यल्लू बसावं सदरेला

माझी तान्ही बाळं येत्यात मुजर्‍याला

४०

यल्लमाच्या डोंगरावर कोन पिवळ्या पातळाची

कारंड यल्लमा हवा पाहते जतरेची

४१

देवामंदी देव यल्लमा किती काहारी

तिनं पुरूषाची केली नारी

४२

यल्लमाला जाते भंडारा घेते समाईक

दोघी बहिणीचा देव एक

४३

यल्लमाला जातां आडवं लागे मोतीचूर

लिंबाला घेते पितांबर

४४

काळं कुरुंद जातं, वाघ्यामागल्या मुरळीचं

दिलं इनाम जेजुरीचं

४५

नऊ लाख पायरी जेजूरी गडाला

कंठी गवंडयाच्या बाळाला

४६

हळदीचं जातं, जड जातं म्हाळसाला

खंडेराव हाक मारी बाणाईला

४७

आठा दिसा आईतवारी, उभी दरवाजांत

बाणाई म्हाळसा आल्या वारी मागत

४८

वाणीयाच्या मुली, हळदीचा काय भाव ?

माझ्या घरी द्येव, जेजुरीचा खंडेराव

४९

वाजंत्री वाजत्यात पाली गांवीच्या बुरुजावर

माझ्या मल्हारीचं लगीन लागतं मिरगावर

५०

वान्याची म्हाळसा, धनगराची बाणाबाई

जेविती एका ताटी, देव मल्हारी तुझ्यासाठी