Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १४

पहिली माझी ओवी - धरीतरी मेघाला

जल्म दिलेल्या दोघांला !

*

तहान लागली अरण्यडोंगरांत

गंगा माझ्या ह्रुदयांत माय माझी.

*

बारीक पिठाची भाकरी चवदारु !

माझ्या माउलीची जेवतांना याद करुं !

*

माय म्हणु माय, किती सांगूं आठवणी

आई मोहाच्या मधावाणी !

*

काय सांगुं बाई ! माहेरची बढाई

माझ्या पित्यानं लावली--येशीपासून अंबराई !

*

इथून दिसतं माहेरीचं हिरवं रान

केवढं केळीबन ! उतरीतो बागवान !!

*

माझ्या माहेराची वाट टाक्या लावूनी घडली

गाडी बुक्क्याची सांडली !

*

उंच्या ओसरीला हंडया लावल्या सवाई

भावाच्या बरोबरी मायबाईचे जांवाई !

एकामागें एक येत्याल मागंपुढें

माझे ल्हाने बंधु माझ्या माउलीचे झेंडे !

सांगावा कासाराला बैस मैदानी मैदानी

बहिनी आम्ही लईजणी संगं बंधवाची राणी !

जातां माह्याराला उंच पाऊल पडे

बापजी बयाबाई गंगासागर येती पुढें !

*

पिकलं पिकलं, ऐंशीं खंडी झाली तुरी

बंधुजीची शेरी माप लाविलं दोहेरी !

*

वाटंवरचा ऊस या उसाचा धनी कोण ?

ताईत बंधुजीला, गुळ रांधाया झालं ऊन !

माळीयाच्या मळ्यांत जाईशेवंती जावाजावा

माझा भाऊराय मधीं केवडा घेतो हवा !

*

काळी चंद्रकळा पोत किती मऊ

घेणार बंधुजी व्यापारी माझा भाऊ !

*

चाटियाच्या दुकानीं उच्च मोलाची लालाई

एक्या बंधुवाचूनी भीड कुनाला घालावी !

*

सासरीचे बोल निवडुंगाचे कांटे

बंधु तुझ्यासाठीं फाटे, मन माझें !

*

शीतळ सावलीला पाखरं झालीं गोळा !

ताईत बंधुजी, माझा इसरांतीचा पानमळा !

*

मराठी माझं गांव पान्याला कशी जाऊं

सोप्या बैसले दीर भाऊ

*

हंसतां खेळतां माहेरीं गेले दीस

दळतां कांडतां सासरीं निघे कीस !

*

जीवाला माझ्या जडू जीवाला कोन होती ?

मध्यान्‌ रात्रीं बया येती हातीं अम्रताची वाटी !