Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १

पुत्राचं फळ न्हाई देवाच्या ध्यानामंदी

नार दिलगिर मनामंदी

पुत्राचं फळ न्हाई नारीच्या नावरसी

कय करील देवऋषी ?

लेन्यालुगड्याची नार दिसती कळवंतीण

जल्मा येउनी न्हाई झाली बाळंतीण

लाख्या सावकार काय करावं लाखाला

पोटी न्हाई पुत्रफळ, धन व्हईल लोकाला

लाख्या सावकार घरी लाखाचा दिवा जळे

पोटी न्हाई पुत्रफळ वसरी कोन खेळे

पोटी नाही पुत्र नार किती देखणी

लागे जिवाला घोकणी

आखाडी एकादस शिवरात्रीला पारणं

केली पुत्राच्या कारणं

देवाला देते मी वाण जवसाचं
पोटी बाळ दे नवसाच

देजे देवा मला संपत थोडी थोडी

अंगनी खेळायाला भीमाअर्जुनाची जोडी

१०

देवाला मी देते, वाण नारळाच

कडेला देई तान्हुलं जावळाच

११

देरे देवा मला, नकोत सोनहोन

मांडीवरी देई इसाव्याला तान्हं

१२

हौस मला मोठी, तान्ह बाळ तें असावं

दानं मुठीनं नासाव

१३

पुत्राचं ग फळ, देवानं दिलं सहज

कडे घ्यायाला नको लाज

१४

अप्रुबाव मेवा तान्या लेकराचा

माझा बत्तासा साकरेचा

१५

तान्ह्या लेकराचा, अप्रूपाव मेवा

कडे उचलून घ्यावा

१६

पुत्राचं फ्ळ, देव देतुया बळंबळं

सासुससर्‍याची माझ्या पुन्याई सबळ

१७

खाऊ पाठवीते, बत्तासा रेवडीचा

तान्हुला माझ्या ग आवडीचा

१८

पालक पाळणा येताजाता जुजु बाई

तान्ह्या बाळा नीज न्हाई

१९

पालक पाळणा येता जातां करूं जुजू

बाळ गोपलकिस्ना निजू

२०

रंगीत पाळना येताजाता हलवा

माझ्या राघुला बोलवा

२१

रंगीत पाळणा खिडक्याखिडक्यांनी वेढियेला

तुझ्या आजानं धाडीयेला

२२

पाळन्याची दोरी उंबर्‍यावरी लोळे

ताईत बाळराय, पाळण्यामंदी खेळे

२३

थोरलं माझं घर ओटीवर पाळणा

निजला आंत तान्हा

२४

पालक पाळणा रंगमहाली करकरला

कंथ हौशनं झोका दिला

२५

पाळन्याची फळी दिसती एकार

ऐका माझ्या तान्हीचा हुंकार