Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ५

१२६

लक्ष्मी आई आली मागाचा कट्टा चढे

हौशा घरधनी घोटाच्या पाया पडे

१२७

लक्ष्मीआई आली सोन्याच्या पाऊलानं

भरताराचं जोतं चढते डऊलानं

१२८

मध्यान्हीला लक्षुमी आली, दाराला देते थाप

घरधनियांची पहिली गाढ झोप

१२९

लक्ष्मी आली बैलाच्या मागून

तुमच्या पालवी लागून

१३०

लक्ष्मी आली धर माझी करांगळी

माझ्या राजसाची दाविते सोप आळी

१३१

लक्षुमी माय आली हाती तांब्या अमृताचा

माझीया कंथाचा वाडा दाविते सम्रताचा

१३२

वाटेवरली लक्षुमी आली परसूदारानं

सावळ्या कंथाच्या कणगी लागल्या फेरानं

१३३

वाटेवरली लक्षुमी आली शेताच्या ओढीनं

सावळा कंथ, धान्य मोजितो खंडीनं

१३४

लक्षुमी पिकली शेताच्या शिवारात

सावळा घरधनी मोती भरतो घागरीत

१३५

तिन्ही सांजा झाल्या, लक्षुमीची वेरझार

राया उघडा देवघर

१३६

सासुसासर्‍याचं, घर दीराया ननंदाचं

पृथ्वीमोलाचं लेनं दिलं भरताराचं

१३७

सांबाच्या पिंडीवर तीळ्तांदूळ पाच गहु

चुडिया राजसाला दे पोटी पुत्र पाठी भाऊ

१३८

सत्तेनारायना न्हाई मागत तुला काई

हाशा भरताराला थोडी संपत, औक्ष लई

१३९

हाशा भरताराला नका म्हनुसा न्हानथोर

पदरी बांधल ईसवर

१४०

आईबापानी दिली लेक नका करुंसा घरघर

देवासारिखं भरतार

१४१

चार माझी बाळं पाचवा भरतार

कृस्नदेवाचा अवतार

१४२

सांबाच्या पिंडीवर बेल वाहते तिकटीचं

चुडीया राजसाला औख मागते दुपटीचं

१४३

देरे देवा मला पांच पुत्रांची पंगत

जल्माची घरधनियांची संगत

१४४

देरे देवा मला, जुनं जुंधळं ठेवणीला

घरधनियांना बारा बैल दावणीला