Get it on Google Play
Download on the App Store

बहुला गाय 4

बहुला गहिवरून म्हणाली, 'बाळ, तुला कोण वाईट म्हणेल? तू गुणांचा आहेस. सारं जग तुझ्यावरून ओवाळून टाकावं असा तू आहेस. तुझ्यावर का मी कधी रागावेन? अरे, पिताना तू मला ढुश्या देतोस, त्यात तर माझं खरं सुख. तुझी एकेक ढुशी लागते व मला अपार पान्हा फुटतो. तुझ्यावर नाही हो मी रागावल्ये.'

डुबा: मग तू का रडतेस? तुझं दु:ख मला का सांगत नाहीस? मी का फक्त तुझं दूधच पिऊ? तुझं दु:ख नको ऐकू? आई जगात तुला मी व मला तू. तू मला तुझं दु:ख सांगणार नसशील तर मी कशाला जगू?

बहुला: बाळ, सारं सांगत्ये, ऐक. आज हिरवं हिरवं गवत पाहून मी लांब चरत गेल्ये. कृष्णाला अंतरल्ये. मला मोह पडला. रात्र पडली तेव्हा मी भानावर आल्ये. तो जवळ ना यमुना, ना गाई, ना गोपाळ, ना कृष्ण, सभोवती भयंकर जंगल. मला रस्ता दिसेना. एकाएकी एक वाघ आला व तो मला खाणार, तोच मी त्याला म्हटलं, 'वाघोबा, माझ्या बाळाला मी शेवटचा पान्हा पाजून येते. त्याला निरोप देऊन येते, मग मला खा. मी खरोखर परत येईन.' डुब्या! वाघाला मी वचन दिलं आहे. आता मला जाऊ दे. मी सत्त्वापासून च्युत कशी होऊ? तू एकटा जगात राहणार, अजून अंगावर पिणारा म्हणून थोडं वाईट वाटलं; परंतु कृष्णदेव तुला आहे. त्याची कृपा सर्वांना पुरून उरेल. बाळ, आता नीट वाग. फार उडया मारू नकोस. फार झोंब्या घेऊ नकोस. रानात कृष्णाला सोडून दूर जाऊ नकोस, चांगला मोठा हो. देवाचा लाडका हो. असे म्हणून बहुलेने डुब्याचे अंग चाटले. डुबा म्हणाला, 'आई, मीच त्या वाघाकडे जातो. तू जगात राहा. तुला माझ्यासारखी आणखी बाळं होतील. मी तुझ्याच पोटी पुन्हा येईन; तुझं बाळ होईन. मला जाऊ दे. तुझ्या दुधावर व तुझ्या कृपेवर पोसलेला हा देह तुझ्याच कामी येऊ दे. माझं सोनं होईल. मी कृतार्थ होईन.'

बहुला सदगदित होऊन बोलली, 'बाळ, तू अजून लहान आहेस. वाघाचे कठोर पंजे तुझ्या कोवळया शरीराला कसे सहन होतील? तू मोठा हो. एक दिवस सत्त्वासाठी मरण्याचं भाग्य तुलाही लाभेल; परंतु आज हट्ट नको करू. आईचं ऐकावं हो बाळ.'

डुबा म्हणाला, 'आई, तुझं दुसरं सारं ऐकेन, परंतु या बाबतीत नाही. मी एक तोड सुचवतो. आपण वाघोबाकडे दोघेजण जाऊ व त्याला मी सांगेन, 'मला खा.' तू सांग, 'मला खा.' वाघाला ज्याचं शरीर आवडेल त्याला तो खाईल.'

बहुला व डुबा वनात जाण्यासाठी निघाली. अजून प्रहरभर रात्र उरली होती. आकाशात तारे स्वच्छ चमकत होते. हजारो डोळयांनी आकाश त्या मायलेकरांकडे पाहात होते. डुबा पुढे चालला होता. वनातून येताना आईचे दूध वाटेवर सांडले होते, त्या खुणेने तो चालला होता. बहुलेचे वाटेवर सांडत गेलेले ते गोड दूध साप पीत होते; परंतु त्या सापांकडे त्या गायवासरांचे लक्ष नव्हते. रानातील तरूवेलींवर असंख्य फुले फुलली होती. त्यांचा सुगंध सर्वत्र भरून राहिला होता. मंद वार्‍याबरोबर सर्वत्र पसरत होता. जणू तो बहुलेच्या सत्यनिष्ठेचा सुगंध होता! वृक्षांच्या पानांवर टपटप बिंदू पडत होते. जणू निसर्गदेवता त्या मायलेकरांसाठी अनंत अश्रू ढाळीत होती.

घामाची फुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वर्गातील माळ 1 स्वर्गातील माळ 2 स्वर्गातील माळ 3 स्वर्गातील माळ 4 स्वर्गातील माळ 5 स्वर्गातील माळ 6 स्वर्गातील माळ 7 स्वर्गातील माळ 8 स्वर्गातील माळ 9 जाई 1 जाई 2 जाई 3 जाई 4 जाई 5 जाई 6 जाई 7 जाई 8 जाई 9 जाई 10 जाई 11 बासरीवाला 1 बासरीवाला 2 बासरीवाला 3 बासरीवाला 4 बासरीवाला 5 बासरीवाला 6 बासरीवाला 7 अश्रूंचे तळे 1 अश्रूंचे तळे 2 अश्रूंचे तळे 3 अश्रूंचे तळे 4 अश्रूंचे तळे 5 ज्याचा भाव त्याचा देव 1 ज्याचा भाव त्याचा देव 2 ज्याचा भाव त्याचा देव 3 ज्याचा भाव त्याचा देव 4 ज्याचा भाव त्याचा देव 5 ज्याचा भाव त्याचा देव 6 ज्याचा भाव त्याचा देव 7 थोर त्याग 1 थोर त्याग 2 थोर त्याग 3 थोर त्याग 4 थोर त्याग 5 मातृभक्ती 1 मातृभक्ती 2 मातृभक्ती 3 मातृभक्ती 4 मातृभक्ती 5 मातृभक्ती 6 मातृभक्ती 7 बहुला गाय 1 बहुला गाय 2 बहुला गाय 3 बहुला गाय 4 बहुला गाय 5 बहुला गाय 6 घामाची फुले 1 घामाची फुले 2 घामाची फुले 3 घामाची फुले 4