Get it on Google Play
Download on the App Store

गायत्री स्तोत्र व माहात्म्य

गायत्री स्तोत्र व माहात्म्य

ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ।

भावार्थ:

प्राणस्वरूप, दुःखनाशक, सुखस्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देवस्वरूप अशा परमात्म्याला आम्ही अंतःकरणात धारण करतो. त्या परमात्म्या कडून आमची बुद्धी सन्मार्गी लागो

*

ॐ गायत्रीदेव्यै नम: ॥ ॐ नमो श्रीगजवदना । गणराया गौरीनंदना । विन्घेशा भवभयहरणा । नमन माझे साष्टांगीं ॥१॥

नंतर नमिली श्रीसरस्वती । जगन्माता भगवती । ब्रह्माकुमारी वीणावती । विद्यादात्री विश्र्वाची ॥२॥

नमन तैसें गुरुवर्या । सुखनिधान सद्‍गुरुराया । स्मरुनी त्या पवित्र पायां । चित्तशुद्धि जाहली ॥३॥

थोर ऋषिमुनी संतजन । बुधगण आणि सज्जन । करुनी तयांसी नमन । ग्रंथरचना आरंभिली ॥४॥

एकदां घडली ऐसी घटना । नारद भेटले सनकमुनींना । वंदन भावें करुनि तयांना । म्हणाले विनंती माझी ऎकावी ॥५॥

जपासाठीं असती मंत्र हजार । त्यांत अत्यंत प्रभावी थोर । ज्याचें सामर्थ्य अपरंपार । ऐसा मंत्र कोणता ॥६॥

तेव्हा म्हणाले सनकमुनी । नारदा तुझा प्रश्र्न ऎकोनी। समाधान झालें माझ्या मनीं । लोकोपयोगी प्रश्र्न हा ॥७॥

आतां ऎक लक्ष देऊन । त्वरित फलदायी मंत्रज्ञान । सफल होतील हेतु पूर्ण । ऐसा एकच मंत्र गायत्री ॥८॥

गायत्री ही मंत्रदेवता । सर्वश्रेष्ठा तिची योग्यता । तिंचे एकेक अक्षर जपतां । आत्मतेज प्रगटतें ॥९॥

गायत्रीमंत्राचें प्रत्येक अक्षर । प्रभाव पाडी सर्व गात्रांवार । देहाच्या एकेका अवयवावर । प्रत्यक्ष परिणाम घडतसे ॥१०॥

गायत्रीची नांवें अनेक असती । त्यांत असते दिव्य शक्ति । एकेका नामोच्चारानें ती । शरिरीं प्रगट होतसे ॥११॥

करीत असतां नामोच्चार । मनीं आणावा तिचा आकार । भक्तिपुर्वक करुनी नमस्कार । नामजप करावा तो ॥१२॥

ॐ काररुपा ब्रह्माविद्या ब्रह्मादेवता । सवित्री सरस्वती वेदमाता । अमृतेश्र्वरी रुद्राणी विक्रमदेवता । ॐ गायत्रीं नमो नम: ॥१३॥

वैष्णवी वेदगर्भा विद्यादायिका । शारदा विश्र्वभोक्त्री संध्यात्मिका । सुर्या , चंद्रा, ब्रह्माशीर्षका । ॐ गायत्रीं नमो नम: ॥१४॥

नारसिंही अघनाशिनी इंद्राणी । अंबिका पद्‍माक्षी रुद्ररुपिणी । सांख्यायनी सुरप्रिया ब्रह्माणी । ॐ गायत्रीं नमो नम : ॥१५॥

गायत्री तूं ब्रह्मांडघारिणी । गायत्री तूं ब्रह्मावादिनी । गायत्री तूं विश्र्वव्यापिनी । ॐ गायत्रीं नमो नम: ॥१६॥

ॐ भू: ऋग्वेदपुरुषं । ॐ भुव: यजुर्वेदपुरुषं । ॐ स्व: सामवेदपुरुषं । ॐ मह: अथर्वणवेदपुरुषं तपर्यामि ॥१७॥

ॐ जन: इतिहासपुराणपुरुषं । ॐ तप: सर्वांगपुरुषं । ॐ सत्यं सत्यलोकपुरुषं । त्वं ब्रह्माशापाद्विमुक्ता भव ॥१८॥

ॐ भू: भुर्लोकपुरुषं । ॐ भुव: भुवलोकपुरुषं । ॐ स्व: स्वर्लोकपुरुषं । त्वं वसिष्ठशापाद्विमुक्ता भव ॥१९॥

ॐ भू एकपदा गायत्रीं । ॐ भुव: द्विपदां गायत्रीं । ॐ स्व: त्रिपदां गायित्रीं । ॐ भूभुर्व स्व: चतुष्पदां गायित्रीं ॥२०॥

ॐ उषसीं तर्पयामि । ॐ गायत्रीं तर्पयामि । ॐ सावित्रीं तर्पयामि । तर्पयामि ॐ सरस्वतीं ॥२१॥

ॐ वेदमातरं तर्पयामि । ॐ पृथ्वीं तर्पयामि । ॐ अजां तर्पयामिअ । तर्पयामि ॐ कौशिकीं ॥२२॥

ॐ सांकृतिं तर्पयामि । ॐ सर्वजिनां तर्पयामि । ॐ गायत्रीत्रय तर्पयामि । त्व विश्र्वामित्रशापाद्विमुक्ता भव ॥२३॥

गायत्रीदेवी प्रात:काळीं । ऋग्वेदरुपा बालिका झाली ब्रह्मादेवाची शक्ति एकवटली । अपूर्व तेजें प्रकाशे ॥२४॥

हातीं कलश अक्षमाला । स्त्रकूस्त्रुवा धारण केला । मुखतेज लाजवी रविंचद्राला । हंसारुढ असते ती ॥२५॥

कंठी रन्तालंकार झगमगती । माणिबिंबांची शोभा अपूर्व ती । जी देतसे धनसंपत्ती । ध्यान तिचें करावें ॥२६॥

सावित्री नांव मध्यान्हकाळीं । तीच रुद्राणी शक्ति बनली । त्रिनेत्रा नवयौवना दिसली । व्याघ्रांबर धारिणी ॥२७॥

हातीं खट्‍वांग, त्रिशुळ,रुद्राक्षमाला । अभय मुद्रा मुगुटी चंद्रा शोभला । वृषभवाहन गौरवर्ण भला । यजुर्वेदस्वरुपा जी ॥२८॥

आयुष्य आणि ऎश्र्वर्यवृद्धी । देतसे सकल महासिद्धी । वाढवी सद्‍भावना सद्‍बुद्धी । साह्य करी ती सर्वांसी ॥२९॥

सायंकाळी तीच विष्णुशक्ति । पीतांबरधारी भगवती सरस्वती । श्यामलवर्णीं गरुडारुढ ती । रत्‍नहार कंठीं शोभती ॥३०॥

बाजुबंद, रत्‍नखचित नुपुर । सुवर्णकंकणें सौभाग्यलंकार । शंख , चक्र, गदा पद्ममय कर । श्रीवृद्धीकारक ती सर्वदा ॥३१॥

ब्राह्मामुहूर्तीं उठावें । बाह्माभ्यंतर शुचिर्भुत व्हावें । श्रीगायत्रीचें ध्यान करावें । स्वस्थ एकाग्र चिंत्तानें ॥३२॥

प्रथम करावा करन्यास । नंतर करावा अंगन्यास । मग पुर्ण प्राणायामास । प्रारंभ नीट करावा ॥३३॥

पूरकीं करणें विष्णुस्मरण । कुंभकीं करावें ब्रह्मास्मरण । रेचकीं करावें शिवध्यान । प्राणायन या नांव असे ॥३४॥

गायत्री जप करावा हजारदां । किंवा करावा शंभरदां । कमीतकमी तरी दहादां । महामंत्रजप करावा ॥३५॥

गायत्रीमंत्राचा जे जप करिती । तया चारी पुरुषार्थ साध्य होती । सर्वैंश्र्वर्य कीर्ती संपत्ती । आणि सिद्धि लाभती ॥३६॥

ज्योतिर्मय दिव्य रूपिणी । मंदमतीसी करिते महाज्ञानी । बल,यश,आयुरारोग्य देऊनी । पराक्रम जगीं गाजवी ॥३७॥

गायत्री मंत्रातील महाशक्ती । व्यक्त होते अव्यक्तीं । अपूर्व लाभते मन:शांति । पुर्ण समाधानी होतेसे ॥३८॥

म्हणुन हें देवर्षीं नारदा । गायत्री उपासना करावी सदा । मिळेल आत्मज्ञानसंपदा । सत्य सत्य वाचा ही ॥३९॥

गायत्रीहृदय गायत्रीतर्पण । गायत्रीकवच गायत्रीध्यान । सर्व पूजाविधी विसर्जन । नारदासी उपदेशिलें ॥४०॥

मग नारद संतुष्ट होऊन । सनकमुनींना करुनी वंदन । आपुल्या कार्यासी गेले निघून । जयजयकार करीत गायत्रीचा ॥४१॥

राजकारणी, समाजकारणी । साहित्यिकांनी विद्यार्थ्यांनी । सर्व स्थरातील गृहस्थानीं । गायत्रीमंत्र जपावा ॥४२॥

स्तोत्र-माहात्म्य गायत्रीचें । रुप पालटील आयुष्याचें । महत्व पटेल माझ्या शब्दांचे । अनुभवानेंच सर्वांना ॥४३॥

गायत्रीची यथार्थ स्तुति । तशीच तिची अपूर्व महती । ऎका आतां यापुढतीं । विनती मिलिंदमाधव ॥४४॥

गायत्री असे परम पुनिता । तींता वसतीए शास्त्रें , श्रुति, गीता । सत्वगुणी, चितरुपा,शाश्र्वता । सनातन, नित्य, सत्सुधा ॥४५॥

मंगलकरक जगज्जननी । सुखघाम, स्वघा, गायत्रीभवानी । सावित्री,स्वाहा,अपूर्वकरणी । मंत्र चौवीस अक्षरी ॥४६॥

ह्रीं , श्रीं, क्लीं, मेघा उदंड । जीवनज्योती महाप्रचंड । शांति, क्रांति , जागृति, अखंड । प्रगति, कल्पनाशक्ति ती ॥४७॥

हंसारुढ दिव्य वस्त्रघारी । सूवर्णकांती गगनाविहारी । कमल,कमंडलु,माला करीं । गौर तनु शोभते ॥४८॥

स्मरणें मन प्रसन्न होतें । दु:ख सरतें सुख उपजतें । कल्पतरुसम इच्छित देते । निराकार निर्गुणा ॥४९॥

गायत्री तुझी अद्‍भुत माया । सुरतरुसम शीतल छाया । भक्तांचे संकट हराया । सदा सिद्ध अससी तूं ॥५०॥

तूं काली लक्ष्मी सरस्वती । वेदमाता ब्रह्माणी पार्वती । तुजसम अन्य नसे त्रिजगतीं । कल्याणकारी देवता ॥५१॥

जयजय त्रिपदा भवभयहारी । ब्रह्मा विष्णु शिव तुझे पुजारी । अपार शक्तिची तुं त्रिरुपधारी । तेजोमय माता तूं ॥५२॥

ब्रह्मांडा , चंद्रसुर्यांना । नक्षत्रासीं , सकल ग्रहांना । तुच देसी गति प्रेरणा । उप्तादक ,पालक , नाशक तूं ॥५३॥

होते तव कृपा जयांवरी । तो जरी असला पापी भारी । तयाच्या पापाराशी दुरी । करिसी तूं क्षणांत ॥५४॥

निर्बुद्ध होई बुद्धिवंत । शक्तिहीन होई बलवंत । रोगी होतो व्याधीमुक्त । दरिद्र दु:ख न राही ॥५५॥

जप करितां गायत्रीचा । लेश न राही गृहक्लेशाचा । चित्तातील चिंताग्नीचा । र्‍हास होई झडकरी ॥५६॥

अपत्यहीनासी अपत्यप्रात्पी । सुखच्छुसी विपुल संपत्ती । सघवा अखंड सौभाग्यवती । होती गायत्रीकृपेनें ॥५७॥

सत्य व्रतस्थ पतिरहिता । तिजला लाभे विरक्तता । जन्माची होते सार्थकता । मोक्षलाभ होतसे ॥५८॥

विवाहेच्छू कुमारिकानीं । पिठाच्या पांच पणत्या पेटवुनी । बसावें पूर्वेकडे पुढा करुनी । चौवीस दिवस प्रभातीं ॥५९॥

मनकामना पूर्ण होऊनी । मना. सारखें येईल घडुनी । गायत्रीवरी श्रद्धा ठेवुनी । रोज ही पोथी वाचावी ॥६०॥

गायत्रीस्तोत्र हें गोड । माहात्म्यही अतीव गाढ । वाचतां ऎकतां प्रचंड । प्रभाव दिसुनी येतसे ॥६१॥

चौवीस वेळीं करावें वाचन श्रवण । चौवीस वेळां करावें मंत्रपठण । चौवीस जन्मींचें होतें पापक्षालन । महत्व ऐ या पोथीचें ॥६२॥

चौवीस वेळां करितां पारायण । गायत्रीदेवी होईल सुप्रसन्न । बोलवुनी सुवासिनी तीन । एक एक पोथी द्यावी ही ॥६३॥

प्रत्येक चौवीस दिवसांनी । अशाच पुजाव्या तीन सुवासिनी । प्रत्येकीस एक एक पोथी देऊनी । नमस्कार करावा ॥६४॥

देव आहे तसें दैवही असतें । पूर्वजन्मींचें त्यांत रहस्य असतें । हें न जाणतां मोठे जाणते । निरा शेनें देवभक्ती सोडिती ॥६५॥

काळ तेयां थोडा कठीण । देव न येई लगेच घावून । म्हणुनी देवासी दोष देऊन । श्रद्धा सोडूं नये कधीं ॥६६॥

गायत्रीची अट्टश्य शक्ती । प्रारब्धाची अनिष्ट गती । फिरवी तक्ताळ सत्य ती । विश्र्वास ऎसा धरावा ॥६७॥

योग्य काळ आल्यावीण । कोणतेंच कार्य न घडे जाण । म्हणुनी हातपाय गाळुन । स्वस्थ कधीम न बैसावें ॥६८॥

स्तोत्र-माहात्म्य हें वाचावें । साधुसंतांचें वचन ध्यानीं घ्यावें । स्वत:च स्वत:ला पारखावें । शुद्ध ज्ञानप्रकाशीं ॥६९॥

आत्माज्ञान नव्हे पोरखेळ । स्वत:ला पारखावें । यावी लागते योग्य वेळ । उगीच होऊनी उतावीळ । देवासी नच निंदावें ॥७०॥

मी तर एक मानव सामान्य । गुरुकृपेनें झालों धन्य धन्य । त्याच्याच प्रेरणेनें सुचलें ज्ञान । पोथीरूपें प्रगटलें तें ॥७१॥

कांहीं दोष गेला असेल राहून । तरी सज्जनांनी करावें थोर मन । क्षमा करावी कृपा करुनी । म्हणे मिलिंदमाधव ॥७२॥

शके अठराशे अठ्याण्णव वर्षीं पौष कृष्णप्रतिपदा दिवशीं । गुरुपुष्यामृत योगासी । पोथी पूर्ण झाली ही ॥७३॥

ॐ तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥शुभं भवतु ॥ ॐ शांति: शांति: शांति:

॥ॐ भूर्भूव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भंगो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात् ॥

॥ मिलिंदमाधवकृत 'गायत्री स्तोत्र-महात्म्य संपूर्ण ॥