Get it on Google Play
Download on the App Store

अभंग ११ ते १२

११.
जोड झालीरे शिवासी । भ्रांत फिटली जिवाची ॥१॥
आनंदची आनंदाला । आनंद बोधचि बोधला ॥२॥
आनंदाची लहरी उठी । ब्रम्हानंद गिळिला पोटीं ॥३॥
एक पण जेथें पाहीं । तेथें विज्ञप्ति उरली नाहीं ॥४॥
ऐसी सद्रुरुची करणी । दासी जनी विठ्ठल चरणीं ॥५॥
१२.
बाई मी लिहिणें शिकलें सद्‌गुरायापासीं ॥ध्रु०॥
ब्रम्हीं झाला जो उल्लेख । तोचि नादाकार देख ।
पुढें ओंकाराची रेख । तूर्य़ा म्हणावें तिसी ॥१॥
माया महतत्त्वाचें सुभर । तीन पांचाचा प्रकार ।
पुढें पंचविसांचा भार । गणती केली छत्तीसीं ॥२॥
बारा सोळा एकविस हजार । आणीक सहाशांचा उबार ।
माप चालें सोहंकार । ओळखिले बावन्न मात्नेसी ॥३॥
चार खोल्या चार घरीं । चौघे पुरुष चार नारी ।
ओळखुनी सर्वांशी अंतरीं । राहिले पांचव्यापासीं ॥४॥
पांच शहाणे पांच मूर्ख । पांच चाळक असती देख ।
पांच दरवडेखोर आणिक । ओळखिलें दोघांसी ॥५॥
एक बीजाचा अंकूर । होय वृक्षाशीं विस्तार ।
शाखापत्रें फळ फुलभार । बीजापोटीं सामावे ॥६॥
कांतीण तंतूशीं काढून । वरी क्रोडी करिती जाण ।
शेवटीं तंतूशीं गिळून । एकटी राहे आपैसी ॥७॥
वेदशास्त्र आणि पुराणा । याचा अर्थ आनीतां मना ।
कनकीं नगाच्या भूषणा । अनुभव वाटे जीवासीं ॥८॥
नामदेवाच्या प्रतापांत । शिरीं विठोबाचा हात ।
जनी म्हणे केली मात । पुसा ज्ञानेश्वरासी ॥९॥