Get it on Google Play
Download on the App Store

महत्त्वाकांक्षी बाजीराव

बाजीराव प्रचंड महत्त्वाकांक्षी होता. त्याकाळात व्यापक पातळीवर दृष्टिकोन ठेवण्याची त्याची पात्रता होती. म्हणूनच छत्रसालाच्या मदतीला तो धावून गेला. त्याने २५ हजारांची फौज घेऊन मुहम्मद खान बंगश याला जैतपूरच्या लढाईत मात दिली. पण तो मुत्सद्दी म्हणूनही हुशार होता. म्हणूनच इलाहाबादच्या या सुभेदाराला त्याने आपल्या मातोश्री राधाबाई यांच्या काशीयात्रेची जबाबदारी घ्यायला लावली. ही स्ट्रॅटेजिक मूव्ह म्हणून खूप मोठी गोष्ट होती. त्या काळात काशी यात्रा करणं खूपच जिकिरीचं होतं. काशी यात्रेला गेलेला माणूस जिवंत परत येईलच याची अजिबात खात्री नसायची. पेशव्याच्या मातोश्रींच्या काशीयात्रेची जबाबदारी बंगशाला घ्यायला लावून त्याकाळात बाजीरावाने एका दगडात अनेक पक्षी मारले होते.

 

बाजीराव पराक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होताच शिवाय त्याचं चारित्र्यही चांगलं होतं. मस्तानीशी जोडलं गेलेलं नाव हा बाजीरावाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. मात्र मस्तानीसही त्याने सहकारिणीचा दर्जा देऊ केला. त्या काळात ते मोठंच धारिष्टय़ होतं. अर्थात या चारित्र्य संपन्नतेमुळेच तो सर्व मराठा सरदारांना एकत्र करू शकला, आणि त्याने शाहूचाही विश्वास संपादन केला.

 

बाजीरावाची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. बाजीराव निघालाय या एवढय़ा बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परत निघाला.