Get it on Google Play
Download on the App Store

श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६

३४८८.

विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दातारु ॥१॥

आदिनाथापासून । परंपरा आली जाण ॥२॥

ज्ञानदेवा ज्ञान दिलें । चांगदेवातें बोधिलें ॥३॥

तोचि बोध माझे मनीं । राहो एका जनार्दनीं ॥४॥

‍३४८९.

केला उपकार जगीं तारियेले सर्व । निवृत्ति गुरु माझा जीव उध्दरिले सर्व ॥१॥

कायावाचामनें शरण निवृत्तिपायीं । देहभावें मीतूंपणा उरलाची नाहीं ॥२॥

ऐसा श्रीनिवृत्ति ज्ञानदेवें धरिला चित्तीं । चांगया प्रेम दिधलें गुरु वोळखिला चित्तीं ॥३॥

एका जनार्दनीं शरण निवृत्तिप्रती । संसार नुरेचि उरी निवृत्ति म्हणतां चित्तीं ॥४॥

३४९०.

धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा ॥१॥

शिव अवतार तूंचि धरुन । केलें त्रैलोक्य पावन ॥२॥

समाधि त्र्यबंक शिखरीं । मागें शोभे ब्रह्मगिरी ॥३॥

निवृत्तिनाथाचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

३४९१.

समाधि निवृत्ति म्हणतां । हारे संसाराची व्यथा ॥१॥

दृष्टीं पाहातां निवृत्तिनाथ । काय भय नाहीं तेथ ॥२॥

समाधि पाहतांचि डोळां । काय सांगूं तो सोहळा ॥३॥

एका जनार्दनीं शरण । समाधि पहातांचि जाण ॥४॥

३४९२.

निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरे चित्तीं ॥१॥

निवृत्ति निवृत्ति नाम घेतां । जन्म सार्थक तत्वतां ॥२॥

निवृत्ति निवृत्ति । संसाराची होय शांति ॥३॥

निवृत्ति नामाचा निजछंद । एका जनार्दनीं आनंद ॥४॥

३४९३.

धन्य आजी डोळां । स्मामी निवृत्ति देखिला ॥१॥

कुशावर्ती करुं स्नान । घेऊं निवृत्तिदर्शन ॥२॥

प्रदक्षिणा ब्रह्मगिरी । चौ‍‍‍‍र्‍यांयशीची चुकली फ़ेरी ॥३॥

गंगाद्वारीं स्नान करतां । हारे पय पान व्यथा ॥४॥

ऐसीं तीन अक्षरें । एका जनार्दन स्मरे ॥५॥

३४९४.

निवृत्तिनाथ तीन अक्षरें । सदा जप करी निर्धारें ॥१॥

पूर्वज उध्दरती साचार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥२॥

पुनरपि जन्माची । वार्ता नाहीं नाहीं साची ॥३॥

अनुभव धरावे वेगीं चित्तीं । एका जनार्दनीं करी विनंती ॥४॥

३४९५.

नाम जपतां निवृत्ति । न येचि पुनरावृत्ति ॥१॥

ऐसा अनुभव जीवा । चराचरीं सर्व देवां ॥२॥

एका जनार्दनीं शरण । निवृत्ति म्हणतां पावन ॥३॥

३४९६.

धन्य स्वामी माझा निवृत्ति । जडलासे चित्तवृत्तीं ॥१॥

अखंडित वाचे । नाम निवृत्ति हेंचि साचें ॥२॥

नामें पावन निवृत्ति । धन्य धन्य तो निवृत्ति ॥३॥

एका जनार्दनीं वाचे । नाम श्रीनिवृत्तीचें ॥४॥

३४९७.

आजी धन्य दिन जाला । स्बामी निवृत्ति भेटला ॥१॥

जन्म जरामरण व्याधी । अवघी तुटली उपाधि ॥२॥

मन इंद्रियांसहित । पायीं जडियेलें चित्त ॥३॥

समूळ अहंकार गेला । निवृत्तिनाथ पाहतां डोळां ॥४॥

एका विनवी जनार्दन । निवृत्तिनामें जालों पावन ॥५॥

३४९८.

नाम निवृत्ति धन्य तो निवृत्ति । देह निवृत्ति पाहतां डोळां ॥१॥

संसार सारासार निवृत्ति । वेद निवृत्ति नाम गातां ॥२॥

शास्त्र निवृत्ति पुराणें निवृत्ति । अंतर्बाह्य कीर्ति निवृत्तिचीं ॥३॥

एका जनार्दनीं पाहतांचि निवृत्ति । होय सर्व शांति निवृत्तिनामें ॥४॥

३४९९.

कळा तो अभ्यास कासया करणें । निवृत्ति नाम घेणें धणीवरी ॥१॥

धणीवरी नाम घेईं पां अंतरीं । निवृत्ति बाह्यात्कारीं होईल तुझी ॥२॥

व्यर्थ खटपट न करी पसार । निवृत्ति नामें साचार जप करीं ॥३॥

गुज गुह्य तुज सांगतों मना । निवृत्तिनाम जाणा ह्रदयीं धरीं ॥४॥

एका जनार्दनीं निवृत्ति नाम वाचे । संसाराचे साचें सार्थक जालें ॥५॥

३५००.

अहं सोहं कोहं सांडोनियां देई । निवृत्तीचे पायीं बुडी देखा ॥१॥

अकार उकार मकार निर्धार । सर्व चराचर निवृत्तिरुप ॥२॥

स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण । तें निवृत्तिनाम जाण सत्य होय ॥३॥

शुध्द बुध्द नाम निवृत्तीचे वाचे । एका जनार्दनीं साचें स्मरे मनीं ॥४॥

३५०१.

उच्चार नामाचा करी पां साचार । आळस निर्धारें टाकून देई ॥१॥

तें नाम सोपें निवृत्तीचें जाणा । कायावाचा मना जप करीं ॥२॥

यातना तें कांही न पडे व्यसन । नाम उच्चारण निवृत्तीचें ॥३॥

निवृत्तिनामाचा लागलिया छंद । तुटे भवकंद नामें तोचि ॥४॥

एका जनार्दनीं निवृत्तिनाम धणी । गाईन मी वाणी सदोदित ॥५॥

३५०२.

साधन कासया श्रम ते करावे । निवृत्तिनाम गावें सदोदित ॥१॥

तीर्थयात्रा कांहीं नाम मुखें गाईं । निवृत्तिनामें डोहीं बुडी दे का ॥२॥

एका जनार्दनीं निवृत्ति नाम सार । करीं रे उच्चार वेळोवेळां ॥३॥

३५०३.

प्रपंच परमार्थ करीं कां रे सुखाचा । निरंतर वाचा निवृत्तिनाम ॥१॥

तुटेल बंधन खुंटेल पतन । निवृत्तिनाम जाण जपतांचि ॥२॥

योगयागादिक न लगे तीं साधनें । निवृत्तिनामें पेणें वैकुंठींचें ॥३॥

एका जनार्दनीं न करीं साधन । निवृत्ति म्हणतां जाण सर्व जोडे ॥४॥

३५०४.

माझ्या मना तूं करीं पां विचार । नाम निरंतर निवृत्ति जपें ॥१॥

जपतां नामावळी आळस न करीं । कोटि जन्म फ़ेरी चुके तेणें ॥२॥

सुखरुप तूं होसील साचार । गर्भाचा उदगार खुंटे साचा ॥३॥

एका जनार्दनीं सांगे निर्धार । निवृत्ति उच्चार नाम करी ॥४॥

३५०५.

सदोदित मना निवृत्तीचे पायीं । मना आणिक ठायीं जाऊं नको ॥१॥

जपतप काहीं न करीं साधन । तुटेल बंधन निवृत्तिनामें ॥२॥

तीर्थ व्रत चाड न धरीं अहंकार । नामाचा उच्चार निवृत्ति करी ॥३॥

तीर्थाचें हें तीर्थ निवृत्ति माहेर । एका जनार्दनीं निर्धार निवृत्तिपायीं ॥४॥

३५०६.

त्र्यंबक शिखरीं जीवन्मुक्त तुम्ही । नाथाचे ते धामीं गुप्तरुप ॥१॥

सर्वकाळ विठ्ठल विठ्ठल पैं वाचें । सार्थक देहाचें येणें करुनी ॥२॥

अखंड नामोच्चार समाधी सोहळा । आणिक न ये डोळां आड कांहीं ॥३॥

एका जनार्दनीं म्हणावा आपुला । आसनीं शयनीं त्याला विसरुं नका ॥४॥