Get it on Google Play
Download on the App Store

अद्वैत - अभंग २४६१ ते २४८०

२४६१

सूर्य अंधारांतें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥

माझें जिणें देखणेपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥

देहीं देहअभिमान । जीवीं मायेचें तें ध्यान ॥३॥

एका जनार्दनीं माया । देहाधीन देवाराया ॥४॥

२४६२

नित्य नूतन दीपज्वाळा । होती जाती देखती डोळा ॥१॥

जागृति आणि देखती स्वप्न । दोहींसी देखतां भिन्न भिन्न ॥२॥

भिन्नपणें नका पाहुं । एका जनार्दनीं पाहूं ॥३॥

२४६३

काचरट पाहतां कडु तें शेंद । परिपाकीं पाहतां गोडचि शुद्ध ॥१॥

कडु तेंचि गोड कडू तेंचि गोड । समरस सोयारिक ॥२॥

साखरेचें वृंदावन केलें । चाखो नेणें तें नाडोनि गेलें ॥३॥

एका जनार्दनीं प्रपंचु एकु । नश्वर म्हणतां नाडला लोकु ॥४॥

२४६४

जनार्दनं मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा ॥१॥

प्रपंच पारखा जाहला दुराचारी । केलीसे बोहरी कामक्रोधां ॥२॥

आशा तृष्णा यांचे तोडियलें जाळें । कामनेचें काळें केलें तोंड ॥३॥

एका जनार्दनीं तोडियेलें लिगाड । परमार्थ गोड दाखविला ॥४॥

२४६५

जनार्दनें केलें अभिनव देखा । तोडियेलें शांखा अद्वैताची ॥१॥

केला उपकार केला उपकार । मोडियेलें घर प्रपंचाचें ॥२॥

एका जनार्दनीं एकपणें देव । दाविला नवलाव अभेदाचा ॥३॥

२४६६

कामक्रोध वैरीयांचे तोडियेले फांसे । जनार्दनें सरसें केलें मज ॥१॥

देहाची वासना खंडुन टाकिली । भ्रांतीची उडाली मूळ दोरी ॥२॥

कल्पनेचा कंद समूळ उपडिला । हृदयीं दाविला आरसा मज ॥३॥

एक जनार्दनीं सहज आटलें । स्वदेहीं भेटलें गुरुकृपें ॥४॥

२४६७

भुक्ति आणि मुक्ति फुकाचें ठेवणें । श्रीगुरु जनार्दनें तुच्छ केलें ॥१॥

येर ब्रह्माज्ञाना काय तेथें पाड । मोक्षाचे काबाड वारियेलें ॥२॥

साधन अष्टांग यज्ञ तप दान । तीर्था तीर्थाटन शीण वायां ॥३॥

एका जनार्दनीं दाविला आरिसा । शुद्धी त्या सरसा सहज झालो ॥४॥

२४६८

देहाचें देऊळ देवळींच देव । जनार्दन स्वयमेव उभा असे ॥१॥

पुजन तें पुज्य पूजकु आपण । स्वयें जनार्दन मागेंपुढें ॥२॥

ध्यान तें ध्येय धारणा स्वयमेव । जनार्दनीं ठाव रेखियेला ॥३॥

एका जनार्दनीं समाधी समाधान । पडिलें मौन देहीं देहा ॥४॥

२४६९

आतां यजन कैशापरी । संसारा नोहे उरी ॥१॥

सदगुरुवचन मंत्र अरणी । तेथोनि प्रगटला निर्धुम अग्नी ॥२॥

सकळीं सकळांच्या मुखें । अर्पितसे यज्ञ पुरुषें ॥३॥

एका जनार्दनीं यज्ञे अर्पी । अर्पीं त्यामाजीं समर्पी ॥४॥

२४७०

शांतीचेनि मंत्रें मंत्रुनी विभुती । लाविली देहाप्रती सर्व अंगा ॥१॥

तेणें तळमळ हारपले व्यथा । गेली सर्व चिंता पुढिलाची ॥२॥

लिगाडाची मोट बांधोनि टाकिली । वासना भाजली क्रोध अग्नी ॥३॥

एका जनार्दनीं शांत जाहला देव । कामनीक देव प्रगटला ॥४॥

२४७१

अहं सोहं कोहं सर्व आटलें । दृश्य द्रष्ट्रत्व सर्व फिटलें ॥१॥

ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली ॥२॥

द्वैत अद्वैताचें जाळें । उगविलें कृपाबळें ॥३॥

अवघें एकरुप जाहलें । दुजेपणाचे ठाव पुसिले ॥४॥

शरण एका जनार्दनीं । एकपणें भरला अवनीं ॥५॥

२४७२

पहा कैसी नवलाची ठेव । स्वयमेव देही देखिला देव ॥१॥

नाहीं जप तप अनुष्ठान । नाहीं केलें इंद्रियाचें दमन ॥२॥

नाहीं दान धर्म व्रत तप । अवघा देहीं जालो निष्पाप ॥३॥

पापपुण्याची नाहीं आटणी । चौदेहासहित शरण एका जनार्दनीं ॥४॥

२४७३

त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दनं ॥१॥

दीपाची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देहीं दिसे ॥२॥

चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योती । एक जनार्दनीं भ्रांति निरसली ॥३॥

२४७४

उदारपणें उदार सर्वज्ञ । श्रीजनार्दन उभा असे ॥१॥

तयाचे चरणीं घातली मिठी । जाहली उठाउठी भेटी मज ॥२॥

अज्ञान हारविलें ज्ञान प्रगटलें । हृदयीं बिंबलें पूर्ण ब्रह्मा ॥३॥

एका जनार्दनीं नित्यता समाधी । वाउग्या उपाधी तोडियेल्या ॥४॥

२४७५

सोलींव ब्रह्माज्ञान सांगत जे गोष्टी । तें उघड नाचे दृष्टी संतासंगें ॥१॥

गळां तुळशीहार मुद्रांचें श्रृंगार । नामाचा गजर टाळ घोळ ॥२॥

दिंडी गरुड टक्के मकरंद वैभव । हारुषें नाचे देव तया सुखी ॥३॥

एका जनार्दनीं सुखाची मादुस । जनार्दनें समरस केलें मज ॥४॥

२४७६

माझें मीपण देहीच मुरालें । प्रत्यक्ष देखिलें परब्रह्मा ॥१॥

परब्रह्मा सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरूनियां ॥२॥

ब्रह्माज्ञानाची तें उघडली पेटी । जाहलों असे पोटीं शीतल जाणा ॥३॥

एका जनार्दनीं ज्ञानाचें तें ज्ञान । उघड समाधान जाहलें जीवा ॥४॥

२४७७

दीपांचें तें तेज कळिकें ग्रासिले । उदय अस्त ठेले प्रभेविण ॥१॥

लोपलीसे प्रभा तेजाचे तेजस । जाहली समरस दीपज्योती ॥२॥

फुंकिल्यावांचुनीं तेज तें निघालें । त्रिभुवनीं प्रकाशिलें नवल देख ॥३॥

एका जनार्दनीं ज्योतीचा प्रकाश । जाहला समरस देहीं देव ॥४॥

२४७८

जेथें परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरु ॥१॥

तेणें माझें मना जाहलें समाधान । निरसला शीण जन्मोजन्मी ॥२॥

उपाधी तुटली शांति हे भेटली । सर्व तेथें आटली तळमळ ॥३॥

एका जनार्दनीं प्रेमाचें तें प्रेम । दाविलें सप्रेम हृदयांत ॥४॥

२४७९

उदार विश्वाचा दीपकु तेजाचा । प्रकाशु कृपेचा दावियेला ॥१॥

हारपले विश्व विश्वभरपणे । दाविलें जनार्दनें स्वयमेव ॥२॥

अकार उकार मकार शेवट । घेतिलासे घोट परब्रह्मीं ॥३॥

एका जनार्दनीं विदेह दाविला । सभराभरीं दाटला हृदयामाजीं ॥४॥

२४८०

देहाची आशा टाकिली परती । केलीसे आरती प्रपंचाची ॥१॥

स्थूल सुक्ष्म यांची रचूनियां होळीं । दावाग्नि पाजळीं भक्तिमंत्रें ॥२॥

एका जनार्दनीं देहासी मरण । विदेहीं तो जाण जनार्दन ॥३॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा

Shivam
Chapters
आत्मस्थिति - अभंग १९०१ ते १९२० आत्मस्थिति - अभंग १९२१ ते १९४० आत्मस्थिति - अभंग १९४१ ते १९६० आत्मस्थिति - अभंग १९६१ ते १९८० आत्मस्थिति - अभंग १९८१ ते २००० आत्मस्थिति - अभंग २००१ ते २०२० आत्मस्थिति - अभंग २०२१ ते २०४० आत्मस्थिति - अभंग २०४१ ते २०६० आत्मस्थिति - अभंग २०६१ ते २०८० आत्मस्थिति - अभंग २०८१ ते २१०० आत्मस्थिति - अभंग २१०१ ते २१२० आत्मस्थिति - अभंग २१२१ ते २१३२ विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१५० विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१५१ ते २१९९ भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२२० भक्तवत्सलता - अभंग २२२१ ते २२४० भक्तवत्सलता - अभंग २२४१ ते २२६४ श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५ अद्वैत - अभंग २२७६ ते २३०० अद्वैत - अभंग २३०१ ते २३२० अद्वैत - अभंग २३२१ ते २३४० अद्वैत - अभंग २३४१ ते २३६० अद्वैत - अभंग २३६१ ते २३८० अद्वैत - अभंग २३८१ ते २४०० अद्वैत - अभंग २४०१ ते २४२० अद्वैत - अभंग २४२१ ते २४४० अद्वैत - अभंग २४४१ ते २४६० अद्वैत - अभंग २४६१ ते २४८० अद्वैत - अभंग २४८१ ते २५०० अद्वैत - अभंग २५०१ ते २५२० अद्वैत - अभंग २५२१ ते २५४० अद्वैत - अभंग २५४१ ते २५६६ स्थूल देह - अभंग २५६७ सुक्ष्म देह - अभंग २५६८ कारण देह - अभंग २५६९ महाकारण देह - अभंग २५७० नवविधा भक्ति - अभंग २५७१ ते २५७२ सार - अभंग २५७३