Get it on Google Play
Download on the App Store

भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२२०

२२००

जीं जीं भक्त बोलतीं वचनें । तीं तीं प्रमाण करणें देवा ॥१॥

याजसाठीं अवतार । धरी मत्स्य कांसव सुकर ॥२॥

भक्तवचना उणेंपण । येऊं नेदी जाण निर्धारें ॥३॥

स्वयें गर्भवास सोशी । अंबऋषीकारणें ॥४॥

एका जनार्दनीं ब्रीद साचा । वागवी भक्ताचा अभिमान ॥५॥

२२०१

अंबऋषिराया पडिले सायास । सोसी गर्भवास स्वयें देव ॥१॥

उच्छिष्टहीं खातां प्रायश्चित्त असे । गोपाळांचें ग्रास खाय हरी ॥२॥

एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । म्हणोनी तिष्ठत विटेवरी ॥३॥

२२०२

भक्तालांगीं अणुमात्र व्यथा । तें न साहवे भगवंता ॥१॥

करुनी सर्वांगाचा वोढा । निवारीतसे भक्तपीडा ॥२॥

होउनी भक्ताचा अंकितु । सारथीपण तो करीतु ॥३॥

प्रल्हादासी दुःख मोठें । होतांची काष्ठीं प्रगटे ॥४॥

ऐसा अंकित चक्रपाणी । एका शरण जनार्दनीं ॥५॥

२२०३

भक्तपणा सान नव्हे रे भाई । भक्तीचें पाय देवाचे हृदयीं ॥१॥

भक्त तोचि देव भक्त तोचिक देव । जाणती हा भाव अनुभवीं ॥२॥

दान सर्वस्वे उदार बळी । त्यांचें द्वार राखे सदा वनमाळी ॥३॥

एका जनार्दनीं मिती नाहीं भावा । देवचि करितो भक्ताची सेवा ॥४॥

२२०४

वाहे भक्तांचे उपकार । न संडी भार त्यांचा तो ॥१॥

म्हणे इहीं थोरपण आम्हां । ऐसा वाढवी महिमा भक्तांचा ॥२॥

एका जनार्दनीं कृपाळू । दीनाचा दयाळ विठ्ठलु ॥३॥

२२०५

मिठी घालूनियां भक्तां । म्हणे सिणलेती आतां ॥१॥

धांवे चुरावया चरण । ऐसा लागवी आपण ॥२॥

योगियासी भेटी नाहीं । तो आवडीनें कवळीं बाहीं ॥३॥

एका जनार्दनीं भोळा । भक्तां आलिंगीं सांवळा ॥४॥

२२०६

देवासी तो आवडे भक्त । नाहीं हेतु दूसरा ॥१॥

बळी सर्वस्व करी दान । त्याचें द्वारपाळपण केलें त्वां ॥२॥

धर्म सदा होय उदास । त्याचे घरी तुझा वास ॥३॥

तुझा भक्त अंबऋषी । त्याचे गर्भवास सोशिसी ॥४॥

तुम्हीं उदार जगदानीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥

२२०७

शुद्ध करूनियां मन । नारायण चिंतावा ॥१॥

मग उणें नाहीं काहीं । प्रत्यक्ष पाही अनुभव ॥२॥

आठवितां उपमन्यु बाळ । दिला क्षीरसागर सुढाळ ॥३॥

ध्रुवें चिंतिलें चरणा । अधळपदीं स्थापिलें जाणा ॥४॥

बिभीषणें केला नमस्कार । तया केलें राज्यधर ॥५॥

विष पाजिलें पूतना । पाठविली वैकुंठसदना ॥६॥

गणिकेंनें आठविलें । तैसी वैकुंठीं बैसविलें ॥७॥

हनियाती कुब्जादासी । जाहली प्रिय ती देवासी ॥८॥

अर्जुनाच्या भावार्थासाठीं । रथ हांकी जगजेठीं ॥९॥

गोपाळांची आवड पोटीं । उच्छिष्टासाठीं लाळ घोटी ॥१०॥

विदुराच्या भक्षा कण्या । तेणें आवडी मानीं मना ॥११॥

एका शरण जनार्दनीं । दासां न विसरें चक्रपाणी ॥१२॥

२२०८

अष्टांग योग साधिती साधनी । तो हारिकीर्तनीं नाचे बापा ॥१॥

यज्ञादिकीं अवदान नेघें वो माये । तो उभा राहुनी क्षीरापती खाये ॥२॥

पवन कोंडोनि योगी जाती निराकारीं । तो हरि धर्माघरीं पाणी वाहे ॥३॥

सनकनंदन जया ध्याताती आवडी । तो अर्जुनाची घोडीं धुतो हरि ॥४॥

एका जनार्दनीं भक्तांच्या अंकित । म्हणोनि तिष्ठत विटेवरी ॥५॥

२२०९

देव धांवे मागें न करी आळस । सांडितां भवपाश मायाजाळ ॥१॥

सर्वभावें जें कां शरण रिघती । तयांचें वोझें श्रीपती अंगें वाहे ॥२॥

नको भुक्तिमुक्ति सदा नामीं हेत । देव तो अंकित होय त्यांचा ॥३॥

एकाजनार्दनीं ऐसा ज्यांचा भाव । तया घरीं देव पाणी वाहे ॥४॥

२२१०

देवासी आवडे भक्तसमागम । त्यांचें सर्व काम करी अंगें ॥१॥

भक्ताकाजालागीं अवतार धरी । नांदे भक्तांघरीं स्वयें देव ॥२॥

भक्तांविण देवा कांहींचि नावडे । भक्त तो आवडें सर्वकाळ ॥३॥

एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । देव सदोदित स्वयें होत ॥४॥

२२११

नातुडे जो योगी ध्याना । तो समचरण पंढरीये ॥१॥

भोळा सुलभ भाविकासी । दर्शनें सर्वांसी सारखा ॥२॥

अभेदाच्या न धांवे मागें । भाविकां लागे पाठोपाठीं ॥३॥

शुद्ध देखतांचि भाव । एका जनार्दनीं उभा देव ॥४॥

२२१२

उदार देव उदार देव । नाशी भेव भक्तांचें ॥१॥

प्रल्हादाचे निवारी घात । राहिला जळता अग्नीसी ॥२॥

पांडवांचें करी काम । निवारी दुर्गम स्वअंगें ॥३॥

गौळियांचीं गुरें राखी । आपण शेखीं एकला ॥४॥

येतां शरण एकपणें । एका जनार्दनीं ऐसें देणें ॥५॥

२२१३

दयाळु उदार पंढरीराव । भाकितां कवि पुरवी इच्छा ॥१॥

ऐसा याचा अनुभव । आहे ठाव मागोनियां ॥२॥

जे जे होती शरणागत । पुरवी आर्त तयाचें ॥३॥

उपमन्यु ध्रुव बाळ । दिधलें अढळपद त्यांतें ॥४॥

पुराणीं तो व्यासें बहु । वर्णिलें दावुं कासया ॥५॥

एका जनार्दनीं एकचि भाव । तेणें देव तुष्टता ॥६॥

२२१४

दयेचें धाम नेघे कोणाचाही श्रम । हरि वाणीं सप्रेम दृढ निजभावें ॥१॥

प्रसन्न होऊनी दीनातें पहातो । आवडी उद्धरीतो भाविकांसी ॥२॥

एका जनार्दनीं भक्तीसी भुलला । म्हणोनी वेडावला भक्तामागें ॥३॥

२२१५

खुर्पूं लागे सांवत्यासी । न पाहे यातीसी कारण ॥१॥

घडी मडकें कुंभाराचें । चोख्यामेळ्याचीं ढोरें वोढी ॥२॥

सजन कसायाचें विकी मांस । दामाजीचा दास स्वयें होय ॥३॥

एका जनार्दनीं जनीसंगें । दळूं कांडु लागे आपण ॥४॥

२२१६

देखावया भक्तपण । रूप धरिलें सगुण ॥१॥

तो हा पंढरीचा राणा । वेदा अनुमाना नये तो ॥२॥

भाविकांचें पाठीमागें । धावें लागे लवलाही ॥३॥

खाये तुळशीपत्र पान । न म्हणे सान थोडे तें ॥४॥

एका जनार्दनीं हरी । आपुली थोरी विसरे ॥५॥

२२१७

दहा अवतार घेत भक्ताचियां काजा । तो हा विटेवरी राजा पंढरीचा ॥१॥

भक्तांचें उणें न पाहे आपण । उच्छिष्ट काढी धर्माघरीं न लाजे जाण ॥२॥

अर्जुनाची घोडीं रणांगणीं धुतली । भक्ति नये उणें कृपेची माउली ॥३॥

एका जनार्दनीं भक्तांचीया काजा । विटाएवरी उभा राहिला सहजा ॥४॥

२२१८

एकपणें एकसा दिसे । उभा असे विटेवरी ॥१॥

नेणती यासाठीं लहान । होय आपण स्वइच्छें ॥२॥

जाणतांचि लागें चाड । न धरी भीड तयाची ॥३॥

एका जनार्दनीं शरण । भावमोचन तारक ॥४॥

२२१९

एका घरी चोरी लोणी । एक घरी वाहे पाणी ॥१॥

एका घरीं बांधिला राहे । एका घरी चिमणा होय ॥२॥

एका घरीं ब्रह्माचारी । एका घरीं भोगी नारी ॥३॥

एका घरीं सुखें नाचे । एका घरीं प्रेम त्याचें ॥४॥

ऐसा व्यापला दोहीं घरीं । एका जनार्दनीं श्रीहरीं ॥५॥

२२२०

एका घरीं द्वारपाळ । एक घरीं होय बाळ ॥१॥

एका घरीं करी चोरी । एका घरें होय भिकारी ॥२॥

एका घरीं युद्ध करी । एका घरी पूजा बरी ॥३॥

एका घरीं खाय फळें । एका घरीं लोणी बळें ॥४॥

एका एकपणें एकला । एका जनार्दनीं प्रकाशला ॥५॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा

Shivam
Chapters
आत्मस्थिति - अभंग १९०१ ते १९२० आत्मस्थिति - अभंग १९२१ ते १९४० आत्मस्थिति - अभंग १९४१ ते १९६० आत्मस्थिति - अभंग १९६१ ते १९८० आत्मस्थिति - अभंग १९८१ ते २००० आत्मस्थिति - अभंग २००१ ते २०२० आत्मस्थिति - अभंग २०२१ ते २०४० आत्मस्थिति - अभंग २०४१ ते २०६० आत्मस्थिति - अभंग २०६१ ते २०८० आत्मस्थिति - अभंग २०८१ ते २१०० आत्मस्थिति - अभंग २१०१ ते २१२० आत्मस्थिति - अभंग २१२१ ते २१३२ विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१५० विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१५१ ते २१९९ भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२२० भक्तवत्सलता - अभंग २२२१ ते २२४० भक्तवत्सलता - अभंग २२४१ ते २२६४ श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५ अद्वैत - अभंग २२७६ ते २३०० अद्वैत - अभंग २३०१ ते २३२० अद्वैत - अभंग २३२१ ते २३४० अद्वैत - अभंग २३४१ ते २३६० अद्वैत - अभंग २३६१ ते २३८० अद्वैत - अभंग २३८१ ते २४०० अद्वैत - अभंग २४०१ ते २४२० अद्वैत - अभंग २४२१ ते २४४० अद्वैत - अभंग २४४१ ते २४६० अद्वैत - अभंग २४६१ ते २४८० अद्वैत - अभंग २४८१ ते २५०० अद्वैत - अभंग २५०१ ते २५२० अद्वैत - अभंग २५२१ ते २५४० अद्वैत - अभंग २५४१ ते २५६६ स्थूल देह - अभंग २५६७ सुक्ष्म देह - अभंग २५६८ कारण देह - अभंग २५६९ महाकारण देह - अभंग २५७० नवविधा भक्ति - अभंग २५७१ ते २५७२ सार - अभंग २५७३