Get it on Google Play
Download on the App Store

सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८००

१७९२

ॐकरस्वरुपा सदगुरु समर्था । अनाथाच्या नाथा तुज नमो ॥१॥

नमो मायाबापा गुरु कॄपाघना । तोडी या बंधना माया मोहा ॥२॥

मोहोजाळ माझें कोण आणि निरशील । तुजवीण दयाळा सदगुरुराया ॥३॥

सदगुरुराया माझा आनंदसागर । त्रैलोक्य आधार गुरुराव ॥४॥

गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश । ज्यापुढें उदास चंद्र रवीं ॥५॥

रवि शशि अग्नि नेणती ज्या रुपा । स्वप्रकाशरुपा नेणें वेद ॥६॥

वेदां पडलें मौन शास्त्रें वेडावलीं । वाचा हे निमाली ते श्रीगुरु ॥७॥

श्रीगुरु जयासी पाहे कृपादृष्टी । तयासी हे सृष्टी पांडुरंग ॥८॥

पांडुरंग माझा दीना मायबाप । नासी सर्व पाप भाव दुजा ॥९॥

दुजेपणा ठाव नाही जया रुपीं । तेथें आपोआपीं मन रंगें ॥१०॥

रंगे चित्त माझे सदगुरुचरणीं । स्वरुप निर्वाणी होय गती ॥११॥

गति अधोगति दोनी या नासती । सदगुरुची मुर्ति ध्यातां मनीं ॥१२॥

मनीं वसे ज्याच्या सदगुरुदयाळ । तयासी सकळ सिद्धि हातीं ॥१३॥

हातीं मोक्ष परी नावडत्या ठायीं । सदगुरुच्या पायीं बुद्धि राहे ॥१४॥

राहे गुरुगृही सदा सर्व काळ । परब्रह्मीं केवळ होय जागा ॥१५॥

जागा शिष्य चित्त सदगुरु वसती । कैसी असे स्थिती शमदमीं ॥१६॥

शमादिकी चित्त जयाचें निर्मळ । तेथें तो गोपाळ वसे प्रभु ॥१७॥

प्रभुराज माझा स्वामी गुरुराव । देतो मज भाव शुद्ध भुमि ॥१८॥

भूमि शुद्ध करी ज्ञानबीज पेरी । अद्वैत हें धरी मी तुं नेणें ॥१९॥

नेणें मी तुं कांहीं द्वैतादैत भाव । एक स्वयमेव आत्मा इति ॥२०॥

इतिकर्तव्यता हीच दासालागीं । माया गुणसंगीं नाश तिचा ॥२१॥

तिचा नाश करणे हाचि येक थोरु । करिता सदगुरु उपकार ॥२२॥

उपकारा त्याच्यानोहे उतराई । ठेवीम जीव पायीं थोडा पाहा ॥२३॥

पाहा गुरुरायें ब्रह्मा दाखविलें । अखंड स्मरविलें मज नाम ॥२४॥

नाम निरामय अज अविनाशी । प्रिय तेंमानसी सदा मज ॥२५॥

मजलागीं माझी सदगुरु माउली । करा कृपा साउली वर्णू काय ॥२६॥

काय वर्णू माझ्य सदगुरु दयाळा । बहुत कळवळा दासा यया ॥२७॥

यया दासा मनीं सदगुरुचें ध्यान । झालासे तल्लीन गुरुपायीं ॥२८॥

एका जनार्दनी गुरु परब्रह्मा । तयांचें पैं नाम सदा मुखीं ॥२९॥

१७९३

नमो सदगुरुराया दीनाच्या वत्सला । पावावे दासाला ब्रीद तुझें ॥१॥

ब्रीद तुझें जगीं पतीतपावन । भक्तांसी रक्षणें सर्व काळीं ॥२॥

सर्व काळीं भक्त आठविती तुज । ब्रीदाची ते लाज धरणे लागे ॥३॥

धरणेंलागे तुज भक्तांचा अभिमान । आश्रम त्या कोन तुम्हाविणें ॥४॥

तुम्हाविणें त्यासी नाहीं कोणी सखा । संसार पारिखा पारिखा वाटे त्यासी ॥५॥

वाटे त्यांसी माझा आधार सदगुरु । इच्छा मी कां करुं आणिकांची ॥६॥

आणिकांची इच्छा कासया करावी । प्रपंचाची ते गोंवि जेणें होय ॥७॥

जेणे होय प्राण्या जन्ममरण दुःख । तया आत्सुख भेट नाहीं ॥८॥

भेट नाहीं जया आत्मा परमात्म्याची । हानी नरदेहाची केली तेणें ॥९॥

केली तेणें जरी जप तपें फार । नाहीं त्या आधार गुरुविणा ॥१०॥

गुरुविणा प्राण्या नव्हेंचि सद्गती । ऐसें वेदश्रुती बोलाताती ॥११॥

बोलताती सिद्ध साधु महानुभाव । गुरुविन वाव सत्कर्में तीं ॥१२॥

सत्कर्में ती वारा चित्त शुद्ध करा । तेणें पाय धरा सदगुरुचें ॥१३॥

सदगुरुचें पाय जयासी लाधलें । तेणें निरसिलेंक प्रपंचासी ॥१४॥

प्रपंचासी बाधा केली गुरुदासें । चरणीं विश्वास ठेविनियां ॥१५॥

ठेवोनियां जीवा सदगुरुचे पायां । प्रपंचव्यवसायीं वागतसें ॥१६॥

वागतसें जनी परी तो विजनीं । भेदभाव मनीं नाहीं जया ॥१७॥

नाही जया चिंती आणिक वासना । सदगुरुवचना विश्वासला ॥१८॥

विश्वासला मनें सदगुरुवचना । प्रेम अन्य स्थानीं नाहीं ज्यांचें ॥१९॥

नाहीं ज्याचें तन मन आणि धन । गुरुसी अर्पण केलें असे ॥२०॥

केलें असे जेणें निष्काम तें कर्म । चित्त शुद्धी वर्म हातां आलें ॥२१॥

हातां आलें जया चित्तांने तें स्थैर्य । सदगुरु आचार्य भेटले त्या ॥२२॥

भेटले त्या मायबाप गुरुराव । दयासिंधु नांव असे ज्यांसी ॥२३॥

असे ज्यांसी सर्व श्रुति अध्ययन । ब्रह्मापरायण अहर्निशीं ॥२४॥

अहर्निशीं चित्त ब्रह्मींचि रंगलें । विषय उरलें नाहीं जया ॥२५॥

नाहीं जया कामक्रोधाची भावना । आणिक वासना नानापरी ॥२६॥

नानापरी जग जरी देखियले । ब्रह्मा हें भरले ओतप्रोत ॥२७॥

ओतप्रोत आत्मा स्वरुप जयासी । तयासी द्वदांसी भेटी कैसी ॥२८॥

भेटी कैसी तया सुखदुह्ख द्वदां । लोभ मोह आपदा नाहीं त्यासी ॥२९॥

नाही त्यासी मनीं द्वैताद्वैत नांव । आत्मशिति भाव सर्व जगीं ॥३०॥

सर्व जगीं दिसे ब्रह्मारुप ज्यासी । उपमा तयासी काय देऊं ॥३१॥

काय देऊं जगीं नसे त्या समान । स्वयं प्रकाशमान सदगुरुराजा ॥३२॥

सदगुरुराजानें केली मज कृपा । ब्रह्मानंद सोपा केला मज ॥३३॥

केला मजवर उपकार गुरुनें । तयासी उत्तीर्ण काय होऊं ॥३४॥

काय उतराई होऊं गुरुराया । मस्तक हा पायां सदा असो ॥३५॥

सदा असो माझे अंतरी वसती । अखंड प्रेम प्रीति गुरुरुपीं ॥३६॥

गुरुरुपीं मज अत्यांतिक सुख । अवलोकी मुख सर्वकाळ ॥३७॥

सर्वकाळ मुखें सदगुरुचें नाम । आणिक ते काम नाहीं मज ॥३८॥

नाहीं मज प्रिय सदगुरुवांचुनी । दृढनिश्चय मनीं केला असे ॥३९॥

केला असे प्राण सखा सदगुरुराजा । मन त्यासी पूजा सदा करी ॥४०॥

सदा करी मन सदगुरु अर्चन । तेणें समाधान होय त्यासी ॥४१॥

होय त्यासी सुख मुखं वर्णवेना । षाडविध प्रणामा लाग नाहीं ॥४२॥

लाग नाहीं जेथें अग्नि चंद्र सुर्या । कारण त्या कार्या नाश जेथें ॥४३॥

नाश जेथें असे सकळ ब्रह्मांडा । त्या सुखा अखंडा काय वानुं ॥४४॥

काय वानुं जेथें श्रुती मौनावल्या प्रभा । त्या पावल्या लयो जेथें ॥४५॥

लय जेथें असे सकळ कल्पनांचा तेथें इंद्रियांच काय पाड ॥४६॥

काय पाड असे अंतर इंद्रियां । चारी देह वायां झालें जेथें ॥४७॥

झाले जेथें लीन मन इंद्रिय प्रमाण । त्या सुख वर्णन कैसें होय ॥४८॥

कैसे होय वक्ता वाच्य आणि वचन । त्रिपुटी हे क्षीण जया ठायीं ॥४९॥

जया ठायीं वसती तेहतीसं कोटी देव । तें सुख वैभव काय सांगुं ॥५०॥

काय सांगु मज मुखें वर्णवेना । तेणें मीतुपणां मावळला ॥५१॥

मावळला आतां जगदांधकार । समुळ संसार पारुषला ॥५२॥

पारुषला मज सकळ द्वैतभाव । दिसे भावाभाव ब्रह्मारुप ॥५३॥

ब्रह्मारुप जग व्यष्टी हे समष्टी । भासे कृपादृष्टी सदगुरुच्या ॥५४॥

सदगुरुच्या कृपें हरलें जीव शिव । ब्रह्मा एकमेवक अद्वितीय ॥५५॥

अद्वितीय ब्रह्मा प्रत्यक्ष हें दिसे । दृष्टी समरसें तदाकार ॥५६॥

तदाकार झाला सकळ हा देह । राहे तो संदेह कैशापरी ॥५७॥

कैशापरी राहें द्वैताची भावना । विपरित असंभावना निवर्तल्या ॥५८॥

निवर्तल्या जेथें शास्त्राचीया मती । मनादिक पंक्ति मावळली ॥५९॥

मावळली मज द्वैताद्वैत क्लृप्ती । सुखें सहज स्थिती भोगितसों ॥६०॥

भोगितसों आम्हीं सुखें परमानंद । कोटी हे आनंद वसती जेथें ॥६१॥

वसती जेथें सिद्ध महानुभाव संत । असे ते अनंत ब्रह्मसुख ॥६२॥

ब्रह्मासुख झालें सहज जयासी । तयाच्या भाग्यासी पार नाहीं ॥६३॥

पार नाहीं तया सुखा प्राप्त झाला । संदेह तो झाला चिंदानंद ॥६४॥

चिंदानंद नित्य अज निरामय । निर्विकार सबाह्म एकरुप ॥६५॥

एकरुप ब्रह्मा उपाधिरहित । तेथें तो वसत भाग्यवंत ॥६६॥

भाग्यवंत ऐसा असे गुरुदास । देहासी उदास सर्वकळ ॥६७॥

सर्वकाळीं करी सत्क्रिया भजन । आणिक उपासन सदगुरुचें ॥६८॥

सदगुरुचें पादतीर्थ सदा सेवी । प्रंपची त्या गोंवी कैशी होय ॥६९॥

कैशी होय गुरुभक्तां अधोगती । लागला सत्पथीं गुरुकृपें ॥७०॥

गुरुकृपें ज्यासी सत्पथ पावला । जीव सुखावला ब्रह्मासुखें ॥७१॥

ब्रह्मासुखें झालों मीसदा संपन्न । ब्रह्मापुर्ण अनुभविलें ॥७२॥

अनुभविलें ब्रह्मा अंतर सबाह्म । जग ब्रह्मामय झालें दिसे ॥७३॥

झाले दिसें ब्रह्मा चतुर्दश लोक । शुद्धशुद्ध विवेक नाहीं जेथें ॥७४॥

नाहीं जेथे द्वैताद्वैत ते उपाधी । ते सुखी समाधी दासां झालीं ॥७५॥

दासां झाली निद्रा शुन्य सारुनियां । वृत्ती पवलीया ब्रह्मसुखा ॥७६॥

ब्रह्मासुखा पावे ज्याचें अंतःकरण । सर्वकाळीं जाण ब्रह्मारुप ॥७७॥

ब्रह्मारुप झालें जयाचें तें अंग । तया नित्यसंग सज्जनाचा ॥७८॥

सज्जानाचा संग जयासी पैं होय । तया उणें काय निजसुखा ॥७९॥

निजसुखा प्राप्त झाला संतसंगे । तयाची सर्वांगें ब्रह्मा झालीं ॥८०॥

ब्रह्मा झालें त्याचें काया वाचा मन । साध्य आणि साधन सर्व ब्रह्मा ॥८१॥

सर्व ब्रह्मावीण नाहीं ज्यासी अनुभव । ऐसा तयचा भाव एकविध ॥८२॥

एकविध भाव जयाचिया मनीं । त्यासी चक्रपाणी अंकिलासे ॥८३॥

अंकिलासे देव तया सदगुरुकृपें । अहंकार पापें सोडियेलें ॥८४॥

सोडियेलें त्यासी कामादि षडविकारीं । वसतीं त्या अंतरीं देवें केली ॥८५॥

देवे केली त्यासीं आपुली अंकीत । तोचि त्याचे हित सत्य जणें ॥८६॥

सत्य जाणे एक सदगुरु दयाळ । चरण कमळ ज्याचें ध्यावें ॥८७॥

त्याचें ध्यावें चरण सदा सर्वकाळ । प्रपंच सकळ सांडुनियां ॥८८॥

सांडुनियां म्हणजे मिथ्या हा पहावा । सदगुरु करावा पाठीराखा ॥८९॥

पाठीराखा होय सदगुरु जयासी । कळिकाळ त्यासी बाधतीना ॥९०॥

बाधातीना त्यासी मुक्ति ऋद्धिसिद्धि । ज्याची सदा बुद्धि सदगुरुपायीं ॥९१॥

सदगुरुपायीं ज्यांचें चित्त स्थिर झालें । तयासी जोडलें मोक्षपद ॥९२॥

मोक्षपद त्याची इच्छा ते करीत । भक्तांचे मनांत गुरुपद ॥९३॥

गुरुपद योगें मुक्ति तुच्छ त्यासी । त्याचिया मानसी गुरु वसे ॥९४॥

गुरुवसे मनीं सदा सर्वकाळ । तुटली हळहळ प्रपंचाची ॥९५॥

प्रपंचाची चिंता गुरुदासा नये । योगक्षेम असे गुरुहातीं ॥९६॥

गुरुहातीं असे सर्व त्याचें काम । दासामुखीं नाम गुरुगुरु ॥९७॥

गुरुगुरु जप आज्ञाननाशक । भवसिंधुंतारक गुरुनाम ॥९८॥

गुरुनामासम आणिक नाहीं मंत्र । सांगताती शास्त्रें महानुभव ॥९९॥

एका जनार्दनीं गुरुपदीं मस्तक । ठेवुनी सम्यक ब्रह्मा झाला ॥१००॥

१७९४

श्रीपांडुरंग सदगुरु हें स्वामी । तया पादपद्मीं नमन माझें ॥१॥

गजाननमुर्ति सदगुरुसमर्थ । देई मज स्वार्थ निजपदीं ॥२॥

नेत मजलागीं गुरु निजधामीं । वसे अंतर्यामीं सर्वकाळीं ॥३॥

शामसुंदरमुर्ति सदगुरुदयाळ । भक्ता प्रतिपाळ गुरुराव ॥४॥

यम नियम मज करविती सदगुरु । सर्वस्वें आधारु मज त्यांचा ॥५॥

नर नारायण रुप हा सदगुरु । उतरी भवपारु क्षणमात्रें ॥६॥

मस्तक तयाच्या पायीं हा ठेवावा । नित्य तो पहावा हृदयामाजीं ॥७॥

ॐकार प्रणव सदगुरुस्वरुप । मिळे आपेंआप अंतर्यामीं ॥८॥

नका विसरुं त्या सदगुरुदयाळा । दासाचा कळवळा तयालागीं ॥९॥

मस्त होऊं नका तारुण्याच्या भरें । करावी या करें सदगुरुसेवा ॥१०॥

ऋद्धिसिद्धि तुम्हीं मनीं त्या न आणा । भजावा तो राणा सदगुरुराव ॥११॥

धंदा नका करु आणिक तयाविण । तन्नाम श्रवम दृढ करा ॥१२॥

अवन होतसे सदगुरुच्या कृपें । निरसती पापें सकळही ॥१३॥

आशा हे त्यागावी पासुनियां मना । सदगुरुचरणा तेव्हा भेटीं ॥१४॥

इहलोकीं सुख सदगुरु देणार । मना सर्व भार तेथें ठेवीं ॥१५॥

ईशान स्वरुपीं सदगुरु प्रत्यक्ष । देत ज्ञान अक्ष दासालागीं ॥१६॥

उपकार त्याचे अनंत अपार । भवसिंधु पार त्याचेंयोगें ॥१७॥

उदास जो झाला देहाचिये ठायीं । तया लागीं पायीं ठाव देई ॥१८॥

ऋषिसिद्ध मुनी ज्या लागी भजती । वसे आत्मस्थिति सर्वकाळ ॥१९॥

ऋण हें फेडावें जन्ममरणाचें साधन हे साचे नाम धरा ॥२०॥

लुब्ध होऊं नका विषयांच्या स्वादा । पावाल आपदा नानापरी ॥२१॥

लुसलुसित कोंवळी बिल्वतुळसीपत्रें । वहावीं पवित्र चरणावरीं ॥२२॥

एक दोन तीन चार पांच सहा । साडुनियां रहा गुरुपायें ॥२३॥

ऐहिक हें सुख तुच्छ नाशिवंत । सेवावा अनंत सदगुरुराव ॥२४॥

ओवी नाममाळा वृत्ति तंतुमाजीं । इंद्रियसमाजी गुरु वसे ॥२५॥

औदार्य गुरुचें अनिवार जगीं । माना पायालागीं दृढ धरीं ॥२६॥

अंगीं मजलागेकें गुरु बैसविती । उपदेश देती ब्रह्माज्ञान ॥२७॥

अहा काय सांगुं सदगुरुची कीर्ति । परब्रह्मा मुर्ति गुरुराव ॥२८॥

कल्पना त्यागावी तेव्हं ब्रह्माप्राप्ती । चुके यातायाती आपेंआप ॥२९॥

खटपट करिती प्रपंचाचेविशी । भजे त्या गुरुशी तैशापरी ॥३०॥

गर्व अभिमान मनीं नको धरुं । तुजसी अधारु सदगुरुराज ॥३१॥

घटिका दीस मास अयन संवत्सर । गुरु विश्वभर भजें बापा ॥३२॥

ॐआकारस्वरुप गुरुमहाराज । मुर्ति हे सहज ह्रुदयीं लक्षीं ॥३३॥

चमत्कार माझ्या सदगुरुरायाचा । दाता स्वानंदाचा लाभ होय ॥३४॥

छत्तीस तत्त्वांचे शरीर हें साचें । कांहीं अनुभवाचें पाव लक्ष ॥३५॥

जवानिका माया समूळ नुरवीं । प्रेम पुरवीं सद्‌गुरुपायीं ॥३६॥

झरा हा सुखाचा सद्‌गुरुच्या पायीं । मना तुं राही अक्षयीं तेथें ॥३७॥

ॐकार वर्णात्मक सदगुरु पांडुरंग ।अक्षय अभंग सर्वासाक्षीं ॥३८॥

टणत्कार करा विरागाच्या योगं । सदगुरुच्या संगे ब्रह्माप्राप्ती ॥३९॥

ठकुं नका तुम्हीं माया विद्यायोगें । चरणीं करा जागे वृत्तीसी त्या ॥४०॥

डमरु त्रिशूळ सदग्रुच्या हातीं । दासांसी रक्षिती सर्वकाळ ॥४१॥

ढवळूं तूं नको विषयाच्या ठायीं । वृत्ति स्थिर पायीं सदा करी ॥४२॥

नकार तिरेघाटी । भेदावला नसे । सदगुरु हा असें ऐक्य तैसा ॥४३॥

तदाकर मन करा सदगुरुरुपीं । सच्चितस्वरुपीं तुम्हीं व्हाल ॥४४॥

थरथर कांपा सदगुरुसमीप । ब्रह्मीं आपेआप प्राप्त व्हाल ॥४५॥

दया शांति क्षमा सद्गुरुसी मागा । सदगुरुच्या वागा आज्ञा ऐसें ॥४६॥

धरा भाव तुम्ही सद्‌गुरूच्या पायीं । परब्रहमा ठायीं गति जेणें ॥४७॥

नमस्कार करा तुम्हीं सदगुरुसी । तेणें निजपदासी प्राप्त व्हाल ॥४८॥

पहावें नयना सदगुरुरायाला । तेणें आनंदाला अनुभावावें ॥४९॥

फजिती ही तुम्हीं नका करुं आतां । वेगीं सदगुरुनाथा शरण जा ॥५०॥

बरवें जनहो तुम्हांसी सांगतों । तुम्हीं चित्तीं ध्या तो सदगुरुरावों ॥५१॥

भरावा मानसीं सदगुरुदयाळ । पद हें पावाल परब्रह्मा ॥५२॥

मरणें जन्मणें सत्वर निवारा । वृत्ति हे आवरा विषयांतुनीं ॥५३॥

यामाच्या हातीचे सोडवील तुम्हां । भजा आत्मारामा गुरुराया ॥५४॥

रमवा हें चित्त सदगुरुच्या ध्यानीं । पहा जनीं वनीं सदगुरुराव ॥५५॥

लगाम हा देणें अश्वासी ज्या परी । वृत्ति स्थिर करी गुरुध्यान ॥५६॥

वमनवत हे विषय त्यागावें । ब्रह्मा अनुभवावें गुरुकृपें ॥५७॥

शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा । सातवी अपेक्षा सदगुरुपायीं ॥५८॥

षकार स्वरुप सदगुरु नारायण । गुण हे श्रवण त्याचे करा ॥५९॥

समाधि साधनीं वृत्ति स्थिर करा । दृढ चरण धरा सद्‌गुरूचे ॥६०॥

हवाशिर स्थान एकांत पहावें । ध्यान तें धरावें सदगुरुचें ॥६१॥

लववावी वृत्ति सदगुरुचरणें । तें पायांपासुनी सोडुं नये ॥६२॥

क्षमा शस्त्र हातीं गुरुकृपें धरा । कामक्रोध करा शांत जना ॥६३॥

ज्ञप्ति हे आकळे सदगुरुप्रसादें । वर्ताल स्वानंदें सर्वकाळ ॥६४॥

एका जनार्दनीं गुरुपदीं लीन । ब्रह्मा परिपुर्ण अनुभविलें ॥६५॥

१७९५

दत्तराया करुं प्रथम नमन । द्वीतीय चरणां सदगुरुच्या ॥१॥

सदगुरुच्या चरणां करावा प्रणाम । मुखीं नित्य नाम सद जप ॥२॥

नित्य जपा वाचे गुरुराया स्वामी । तेणें सुखधामीं प्राप्त व्हाल ॥३॥

प्राप्त व्हाल तुम्हीं आत्यांतीक सुखा । जेथें जन्म दुःखा पार नाहीं ॥४॥

पार नाहीं वेदा शास्त्रे मौनावली । पुराणें ती झालीं मौनरुप ॥५॥

शेष ब्रह्मा आणि इंद्र । सुर्य अग्नि चंद्र अंत नाहीं ॥६॥

अंत नाहीं त्याचा अनंत स्वरुप । अनिर्वाच्य रुप सदगुरुचें ॥७॥

सदगुरुचें रुप तें स्वयंप्रकाश । दृश्यीं जो प्रकाश सद्‌गुरुचा ॥८॥

सद्‌गुरूचा प्रेमा माझिया अंतरीं । अनुभव साक्षीत्कारीं झाला असे ॥९॥

झाला असे अनुभव अपरोक्ष । शास्त्री जे विवक्षा केली असे ॥१०॥

केली असे स्तुति संत महानुभावी । सदगुरु वदवी मजलावी ॥११॥

मजलागीं त्यांनी दिली असे वाचा । उपकार तयाचा काय वानुं ॥१२॥

काय वानुं माझ्या सदगुरुदयाळा । बहुत कळवळा ज्यासी माझा ॥१३॥

ज्यासीं माझा प्राण अर्पण मी केला । देहा हा विकिला सर्वस्वं मी ॥१४॥

सर्वस्वें मी वसे सदगुरुचे पायीं । अन्य प्रिय नाहीं मजलागीं ॥१५॥

मजलागीं दया केली गुरुरायें । ह्रुदयीं तें पाय धरियले ॥१६॥

धरियेलीं जीवीं पाउलें कोवळीं । कंठीं एकावळी नाममाळा ॥१७॥

नाममाळा कंठीं शोभे ही साजिरी । हृदयीं गोजरीं गुरुमुर्ति ॥१८॥

गुरुमूर्ति वसे ज्याचे हृदयकमळीं । तया चंद्रमुळीं मागें पुढें ॥१९॥

मागें पुढें उभा राहे तो रक्षित । कांहीच आघात येवो नेदी ॥२०॥

येवो नेदी कदा कल्पनेची बाधा । आणिक आपदा शिष्यालागीं ॥२१॥

शिष्यालागीं गुरु करिताती बोध । स्वरुप स्वानंद देती तया ॥२२॥

देती त्या गुरु अनुपम सुख । स्वानंद कौतुक त्यासी लाभे ॥२३॥

त्यासी लाभे आत्मा सर्व अंतर्यामी । चिन्मयसुख धार्मीं पहुडे तो ॥२४॥

पहुडे तो नये कदाकाळीं देहा । तोचि निःसंदेहा पावलासे ॥२५॥

पावलासे ब्रह्मा अखंड परात्पर । सारासार विचार करोनियां ॥२६॥

करोनिया जेणें नित्य सनानसंध्या । दोषाची ते बाधा वारियेली ॥२७॥

वारियेली जेणे चित्तविक्षेपता । अकरोनि उपास्यता सगुणमूर्ति ॥२८॥

सगुणमुर्तीसी न म्हणावें मायीक । शास्त्र आत्यांतिक सांगतसे ॥२९॥

सांगतसे शास्त्र देवध्यान करा । विक्षेप तो वारा चित्ताचा पैं ॥३०॥

चित्ताचा गेलिया विक्षेप सकळ । आवरण केवळ राहिलेसे ॥३१॥

राहिलेसे जया स्वरुपावरण । त्याचें निवारण ज्ञानें होय ॥३२॥

ज्ञानें अहोय परी ज्ञानप्राप्तिलागीं । साधनें तीं अंगी विवेकादी ॥३३॥

विवेक वैराग्य शमादी ते षटक । चौथी ते देख मुमुक्षता ॥३४॥

मुमुक्ष ते पुढें श्रवण मनन । निजे तें ध्यासन पाहिजें कीं ॥३५॥

पाहिजें कीं तत्त्व पदार्थशोधन । साधनें हीं जाण अंतरंग ॥३६॥

अंतरंग साधनें करावी परमार्था । त्यागावी सर्वथा बहिरंग ॥३७॥

बहिरंग साधनें होय स्वर्गप्राप्ती । निष्कामी होती चित्तशुद्दी ॥३८॥

चित्तशुद्धि झाल्या अंतरंगा आधिकार । विवेक निर्धार सांगतसो ॥३९॥

सांगतो आतां विवेकांचे तथ्य । ब्रह्मा हेंचि सत्य जगन्मिथ्या ॥४०॥

मिथ्या माया कार्य जगत प्रकार । ब्रह्मा हेंचि सार विवेक हा ॥४१॥

विवेक हा स्मरा अनुभवकरा । वैराग्य अवधारा एकचित्तें ॥४२॥

एकचित्तें करा वैराग्य श्रवण । तेणें समाधान स्वरुपी होय ॥४३॥

स्वरुपी होय स्थिती वैराग्याच्या योगे । अन्ना विषसंगें सेवु नये ॥४४॥

सेवुं नये विषय वमनांचें परी । विट तो अंतरी सदा असो ॥४५॥

सदा असो प्रीति परमार्थालागीं । विषयीं विरागी यांचें नांव ॥४६॥

याचें नांव शम मनाचा निग्रहो । विषयी आग्रहो चित्ता नाहीं ॥४७॥

चित्ता नाही कधीं विषयाची स्फुर्ति । अंतर हे वृत्ति झाली असे ॥४८॥

झाली असे सर्व इंद्रिया स्थिरता । दम हें तत्त्वतां म्हणती त्या ॥४९॥

म्हणती त्य औपरम स्वधर्मासी । त्यागवे विधीसी सर्वस्वची ॥५०॥

सर्वस्वेचि शीत उष्णाएं साहणें । तितिक्षा म्हणनेम तयालागीं ॥५१॥

तयालागीं श्रद्धा म्हणताती जनीं । सदगुरुवचनीं विश्वास तो ॥५२॥

विश्वास असावा वेदांतांचे ठायी । सदगुरुचे पायी लीन व्हावें ॥५३॥

लीन व्हावें चित्त्त सदगुरुवचना । तोचि समाधान प्राप्त झाला ॥५४॥

प्राप्त झाला प्राणी मुमुक्षतेंलागीं । प्रपंचसंसंगीं विटला तो ॥५५॥

विटला संसारा आणि घरदारा । पुत्र परिवारा मिथ्या मानी ॥५६॥

मिथ्या मानी सर्व प्रपंचवैभव । विषयाचें नांव नांवडें ज्यासी ॥५७॥

नावडे ज्यांसी इष्ट मित्र ते सोयरे । परमार्थी वेव्हारे चित्त ज्याचें ॥५८॥

चित्त ज्यांचें झालें प्रपंचासी विरक्त । त्याचे मनीं आर्त सदगुरुभेटी ॥५९॥

सदगुरुभेटी व्हावी ऐसें ज्याचें मनीं । तो सर्वालागुनिअ विचारित ॥६०॥

विचारित मला सदगुरु कैं भेटती । रात्रंदिवस चित्तीं दुजें नाहीं ॥६१॥

दुजें नाहीं तया आणिक जगांत । सदगुरु सर्वत्र दिसतसे ॥६२॥

दिसतसे गुरु आसनीं शयनीं । आणिक भोजनीं गुरु दिसे ॥६३॥

गुरु दिसे जागृती स्वप्न आणि सुषप्ती । आनंद नेणई गुरुवीण ॥६४॥

गुरुवीण जनीं न दिसे ज्या अन्य । चित्त होय धन्य गुरु भेटी ॥६५॥

गुरुभेटी होता चित्त स्थिर होय । तळमळ जाय मनांचीं तें ॥६६॥

मनाची ते शंती होता पाय धरीं । दंडवत करी वेळोवेळां ॥६७॥

वेळोवेळां गुरुसी करी नमस्कार । जोडोनियां कर उभा राहीं ॥६८॥

जोडोनियां हात पुढें गुरुराया । बोलत सखया तारा स्वामी ॥६९॥

तारा स्वामी मज भवाचे सागरीं । व्हावें कर्णधारी मजलागीं ॥७०॥

मजलागीं गुरों तुमचा आधार । वोस चराचर तुम्हांवीण ॥७१॥

तुम्हावीण सखा मज नाहीं कोणी । वाटतें चरणीं घालु मिठी ॥७२॥

मिठी घालुं पायंसदगुरुसमर्थ । तेणें निजस्वार्था पावतील ॥७३॥

पाववीअल सुखा सदगुरु माउली । ती मज गाउली शिष्यवत्सा ॥७४॥

शिष्यवत्सालागी पाजी ज्ञानदुग्ध । तेणें देह शुद्ध होय त्याचा ॥७५॥

देह त्याचा केला ब्रह्मा हा गुरुनें । काय वाचा मनें चरण धरी ॥७६॥

चरण धरीतसे शिष्य वेळोवेळां । माझा कळवळा असो तुम्हां ॥७७॥

तुम्हावीण मज कोण हो तारील । दीन उद्धरेल कैशापरीं ॥७८॥

कैशापरी मज होईल सुटका । प्रपंच लटिका वाटे केव्हां ॥७९॥

केव्हा वाटे मज जगत हें मिथ्या । ब्रह्माचें सत्यत्व केव्हा पावें ॥८०॥

केव्हा पावएअ मज स्वरुपचि शांती । तें मज निश्चिती सांगा स्वामी ॥८१॥

सांगा स्वामी मज कृपा हो करुनी । शिष्य विनवणी करी ऐशीं ॥८२॥

करी ऐशी दया मज गुरुराया । लागतसे पाया शिष्यराज ॥८३॥

शिष्यराजा झाली अष्टभाव प्राप्ती । सदगुरुंनीं हातीं धरियेला ॥८४॥

धरियेला करीं नेला एकांतांत । अंकीं बैसवीत सदगुरुराव ॥८५॥

सदगुरुराव बोलती त्या क्षणीं । लागली उन्मनी तया लागीं ॥८६॥

तयालागीं नाहीं देहींची आठव । स्थुल सुक्ष्म भाव मावळले ॥८७॥

मावळले चारी देह चारी अवस्था । शिष्य तो तत्त्वता ब्रह्मा झाला ॥८८॥

ब्रह्मा झाला तयाचा देह आत्मस्थिती । द्वैताद्वैतप्रतीत नाहीं जया ॥८९॥

नाहीं जया सुखदुःखाची भावना । समुळ वासना निरसली ॥९०॥

निरसली त्याची अहंकार कल्पना । सुखदुःख यातना नाही तया ॥९१॥

नाहीं तया जीव शिव भेदाभेद । समुळ हे वाद मिथ्या झाले ॥९२॥

मिथ्या झालें ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता । भोज्य भोग भोक्ता मावळला ॥९३॥

मावळला तेव्हा सद्वैत प्रपंच । एक ब्रह्मा साच अनुभविलें ॥९४॥

अनुभविलें तेणें अनुभव वेडावला । विचार निमाला जिये ठायीं ॥९५॥

जिये ठायींगती नाहीं षटप्रमाणा । साधन लक्षणा ठाव कैंचा ॥९६॥

ठाअव कैंचा तेथें परादिका वाच । जेथें त्या शब्दाचा लाग नाहीं ॥९७॥

लाग नाहीं तेथें उपपत्ति युक्ति । अपरोक्ष प्रतीति लया गेली ॥९८॥

लया गेली तया स्थानीं मज ठेविलें । सदगुरुदयाळें दीनानाथें ॥९९॥

दीनानाहें तया ठायीं निजविलें । नवजाती वर्णिलें गुण तया ॥१००॥

एका जनार्दन गुरुपायीं लीन । ब्रह्मा परिपुर्ण अनुभविलें ॥१०१॥

१७९६

श्रीगुरुराया स्वामी दिनानाथा । उद्धरी अनाथा पांडुरंग ॥१॥

गुण निर्गुणरुपा देवा यतिवरा । त्रैलोक्य आधारा पाडुरंगा ॥२॥

रुप वर्णावया नाहीं मज मती । देई तुं बा शक्ति पांडुरंगा ॥३॥

देई मजलागीं प्रभो नित्य शांती । करितों विनंति पाडुरंगा ॥४॥

वदविसी मज तंव सत्ते देवा । देई मज भावा पाडुंरंगा ॥५॥

दशा हें यौवन मज करी बाधा । सांगे स्वयंबोधा पाडूरंगा ॥६॥

तमगुणरजोगुणांतें निरसी । तारी या दासासी पाडुरंगा ॥७॥

असावें मी सदा विषयीं विरक्त । पुरवींमाझे आर्त पाडुरंगा ॥८॥

वससी अंतरीं दासाच्या तुं सदा । आनंदाच्या कंदा पाडुरंगा ॥९॥

धूतपाप व्हावें तुमच्या कृपादृष्टी । सुखाची तुं सृष्टीं पांडुरंगां ॥१०॥

तरती सज्जन तुमच्या दर्शनें । कॄपेचें तुं ठाणें पाडूरंगा ॥११॥

श्रियाळ चांगुना भक्त तारियेले । सत्व रक्षियेलें पाडुरंगा ॥१२॥

पाश हा भ्रांतीचा मजलागीं गोंवा । त्वाचि पैंक तोडावा पांडुरंगा ॥१३॥

दमावी इंद्रियें तेव्हा गुरुभेटी । नको आटाआटी पांडुरंगा ॥१४॥

श्रीद श्रीद माझा समर्थ सदगुरु । देवा तुं आधारु पाडुरंगा ॥१५॥

वन जन सर्व त्वाचि व्यापियलें । स्वरुप शोभलें पांडुरंगा ॥१६॥

लव निमिषभरी तुजविण रहावें । मरणें मज व्हावें पाडुरंगा ॥१७॥

भवसागरांत बुडतों मी देवा । करी माझा काढावा पाडुरंगा ॥१८॥

स्वानंद आरामी मी तो विश्रांमावें । मजलागीं पावावें पाडुरंगा ॥१९॥

मीपणेंनसिलें मजलागीं देवा । देई स्वानुभवा पाडुंरगा ॥२०॥

नृप हा जगाचा परमानंद साचा । वदों माझी वाचा पाडुरंगा ॥२१॥

सिंहासन हृदयीं करोनिया माझ्या । बैसे गुरुराजा पांडुरंगा ॥२२॥

हस्तांत धरावें आपुलिया दासा । हेअ जगन्निवासा पांडुरंगा ॥२३॥

सर्वकाळ चित्ती माझिया वसावें । शुद्ध प्रेम द्यावें पाडुरंगा ॥२४॥

रण कामक्रोध लोभाचें माजलें । निवारी उगलें पाडूरंगा ॥२५॥

स्वभाव हा माझा रजो तमो युक्त । नाशी तुं क्षणांत पांडुरंगा ॥२६॥

तीकडी सांखळी त्रिगुणाची सारी । भव हा निवारी पांडुरंगा ॥२७॥

मनन करावें रात्रंदिवस तुझें । ऐसी कृपा कीजे पांडुरंगा ॥२८॥

हाव ही धरावी सदगुरुपायांची । विनंती दीनाची पाडुरंगा ॥२९॥

रहावें सर्वदा तुझ्या पायांपाशीं । देई तुं वरांसी पाडुरंगा ॥३०॥

जय जय सदगुरो स्वामी तुं समर्थ । पुरवी मनोरथा पाडुरंगा ॥३१॥

एका जनार्दनीं सदगुरों उदारा । दयेच्या सागरा पांडुरंगा ॥३२॥

१७९७

प्रकाश तरणी न बोले वेदवाणी । बोध विवेक दोन्ही तटस्थ झालीं ॥१॥

वेदासी अगोचर ध्यानासी कानडें । तें ब्रह्मा सांपडें सदगुरु चरणीं ॥२॥

काळासी नाकळें कर्मीं जे न मिळें । सर्वांसी न कळे असुनियां ॥३॥

जीवीं जीवा न कळे शिवपण वोविलें । नाम या वेगळें सच्चिदनंद ॥४॥

सदगुरु बोधें ब्रह्मा ब्रह्मार्पण । जीवासी सोडवण सदगुरुचरणीं ॥५॥

गुरुजप सदा नाम एक वस्ती । एका जनार्दनीं प्राप्त सहज नाम ॥६॥

१७९८

मनोभाव जाणोनि माझा । सगुणरुप धरिलें वोजा । पाहुणा सदगुरुराजा । आला वो माय ॥१॥

प्रथम अंतःकरण जाण । चित्तःशुद्ध आणि मन । चोखाळोनी आसन । स्वामीसी केलें ॥२॥

अनन्य आवडीचें जळ । प्रक्षाळिलें चरणकमळ । वासना समुळ । चंदन लावी ॥३॥

अहं जाळियल धूप । सदभाव उजळिला दीप । पंचप्राण हे अमूप । नैवेद्य केला ॥४॥

र्जतम सांडोनी दोन्हीं । विडा दिला सत्त्वगुनीं । स्वानुभवेंण रंगोनी । सुरंग दावी ॥५॥

एका जनार्दनीं पुजा । देवभक्त नाही दुजा । अवघाचि सदगुरुराजा । होवोनि ठेला ॥६॥

१७९९

धन्य धन्य श्रीगुरुभक्त । गुरुचें जाणती मनोगत ॥१॥

गुरुचरणीं श्रद्धा गाढी । गुरुभजनाची आवडी ॥२॥

गुरुचेंनाम घेतां वाचें । कैवल्य मुक्ति तेथें नाचे ॥३॥

गुरुचें घेतां चरणातीर्थ । भुक्ति मुक्ति पवित्र होत ॥४॥

गुरुकृपेचें महिमान । शरण एका जनार्दन ॥५॥

१८००

धन्य धन्य सदगुरुराणा । दाखिविलें ब्रह्मा भुवना ॥१॥

उपकार केला जगीं । पावन जालों आम्हीं वेगीं ॥२॥

पंढरीं पाहतां । समाधान जाले चित्ता ॥३॥

वेटेवरी समचरण । एका जनार्दनीं निजखुण ॥४॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

Shivam
Chapters
मंगलाचरण - अभंग १ ते ४ बाळक्रीडा - अभंग ५ ते १२ श्रीकृष्ण प्रगटला - अभंग १३ ते १६ गर्गाचार्य - अभंग १७ श्रीकृष्ण आळ - अभंग १८ ते १९ विश्वरुप - अभंग २० ते २२ चौर्यकर्म - अभंग २३ ते २७ गौळणीं - अभंह २८ ते ३० श्रीकृष्ण विंदान - अभंग ३१ ते ४२ वेणी - अभंग ४३ ते ४७ गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७ राधाविलास - अभंग ७८ ते १०२ श्रीकृष्णाचा वेध - अभंग १०३ ते ११८ विरहावस्था - अभंग ११९ ते १३८ वनक्रीडा - अभंग १३९ ते १४७ मुरली - अभंग १४८ ते १६५ रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३ दळण - अभंग १७४ ते १७५ कांडण - अभंग १७६ पिंगा - अभंग १७७ ते १७८ फुगडी - अभंग १७९ गोपांचे खेळ - अभंग १८० ते १८१ टिपरी - अभंग १८२ ते १८३ विटीदांडु - अभंग १८४ ते १८८ चेंडूफळी - अभंग १८९ ते १९० लगोरी - अभंग १९१ ते १९२ भोंवरा - अभंग १९३ ते १९४ लपंडाई - अभंग १९५ ते १९६ सुरकांडी - अभंग १९७ वावडी - अभंग १९८ एकीबेकी - अभंग १९९ ते २०१ पटपट सांवली - अभंग २०२ झोंबी - अभंग २०३ चिकाटी - अभंग २०४ उमान - अभंग २०५ हमामा - अभंग २०६ ते २१२ हमामाहुंबरी - अभंग २१३ ते २१७ हुतुतु - अभंग २१८ ते २३१ काला - अभंग २३२ ते २६३ गौळणींचा आकांत - अभंग २६४ गौळणींची धांदल - अभंग २६५ उद्धवास आज्ञा - अभंग २६६ देवकी बंधमुक्तता - अभंग २६७ ते १७१ श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७ पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ३३० पंढरी माहात्म्य - अभंग ३३१ ते ३४० पंढरी माहात्म्य - अभंग ३४१ ते ३५० पंढरी माहात्म्य - अभंग ३५१ ते ३६० पंढरी माहात्म्य - अभंग ३६१ ते ३७० पंढरी माहात्म्य - अभंग ३७१ ते ३८० पंढरी माहात्म्य - अभंग ३८१ ते ३९० पंढरी माहात्म्य - अभंग ३९१ ते ४०० पंढरी माहात्म्य - अभंग ४०१ ते ४१० पंढरी माहात्म्य - अभंग ४११ ते ४२० पंढरी माहात्म्य - अभंग ४२१ ते ४३० पंढरी माहात्म्य - अभंग ४३१ ते ४४० पंढरी माहात्म्य - अभंग ४४१ ते ४५० पंढरी माहात्म्य - अभंग ४५१ ते ४६० पंढरी माहात्म्य - अभंग ४६१ ते ४७० पंढरी माहात्म्य - अभंग ४७१ ते ४७९ विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ४९० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४९१ ते ५०० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५०० ते ५१० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५११ ते ५२० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५२१ ते ५३० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५३१ ते ५४० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५४१ ते ५५० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५५१ ते ५६० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५६१ ते ५७० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५७१ ते ५८० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५८१ ते ५९० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५९१ ते ६०० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६०१ ते ६१० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६११ ते ६२० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६२१ ते ६३० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६३१ ते ६४० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६४१ ते ६५० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६५१ ते ६६० विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६६१ ते ६६६ विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ६८० विठ्ठलनाममहिमा - अभंग ६८१ ते ६९० विठ्ठलनाममहिमा - अभंग ६९१ ते ७०० विठ्ठलनाममहिमा - अभंग ७०१ ते ७१० विठ्ठलनाममहिमा - अभंग ७११ ते ७२३ रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ७४० रामनाममहिमा - अभंग ७४१ ते ७५० रामनाममहिमा - अभंग ७५१ ते ७६० रामनाममहिमा - अभंग ७६१ ते ७७० रामनाममहिमा - अभंग ७७१ ते ७८० रामनाममहिमा - अभंग ७८१ ते ७९० रामनाममहिमा - अभंग ७९१ ते ८०० रामनाममहिमा - अभंग ८०१ ते ८१० रामनाममहिमा - अभंग ८११ ते ८२० रामनाममहिमा - अभंग ८२१ ते ८३० रामनाममहिमा - अभंग ८३१ ते ८४० रामनाममहिमा - अभंग ८४१ ते ८५० रामनाममहिमा - अभंग ८५१ ते ८६० रामनाममहिमा - अभंग ८६१ ते ८७० रामनाममहिमा - अभंग ८७१ ते ८८० रामनाममहिमा - अभंग ८८१ ते ८९० रामनाममहिमा - अभंग ८९१ ते ९०० रामनाममहिमा - अभंग ९०१ ते ९१० रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५ सीता मंदोदरी संवाद - अभंग ९२६ मंदोदरी प्रश्न - अभंग ९२७ ते ९२८ सीता उत्तर - अभंग ९२९ ते ९३१ राम रावण युद्ध - अभंग ९३२ ते ९३३ भिल्लिण - अभंग ९३४ सीताशुद्धी - अभंग ९३५ पदप्राप्ति - अभंग ९३६ राम सहवास - अभंग ९३७ ते ९४४ शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८ हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७ दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५ दत्तमानसपूजा - अभंग १०५६ ते १०७० हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९ हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४ चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६१ नाममहिमा - अभंग ११६२ ते ११८० नाममहिमा - अभंग ११८१ ते १२०० नाममहिमा - अभंग १२०१ ते १२२० नाममहिमा - अभंग १२२१ ते १२४० नाममहिमा - अभंग १२४१ ते १२६० नाममहिमा - अभंग १२६१ ते १२७२ नामपाठ - अभंग १२७३ ते १२८१ नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३ नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३५० नामपाठमार्ग - अभंग १३५१ ते १३७३ नामपाठ - अभंग १३७४ ते १३९० नामपाठ - अभंग १३९१ ते १४१० नामपाठ - अभंग १४११ ते १४३० नामपाठ - अभंग १४३१ ते १४५० नामपाठ - अभंग १४५१ ते १४७० नामपाठ - अभंग १४७१ ते १४९० नामपाठ - अभंग १४९१ ते १५१० नामपाठ - अभंग १५११ ते १५३० नामपाठ - अभंग १५३१ ते १५५० नामपाठ - अभंग १५५१ ते १५७० नामपाठ - अभंग १५७१ ते १५९० नामपाठ - अभंग १५९१ ते १६१० नामपाठ - अभंग १६११ ते १६३० नामपाठ - अभंग १६३१ ते १६५० नामपाठ - अभंग १६५१ ते १६७० नामपाठ - अभंग १६७१ ते १६९० नामपाठ - अभंग १६९१ ते १७१० नामपाठ - अभंग १७११ ते १७३० नामपाठ - अभंग १७३१ ते १७५० नामपाठ - अभंग १७५१ ते १७७० नामपाठ - अभंग १७७१ ते १७९१ सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८०० सद्गुरुमहिमा - अभंग १८०१ ते १८२० सद्गुरुमहिमा - अभंग १८२१ ते १८४० सद्गुरुमहिमा - अभंग १८४१ ते १८६० सद्गुरुमहिमा - अभंग १८६१ ते १८८८ गुरुपरंपरा - अभंग १८८९ ते १९००