Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ३१

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥    
जय द्वारकावासी रुक्मिणीरमणा ॥ चित्तचालका चैतन्यवना ॥ विधिजनका भक्तभूषणा ॥ दानवमर्दना श्रीकृष्णा ॥१॥
जय विश्वव्यापका सर्वेश्वरा ॥ सायुज्यपददानीं अति उदारा ॥ पतितपावना जगदुद्धारा ॥ राधिकावरा गोविंदा ॥२॥
जय सगुणस्वरूपा मेघश्यामा ॥ गुणातीता पुरुषोत्तमा ॥ ब्रह्मांडवासी आत्मारामा ॥ भजनीं प्रेमा मज असों दे ॥३॥
जय गोमतीतीरनिवासिया ॥ श्रीजगद्गुरु रणछोडराया ॥ चित्त स्थिरावे तुझिया पायां ॥ ते कृपेची छाया करावी ॥४॥
जय निजभक्तहृदयकमलमिलिंदा ॥ सच्चिदानंदा स्वानंदकंदा ॥ चित्त स्थिरावे चरणारविंदा ॥ ऐसें गोविंदा करावें ॥५॥
तुझीं निजभक्तचरित्रें अद्भुत ॥ साह्य होऊनि वदनीं यथार्थ ॥ जेणें श्रोतयांचे श्रवण तृप्त ॥ होती त्वरित निजप्रेमें ॥६॥
आतां ऐका भाविक जन ॥ कथा रसिक अति पावन ॥ श्रवणीं पडतां दुरितें संपूर्ण ॥ जाती जळून क्षणमात्रें ॥७॥
द्वारकेची पुरातन मूर्ती ॥ डाकुरा आली देखोनि भक्ती ॥ दीडशें कोस द्वारावती ॥ तेथोनि पुढें असे पैं ॥८॥
रामदास नामें ब्राह्मण ॥ होता परम भाविक सज्ञान ॥ कोरान्न मागोनि संरक्षण ॥ कुटुंबाचें करीतसे ॥९॥
निराश संतुष्ट सर्वकाळ ॥ राहिली चित्ताची तळमळ ॥ नामस्मरण सर्वकाळ ॥ अहोरात्र करीतसे ॥१०॥
पंधरा दिवसीं एकादशी ॥ जात असे द्वारकेसी ॥ नेमें वारी धरिली ऐसी ॥ रामदासें निजनिष्ठें ॥११॥
सायाचें लांकूड कोरून ॥ त्यामाजी तुळसी लावून ॥ हातावरी ते धरून ॥ करी गमन सत्वर ॥१२॥
मार्गीं चालता प्रेमयुक्त ॥ स्वानंदें हरीचे गुण वर्णित ॥ शरीरलोभ सांडूनि त्वरित ॥ वैराग्यभरित सर्वदा ॥१३॥
दृष्टीं देखतां द्वारावती ॥ परम उल्हास वाटे चित्तीं ॥ जेवीं कृपणासी धन अवचितीं ॥ मार्गी चालतां सांपडे ॥१४॥
कीं सासुरवासें गांजिली बाळा ॥ माहेर देखतां उल्हास तिजला ॥ कीं अवर्षणीं मेघ जैसा ओळला ॥ देखोनि प्रजांस जाहला आनंद ॥१५॥
अनुताप धरूनि अंतरीं ॥ स्नान करी गोमतीतीरीं ॥ मग मानसपूजा करून सत्वरीं ॥ महाद्वारीं जातसे ॥१६॥
सद्भावें घालूनि लोटांगण ॥ सांडोनि सकळ देहाभिमान ॥ म्हणे देवा तुज अनन्यशरण ॥ जन्ममरण खंडावें ॥१७॥
तुळसीझाड वागवीं सवें ॥ त्याची मंजरी तोडूनि भावें ॥ पूजोनियां वैकुंठराव ॥ भाकित कींव निजनिष्ठें ॥१८॥
म्हणे पतितपावना गरुडध्वजा ॥ हे माझी अनाथाची पूजा ॥ नमस्कारूनि अधोक्षजा ॥ मागुती डाकुरा येतसे ॥१९॥
एक दिवस गृहीं राहून ॥ मागुती करीतसे प्रयाण ॥ पंचवीस वर्षेंपर्यंत जाण ॥ ऐसी वारी करीतसे ॥२०॥
शरीर बहुत जर्जर जाहलें ॥ वृद्धपण अंगीं आलें ॥ मग द्वारकेसी येऊनि एक वेळे ॥ देवास विनंति करीतसे ॥२१॥
अशक्त जाहली माझी काया ॥ आतां शक्ति नसे यावया ॥ लोभ असों दे देवराया ॥ चरणीं मस्तक ठेविला ॥२२॥
अश्रु वाहाती नेत्रांतून ॥ पुढें न करवे कांहीं स्तवन ॥ म्हणे हें शेवटींचें दर्शन ॥ पुढती येणें नव्हे कीं ॥२३॥
ऐसें बोलतां रामदास ॥ सद्गद जाहला जगन्निवास ॥ चहूं भुजीं निजभक्तास ॥ आलिंगूनि धरियेलें ॥२४॥
रामदासासी देव बोले ॥ तुवां श्रम बहुत केले ॥ सेवाऋण फार जाहलें ॥ तें फिटलें नवजाय ॥२५॥
तुझी फार जाहली सेवा ॥ आतां मज न्यावें आपुल्या गांवा ॥ रामदास म्हणे केशवा ॥ कैसें न्यावें तुजलागीं ॥२६॥
देव म्हणे माझा रथ घेईं ॥ जुंपोनि घोडे त्यांत बैसवीं ॥ रातोरात लवलाहीं ॥ चाल येतों सत्वर ॥२७॥
मग रथ आणोनि ते वेळ ॥ त्यांत बैसविले घननीळ ॥ मनोवेगें भक्तवत्सल ॥ आले डाकुरासी तेधवां ॥२८॥
रामदास म्हणे भगवंता ॥ तुज कोठें लपवूं आतां ॥ मागूनि धांवणें आलिया तत्त्वतां ॥ शिक्षा मज करितील ॥२९॥
इकडे प्रातःकाळीं द्वारकेत ॥ पुजारी कांकडआरतीसी येत ॥ तों मूर्ति नाहीं राउळांत ॥ नवल वाटत सकळांसी ॥३०॥
विचार करिती तये वेळां ॥ एक म्हणती रामदास आला ॥ तोचि देवासी घेऊनि गेला ॥ मार्ग दिसतसे रथाचा ॥३१॥
पूजारी माग पाहून ॥ डाकुरासी आले सकळ जन ॥ रामदासें मूर्ति उचलोन ॥ तळ्यामध्यें टाकिली ॥३२॥
पूजारी म्हणती त्यालागून ॥ मूर्ति आणलीस द्वारकेहून ॥ तें दाखवीं आम्हांकारण ॥ ऐसें वचन बोलिले ॥३३॥
येरू बोले असत्य वचन ॥ म्यां नाहीं आणिला जगज्जीवन ॥ पाहा गृहांत धुंडाळून ॥ भक्तभूषण परमात्मा ॥३४॥
मग नगरांत जाऊनि सत्वर ॥ झाडा घेतां घरोघर ॥ आड विहीर सविस्तर ॥ शोधोनियां पाहाती ॥३५॥
ग्रामाबाहेर सरोवरीं ॥ पाहों लागले ते अवसरीं ॥ वक्षःस्थळीं बरची लागली ॥ उकळी आली अशुद्धाची ॥३६॥
तर्क करिती आपुलें मनांत ॥ म्हणती सांपडला रणछोडनाथ ॥ मग बुडी देऊनियां त्वरित ॥ रुक्मिणीकांत काढिला ॥३७॥
मग सन्निध आणूनि रहंवर ॥ मूर्तीसी बैसविलें सत्वर ॥ रामदास जाहला चिंतातुर ॥ देवासी उत्तर बोलतसे ॥३८॥
म्हणे भक्तवत्सला दीननाथा ॥ मज टाकूनि जातोसी आतां ॥ तुजकारणें रुक्मिणीकांता ॥ असत्य वचन बोलिलों मी ॥३९॥
ध्यानीं येऊनि जगज्जीवन ॥ निजभक्तासी बोले वचन ॥ तूं आपुलें स्वस्थ करूनि मन ॥ माझें भजन करावें ॥४०॥
मी कर ठेवूनि कटावरी ॥ राहिलों पुंडलिकाचें द्वारीं ॥ तैसाचि तुजपासी डाकुरीं ॥ निरंतरीं राहीन ॥४१॥
यावरी रामदास बोले वचन ॥ पूजारी नेतील तुजलागून ॥ यासी उपाय करावा कवण ॥ मजकारण कळेना ॥४२॥
मग कृपावंत म्हणे त्यासी ॥ तूं जाईं पूजार्‍यांपासीं ॥ माझ्याभार सुवर्ण त्यांसी ॥ द्यावया करीं सत्वर ॥४३॥
तुझे स्त्रियेचे नाकींची नथ ॥ वालभरी आहे निश्चित ॥ त्याच्या भार मी होऊनि त्वरित ॥ येथें राहतों तुजपाशीं ॥४४॥
रामदास हर्षला मनीं ॥ पूजार्‍यांसीं सांगे जाऊनी ॥ मूर्ति आणिली द्वारकेहूनि ॥ तैसीच येथें असों द्या ॥४५॥
मूर्तिभार देतों सुवर्ण ॥ तें समस्तांसी मानवलें वचन ॥ बुद्धिदाता नारायण ॥ अवश्य आणा म्हणती ते ॥४६॥
ग्रामवासी बैसले लोक ॥ तेथें जाऊनि तात्काळिक ॥ म्हणे मूर्तिभार सुवर्ण देख ॥ पूजारियांसी मी देतों ॥४७॥
म्हणजे माझी हे मूर्ति जाहली ॥ तुम्हीं साक्ष असावें सकळीं ॥ कुटिल हांसती तयेंवेळीं ॥ वचन ऐकोनि तयाचें ॥४८॥
म्हणती तूं दुर्बळ दीन हीन ॥ भक्षावयासी नाहीं अन्न ॥ कोठूनि देशील सुवर्ण ॥ नवल आम्हांसी वाटतें ॥४९॥
येरू म्हणे समर्थ हरी ॥ तो आला माझिये घरीं ॥ दुर्बळ मजला म्हणतां अंतरीं ॥ लाज तुम्हांसी वाटेना ॥५०॥
दरिद्रियाचें घरीं समुद्रतनया ॥ अवचित आली वाण द्यावया ॥ तयासी दरिद्री म्हणतां वायां ॥ मूर्खत्व अंगीं ठसावें ॥५१॥
नातरी लोहचे संदुकेंत ॥ परीस सांपडला अकस्मात ॥ त्याचें मागील मोल बोलोनि व्यर्थ ॥ वाचेसी शीण करावा ॥५२॥
गांवांतील अमंगळ ओहोळ ॥ त्यावरी लोटलें गंगाजळ ॥ मग अपवित्र म्हणतां तत्काळ ॥ दोष लागती आपणांसी ॥५३॥
कीं मुक्यासी सरस्वती प्रसन्न ॥ होऊनि शिकवी अध्ययन ॥ तयासी मूर्ख म्हणतां उणेपण ॥ आपणाकारण येतसे ॥५४॥
तेवीं लक्ष्मीपती वैकुंठनाथ ॥ तो संतुष्ट जाहला मजप्रत ॥ दुर्बळ म्हणतां मनांत ॥ शंका कांहीं न वाटे ॥५५॥
लोक म्हणती पाहूं कौतुक ॥ साक्ष आहों आम्ही सकळिक ॥ धट रोंवूनि रमानायक ॥ पारड्यामध्यें घातला ॥५६॥
पुजारी म्हणती सुवर्ण आणीं ॥ मग गृहासी गेला तये क्षणीं ॥ नथ मुष्टींत धरूनी ॥ आला घेऊन सत्वर ॥५७॥
लोक म्हणती तये क्षणीं ॥ कोठें कनक दाखवीं नयनीं ॥ लवलाहीं गृहास जाऊनी ॥ रिक्तपाणि आलासी ॥५८॥
दाखवीं मुष्टि उकलोन ॥ देखोनि हांसती सकळ जन ॥ म्हणती फार होईल सुवर्ण ॥ ऐसें आम्हांसी वाटतें ॥५९॥
मग हस्त जोडोनि त्या अवसरा ॥ प्रार्थिता झाला रुक्मिणीवरा ॥ म्हणे अनाथनाथा शारंगधरा ॥ दीनोद्धारा श्रीकृष्णा ॥६०॥
सत्यभामेनें नारदासी ॥ दान दिधला हृषीकेशी ॥ तुळसीपत्र रुक्मिणीसी ॥ घेऊनि यश दिधलें ॥६१॥
तियेहूनि मी आहें दीन ॥ माझा असों दे अभिमान ॥ ऐसें बोलुनि वालभार सुवर्ण ॥ पारड्यामध्यें घातलें ॥६२॥
अनंत ब्रह्मांडें ज्याचें उदरीं ॥ तो वाल घालितांचि गेला वरी ॥ भक्त गर्जती जयजयकारीं ॥ सुरवर पुष्पें टाकिती ॥६३॥
म्हणती धन्य रामदासा ॥ देव विकत घेतला कैसा ॥ वाल देऊनि द्वारकाधीशा ॥ आपुले आधीन त्वां केलें ॥६४॥
धन्य धन्य तुझी भक्ति ॥ धन्य धन्य तुझी कीर्ती ॥ ऐसें म्हणोनि द्वारावतीं ॥ पुजारी गेले परतोनि ॥६५॥
नूतन मूर्ति करूनी ॥ स्थापिली द्वारकापट्टणीं ॥ डाकुरीं राहिलें चक्रपाणी ॥ रामदासाकारणें ॥६६॥
अद्यापि द्वारकेसी जाती जन ॥ ते आधीं डाकुरासी येऊन ॥ घेऊनि श्रीकृष्णदर्शन ॥ मग पुढें गमन करिताती ॥६७॥
पुढिले अध्यायीं रसउत्पत्ति ॥ मथुरेची पुरातनमूर्ति ॥ ब्रह्मचार्‍याची देखोनि भक्ति ॥ हरिद्वारासी येईल ॥६८॥
नाना चरित्रें करून ॥ वाढवितो भक्तमहिमान ॥ महीपति तयाचे गुण ॥ प्रेमभावें वर्णीतसे ॥६९॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ भक्त भाविक भक्त ॥ एकत्रिंशाध्याय रसाळ हा ॥७०॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥३१॥ ओंव्या ॥७०॥    ॥    ॥    ॥    ॥

श्री भक्तविजय

Shivam
Chapters
॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची, प्रार्थना - आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७