Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ३

श्रीगणेशाय नमः ॥     
॥ श्रीकृष्णाय नमः ॥
जय जय भक्तवत्सला आनंदकंदा ॥ परमपुरुषा सच्चिदानंदा ॥ जगदुद्धारा जगद्वंद्या ॥ श्यामसुंदरा गोविंदा ॥१॥
जय भीमातटनिकटवासिया ॥ पुंदरीकवरदा यादवराया ॥ जघनीं कर ठेवूनियां ॥ वाट पाहसी भक्तांची ॥२॥
नाना पातकी चोर जार ॥ ब्रह्मद्वेषी गोहत्यार ॥ दर्शना येतांचि उद्धार ॥ करिसी त्यांचा क्षणमात्रें ॥३॥
गजेंद्र पशु अति अज्ञान ॥ संकटीं स्मरला तुजलागून ॥ त्याचें ऐकोनि करुणावचन ॥ सुदर्शन प्रेरिलें ॥४॥
शिक्षा करूनि नक्रासी ॥ भेटी दिधली गजेंद्रासी ॥ विमानीं बैसवितां तयासी ॥ नक्र तुजसी हांसला ॥५॥
नक्र बोलिला तुजलागून ॥ तुझें नाम पतितपावन ॥ आणि माझा अव्हेर करून ॥ जासी घेऊन गजेंद्रा ॥६॥
तरी पतितपावन बिरुद असे चरणीं ॥ तें सोडूनि दे चक्रपाणी ॥ ऐसी ऐकूनि नक्रवाणी ॥ तोही विमानीं घातला ॥७॥
भक्त अभक्त दोघे जण ॥ त्यांस दिधलें सायुज्यसदन ॥ ऐसे वर्णितां तुझे गुण ॥ आला शीण फणिवरा ॥८॥
तुझें गुणकथामृत ॥ इंद्रादिदेवां नव्हे प्राप्त ॥ अनन्यभावें प्रेमळ भक्त ॥ कथासारामृत त्यां देसी ॥९॥
कनवाळू माय कां जैसी ॥ लेंकुरें बैसवोनि निजपंक्तीसी ॥ ग्रास घाली तयांसी ॥ मोह मानसीं धरूनि ॥१०॥
तेवीं तूं आपुले भक्तजनां ॥ कथामृत वर्षोनि पान्हा ॥ ग्रास घालिसी जगज्जीवना ॥ मनमोहना गोविंदा ॥११॥
ऐसे निजभक्त त्वां आपुले ॥ कथामृतजेवणीं बैसविले ॥ मीही याचक ते वेळे ॥ दीन अन्नार्थी पातलों ॥१२॥
कथामृत जेवण जेवितां ॥ तृप्ति झाली निजभक्तां ॥ त्यांचें उच्छिष्ट पाठवीं मज अनाथा पाठवी ॥१३॥
दीनदयाळा रुक्मिणीपती ॥ तुझी अद्भुत ऐकून कीर्ती ॥ तिष्ठत बैसला महीपती ॥ प्रेम उचित पाठवीं ॥१४॥
कलियुगीं भक्त अति प्रेमळ ॥ त्यांची चरित्रें अति रसाळ ॥ तूं बोलविसी घननीळ ॥ तैसीं वर्णीन गोविंदा ॥१५॥
आतां ऐका श्रोतेजन ॥ क्षीरसागरीं शेषशयन ॥ निजले असतां नारायण ॥ तों भक्तजन पातले ॥१६॥
उद्धव अक्रूर वाल्मीक ॥ ध्रुव प्रर्‍हाद आणि शुक ॥ जवळी येऊनि सम्यक ॥ यदुनायक वंदिला ॥१७॥
तों वाल्मीकास म्हणे जगदुद्धार ॥ कलियुगीं दोष जाहले दुर्धर ॥ त्वां मृत्युलोकीं धरून अवतार ॥ करावा उद्धार जनांचा ॥१८॥
माझे गुण नामकीर्तन ॥ भविष्य कथिलें जें रामायण ॥ ते संस्कृत वाणी न कळे जाण ॥ अज्ञानजनां कलियुगीं ॥१९॥
तरी मृत्युलोकीं अवतार धरून ॥ भजनीं लावीं अवघे जन ॥ ऐसें ऐकून वचन ॥ केलें नमन वाल्मीकें ॥२०॥
उत्तरदेशीं हस्तनापुरीं ॥ कनोजब्राह्मणाचिये घरीं ॥ वाल्मीकऋषि ते अवसरीं ॥ अवतार धरी निजलीलें ॥२१॥
आत्माराम नामामिधान ॥ धर्मशीळ पुण्यपावन ॥ अकबर राजा होता जाण ॥ करी सेवन तयाचें ॥२२॥
आत्माराम ब्राह्मण चतुर ॥ रायाची कृपा तयावर ॥ त्याचे उदरीं अवतार ॥ घेतला सत्वर वाल्मीकें ॥२३॥
जातकर्म नामधर्म । करिता जाहला द्विजोत्तम ॥ तुलसीदास ठेवूनि नाम ॥ खेळवी सप्रेम आवडीं ॥२४॥
दिवसेंदिवस थोर जाहला ॥ मायबापें व्रतबंध केला ॥ द्वादश वर्षें त्याजला ॥ ब्रह्मचारी ठेविलें ॥२५॥
स्नान संध्या वेदाध्ययन ॥ विधियुक्त करविलें जाण ॥ त्यावरी वधू विचारून ॥ केलें लग्न तयाचें ॥२६॥
बालत्व रसोनि जातां ॥ तारुण्यदशा अंगा येतां ॥ प्रीति जडली उभयतां ॥ वियोग सर्वथा न साहे ॥२७॥
नाना वस्त्रे आणि भूषणें ॥ मुक्ताहार दिव्य रत्नें ॥ केशर कस्तूरी चंदन सुमनें ॥ पीतवर्ण नागवेली ॥२८॥
एला लवंगा जायफळ ॥ भोग भोगीत नित्यकाळ ॥ वेगळें होतां वियोगानळ ॥ तुलसीदासा न साहे ॥२९॥
तुलसीदासाची निजकांता ॥ तिचें नाम देवी ममता ॥ अनन्यभावें पतिव्रता ॥ सेवा करी तयाची ॥३०॥
तंव कोणे एके अवसरीं ॥ अकबर राजा चालिला स्वारी ॥ तुलसीदासा सत्वरी ॥ समागमें पैं गेला ॥३१॥
तों मागें ममताईकारण ॥ मूळ आलें माहेरींहून ॥ म्हणती तुझे मातेकारण ॥ व्यथा दारुण जाहली ॥३२॥
डोळेभेट तीस देऊन ॥ मागुती येईं फिरून ॥ ऐसें ऐकोन वचन ॥ शोक करी आक्रोशें ॥३३॥
मातेची व्यथा ऐकोनि कानीं ॥ घाबरी झाली तये क्षणीं ॥ मुळारी म्हणती तिजलागुनी ॥ असत्य आम्ही बोलिलों ॥३४॥
भेटीसी झाले फार दिवस ॥ तुज न पाठवी तुलसीदास ॥ म्हणूनि असत्य वचनास ॥ बोलिलों आम्ही जाण पां ॥३५॥
ममताई म्हणे तयांप्रती ॥ स्वारीसी गेले निजपती ॥ तों मी  जाऊनि मातेप्रति ॥ भेटोनि येईन सत्वर ॥३६॥
पुसोनि सासूसासर्‍य़ांसी ॥ ममताई गेली माहेरासी ॥ तों तुळसीदास तेचि दिवसीं ॥ सायंकाळीं पातले ॥३७॥
मातेसी पुसोनि त्वरित ॥ ऐकिला सकळ वृत्तांत ॥ म्हणे प्रिये मज कां येथ ॥ टाकोनि गेलीस ये काळीं ॥३८॥
निद्रा न लागे करितां शयन ॥ तेथूनि सत्वर निघाला जाण ॥ पांच कोश रात्रीसेसे चालोन ॥ श्वसुरगृहासी पातला ॥३९॥
रात्र झाली प्रहर दोन ॥ कपाटें अडकलीं असतां जाण ॥ तुलसीदास विलोकून ॥ पाहता झाला सभोंवतें ॥४०॥
तों महासर्प अति विशाळ ॥ लोंबत देखिला तत्काळ ॥ हातीं धरूनि ते वेळ ॥ उपरीवरी चढियेला ॥४१॥
मंदिरीं प्रवेशतां जाण ॥ जागे झाले सेवक जन ॥ पाहती जंव विलोकून ॥ तंव तुळसीदासा देखिलें ॥४२॥
ममतादेवी लावण्यखाणी ॥ जागी झाली तये क्षणीं ॥ भ्रतारासी देखोनि नयनीं ॥ चमत्कारूनि ऊठली ॥४३॥
भ्रतार म्हणे लावण्यखाणी ॥ कां आलीस मज टाकूनी ॥ पांच कोश वाट चालूनी ॥ तुजकारणें मी आलों ॥४४॥
कांता म्हणे ते वेळां ॥ यमुनेसी पूर तुंबळ आला ॥ मंदिरीं प्रवेश कैसा झाला ॥ हें मजला कळेना ॥४५॥
तुलसीदासें दिधलें उत्तर ॥ तुझी माझी प्रीति थोर ॥ उपरीवरूनि टाकिला दोर ॥ तो धरूनि मी आलों ॥४६॥
ऐकोनि म्हणे पतिव्रता ॥ असत्य वचन कां बोलतां ॥ म्यां कधीं उपरीवरुता ॥ दोर नाहीं टाकिला ॥४७॥
सत्य असत्य न कळे जाण ॥ म्हणे दाखवा मजलागून ॥ सवें घेऊनि सेवकजन ॥ दीप लावून पाहाती ॥४८॥
तों महासर्प अति विशाळ ॥ लोंबत देखिला ते वेळ ॥ विस्मित झाले सकळ ॥ नवल वाटलें तयासी ॥४९॥
भ्रतारातें धरूनि करी ॥ कांता पातली निजमंदिरीं ॥ म्हणे प्राणनाथा अवधारीं ॥ वचन माझें ये वेळे ॥५०॥
तूं शहाणा चतुर म्हणविसी ॥ परी विवेक नाहीं तुजपासीं ॥ अज्ञानमद अहर्निशीं ॥ तुजपासीं वसतसे ॥५१॥
माय बाप बंधु सज्जन ॥ सर्व संपत्ति आणि धन ॥ सांडोनि एवढे रात्रीं येणें ॥ मजकारणें कां केलें ॥५२॥
महासर्प नरी तुम्हांस डसता ॥ तरी प्राणासी आपुल्या मुकतां ॥ अनित्य संसार प्राणनाथा ॥ तुज सर्वथा कळेना ॥५३॥
माझा काम धरून ॥ रात्रीं आलासी धांवोन ॥ परी आम्हां स्त्रियांच्या संगतीन ॥ नाश बहुत पावले ॥५४॥
अहल्या सुंदर देखोन ॥ इंद्र पातला लुब्ध होऊन ॥ आम्हां स्त्रियांचे संगतीन ॥ नाश बहुत पातले ॥५५॥
सीतेचा मनीं काम धरितां जाण ॥ नाश पावला रावण ॥ आम्हां स्त्रियांचे संगतीन ॥ नाश बहुत पातले ॥५६॥
दीपाची झगमग देखोन ॥ पतंग मरण पावती जाण ॥ आम्हां स्त्रियांचे संगतीन ॥ नाश बहुत पातले ॥५७॥
हृदयीं नोळखतां आत्माराम ॥ भ्रांत विषयीं धरिती काम ॥ श्रीराम सकळांचा विश्राम ॥ त्यासी अधम नेणती ॥५८॥
पुत्र दारा संपत्ति धन ॥ प्राणियासी आवडती जीवाहून ॥ त्याच रीतीं श्रीहरिचरण ॥ आठवितां जाण सार्थक ॥५९॥
ममतादेवीं ऐसें बोलतां ॥ अनुताप जाहला निजचित्ता ॥ सत्य माते म्हणोनि कांता ॥ तुलसीदासें नमियेली ॥६०॥
बाळकें धरितां खदिरांगार ॥ माता राखी तयासी सत्वर ॥ तैसा आजि उपकार थोर ॥ मजकारणें त्वां केला ॥६१॥
ऐसें बोलोनि तिजकारण ॥ तेथून सत्वर निघाला जाण ॥ पूर्वजन्मींचें जें कारण ॥ मागील सर्व आठवलें ॥६२॥
म्हणे मी वाल्मीकि वैष्णव कीं ॥ अवतार घेतला मृत्युलोकीं ॥ श्रीरामचरित्रें गाऊनि मुखीं ॥ जन भक्तीस लावावे ॥६३॥
विषयसुख नाशवंत ॥ भोगीत गुंतलों होतों येथ ॥ ऐसा अनुताप धरूनि चित्तांत ॥ आनंदवनासी पातला ॥६४॥
करूनि भागीरथीचें स्थान ॥ तीव्र मांडिलें अनुष्ठान ॥ वर्जिलें अन्न फळभक्षण ॥ गलितपत्रें खातसे ॥६५॥
प्रातःकाळीं करूनि स्नान ॥ करी श्रीरामाचें स्मरण ॥ म्हणे अयोध्यावासी जानकीजीवन ॥ द्यावें दर्शन मजलागीं ॥६६॥
शौच करावया कारण ॥ अरण्यांत जातसे जाण ॥ उरलें उदक तें टाकून वृक्षातळीं देतसे ॥६७॥
द्वादश वर्षेंपर्यंत जाण ॥ ऐसें करितां अनुष्ठान ॥ अहोरात्र नामस्मरण ॥ नाही खंडण क्षणमात्र ॥६८॥
तंव कोणे एके दिवशीं ॥ तुलसीदास गेले शौचासी ॥ उरलें उदक त्या स्थलासी टाकूनियां दिधलें ॥६९॥
तों महाभयानक त्वरित ॥ पिशाच देखिलें अकस्मात ॥ दोनी कर जोडोनि तेथ ॥ उभा ठाकला सन्मुख ॥७०॥
तुलसीदासासी बोले वचन ॥ प्रसन्न जाहलों तुजकारण ॥ कांहीं मागसील वरदान ॥ तुजकारणें देईन मी ॥७१॥
तुलसीदास म्हणे त्यास ॥ तूं कोण हें सांग मजसी ॥ काय प्रसन्न जाहलों म्हणसी ॥ हें मजसी कळेना ॥७२॥
येरू म्हणे मी पिशाच जाण ॥ येथे असतों बहुत दिन ॥ तुम्ही उदक देतां टाकून ॥ तें मी प्राशन करीतसें ॥७३॥
वाणी कूप सरिता समुद्र ॥ यांचें प्राशन करावया नीर ॥ आम्हांसी नाहीं अधिकार ॥ तृषा फार लागतां ॥७४॥
द्वादश वरुषेंपर्यंत जाण ॥ तुम्ही मज करविलें उदकपान ॥ कांहीं आज्ञा मजकारण ॥ कराल तें देईन मी ॥७५॥
तुलसीदासाचें विस्मित मन ॥ म्हणे इच्छीत होतों श्रीरामदर्शन ॥ त्याचें फळ मजकारण ॥ भूत प्रसन्न जाहलें कीं ॥७६॥
चूतवृक्ष सायासें लाविला ॥ तों वृंदावनफळें आलीं त्याला ॥ तेवीं अनुष्ठान करितां मजला ॥ भूत प्रसन्न जाहलें कीं ॥७७॥
इच्छीत होतों नंदिनी दर्शन ॥ तों सूकर ठाकलें पुढें येऊन ॥ तेवीं न होतां श्रीरामदर्शन ॥ भूत प्रसन्न जाहलें कीं ॥७८॥
शर्करेचें केलें आळें ॥ त्यांत उगवलीं तुंबिनीफळें ॥ तेवीं अनुष्ठान करितां भलें ॥ भूत प्रसन्न जाहलें कीं ॥७९॥
राजहंस येतां चांग ॥ तों अकस्मात देखिला काग ॥ तैसा न भेटता श्रीरंग ॥ भूत प्रसन्न जाहलें कीं ॥८०॥
सत्संग पाहतां जाण ॥ तों निंदक ठाकले पुढें येऊन ॥ तेवीं न भेटतां जानकीजीवन ॥ भूत प्रसन्न जाहलें कीं ॥८१॥
अध्यात्मविद्या इच्छितां मनीं ॥ तों कोकशास्त्र ऐकिलें कर्णीं ॥ तेवीं न भेटतां चापपाणी ॥ भूत प्रसन्न जाहलें कीं ॥८२॥
कल्पतरूची छाया इच्छितां जाण ॥ तों अकस्मात देखिलें सिंदीवन ॥ तेवीं न भेटतां रघुनंदन ॥ भूत प्रसन्न जाहलें कीं ॥८३॥
सिद्धांतज्ञान इच्छितां मनीं ॥ तों पाखंडगाथा ऐकिली श्रवणीं ॥ तेवीं न भेटतां चापपाणी ॥ भूत प्रसन्न जाहलें कीं ॥८४॥
मुक्ताफळांच्या इच्छितां हारा ॥ तों पुढें येऊनि पडल्या गारा ॥ तेवीं न देखतां जानकीवरा ॥ भूत प्रसन्न जाहलें कीं ॥८५॥
इच्छितां क्षीराब्धिदर्शन ॥ तों अकस्मात देखिलें थिल्लरीजीवन ॥ तेवीं न भेटतां रावणमर्दन ॥ भूत प्रसन्न जाहलें कीं ॥८६॥
ऐकोनि पिशाच बोले वचन ॥ तूं चतुर दिसतोसी विचक्षण ॥ परी मज योग्य असेल तें मागणें जाण ॥ संकोच मनीं न धरावा ॥८७॥
जया आपुलें कार्य साधणें ॥ तेणें म्हणावें थोर लाहानें ॥ स्वागी रितां जाणें ॥ मुशींत सोनें आटेना ॥८८॥
सूक्ष्म दोरा अव्हेरितां ॥ पुष्पहार न ये ओंवितां ॥ लोहसुई हातीं न घेतां ॥ अंगी अव्हे शिवितां न ये कीं ॥८९॥
सिंदीफडे अपवित्र म्हणोनी ॥ अव्हेरूं नये केरसुणी ॥ नीच पदार्थ विचक्षणीं ॥ कार्यसाधनीं घेतले ॥९०॥
तुलसीदास म्हणे त्यासी ॥ प्रसन्न झालों मज म्हणसी ॥ तरी अधिक इच्छा नसे मानसीं ॥ श्रीरामासी भेटवीं ॥९१॥
रामनाम कानीं ऐकतां ॥ पिशाच सरतसे मागुता ॥ म्हणे हीं अक्षरें मुखीं वदतां ॥ नाश सर्वथा पावेन मी ॥९२॥
तुम्ही भेट इच्छितां चित्तीं ॥ त्याचा सेवक तो मारुती ॥ त्याचें दर्शन निश्चिती ॥ तुम्हांप्रती करवीन मी ॥९३॥
तुलसीदास वचन बोलत ॥ कोठें आहे वायुसुत ॥ तो मज दाखवीं त्वरित ॥ माझा हेत पुरवील तो ॥९४॥
पिशाच बोले व अचन ॥ तूं नित्य करिसी पुराण श्रवण ॥ तेथें येतसे वृद्ध ब्राह्मण ॥ तोचि जाण मारुती ॥९५॥
तो जरी म्हणशील कोण ॥ तेही तुज सांगतों खूण ॥ सर्वांआधीं बैसे येऊण ॥ सर्वांमागून जातसे ॥९६॥
हातीं काठी डोयीस टोपी ॥ जीर्ण वस्त्र आणि लंगोटी ॥ ऐसें रूप देखसी दृष्टीं ॥ वानरजेठी तोचि पैं ॥९७॥
ऐसें वचन बोलून ॥ पिशाच अदृश्य झाला जाण ॥ तुलसीदास परतोन ॥ आश्रमासी पातला ॥९८॥
दुसरे दिवशीं करूनि स्नान ॥ नित्य नेम नामस्मरण ॥ जेथें होत पुराणश्रवण ॥ तेथें गेला सत्वर ॥९९॥
तों अकस्मात वृद्ध ब्राह्मण ॥ तेथें बैसलासे येऊन ॥ पिशाचें सांगितली खूण ॥ तैसीं चिन्हें देखिलीं ॥१००॥
पुराण समाप्त होतां जाण ॥ श्रोते गेले सर्व उठोन ॥ तयांमागून वृद्ध ब्राह्मण ॥ धरूनि मौन निघाला ॥१॥
तयासवेंच लागवेगें ॥ तुलसीदास जातसे मागें ॥ नगराबाहेर हनुमान वेगें ॥ त्वरें करून जातसे ॥२॥
एकांत देखोनि ते अवसरीं ॥ ब्राह्मणाचे चरण धरी ॥ म्हणे स्वामी मजवरी ॥ कृपा करीं समर्था ॥३॥
ब्राह्मण म्हणे रे तूं कोण ॥ स्पर्श केला मजकारण ॥ मी तों अनाथ गरीब दीन ॥ धरिले चरण कां माझे ॥४॥
तुलसीदास तयासी बोलत ॥ तुम्ही रामभक्त कीं हनुमंत ॥ ऐसें बोलोनि त्वरित ॥ मागुती लागे चरणांसी ॥५॥
हनुमंत विचारी मनीं ॥ म्हणे हा अवतरला वाल्मीकिमुनी ॥ आलिंगन देऊन तेच क्षणीं ॥ प्रेमेंकरून भेटले ॥६॥
तुलसीदासासी हनुमंत म्हणे ॥ प्रसन्न जाहलों तुजकारणें ॥ येरू म्हणे कृपादानें ॥ इच्छित मन आहे कीं ॥७॥
श्रीरामाचें दर्शन ॥ मजलागीं होय ऐसें करण ॥ अवश्य म्हणोनि हनुमान ॥ अदृश्य झाला तेधवां ॥८॥
हनुमंत म्हणे श्रीरामाकारण ॥ एक ऐका माझें वचन ॥ तुलसीदास भक्त जाण ॥ अवतार पूर्ण वाल्मीकीचा ॥९॥
सगुण दर्शन साक्षात ॥ तयालागीं द्यावें निश्चित ॥ ऐसा माझा आहे हेत ॥ पुरावीं मनोरथ स्वामिया ॥११०॥
ऐकोनि मारुतीचें वचन ॥ अवश्य म्हणे रघुनंदन ॥ सकळ वानर बोलावून ॥ घेतलें सैन्य सांगतें ॥११॥
तुलसीदासाचे आश्रमावरूनी ॥ त्वरें चालिले कोदडपाणी ॥ परी तो नोळखेचि तये क्षणीं ॥  म्हणे अविंध कोणी जातसे ॥१२॥
वानर दिसती महावीर ॥ अविंध राजा श्रीरघुवीर ॥ ऐसें देखोनि नमस्कार ॥ तुलसीदासें न केला ॥१३॥
तयामागून वायुसुत ॥ तुलसीदासाच्या आश्रमा येत ॥ म्हणे तुझा जैसा होता हेत ॥ तो रघुनाथें पुरविला ॥१४॥
येरू म्हणे वायुसुता ॥ मी भेटलों नाहीं रघुनाथा ॥ मारुति म्हणे रे आतां ॥ आश्रमावरून गेला कीं ॥१५॥
तुलसीदास म्हणे तो अविंध सत्य ॥ आश्रमावरूनि गेला त्वरित ॥ नाही देखिला रघुनाथ ॥ अपूर्ण हेत राहिला कीं ॥१६॥
हनुमंत म्म्हणे ते अवसरीं ॥ कामधेनु आली होती घरीं ॥ ते अजा म्हणोनि बाहेरी ॥ चतुरा तुवां घातली ॥१७॥
स्वइच्छें मार्गीं चालतां ॥ तों परीस देखिला अवचितां ॥ तो खडा म्हणूनि तत्वतां ॥ कैसा टाकिला सुजाणा ॥१८॥
रावा सुजाण चतुर भला ॥ अवचित तुझिया आश्रमा आला ॥ तो कपोत तुज भासला ॥ म्हणोनि पाळिला नाहीं कीं ॥१९॥
कल्पतरूचें भेटलें जें वन ॥ तें तुज भासलें सिंदीसमान ॥ तेवीं जातां श्रीरघुनंदन ॥ तुवां ओळखिलें नाहीं कीं ॥१२०॥
कीं महापर्वकाळीं दीन ॥ अवचित घरा आला ब्राह्मण ॥ तो अजापाळ म्हणोन ॥ अव्हेरिला तुवां कीं ॥२१॥
मुक्ताफळांचे हार देखोनी ॥ते तुज भासले कां चमणी ॥ तेवीं जातां कोदंडपाणी ॥ तुवां ओळखिलें नाहीं कीं ॥२२॥
राजहंसाची गेली झांक ॥ ते तुज भासले जैसे काक ॥ तेवीं जातां श्रीरघुनायक ॥ तुवां नमिलें नाहीं कीं ॥२३॥
निर्धनाघरीं भानवसीं ॥ लक्ष्मी आली आपैसी ॥ ते तयासी वाटली दासी ॥ तैसें तुवां केलें कीं ॥२४॥
कीं निर्दैवे घर उकलितां ॥ तों सुवर्णहोन लागले हाता ॥ ते वाळू म्हणोनि तत्त्वतां ॥ अव्हेरूनि टाकिले कीं ॥२५॥
मैलागिरी शुद्ध चंदन ॥ तो तुज भासला जैसा हिंगण ॥ तेंवीं जातां रघुनंदन ॥ तुवां ओळखिला नाहीं कीं ॥२६॥
पिनाकपाणी पार्वतीरमण ॥ याचकरूप आला धरून ॥ नाहीं दिधलें भिक्षादान ॥ तैसें तुवां केलें कीं ॥२७॥
तुलसीदास म्हणे स्वामी ॥ अन्याय लावितां मजलागुनी ॥ परी विश्वंभर चक्रपाणी ॥ विश्व व्यापूनि दिसेना ॥२८॥
सुवर्णाचे अलंकार ॥ परी सुवर्ण न म्हणती अज्ञानी नर ॥ नीरापासोनि होतें क्षीर ॥ परी नीरा क्षीर न म्हणावें ॥२९॥
नीर अवघेंचि आहे एक ॥ परी चातक न घेती भूमीचें उदक ॥ तेवीं श्रीरामउपासक ॥ स्वरूपें अनेक न मानिती ॥१३०॥
अयोध्यावासी जानकीजीवन ॥ हातीं धरूनि धनुष्यबाण ॥ जैसें वाल्मीकें वर्णिलें ध्यान ॥ मजलागोन तें दावा ॥३१॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ मारुति जाहला हास्यवदन ॥ म्हणे तुझे मनोरथ पूर्ण ॥ श्रीरघुनंदन करील कीं ॥३२॥
ऐसें बोलोनि तयाप्रती ॥ अदृश्य जाहला मारुती ॥ ध्यानांत आणोनि श्रीराममूर्ती ॥ स्तवन प्रीतीं आरंभिलें ॥३३॥
जय जय अयोध्यावासी सीतारमणा ॥ रावणांतका धनुष्यधारणा ॥ पतितपावना दीनोद्धारणा ॥ दानवमर्दना श्रीरामा ॥३४॥
श्रीराम म्हणे गा मारुती ॥ आजि कां बहुत मांडिली स्तुती ॥ काय मनोरथ धरूनि चित्तीं ॥ स्तवन प्रीतीं आरंभिलें ॥३५॥
हनुमंत म्हणे श्रीरामा ॥ भक्तकामकल्पद्रुमा ॥ सगुणरूपा मेघश्यामा ॥ तुलसीदासासी भेटावें ॥३६॥
ऐकूनि मारुतीचें वचन ॥ काय बोलिले रघुनंदन ॥ कलियुगीं साक्षात दर्शन ॥ त्याजकारणें होय कैसें ॥३७॥
हनुमंत म्हणे हृषीकेशी ॥ तो अवतरला वाल्मीकिऋषी ॥ तुम्हींचि आज्ञा दिधली त्यासी ॥ जन भक्तीसी लावावे ॥३८॥
ऐकोनि मारुतीचें वचन ॥ काय बोलिला रघुनंदन ॥ तूं सांगसी तें ऐकेन ॥ न मोडीं वचन कल्पांतीं ॥३९॥
श्रीराम सीता लक्ष्मण ॥ सगुण अवतारस्वरूप धरून ॥ हनुमंताचे समागमें जाण ॥ श्रीरघुनंदन चालिले ॥१४०॥
पुढें होऊनि मारुति भक्त ॥ तुलसीदासासी सांगे मात ॥ म्हणे आजि तुझे मनोरथ ॥ श्रीरघुनाथ पुरवील कीं ॥४१॥
मारुतीचे वचनास ॥ ऐकोनि हर्षला तुलसीदास ॥ तों पुढें देखिला अयोध्याधीश ॥ त्या सुखास पार नाहीं ॥४२॥
मुकुट विराजे देदीप्यमान ॥ पीतांबरधारी घनश्यामवर्ण ॥ हातीं घेतले धनुष्यबाण ॥ श्रीरघुनंदन देखिला ॥४३॥
अनन्यभावें दंडवत ॥ तुलसीदास घाली त्वरित ॥ कृपावंतें तुलसीभक्त ॥ श्रीरघुनाथें आलिंगिला ॥४४॥
हनुमंत म्हणे तूं दैवागळा ॥ श्रीरामस्वरूप देखिलें डोळां ॥ मागें त्वां जे वर्णिली लीला ॥ ते जना सकळां सांगावी ॥४५॥
योग याग वेदाध्ययन ॥ कलियुगीं नव्हे हें साधन ॥ तरी नाममहिमा प्रकट करून ॥ लावीं जन भक्तीसी ॥४६॥
श्रीरामासी सांगे सत्वर ॥ याचे मस्तकीं ठेवा कर ॥ वचन ऐकोनि श्रीरघुवीर ॥ अभयवर दीधला ॥४७॥
ऐसें देऊनि वरदान ॥ अदृश्य जाहले सीतारमण ॥ तुलसीदास प्रेमेंकरून ॥ श्रीरामगुण वर्णितसे ॥४८॥
वाराणसीचे सकळ जन ॥ श्रवण करिती हरि कीर्तन ॥ तुलसीदासासी जाण ॥ मठ बांधोन दिधला ॥४९॥
कोणी श्रीमंत भाविकजन ॥ अनुग्रह दिधला त्यांकारण ॥ ते नानापदार्थ आणून ॥ याचे आश्रमीं देतातीए ॥१५०॥
तुलसीदासाचिया पक्तीं ॥ सहस्र ब्राह्मण नित्य जेविती ॥ दीन याचक अन्नार्थी ॥ येतां पावती संतोष ॥५१॥
जनांत प्रशंसा जाहली फार ॥ द्रव्य आणूनि देती अपार ॥ कनकपात्रें थोर थोर ॥ रुपें अपार अणगित ॥५२॥
कोणी देत अथवा नेत ॥ कोणी निंदित कोणी स्तवित ॥ परी तुलसीदास अलिप्त ॥ हर्षशोकांत पडेना ॥५३॥
जैसे आकाशाचे ठायीं ॥ तीनही काळ येती पाहीं ॥ परी तें संगदोषें कांहीं ॥ लिप्त नाहीं सर्वथा ॥५४॥
ब्राह्मणभोजन जाहलियावर ॥ होय कीर्तनाचा गजर ॥ भाविक लोक येती फार ॥ नामउच्चार करावया ॥५५॥
कपाटें मोकळीं ठेवून ॥ निद्रा करिती सकळ जन ॥ स्वप्न सुषुप्ति जागरण ॥ श्रीरामचरण आठविती ॥५६॥
तों दोघे तस्कर मिळोनी ॥ विचार केला दृढ त्यांनीं ॥म्हणती तुलसीदासाचे आश्रमीं ॥ वर्जिता कोणी दिसेना ॥५७॥
तेथें जाऊनि निर्भयचित्तें ॥ सुवर्णपात्राचें भरून भरतें ॥ ओझें जाईळ जें आपणातें ॥ आपले हातें तें घेऊं ॥५८॥
हरिकीर्तन होतां जाण ॥ निद्रित जाहले अवघे जन ॥ तंव दोघे तस्कर येऊन ॥ चोरीस जाण प्रवर्तले ॥५९॥
सुवर्णपात्रें घेऊनि करें ॥ मोटा बांधिल्या अति सत्वरें ॥ मस्तकीं घेऊनियां भारे ॥ जाती चोर लगबगें ॥१६०॥
द्वारापाशीं लवकर येत ॥ तों दोघे धनुर्धर बैसले तेथ ॥ धनुष्यबाण धरून हातांत ॥ प्रतापवंत बैसले ॥६१॥
तस्करांचें विस्मित मन ॥ म्हणती येथें नव्हतें कीं रक्षण ॥ तेथोनि सत्वर परतोन ॥ उत्तरद्वारा पातले ॥६२॥
तों किरीटकुंडलें देदीप्यमान ॥ हातीं घेऊनि धनुष्यबाण ॥ तस्करीं देखिले दुरून ॥ लज्जायमान ते जाहले ॥६३॥
दक्षिणद्वाराजवळ गेले ॥ तंव तेथेंही तैसेच बैसले ॥ तस्करांसी नवल वाटलें ॥ परतोनि बैसले तैसेचि ॥६४॥
विचार करिती दोघे जण ॥ धनुर्धर जातील उठोन ॥ मग सुवर्णपात्रें घेऊन ॥ सत्वर जाऊं घरासी ॥६५॥
ऐसें म्हणूनियां तस्कर ॥ उगेच बैसले घटिका चार॥ द्वारापासीं सत्वर ॥ मागुती पाहती जाऊनि ॥६६॥
तों तैसेच बैसले दोघे जण ॥ हातीं असती धनुष्यबाण ॥ आकर्ण ओढी ओढून ॥ ठाण मांडोनि उभे कीं ॥६७॥
तस्कर जाहले भयभीत ॥ सुवर्णपात्रें टाकिलीं समस्त ॥ द्वारापासीं मागुती जात ॥ परी ते जाऊं न देती ॥६८॥
रात्र सरली चिंता करितां ॥ अरुणोदय जाहला अवचिता ॥ कांकडआरतीस तत्त्वता ॥ सकळ भक्त उठिले ॥६९॥
प्रातःस्मरण जाहलियावरी ॥ तुलसीदास आले बाहेरी ॥ तों दोघे तस्कर सत्वरी ॥ येऊनि चरणीं लागले ॥१७०॥
क्षमा करा आमुचा अपराध ॥ तस्कर जाहले सद्गद ॥ तुलसीदास म्हणे प्रसिद्ध ॥ कोण तुम्ही हें मज सांगा ॥७१॥
ते म्हणती आम्ही तस्कर ॥ चोरीस पातलों कीं साचार ॥ तों द्वारापासीं धनुर्धर ॥ बैसले जाऊं न देती ॥७२॥
सुवर्णपत्रांच्या बांधोनि मोटा ॥ तिष्टत बैसलों तुमचे मठा ॥ ऐसा अपराध जाहला मोठा ॥ क्षमा करीं तूं दयाळा ॥७३॥
तूं रामभक्त परम उदार ॥ रात्रीं ठेविसी मुक्तद्वार ॥ म्हणोनि निर्भय आम्ही चोर ॥ पातलों सत्य जाण पां ॥७४॥
शिष्यसंप्रदायीं बहुत जन ॥ तुलसीदास पुसे त्यांकारण ॥ द्वारापासीं रक्षक कोण ॥ मज न कळत ठेविले कां ॥७५॥
म्यां सांगितलें तुम्हांप्रती ॥ कोण देती अथवा नेती ॥ तें समान मानूनि चित्तीं ॥ श्रीराम प्रीतीं भजा कीं ॥७६॥
शिष्य बोलती वाहूनि आण ॥ साक्ष आहेत तुमचे चरण ॥ द्वारापासीं रक्षक कोण ॥ हें न जाणो स्वामिया ॥७७॥
तस्कर बोलती वचन ॥ किरीटकुंडलें विराजमान ॥ पीतांबरधारी श्यामवर्ण ॥ अजूनि बैसले आहेत कीं ॥७८॥
आश्चर्य वाटलें सकळांसी ॥ येऊनि पाहती द्वारापासीं ॥ तंव कांहीं न दिसे तयांसी ॥ नवल सकळांसी वाटलें ॥७९॥
तुलसीदासाचे नेत्रकमळीं ॥ अश्रु आले ते वेळीं ॥ म्हणे श्रीराम लक्ष्मण ये काळीं ॥ द्वाररक्षक जाहले कीं ॥१८०॥
नाना योगवज्रासनीं बैसतां ॥ प्राप्त नव्हेचि तीर्थें करितां ॥ त्या अयोध्यावासी रघुनाथा ॥ द्वारपाळ म्यां केलें कीं ॥८१॥
एकपत्नी एकबाण ॥ ज्याचा निश्चय एकवचन ॥ तो रावणांतक रघुनंदन ॥ द्वारपाळ येथें झाला कीं ॥८२॥
चरण लागतां साचार ॥ केला अहल्येचा उद्धार ॥ जो कैवल्यदानी अति उदार ॥ द्वाररक्षक जाहला कीं ॥८३॥
मग म्हणे जय जय रघुवीरा ॥ परमपुरुषा अतिउदारा ॥ नीलग्रीव शंभूच्या प्रियकरा ॥ विश्वोद्धारा रामकृष्णा ॥८४॥
तूं लक्ष्मीकांत अति उदार ॥ उपमन्यु मागतां किंचित क्षीर ॥ त्वां ऐकोनि तयाचें उत्तर ॥ क्षीरसागर त्या देसी ॥८५॥
मांडीवरी बैसों नेदी पिता ॥ ध्रुवबाळक रुसोनि जातां ॥ अढळपदीं रमाकांता ॥ स्थापिला तुवां कौतुकें ॥८६॥
बिभीषण तुझा प्रियकर ॥ तयासी दिधलें सुवर्णनगर ॥ आणि सुवर्णपात्रें नेतां तस्कर ॥ कृपण थोर जाहलासी कीं ॥८७॥
मग म्हणे तस्करांप्रती ॥ जी इच्छा असेल तुमचे चित्तीं ॥ तें घेऊनि जा सदनाप्रती ॥ संकोच चित्तीं न धरावा ॥८८॥
ऐसें ऐकूनि उत्तर ॥ चरणां लागले तस्कर ॥ कृपा करावी आम्हांवर ॥ अभय कर ठेवूनि ॥८९॥
आम्हीं तों पतित दुर्जन ॥ वेष्टिलों होतों अविद्येन ॥ परी तुमचे संगतीचें महिमान ॥ श्रीरामदर्शन जाहलें कीं ॥१९०॥
परिसाच स्वाभाविक गुण ॥ लोह लागतां करी सुवर्ण ॥ तेवीं तुझें आम्हीं करितां छळण ॥ श्रीरामदर्शन जाहलें कीं ॥९१॥
तुझें दर्शन होतांचि जाण ॥ दुर्बुद्धि गेली देहांतून ॥ जैसा उदयासी येतां दिन ॥ तिमिरं जाण दिसेना ॥९२॥
तुलसीदास म्हणे त्यांस ॥ तुमचें भाग्यअति विशेष ॥ न करितां कांहीं आयास ॥ दर्शन दिधलें श्रीरामें ॥९३॥
रानांत भाजी घेतांघेतां ॥ तों अमृतवल्ली लागली हाता ॥ कीं गांवदरीं गारा वेंचितां ॥ परीस अवचितां सांपडला ॥९४॥
कांजी मागतां घरोघरीं ॥ तों सुधारस आला पदरीं ॥ सायास करितां दीपावरी ॥ तों रवीचि घरीं पातला ॥९५॥
कोकशास्त्र पाहतां पाहतां ॥ तों वेदांतचि लागला हाता ॥ कांचमणि ओंवीत असतां ॥ मुक्ताहार हाता आला ॥९६॥
बाभूळ पाहतां वनांतरीं ॥ तों पुढें देखिला मैलागिरी ॥ पाहूं जातां यमनगरी ॥ तों वैकुंठपुरी देखिली ॥९७॥
ऐसें ऐकोनि तस्कर ॥ मागुती करिती नमस्कार ॥ दुर्बुद्धि टाकूनि निरंतर ॥ यांच्या आश्रमीं राहिले ॥९८॥
श्रीभागवतीं कृष्णनाथ ॥ उद्धवासी सांगे निजगुह्यार्थं ॥ मत्प्राप्तीचा जया हेत ॥ तेणें सत्समागम धरावा ॥९९॥
सत्समागमेंकरून ॥ श्रवणीं पडे हरिकीर्तन ॥ चोर जार जे होते दुर्जन ॥ साधु जन ते जाहले ॥२००॥
श्रवण कीर्तन नामस्मरण ॥ नित्य घडे त्यांकारण ॥ ऐसें होतां बहुत दिन ॥ तों नवल अपूर्व वर्तलें ॥१॥
तुलसीदासाचे आश्रमासी ॥ ब्राह्मण बैसले भोजनासी ॥ नानापरींचीं अन्नें तयांसी ॥ घृतशर्करायुक्त वाढिली ॥२॥
हातीं संकल्प घेतां जाण ॥ विप्र बोलती ब्रह्मार्पण ॥ तों द्वारापासीं एक ब्राह्मण ॥ काय बोले तें ऐका ॥३॥
प्रथम बोलोनि सीताराम ॥ म्हणे मी ब्रह्महत्यारी परम ॥ कांहीं द्या मज भिक्षान्न ॥ ऐसें वचन बोलिला ॥४॥
वचन ऐकोनि रकळ जन ॥ तटस्थ बैसले ब्राह्मण ॥ तुलसीदास बाहेर येऊन ॥ दिधलें आलिंगन तयासी ॥५॥
विप्रासी धरूनियां हातीं ॥ आणॊनि बैसविला निजपंक्तीं ॥ म्हणे स्वामी कृपामूर्ती ॥ वचन माझें एक ऐका ॥६॥
सीताराम ऐसें वचन ॥ तुम्हीं केलें उच्चारण ॥ ब्रह्महत्यादिदोषतृण ॥ तेव्हांच दग्ध जाहलें कीं ॥७॥
ऐसें बोलूनि तयासी ॥ म्हणे ग्रास घ्यावा ब्राह्मणासी ॥ ऐकतां ऐसिया वचनासी ॥ विप्र तयासी बोलती ॥८॥
षट्शास्त्रीं निपुण पंडित ॥ तुलसीदासासी काय बोलत ॥ ब्रह्महत्यारी या पंक्तीत ॥ कवण्या आधारें बैसविला ॥९॥
तुलसिदास म्हणे त्यांसी ॥ एक आधार आहे यासी ॥ राम म्हणतां निजवाचेसी ॥ ब्रह्महत्या कैसी राहील ॥२१०॥
श्रीभागवतीं कृष्णनाथ ॥ उद्धवासी सांगे निजगुह्यार्थ ॥ नाममहिमा अति अद्भुत ॥ कलियुगांत असे पैं ॥११॥
स्नानसंध्या करितां जाण ॥ आधीं केलें केशव नारायण ॥ व्यंग होतां ब्रह्मकर्म जाण ॥ विष्णुस्मरणें पूर्ण होय ॥१२॥
पितृश्राद्ध सांग आचरतां ॥ शेवटीं जनार्दनस्वरूपीं अर्पितां ॥ हरिनामावांचूनि अन्यथा ॥ कर्म सर्वथा न चाले ॥१३॥
लग्ननिश्चय करितां जाण ॥ घटितार्थ पाहतां छत्तीस गुण ॥ शेवटीं लक्ष्मीकांतस्मरण ॥ केल्यावांचोनि सरेना ॥१४॥
अंतकाळीं प्रायश्चित्त घेतीं ॥ शेवटीं नाम उच्चारिती ॥ पार्वती रमण कैलासपती ॥ राम प्रीतीं जपतो कीं ॥१५॥
महापातकी गणिका जाण ॥ राघव म्हणे शुकाकारण ॥ महादोष हेंचि तृण ॥ नामवह्नीनें जळालें ॥१६॥
भ्रष्टला ब्राह्मण अजामिळ ॥ त्याचा मांडला अंतकाळ ॥ नारायण स्मरतां बाळ ॥ दोष तकाळ जळाले ॥१७॥
ब्राह्मण म्हणती विचक्षणा ॥ सत्य न वाटे आमुचे मना ॥ कांहीं साक्ष दाखवी जनां ॥ संशयखंडना तैं होय ॥१८॥
तुलसीदास म्हणे विप्रांसी ॥ कोणती साक्ष मागतां मजपासीं ॥ धरामर म्हणती तयासी ॥ नैवेद्य नंदीसी दाखवावा ॥१९॥
कैलासपति विश्वेश्वर ॥ त्यापुढें आहे नंदिकेश्वर ॥ अन्नपात्र भरूनि सत्वर ॥ समर्पण तुम्ही करा कीं ॥२२०॥
प्रत्यक्ष नंदी पाषाणमूर्ती ॥ नैवेद्य भक्षील तुम्हांहातीं ॥ तरीचि ब्रह्महत्यारी पंक्तीं ॥ आम्हीं बैसवूं ये वेळे ॥२१॥
नाना दृष्टांत देऊनि आम्हांसी ॥ नाममहिमा बहु सांगसी ॥ प्रत्यक्ष साक्ष हे दाखविसी ॥ सत्य मानसी तैं वाटे ॥२२॥
मुखें सांगतां साखरगोडी ॥ रसनेची न पुरे आवडी ॥ तेवीं तूं सांगसी नामप्रौढी ॥ परी विकल्पओढी सोडीना ॥२३॥
सुलाखणीनें टोंचूनि नाण ॥ खरें पारखिती सज्ञान ॥ तेवीं साक्ष कांहीं दाखवून ॥ संशयखंडन करावें ॥२४॥
कां मोहर्‍यांसी गुंडाळोनि सूत ॥ टाकूनि पाहती अग्नींत ॥ तेवीं हरिनामाची प्रचीत ॥ दावीं निश्चित आम्हांसी ॥२५॥
कीं हिरा ठेवूनि ऐरणीवरी ॥ पारखी घण हाणिती वरी ॥ तेवीं नाममहिमा ये अवसरीं ॥ दाखवीं सत्वरी सुजाणा ॥२६॥
ऐसी ऐकोनि विप्रवाणी ॥ तुलसीदास हर्षले मनीं ॥ अन्नपात्र सत्वर घेऊनी ॥ विश्वेश्वरसदनीं चालिले ॥२७॥
सकळ विप्र उठोन ॥ तेही चालिले तयामागून ॥ सभामंडपीं उभे राहून ॥ कौतुक अवघे पाहाती ॥२८॥
अन्नपात्र घेऊनि करीं ॥ तुलसीदास आले महाद्वारीं ॥ हात जोडोनि ते अवसरीं ॥ नमन करिती साष्टांगें ॥२९॥
म्हणे जय जय चंद्रमौळी सत्वरीं ॥ नीलकंठा खट्वांगधारी ॥ मृडानीवरा त्रिपुरारी ॥ वचन अवधारीं दीनांचें ॥२३०॥
महाविष अति दारुण ॥ तुम्हीं केलें जैं प्राशन ॥ सर्वांगाचें जाहलें दहन ॥ नामस्मरण तैं केलें ॥३१॥
राम हीं अक्षरें दोन्ही जपतां ॥ शीतळ जाहलासी विश्वनाथा ॥ हें सत्य असेल तरी आतां ॥ नैवेद्य भक्षिता होय नंदी ॥३२॥
ऐसी ऐकोनियां वाणी ॥ नवल वर्तलें तये क्षणीं ॥ पाषाणनंदी सत्वर उठोनी ॥ श्वास टाकूनि फुंपत ॥३३॥
नैवेद्य भक्षूनि सकळ ॥ मग खादली पत्रावळ ॥ कौतुक पाहती सकळ ॥ धन्य काळ सुदिन तो ॥३४॥
ऐसें कौतुक दाखवूनि त्वरित ॥ नंदी बैसला निवांत ॥ भक्तमहिमा अति अद्भुत ॥ न कळे अंत श्रुतिशास्त्रां ॥३५॥
नामस्मरणीं वैष्णववीर ॥ सकळ करिती जयजयकार ॥ तुलसीदासासी नमस्कार ॥ सकळ द्विजवर घालिती ॥३६॥
म्हणती धन्य तूं वैष्णववीर ॥ सिद्धांतज्ञानी अति चतुर ॥ पूर्व वाल्मीकीचा अवतार ॥ कळलें साचार आम्हांसी ॥३७॥
तारांगणात चंद्र वरिष्ठ ॥ कीं पक्षियांमाजी गरुड श्रेष्ठ ॥ की देवांमाजी वैकुंठपीठ ॥ वैष्णव वरिष्ठ तैसा तूं ॥३८॥
तापसांमाजी पिनाकपाणी ॥ कीं महर्षींमाजी व्यासमुनी ॥ कीं सकळ गोपींत माता रुक्मिणी ॥ तेवीं वैष्णवजनीं तूं श्रेष्ठ ॥३९॥
कीं धनुर्धरांमाजी जानकीवर ॥ कीं सागरांमाजी क्षीरसागर ॥ सिद्धांमाजी अनसूयाकुमर ॥ वैष्णववीर तैसा तूं ॥२४०॥
चहूं मुक्तींत सायुज्यता ॥ कीं यादवांमाजी कमलासनपित ॥ कीं पंडितांमाजी वेदांतवक्ता ॥ तेवीं भक्तजनांत तूं अससी ॥४१॥
कीं नवग्रहांत सहस्रकर ॥ कीं कवीश्वरांत उशना साचार ॥ पर्वतांमाजी मेरु थोर ॥ तेवीं वैष्णववीर तूं होसी ॥४२॥
असो यापरी करूनि स्तवन ॥ आश्रमा आले सकळ ब्राह्मण ॥ ब्रह्महत्यारी पंक्तीसी घेऊन ॥ केलें भोजन सकळिकीं ॥४३॥
वाराणसीचे सकळ जन ॥ करिते जाहले नामस्मरण ॥ सांडोनियां देहाभिमान ॥ करिती श्रवण हरिलीला ॥४४॥
ऐसा होतां बहुत काळ ॥ तों नवल वर्तलें एक वेळ ॥ सावकार होता जैतपाळ ॥ शांत तत्काळ तो जाहला ॥४५॥
त्याची स्त्री पतिव्रता ॥ तिणें त्यजूनि मायाममता ॥ चित्तीं धरूनि प्राणनाथा ॥ सहगमनार्थ चालिली ॥४६॥
गंगातीरीं निर्मळ वन ॥ तेथें पेटविला महाअग्न ॥ सौभाग्य xटोनि अहेवपण ॥ ऐसी मिरवत निघाली ॥४७॥
तुलसीदासाचे गुंफेवरूनी ॥ जाती जाहली तयेक्षणीं ॥ नमस्कार करावया लागूनी ॥ आली ते क्षणीं एकलीच ॥४८॥
तुलसीदास करीत नामस्मरण ॥ तों तिणें केलें साष्टांग नमन ॥ अष्ट पुत्र होऊत तुजलागून ॥ आशीर्वचन दिधलें ॥४९॥
सती म्हणे विष्णुभक्ता ॥ शांत जाहला माझा भर्ता ॥ चालिलें आता सहगमनार्था ॥ मायाममता सांडोनियां ॥२५०॥
अष्टपुत्रा सौभाग्यवती ॥ आशीर्वाद दिधला मजप्रती ॥ हीं वचनें अन्यथा न होती॥ संशय मजप्रति वाटला ॥५१॥
म्हणे मी नकळत बोलिलों वचन ॥ तें सत्य करील रघुनंदन ॥ ऐसें ऐकोनि सतीनें वचन ॥ पुढती नमन घातलें ॥५२॥
प्रेतापासीं जातां सत्वर ॥ तों उठोनि बैसला निजभ्रतार ॥ सकळां संतोष वाटला थोर ॥ जयजयकार मांडला ॥५३॥
भ्रतारासी धरूनि हातीं ॥ आश्रमास आली ते सती ॥ तुलसीदासासी नमन प्रीतीं ॥ पुन्हा मागुती घातलें ॥५४॥
वाराणसीचे सकळ जन ॥ तुलसीदासाचें करिती स्तवन ॥ म्हणती धन्य हा वैष्णवजन ॥ तारक पूर्ण जडजीवां ॥५५॥
पाषाणनंदी जेवविला अन्नें ॥ प्रेत उठविलें आशीर्वचनें ॥ ऐसीं कोणी वर्तमानें ॥ सांगे जाऊन रायासी ॥५६॥
अकबर राजा हस्तनापुरीं ॥ त्यासी सांगितलें ते अवसरीं ॥ कौत्क पहावया सत्वरीं ॥ उपाव करी नृपनाथ ॥५७॥
चतुर प्रधान बोलावून ॥ विचार सांगे त्यालागून ॥ म्हणे तुलसीदास वैष्णवजन ॥ मजलागून भेटवीं ॥५८॥
ब्रह्मज्ञानीं अति निपुण ॥ चतुर बोलका विचक्षण ॥ तुलसीदासाचे वेधीं मन ॥ मूळ पाठविणें तयासी ॥५९॥
सवें देऊनि शिबिका रथ ॥ येथें आणिजे तया त्वरित ॥ कांहीं पहावी प्रचीत ॥ कर्णीं मात ऐकिली ते ॥२६०॥
प्रधान म्हणे आज्ञा प्रमाण ॥ चतुर बोलके विचक्षण ॥ संगें घेऊनि कांहीं सैन्य ॥ आनंदवना पातले ॥६१॥
तुलसीदासाचे आश्रमासी ॥ येऊनि राहिले ते दिवशीं ॥ वर्तमान सांगती तयासी ॥ रायें तुम्हांस पाचारिलें ॥६२॥
तुम्ही वैष्णव प्रेमळ भक्त ॥ कीर्ति ऐकोनि अति अद्भुत ॥ दर्शनाचा धरूनि हेत ॥ रायें सत्वर पाठविलें ॥६३॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ तुलसीदास विचारी मनालागून ॥ म्हणे ते देशींचे सकळ जन ॥ नामस्मरणीं लावावें ॥६४॥
निराश असतां वैष्णववीर ॥ ते कां फिरती देशावर ॥ तरी करवया जनांचा उद्धार ॥ आज्ञा साचार हरीची ॥६५॥
दुराचारी अज्ञान जन ॥ समूळ वेष्टिले अविद्येंकरून ॥ त्यांचें करावया उद्धरण ॥ साधुजन हिंडती ॥६६॥
असो रायें पाठविलें मूळ ॥ वर्तमान ऐकिलें सकळ ॥ तुलसीदास भक्त प्रेमळ ॥ तेथोनि तत्काळ निघाले ॥६७॥
करीत हरिनामाचा गजर ॥ सत्वर पावले हस्तनापुर ॥ राजा येऊनि समोर ॥ चरणीं साचार लागला ॥६८॥
तुलसीदासासी सिंहासनीं ॥ रायें बैसविलें तये क्षणीं ॥ सेवकांसी सांगितलें कानीं ॥ यालागीं जाऊं न द्यावें ॥६९॥
षोडशोपचारीं करूनि पूजा ॥ तुलसीदासासी म्हणे राजा ॥ थोर प्रताप ऐकिला तुझा ॥ ईश्वर दुजा म्हणविसी ॥२७०॥
पाषाणनंदीसी जेवविलें अन्न ॥ प्रेत उठविलें आशीर्वाद देऊन ॥ अघटित दिसे तव करण ॥ न कळे महिमान आम्हांसी ॥७१॥
तुलसीदास म्हणे तयालागुनी ॥ हे श्रीरामाची करणी ॥ मी तों अनाथ रामाचे चरणीं ॥ चित्त ठेवूनि राहिलों ॥७२॥
ऐकोनि राजा बोले वचन ॥ तो राम भेटवीं मजलागून ॥ नाहीं तरी तुजकारण ॥ जाऊं नेदीं सर्वथा ॥७३॥
ऐसें बोलोनि त्या अवसरा ॥ राजा गेला निजमंदिरा ॥ म्हणे साक्ष दावील तरी खरा ॥ वैष्णववर या मानूं ॥७४॥
तुलसीदास सिंहासनीं ॥ बैसले असतां तये क्षणीं ॥ सेवक म्हणती त्यांलागुनी ॥ तुम्हीं येथूनि न जावें ॥७५॥
श्रीरामाचें दर्शन ॥ रायासी करवावें न लागतां क्षण ॥ नाहीं तरी तुजलागून ॥ जाऊं न देऊं सर्वथा ॥७६॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ केलें मारुतीचें स्तवन ॥ हनुमंत तत्काळ येऊन ॥ तुलसीदासासी भेटले ॥७७॥
म्हणती संकट पडिलें अति दारुण ॥ म्हणोनि केलें तुमचें चिंतन ॥ आतां हें अरिष्ट निरसून ॥ नाममहिमा वाढवीं ॥७८॥
कौतुक मांडिलें हनुमानें ॥ पाचारिलें वानर सैन्य ॥ महावीर अति दारुण ॥ गगनांतून निघाले ॥७९॥
जैसा वर्षाकाळ येतां ते क्षणीं ॥ अभ्र निघे गगनांतुनी ॥कीं पर्जन्य पडतां मेदिनीं ॥ तृणांकुर उठती पैं ॥२८०॥
नातरी येतां दुर्भिक्षकाळ ॥ गगनीं अकस्मात येती टोळ ॥ तेवीं दहासहस्र वानरदळ ॥ अकस्मात प्रकटलें ॥८१॥
हनुमंतासी करूनि नमन ॥ वानर म्हणती त्याकारण ॥ काय आज्ञा आम्हांलागून ॥ कृपा करून सांगावी ॥८२॥
हनुमंत म्हणे त्यांकारण ॥ तुम्हांसी पाचारिलें यालागून ॥ कांहीं आपुले स्वाभाविक गुण ॥ रायाकारणें दाखवावे ॥८३॥
ऐसी आज्ञा होतांचि त्वरित ॥ वानर खवळले अति अद्भुत ॥ उपरी माडियांवरी वेंधत ॥ मोडूनि टाकीत कौतुकें ॥८४॥
महावृक्ष उपटोनि सत्वरी ॥ उचलूनि टाकिती मनुष्यांवरी ॥ हलकल्लोळ हस्तनापुरीं ॥ थोर आकांत जाहला ॥८५॥
कोणाचे तोडिले नाक कान ॥ कोणाची पिळूनि टाकती मान ॥ कोणाचा पाय धरून ॥ जाती घेऊन ऊर्ध्वपंथें ॥८६॥
घागरी घेऊनि डोईवरी ॥ नारी जाती गंगातीरीं ॥ त्यांचीं वस्त्रें हिरूनि सत्वरीं ॥ नदीमाजी टाकिती ॥८७॥
व्याही विहिणी बिदीहूनी ॥ चालतां धरिती तये क्षणीं ॥ गांठीं देऊनि दाधी वेणी ॥ जाती पळोनि वानर ॥८८॥
श्रीरामभजनीं विमुख जन ॥ विष्णुभक्तांचें करिती छळण ॥ त्यासी अकस्मात उचलून ॥ कुत्सित न्हाणीं टाकिती ॥८९॥
शेट साहुकार दुर्जन ॥ कदा न करिती अन्नदान ॥ त्यांचीं भांडारें फोडून ॥ जाती घेऊन वानर ॥२९०॥
हाहाकार मांडिला थोर ॥ मग प्रवेशले राजमंदिर ॥ नाक कान तोडिती वानर ॥ आकांत थोर मांडिला ॥९१॥
राजस्त्रिया पांचशत ॥ नाटकशाळेंत बैसल्या समस्त ॥ वानर येऊनि अकस्मात ॥ त्यांवरी करिती दीर्घशंका ॥९२॥
चोर जार कुटिल दुर्जन ॥ त्यांस अकस्मात उचलोन ॥ राजमंदिरांत नेऊन ॥ देती टाकून ऊर्ध्वपंथें ॥९३॥
वस्त्रें भूषणें हिरून घेती ॥ गगनमार्गें उडोनि जाती ॥ दीन गरीब जे अन्नार्थी ॥ त्यासीं देती संतोषें ॥९४॥
दरिद्री केलें भाग्यवंत ॥ व्यवहारी नागविले समस्त ॥ असत्य वचन जे बोलत ॥ वानर ताडिती तयांसी ॥९५॥
रायापासीं येऊन ॥ सत्वर सांगती सेवकजन ॥ म्हणती आलें वानरसैन्य ॥ त्यानें प्रळय मांडिला ॥९६॥
जैसे मेघ वर्षतां दारुण ॥ अभ्र कोंदे भरूनि गगन ॥ हस्तनापुरीं वानरसैन्य ॥ तैसे रीती दिसतसे ॥९७॥
वानर क्षोभले प्रबळ ॥ नगरीं मांडिला हलकल्लोळ ॥ राजा म्हणे प्रलयकाळ ॥ आतांचि केवळ ओढवला ॥९८॥
कोणी सज्ञान होते जन ॥ ते सांगती रायाकरण ॥ म्हणती तुलसीदास वैष्णव जाण ॥ त्याचें छळण न करावें ॥९९॥
वानर क्षोभले असती थोर ॥ पालथें घालिती हस्तनापुर ॥ रायासी वाटला चमत्कार ॥ अन्याय थोर म्यां केला ॥३००॥
अंबरीषाचें करितां छळण ॥ दुर्वास पावला अपमान ॥ तैसें झालें मजलागून ॥ अन्याय मनें आठवला ॥१॥
तुलसीदासाचिया जवळी ॥ राजा पातला तये वेळीं ॥ जोडूनियां बद्धांजुळी ॥ सन्मुख उभा राहिला ॥२॥
अकबर म्हणे विष्णुभक्ता ॥ वानरदळ आंवरीं आतां ॥ अज्ञानपणें मी नेणतां ॥ तुज छळणार्था पातलों ॥३॥
द्रौपदीसतीचें करितां छळण ॥ अपमान वाटला दुर्योधन ॥ तैसें झाले मजलागून ॥ तुझें छळण करितांचि ॥४॥
ऐसें ऐकूनि करुणावचन ॥ तुलसीदास म्हणे त्यालागून ॥ तुम्ही इच्छितां श्रीरामदर्शन ॥ त्याचें सैन्य हें आलें ॥५॥
उदया येतां सहस्रकर ॥ प्रभा फांके पृथ्वीवर ॥ तैसेच हे महावीर ॥ पुढें पातले नृपनाथा ॥६॥
श्रवणापुढें उपजे आर्ती ॥ कीं मननापुढें श्रवणभक्ती ॥ साक्षात्कारापुढें नृपती ॥ निदिध्यास प्रकटे कीं ॥७॥
तेवीं मागें येतां रघुवीर ॥ पुढें पातले हे वानर ॥ अठरा पद्में दळभार ॥ मागून सत्वर येतसे ॥८॥
अठरा पद्में आलिया जुत्पती ॥ मागून येतील रघुपती ॥ तुझें भाग्या नाहीं मिती ॥ दर्शना येती श्रीराम ॥९॥
ऐकूनि राजा बोले वचन ॥ मी पावलों श्रीरामदर्शन ॥ म्हणोनि धरिले दोनी चरण ॥ म्हणे महिमा पूर्ण कळेना ॥३१०॥
दहा सहस्र वानरदळ ॥ इहींच केला हलकल्लोळ ॥ अठरा पद्में येतां दळ ॥ प्रलयकाळ होईळ कीं ॥११॥
ऐकोनि रायाचें करुणावचन॥ अदृश्य झालें वानरसैन्य ॥ तुलसीदासाचे चरण ॥ सकळ जन वंदिती ॥१२॥
एक संवत्सरपर्यंत ॥ तुलसीदास राहिले तेथ ॥ श्रीरामचरित्र अति अद्भुत ॥ नित्य वर्णीतसे प्रेमें ॥१३॥
हस्तनापुरींचे सकळ जन ॥ नित्य करिती नामस्मरण ॥ जड मूढ होते अज्ञान ॥ झाले सज्ञान सत्संगें ॥१४॥
अकबररायासी पुसोन ॥ तुलसीदास निघाले तेथून ॥ मथुरावासी श्रीकृष्ण ॥ त्याचें दर्शन घ्यावया ॥१५॥
आधीं गोकुळासी येऊन ॥ यमुनातीरीं केलें स्नान ॥ घेऊनि श्रीकृष्णदर्शन ॥ सत्वर तेथून निघालें ॥१६॥
मग येऊन वृंदावनीं ॥ तेथें नमिले शारंगपाणी ॥ एक मास तेथें राहूनी ॥ हरिरंगणीं नाचत ॥१७॥
तेथूनि मथुरेसी आले ॥ यमुनातीरीं स्नान केलें ॥ श्रीकृष्णदर्शन घेतलें ॥ वैष्णव भेटले सकळिक ॥१८॥
मथुरा गोकुळ वृंदावन ॥ तेथें वसती वैष्णवजन ॥ नित्य करिती हरिकीर्तन ॥ नामस्मरण अहर्निशीं ॥१९॥
प्रियादास नागरब्राह्मण ॥ परमभाविक वैष्णव जन ॥ भक्ति ज्ञान वैराग्य पूर्ण ॥ त्याचे ठायीं जाण असती ॥३२०॥
कलियुगीं झाले विष्णुभक्त ॥ त्यांची चरित्रें अति अद्भुत ॥ त्यांचा ग्रंथ संस्कृत ॥ प्रियादासें लिहिलासे ॥२१॥
संतचरित्र ग्रंथ केला ॥ तो तुससीदासासी श्रुत झाला ॥ प्रियादासासी एक वेळां ॥ येऊनियां भेटले ॥२२॥
मग म्हणे जी स्वामी ॥ संतचरित्र लिहिलें तुम्हीं ॥ तें ऐकिलें नाहीं आम्हीं ॥ ग्रंथ आणोनि दाखवा ॥२३॥
प्रियादास म्हणे ते वेळे ॥ चहूं युगीचे भक्त वर्णिले ॥ परी तुलसीदासाचें चरित्र भलें ॥ नाही लिहिलें या ग्रंथीं ॥२४॥
कलियुगींचे वैष्णवभक्त ॥ तेही वर्णिले असती येथ ॥ म्हणूनि झाले चिंताक्रांत ॥ तो नवल अद्भुत वर्तलें ॥२५॥
प्रियादासासी नकळत ॥ तुलसीदासाचें जें चरित्र ॥ श्रीरामें येऊनि तेथ ॥ आपुल्या हातें लिहिलें ॥२६॥
ग्रंथ करावया श्रवण ॥ सकळ मिळाले वैष्णवजन ॥ महाद्वारासी येऊन ॥ सभारंगणीं बैसले ॥२७॥
चतुर सर्वज्ञ पंडित तेही येऊनि बैसले तेथ ॥ प्रियादास प्रेमळ भक्त ॥ वाचूनि दावीत तयांसी ॥२८॥
प्रियादासें ग्रंथ लिहिला ॥ तो सकळ वैष्णवीं मान्य केला ॥ तुलसीदास म्हणती बोलिला ॥ तुमचे मुखें श्रीहरी ॥२९॥
ऐसें ऐकूनि संतवचन ॥ प्रियादास म्हणे त्यांलागून ॥ तुलसीदासाचें चरित्र पूर्ण ॥ लिहिलें येऊन श्रीरामें ॥३३०॥
श्रीरामाचें हस्ताक्षर ॥ सकळ पाहती वैष्णववीर ॥ भक्तमहिमा थोर ॥ श्रुतिशास्त्रांतें न वर्णवे ॥३१॥
वर्णितां श्रीहरीचे गुण ॥ तटस्थ राहिलीं अठरा पुराणें ॥ वाद घालिती षड्दर्शनें ॥ त्यांसी महिमान कळेना ॥३२॥
ऐसें ग्रंथीं निरूपण ॥ आवडीं करितां नित्य श्रवण ॥ त्यांसी श्रीरामाचें दर्शन ॥ होईल जाण निश्चयेंसीं ॥३३॥
जो श्रीरामाचा प्रियकर ॥ पूर्ण वाल्मीकीचा अवतार ॥ त्याचें चरित्र श्रीरघुवीर ॥ आपुले हस्तें लिहीतसे ॥३४॥
मूळींचा ग्रंथ संस्कृत जाण ॥ प्रियादासें केलें वर्णन ॥ त्यावरी नाभाजीनें जाण ॥ लिहिला ग्वाल्हेर भाषेंत ॥३५॥
त्याचीं पद्यें ऐकोनि कानीं ॥ ग्रंथ लिहिला महाराष्ट्रवाणी ॥ जैसें दुग्धामाजी धारवणी ॥ उदक थोडें घालिती ॥३६॥
सुवर्णाचिये कोंदणीं ॥ लाख बैसविती पुरवणी ॥ तैसी माझी आर्षवाणी ॥ संतसज्जनीं ऐकिली ॥३७॥
हें तुलसीदासाचें चरित्र पूर्ण ॥ स्वयें वर्णिती भगवान ॥ सद्भावें श्रवण करितां जाण ॥ श्रीरामरूप ते होती ॥३८॥
श्रीभीमातीरवासी रुक्मिणीपती ॥ तोचि वक्ता ये ग्रंथीं ॥ अभंगीं नाम महीपती ॥ त्यानेंचि निश्चितीं लिहविलें ॥३९॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ तृतीयाध्याय रसाळ हा ॥३४०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥

श्री भक्तविजय

Shivam
Chapters
॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची, प्रार्थना - आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७