Get it on Google Play
Download on the App Store

शशी 15

“अरे आम्ही लहानपणी हेच शिकलो होतो.” हरदयाळ म्हणाले.”

“तुम्ही संध्या आटपा आता पटकन्-मी पाने वाढते,” पार्वतीबाईंनी सूचना दिली. शशी म्हणाला, “बाबा, कधी संध्या पटकन होते व कधी तिला उशीर लागतो. माझा परवचा कधीच का नाही पटकन् संपत?” हरदयाळ म्हणाले, “अरे मुर्खा, घाई असली म्हणजे पटकन करावे लागते सारे काम.” मला झोप येत असली तर मी पटकन संपवू का?” शशीने विचारले.
“पुरे रे शश्या, आता जेवा आणि निजा एकदाचे.” आई म्हणाली.

जेवणे झाली. हरदयाळ अंगणात विष्णुसहस्त्रनाम म्हणत शतपावली करीत होते. पाळण्यात मधू निजला होता. शशी आईजवळ बसला होता.

शशी : आई कृष्ण म्हणजे देव ना ग? तो सुद्धा गायी चारी, मग मी आपली गाय चरायला नेली म्हणून काय गं झाले? बाबा रागाने म्हणतात, तुला का गुराखी व्हायचे आहे? गुराखी होणे का वाईट? कृष्ण गुराखीच होता तो कांबळे घेई अन् रानात जाई. तेथे तो खेळे. मोराची पिसे जमवून त्यांचा मुकुट करी अन् फुलांचे हार गळ्यात घाली. आई, मी कृष्णा होईन. गोपाळकृष्ण! आपल्या तांबूला मी नदीवर नेईन. मी झाडाखाली निजेन. कोकिळा कुहू करील. मोर नाचेल. मी अलगुजे बाजवीन. रानातील फुले घरी आणीन. आई, मला शाळा नको. मी गुराखी होईन.

आई : शश्या, अरे चांगले मामलेदार-मुन्सफ होईन, असे म्हणावयाचे, तर काय अवदसा तुला आठवली आहे? हे भिकेचे डोहाळे कसे सुचतात तुला? नांगर हाती धरायचा आहे वाटते पुढे?

शशी : आई, शेतकरी होणे चांगले. बळरामाच्या हातात नांगरच असे. कृष्ण पावा वाजवी. गायी चारी अन् बळराम नांगर चालवी. आई, बैलांचे डोळे कसे असतात- काळेनिळे. मी बैलाला मारणार नाही, आर टाचणार नाही. त्या वासूकाकांच्या बैलाला किती टोचतात! परवा तो बैल रडत होता. बैलांना टोचणारांना देव टोचील का गं? देव रागावत असेल, नाही?

आई : जा आता जाऊन नीज. काही काम सांगितले असते, तर म्हटले असतेस, मला झोप येते म्हणून.

शशी : आई, तुझे मी काम नाही का ग करीत? मी कुणालाही आवडत नाही. आई तुलासुद्धा मी आवडत नाही ना?
आई : मला मधू आवडतो. गुराखी होणारा पोर कुणाला आवडेल? चांगले शाळेत जावे, शिकावे, तर म्हणे, “मी गुराखी होईन. नांगर धरीन.” मुळीच नाहीस तू मला आवडत! मान खाली घालायला लावतोस. सारे म्हणतात, “असा कसा तुमचा शशी?” काय बोलायचे?

शशी : देवसुद्धा मला वाईट म्हणत असेल का? देवाला सुद्धा मी आवडत नसेन? तोसुद्धा मला जवळ नाही घेणार!

विश्राम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
विश्राम 1 विश्राम 2 विश्राम 3 विश्राम 4 विश्राम 5 विश्राम 6 विश्राम 7 विश्राम 8 विश्राम 9 विश्राम 10 श्यामची आत्या 1 श्यामची आत्या 2 श्यामची आत्या 3 श्यामची आत्या 4 श्यामची आत्या 5 श्यामची आत्या 6 श्यामची आत्या 7 श्यामची आत्या 8 शशी 1 शशी 2 शशी 3 शशी 4 शशी 5 शशी 6 शशी 7 शशी 8 शशी 9 शशी 10 शशी 11 शशी 12 शशी 13 शशी 14 शशी 15 शशी 16 शशी 17 शशी 18 शशी 19 शशी 20 शशी 21 शशी 22 शशी 23 शशी 24 शशी 25 शशी 26 शशी 27 शशी 28 शशी 29 शशी 30 शशी 31 शशी 32 शशी 33 शशी 34 शशी 35 शशी 36 शशी 37 शशी 38 मोलकरीण 1 मोलकरीण 2 मोलकरीण 3 मोलकरीण 4 मोलकरीण 5 मोलकरीण 6 मोलकरीण 7 मोलकरीण 8 मोलकरीण 9 मोलकरीण 10 मोलकरीण 11 मोलकरीण 12 मोलकरीण 13 मोलकरीण 14 मोलकरीण 15 मोलकरीण 16 मोलकरीण 17 मोलकरीण 18 मोलकरीण 19 मोलकरीण 20 मोलकरीण 21 मोलकरीण 22 मोलकरीण 23 मोलकरीण 24 मोलकरीण 25 मोलकरीण 26 मोलकरीण 27 मोलकरीण 28 मोलकरीण 29