Get it on Google Play
Download on the App Store

श्यामची आत्या 6

पुष्कळ वर्षांनी सीताआत्याला भेटण्यासाठी श्याम आला होता. ती लहानशा पडवीत बसली होती. सीताआत्याचे घरही गेले, हे श्यामला माहीत नव्हते. दहा-बारा वर्षांनी विद्या संपवून तो कोकणात आला होता. सीताआत्याला श्याम म्हणाला, “आत्या, तू पडवीत का ग राहतेस ?” ती म्हणाली, “बाळ, काय सांगू तुला ? दुर्दैव हो आपले ! ही पडवी तरी मिळाली आहे; नाहीतर देवळातच राहण्याची वेळ आली असती ! घर गेले हो आपले ! देवाने दिले, त्यानेच नेले. ती सारी कथा कशाला विचारतोस ? ते जाऊ दे. परत कधी आलास ? बस असा नीट बस. बघू दे तुला एकदा नीट. काही जाडजूड नाही रे झालास ? लहानपणी जसा हाडकुळा होतास, तसाच राहिला आहेस ! श्याम, किती वर्षांनी रे आलास ? तुझे वडील होते, तोपर्यंत ते येत असत आणि तुझी हकीकत कळत असे. परंतु गेले तुझे आईबाप ! हवे होते हो ! आता कोठे त्यांना चांगले दिवस यायचे ! तुझे वडील म्हणत, ‘सीता, श्याम पुढे नाव काढील.’ पण ते कोठे जगले आहेत पाहायला ? आज ते असते तर त्यांनी तुझे किती कौतुक केले असते ! परंतु देवाला चांगले पाहवत नाही. आम्हाला जगात भरपूर आऊक्ष देतो, परंतु जे जिवंत राहायला हवे त्यांना तो कमी देतो ! या गावातील लोक तुझ्याबद्दल वर्तमनपत्रात वाचतात व त्यांना ते कळते. येऊन घरी सांगतात व म्हणतात, ‘श्याम चांगला निघाला हो ! वाटले नव्हते असा निघेल म्हणून.’ अरे, ऐकून बरे वाटते.”

सीताआत्याच्या शब्दांनी श्यामचे हृदय गहिवरले. आईबापांच्या कृश व प्रेमळ मूर्ती त्याला डोळ्यांसमोर दिसू लागल्या. “मी मोठा होईन व आई, तुला सदैव सुखात ठेवीन,” असे आपण लहानपणी कसे म्हणत असू ते त्याला आठवले. तो मनात म्हणाला, “देवा, कोठे आहे माझी आई ? कोठे आहेत वडील ? का रे असे केलेस ? आमच्या कृतज्ञ हृदयांच्या पवित्र व प्रेमळ आशा अपूर्ण ठेवण्यातच का तुला बरे वाटते?”  नाना विचार व नाना स्मृती मनात येऊन श्यामचे डोळे भरून आले! परंतु पटकन तोंड वळवून त्याने ते पुसून टाकले.

सीताआत्याच्या पडवीत श्याम बसला होता. पलीकडे पडवीत दोन सावळी वासरे बांधलेली होती. सीताआत्याने श्यामला दूध दिले व ती म्हणाली, “श्याम, घे. ते सारे घे हो! संकोच नको करू. अरे, हल्ली घरात पुष्कळ दूध आहे. खायलाच कोणी नाही! ती सायसुद्धा घे. तुला आवडत असे लहानपणी. सायीसाठी तू कोण भांडायचास! आठवते का रे तुला? मोरी गाय हल्ली पुष्कळ दूध देते. ते पाहिलेस का तिचे नवे वासरू? त्या वासराचे नाव हि-या आहे हो! हि-या ओळखलेस का रे कोण आले आहे ते? अरे, तुझी आई ह्याच्याच वडलांच्या घरची हो! तुला कोठे माहीत आहे? हि-या अरे, असे काय वेड्यासारखे बघतोस! असे चकण्यासारखे नको पाहू! नीट सरळ पहा! नाहीतर हा श्याम तुला नावे ठेवील हो! अन् तुला नावे ठेवलेली मला नाही खपणार! कुठे रे पाहतो आहेस सारखा? काय पाहिजे तुला? हि-या बघ दाव्याशी ओढ नको घेऊ. त्याला अंगणात फिरावयाला हवे असेल. मोठा लबाड आहे! फिरायला हवे त्याला. श्याम, त्याला जरा अंगणात हिंडवतोस का? येईल का तुला हिंडवायला? घट्ट धर हो! तो खूप मस्ती करतो.”

 

विश्राम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
विश्राम 1 विश्राम 2 विश्राम 3 विश्राम 4 विश्राम 5 विश्राम 6 विश्राम 7 विश्राम 8 विश्राम 9 विश्राम 10 श्यामची आत्या 1 श्यामची आत्या 2 श्यामची आत्या 3 श्यामची आत्या 4 श्यामची आत्या 5 श्यामची आत्या 6 श्यामची आत्या 7 श्यामची आत्या 8 शशी 1 शशी 2 शशी 3 शशी 4 शशी 5 शशी 6 शशी 7 शशी 8 शशी 9 शशी 10 शशी 11 शशी 12 शशी 13 शशी 14 शशी 15 शशी 16 शशी 17 शशी 18 शशी 19 शशी 20 शशी 21 शशी 22 शशी 23 शशी 24 शशी 25 शशी 26 शशी 27 शशी 28 शशी 29 शशी 30 शशी 31 शशी 32 शशी 33 शशी 34 शशी 35 शशी 36 शशी 37 शशी 38 मोलकरीण 1 मोलकरीण 2 मोलकरीण 3 मोलकरीण 4 मोलकरीण 5 मोलकरीण 6 मोलकरीण 7 मोलकरीण 8 मोलकरीण 9 मोलकरीण 10 मोलकरीण 11 मोलकरीण 12 मोलकरीण 13 मोलकरीण 14 मोलकरीण 15 मोलकरीण 16 मोलकरीण 17 मोलकरीण 18 मोलकरीण 19 मोलकरीण 20 मोलकरीण 21 मोलकरीण 22 मोलकरीण 23 मोलकरीण 24 मोलकरीण 25 मोलकरीण 26 मोलकरीण 27 मोलकरीण 28 मोलकरीण 29