Get it on Google Play
Download on the App Store

सावित्रीचा सुका 3

‘माझ्या डोक्याला काय लागले? हाताला काय झाले.? त्याने विचारले. ‘मागून सांगेन ती म्हणाली. तिचे डोळे भरुन आले. ती बाळाला तेथेच ठेवून चुलीजवळ गेली. ती भाकरी करीत बसली. सुकाने मुलाचे मुके घेतले. नंतर त्याला पाळण्यात ठेवून तो हातपाय तोंड धुवून आला. तो तेथे बसला. त्याने भाकर खाल्ली. ‘सांग मला सारे तो म्हणाला. ‘या बाळाची शपथ. आजपासून दारू नका पिऊ शपथ घ्या.

मग सारे सांगेन ती म्हणाली. तिने त्याला सारी हकीगत सांगितल. तो मुलाकडे पहात होता. त्याने त्यास एकदम उचलून घेतले नि हृदयाशी घटट् धरले. ‘उदंड आयुष्याचा हो' तो म्हणाला.

काही दिवस बरे गेले. परंतु दारू कमी झाली. तरी सुटली नाही. एखादे वेळेस तालुक्याच्या ठिकाणी तो बाजाराला म्हणून जाई आणि तिकडेच झिंगून पडे. कोणी गावकरी गाडीत घालून त्याला आणीत. दारू पिणा-याच घरी सदैव चिंता, शाश्वती कशाची नाही. आज सावित्री तशीच काळजीत होती.

गाडी जोरात येत होती. घरी जायचे म्हणून बैल पळत होते. घंटा घणघण वाजत होत्या. रस्त्यात अंधार होता. तो गाडीवानाला रस्त्यात काही तरी पांढरे दिसले. त्यानं कासरा खेचला.

‘कोणीतरी रस्त्यात पडले आहे' तो म्हणाला. व्याख्याते, गाडीवान, व्याख्यात्यांना नेमण्यासाठी आलेले मित्र सारे खाली उतरले. रस्त्यात ती व्यक्ती बेशुध्द पडली होती.

‘हा तर सुका, सावित्रीचा सुका. पुन्हा दारू पिऊन आला' गावकरी म्हणाले.’ आपली गाडी त्याच्या अंगावरुन जाती तर तो मरता. गाडीवानाला दिसले काही तरी. त्याने बैल थांबवले म्हणून वाचला.’ व्याख्याते म्हणाले.

‘सावित्रीच्या बांगडयांचा जोर' कोणी म्हणाले.

त्यांनी सुकाला उचलून गाडीत ठेवले. कोणी पायी चालू लागले. आणि गाडी एकदाची गावात आली. व्याख्याते तडक सभेकडे गेले. सुकाला घरी पोचविण्यात आले. सावित्रीचा जीव खाली पडला.

व्याख्यात्यांनी सभेत दारूबंदीवरच जोर दिला. ते ताजे उदाहरण होते. गावात दारू नका ठेवू. दारू म्हणजे दु:ख, दारू म्हणजे संकट. दारूमुळे धर्म बुडतो. माणुसकी जाते. कर्ज होते, संसाराचा विचका होतो. दारू म्हणजे जिवंतपणाचा नरक पुष्कळ ते बोलले सकाळच्या वेळी दुस-या दिवशी व्याख्याते सुकाच्या घरी गेले. सुकाने प्रणाम केला. सावित्री पाया पडली. तुमची कृपा म्हणून कुंकू राहिले’ ती स्फुंदत म्हणाली.

'कृपा देवाची. परंतु आजपासून दारू पिणार नाही अशी यांनी शपथ घ्यावी. संकल्प करावा. हा महात्माजींचा फोटो येथे मी लावतो. त्याला साक्ष ठेवून प्रतिज्ञा करा.' व्याख्याते म्हणाले.

शेवटी सुकाने महात्माजींच्या फोटोस साक्षी ठेवून शपथ घेतली. त्याची दारू सुटली. त्याच्या घरात हल्ली आनंद आहे. त्याचा मुलगा राजीव मोठा झाला आहे. दर शुक्रवारी महात्माजींच्या फोटोस तो हार घालतो व ‘आम्हा सर्वांस सदबुद्धी द्या’, अशी प्रार्थना करतो.