Get it on Google Play
Download on the App Store

दहाव्या नंतर

अकरावे दिनी सर्व घरातील कपडे वगैरे स्वच्छता केली जाते . यानंतर पंचगव्य वगैरे प्राशन करून वृषोत्सर्ग विधी पूर्वी करीत असत . याच दिवशी एकोद्दिष्ट ( म्हणजे फक्त एकास उद्देशून केलेले ) श्राद्ध केले जाते . यापाठोपाठ रूद्रगण श्राद्ध , वसुगण श्राद्ध व  यानंतर मलीन मासिक श्राद्ध केले जाते . यावेळी विविध दशदाने करून समाप्ती केली जाते .


 बारावे दिवशी सपिंडी श्राद्ध केले जाते . यात चार पिंड बनवून त्यातील गेलेल्या व्यक्तीच्या नावाच्या पिंडाचे तीन भाग करून बाकीच्या तीन पिंडात मिसळले जातात . चार पिंडात पहिला पिंड मृत व्यक्तीचा , दुसरा पिंड प्रेताचे वडिल , तीसरा आजोबा , व चौथा पणजोबांचा असतो . यातील पहिल्या पिंडाचे तीन भाग उरलेल्या तीन पिंडात मिसळल्यावर गत व्यक्ती पितृलोकी जाते व पणजोबांस मुक्ती मिळते . हा विधी केल्या शिवाय सुतकातून सुटकाच होत नाही व पुढे कोणतेही शुभ कर्म करू शकत नाहीत हा नियम सर्व वर्णांस लागू आहे . नंतर पाथेय श्राद्ध करून विधी संपतो .


 तेरावे दिनी प्रथम निधनशांती करतात . यात गणेशपुजन पुण्याहवाचन रूद्र पुजन करतात व विप्रांकडे विविध सुक्ताचे पठण करतात तर बाकीकडे हवन केले जाते . नंतर सुतकात गंध , कुंकू वगैरे लावलेले नसते ते लावून घरातील देवपूजा केली जाते . या विधीसाठी चार गुरूजी लागतात . यात उंबऱ्यावर सुपारी फोडली जाते .


 यानंतर तेराव्याचे श्राद्ध केले जाते . यासोबतच शुद्ध सोळा मासिक श्राद्धे केली जातात . यात तेरा ब्राह्मण भोजनास सांगतात . परंतू अभावी किमान पाच म्हणजे दोन देवा कडील व तीन पितरांचे असे भाेजन करतात . यास मासिक निवृत्ती असेही म्हणतात . आलेल्या गुरूजींस व चालवणाऱ्या गुरूजींस दशदाने पददानादी सह उदककुंभ व दक्षिणा दिली जाते . दुपारी आहेर करून यजमानांचे मामा यजमानास मारूतीच्या मंदिरात नेतात . तेथे नवीन निरांजनात दिवा लावून नमन करून बाहेर पडताना देवळाची घंटी वाजवतात . यादिवसापासून रोजची कर्मे करण्यास सुरूवात केली जाते . जर कोणाचा विवाह ठरला असेल तरच तो विनायक शांती करून करावा अन्यथा पुढे तीन वर्षे विवाह करता येत नाही हा समज अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे असे करू नये .