Get it on Google Play
Download on the App Store

प्रल्हाद 7

सत्याग्रही नि समाजवादी
असा हा भरतखंडातील पहिला बाळ सत्याग्रही. महात्माजींच्या जीवनावर प्रल्हाद चरित्राचा केवढा परिणाम ! प्रल्हाद सारे सहन करतो तो सत्याला सोडत नाही. प्रभूवर विसंबून असतो. परंतु प्रल्हाद केवळ सत्याग्रही नव्हता. त्याच्याजवळ आणखी काही तरी होते. प्रसन्न नि शांत झालेल्या नारसिंहाने वर माग म्हणून म्हटले, प्रल्हाद काही बोलेना.

“दुर्लभ असा मोक्ष तुला देऊ ?”

“मला एकट्याला मोक्ष नको. मी एकटाच मुक्त होऊन काय करु ?”

प्रल्हादाचे असे हे उत्तर आहे. तो सर्वांचा मोक्ष इच्छितो. सर्वांचे सुख, स्वातंत्र्य इच्छितो. तो सर्वांचा विकास इच्छितो. तो स्वतःपुरते पाहणारा नव्हता. तो प्रभूला म्हणाला, “तुझी भक्ती मला दे. मला जनतेची सेवा करु दे.”

मोक्ष अपुरा
महात्माजी म्हणत की, “सभोवतालचा मानवी समाज जोवर अपूर्ण आहे तोवर आपला मोक्षही परिस्थितीसापेक्ष आहे. अन्यायी राज्यात जगून तुम्ही मोक्षाचे अधिकारी कसे काय ? सभोवतालचं दारिद्र्य, अन्नान्नदशा, विषमता ही पाहून तुम्ही मुक्त कसे काय? तुमचा मोक्ष सर्वांशी जोडलेला आहे. सर्वांना सुख मिळेपर्यंत मी पुनःपुन्हा जन्म घेईन असे भगवान बुद्ध म्हणत. तुकाराम महाराज ‘गर्भवासी सुखे घालावे आम्हासी’ असेच म्हणतात. तेही ‘नलगे मुक्ती’ असेच म्हणतात. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन ते सेवा करु इच्छितात. कारण एकट्याची मुक्ती त्यांनाही नको असेल. अपूर्ण जगात ती संपूर्णतः मिळणं अशक्य. प्रल्हादानं देवापाशी वैयक्तीक मोक्ष मागितला नाही.

सेनापतींचा आवडता प्रल्हाद

महर्षी सेनापती बापटांना प्रल्हादाचे फार प्रेम. हरिजन दौ-यात आम्ही हिंडत होतो. जेथे जेथे शाळेत वा सेवादलात मुला-मुलींसमोर बोलायची वेळ येई तेव्हा सेनापती प्रल्हादाचे उदाहरण सांगून “असे बंडखोर व्हा. म्हातारे लोक तुमचं ऐकणार नाहीत. तुम्ही त्यांच ऐकू नका. उद्याचं जग तुमचं आहे. म्हातारे मुर्दाबाद-तरुण जिंदाबाद. मुलंमुली जिंदाबाद, असं म्हणा- मनाला पटेल ते करा.”

प्रल्हाद हा सेनापतींचा आदर्श आहे. आज हजारो वर्षे ध्रुव, प्रल्हादांच्या आदर्शांनी भारतीय संसारात मार्गदर्शन केले आहे. ही जोडी अमर आहे. अनंत काळपर्यंत ही जोडी धीर देईल, श्रद्धा देईल. त्या दोघांना माझे सहस्त्र प्रणाम. माझ्या हृदयमंदिरातील ही दोन तेजस्वी दैवते आहेत.