Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

भाग ५

एखादा अडाणी शेतकरी बायका मुलां सहित शेती करत राहतो. एक दिवस युद्ध होते आणि सैनिक गावातून जातात. काही जण त्याचे धान्य ओढून नेतात तर काही जण त्याच्या बायको मुलीला अंगाखाली घेतात. बिचारा शेतकरी प्रतिकार करू शकत नाही. काही जण तो अपमान आणि विटंबना सहन करून राहतात पण कधी कधी सहनशीलतेचा अंत होतो. तो शेतकरी बंड पुकारतो, विरोधी सैनिकांना जाऊन भेटतो. त्याला सुद्धा एखादी जुनाट तलवार दिली जाते. ज्या बायका मुलांच्या प्रेमापोटी तो हे पाऊल उचलतो त्यांनाच सोडून तो युद्धावर जातो. लहान पणी शूर सरदारांच्या कथा ऐकल्या असतात पण प्रत्यक्ष युद्ध भूमीवर पोटांत अन्न नसताना, डोळ्यावर झोप नसताना त्याचा सरदार त्याला पुढे ढकलतो. त्याचे काही दिवसांचे मित्र कापले जातात, कधी कधी त्याला इजा होते. आपण कुठे लढलो, कुणासाठी लढलो हेच समजत नाही. मढ्याच्या अंगावरून वस्त्र आणि चिलखत तो चोरतो, भुकेने विव्हळून वाटेवर कुना गरीब शेतकऱ्याचे धान्य चोरतो आणि कधी कधी दारूच्या नशेतून त्याच्या मुलीला सुद्धा ओढतो. तो ओरडते, आक्रंदत असते, तिचा चेहरा, त्या विनवण्या कधी कधी ओळखीच्या वाटतात पण नक्की काही आठवत नाही.

माणूस का जन्माला येताना वाईट म्हणून येतो ? त्या सैनिकाने आपल्या बायका मुलांना हात लावला नसता तर आज ह्या मुलीला आपण हात लावला असता का ? चूक कुणाची ? मी दुर्बल आहे म्हणून माझी ? युद्धाला सैनिकांना नेणाऱ्या राजाची ? सैनिकांची कि जन्माचे रहाट गाडगे हे असेच असते ?

शुक चालत चालत विचार करत होता. सह्याद्रीचे अनेक कडे कपारी त्याला चालून जायचे होते. अनेक नद्या त्याला पार करायच्या होत्या. आपल्या जीवनाच्या सत्यावर विचार मंथन करायला आणखी कधी वेळ भेटेल ? आपण काय करणार हे त्याने खूप आधीच ठरवले होते. पण आपण करतो ते बरोबर कि वाईट हे ठरविण्यासाठी मात्र त्याला आताच वेळ मिळाला होता. अनेक विद्या आणि प्रचंड ज्ञान त्याला प्राप्त झाले होते पण त्याच वाली पूर्वीपेक्षा आपण थोडे कमी झालो आहोत असे कुठेतरी खोलवर वाटत होते. आपल्या अस्तित्वाचे काही भाग मनाच्या कोपऱ्यांत कुठेतरी हरवले आहेत असे वाटत होते. त्याने आठवण्याचा खूप प्रयत्न केला पण जास्त काही त्याला आठवले नाही.

तसे पाहता ह्या जंगलात त्याचे काय बरे काम होते ? इतरांप्रमाणे त्याची सुद्धा सामान्य स्वप्ने होती. तंत्र मंत्र त्याच्यासाठी नव्हते, त्याला कॉलेज मध्ये जायचे होते. आईबरोबर राहायचे होते. शिकून तिला चांगले दिवस दाखवायचे होते. रस्त्याच्या कडेला डोंबारी लोक जादू दाखवत ते पाहून तो थक्क होत होता. कुणी त्याला तू अगम्य विध्येच्या शोधांत फिरशील असे सांगितले असते तर त्याने त्या व्यक्तीला मूर्खांत काढले असते. पण कदाचित त्या शेतकऱ्याला सुद्धा कुणी तू हातांत तलवार घेऊन युद्ध भूमीवर जाशील असे सांगितले असते तर खरे वाटले नसते. पण अतिशय सामान्य पापभीरु माणसाच्या मनाला सुद्धा सीमा असतात, त्यावर ताण पडला कि तो माणूस तुटतो. कधी कधी मोत्यांच्या माळे प्रमाणे विखरून नामशेष होऊन जातो तर कधी ज्वालामुखी प्रमाणे उद्रेक करून जातो. शुक सुद्धा तुटला होता. लहानपणी त्याला पाण्यात कागदी नवा सोडायला फार आवडायचे. कधी कधी आपण सुद्धा एका होड्यावर स्वर होऊन अथांग सागराच्या कुशीत जाऊ असे त्याला वाटायचे पण त्या कागदी होड्या नेहमीच कागदाने मऊ होऊन बुडायच्या. कागदाची ती होडी पाण्यात विरघळून लुप्त व्हायची आणि आपले स्वप्न सुद्धा त्याच प्रमाणे विलुप्त होत आहे असे त्याला वाटायचे. आज त्याची विद्या सिद्ध झाली होती ४ वर्षा पासून तो जे शोधात होता ते भेटले होते पण त्याच्या त्या ध्येयाची होडी पाण्यावर तरंगत होती, काही काळ जाईल आणि कदाचित ती विरून जाईल." हे सगळे संपेल तेंव्हा मन रॆकमी रिकामी होईल आणि त्यावेळी मी काय करून बरे ?" शुकाच्या मनात विचार आला.

अनेक दिवस रात्र वाटचाल करून तो शेवट मानव वस्तीच्या जवळ आला होता. पायाच्या साली निघाल्या होत्या आणि पोटांत कावळे ओरडत होते. शरीराला दुर्गंध येत होती. आणि तश्यांत त्याला एस टी येताना दिसली. तो लाल रंगाचा ओबड धोबड डबा त्याहून बेढब हालचालीने जावळ येत होता. धुराळ्यातील त्यावरील पाटी दिसत नव्हती पण बस जवळ येतंच तिने करकचून ब्रेक मारला. "कुठे जाणार स्वामीजी? " आतून चालकाने विचारले. "मुंबई" म्हणून शुक आंत चढला.