Get it on Google Play
Download on the App Store

दुर्योधन

https://i.ytimg.com/vi/eL8zDj_ABrc/hqdefault.jpg

दुर्योधनाला महाभारत युद्धाचा खलनायक मानले जाते. यामागे कारण असे आहे की दुर्योधनाची जिद्द आणि महत्वाकांक्षा यांच्यामुळे वारंवार पांडवांना वनात जावे लागले आणि कष्टप्रद जीवन जगणे भाग पडले. याचा परिणाम असा झाला की कौरव आणि पांडव यांच्या मनात एकमेकांबद्दल एवढे विष भरले गेले की महायुद्धाची तयारी सुरु झाली. जगभरातील देश दोन भागात विभागले गेले. एक पक्ष कौरवांच्या बाजूने होता तर दुसरा पांडवांच्या, आणि मग एक दिवस असा आला जेव्हा जगभरातील योद्धे कुरुक्षेत्राच्या मैदानावर एकत्र आले आणि त्यांच्यात महायुद्ध झाले.
या युद्धाने लाखो करोडो लोकांना मृत्युच्या तोंडी दिले. हेच कारण आहे की दुर्योधनाला महाभारत युद्धाचा खलनायक मानले जाते. काही अशा कथा देखील आहेत ज्यांच्यावरून असे लक्षात येते की दुर्योधनाच्या जन्माच्या वेळीच हे पक्के ठरले होते की तो संपूर्ण कुळाचा नाश करणारा खलनायक ठरेल. महाभारतात अशी कथा आहे की हस्तिनापूरच्या उत्तराधिकारी पदावरून पंडू आणि धृतराष्ट्र दोघेही चिंतीत होते. दोघांचीही इच्छा होती की आपला पुत्र मोठा होऊन हस्तिनापूरचा उत्तराधिकारी बनावा. गांधारी ही भगवान शंकराची भक्त होती. तिला शंभर पुत्रांची माता होण्याचा आशीर्वाद प्राप्त होता. योगायोग असा झाला की पंडूची पत्नी कुंती आणि धृतराष्ट्राची पत्नी गांधारी दोघीही गर्भवती झाल्या. परंतु भाग्याने पंडूची साथ दिली आणि सर्वात आधी त्याच्या घरी युधिष्ठिराचा जन्म झाला. त्यामुळे धृतराष्ट्र आणि गांधारी दोघांनाही खूप दुःख झाले. गांधारी दुःखी झालेली पाहून महर्षी वेदव्यास तिला म्हणाले की तू चिंता करू नकोस, तुला शिवाचा आशीर्वाद प्राप्त आहे त्यामुळे तू शंभर पुत्रांची माता होशील. काळ पुढे जात राहिला आणि कुंती दुसऱ्या वेळची गर्भवती झाली, परंतु गांधारीच्या गर्भातून मुलाचा जन्म झाला नाही.
त्यामुळे दुःखी होऊन गांधारीने आपल्या दासीला आपल्या पोटावर वार करायला सांगितले. दासीने महाराणीच्या आज्ञेवरून तिच्या पोटावर जोरदार प्रहार केला. त्या प्रहारामुळे गांधारीच्या पोटातून मांसाचा एक मोठा पिंड पडला. आपल्या पोटातून पडलेल्या पिंडाला पाहून गांधारीला रडू कोसळले. त्याचवेळी महर्षी वेदव्यास तिथे आले. त्यांनी गांधारीचे सांत्वन करत तिला सांगितले की तुला दुःख करण्याची आवश्यकता नाही, याच पिंडातून शंभर पुत्रांचा जन्म होईल.
व्यासांनी सांगितले की याच पिंडाला शंभर भागात विभागून मडक्यांमध्ये बंद करून ठेव. त्यामधून शंभर पुत्रांचा जन्म होईल. गांधारीने त्यावेळी एका कन्येची इच्छा मागितली. त्यामुळे पिंडाला १०१ तुकड्यांत कापण्यात आले. ९ महिन्यांनी जेव्हा कुंतीने भीमाला जन्म दिला, त्याच वेळी एक घडा फुटला आणि त्यातून दुर्योधनाचा जन्म झाला. दुर्योधनाच्या जन्माबरोबरच काही अजब घटना घडू लागल्या ज्यामुळे राज पंडित आणि विदुर चिंतीत झाले.
दुर्योधनाचा जन्म झाल्याबरोबर आकाश काळ्या ढगांनी भरून गेले आणि राजमहालाच्या जवळ येऊन लांडगे मोठमोठ्याने रडू लागले. लांडग्यांचा आवाज ऐकून एक भीती आणि अपशाकुनाचे वातावरण बनत चालले होते. लांडग्यांना सैनिक सारखे हाकलून देत होते परंतु ते पुनःपुन्हा तिथे येऊन रडू लागत. हे सर्व पाहून राज पंडित म्हणाले की मुलाचा जन्म अशुभ वेळी झाला आहे आणि तो कुळाचा नाश करणारा ठरेल. जर हा पुत्र राजमहालात राहिला तर कुळाचा अंत निश्चित होईल. महामंत्री विदुराने धृतराष्ट्राला सल्ला दिला की या बालकाला आपल्यापासून दूर करावे. परंतु पुत्रप्रेमामुळे धृतराष्ट्राने असे केले नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की दुर्योधनाने हळूहळू महायुद्धाला निमंत्रण दिले आणि तेच झाले जे भाग्यात व्हायचे होते. दुर्योधन संपूर्ण कुळाचा नाश करणारा ठरला.