Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

महाभारतातील ‘कपट-द्यूत’

युधिष्ठिर आणि (दुर्योधनातर्फे) शकुनि यानी कौरव-दरबारात खेळलेले द्यूत व अनुद्यूत हा एक फार महत्वाचा प्रसंग आहे. कौरव-पांडवांमधील अनावर वैर आणि त्याची १३ वर्षांनी घोर युद्धात झालेली परिणति यांचे मूळ या द्यूतप्रसंगात आहे. या द्यूताचे वर्णन नेहेमी कपट-द्यूत असे केले जाते. व शकुनि कपटानेच जिंकला असे अनेक ठिकाणी म्हटलेले आहे. मात्र शकुनीने प्रत्यक्षात काय कपट केले याचा खुलासा महाभारतात कोठेहि वाचावयास मिळत नाही! हे एक कोडेच आहे. काही काळापूर्वी पुणे येथील श्री. रविंद्र गोडबोले यांचे महाभारतावरील एक नवे पुस्तक मला एका ज्येष्ठ मित्रानी वाचावयास दिले. त्यामध्ये इतर अनेक विषयांबरोबर या कोड्याचाहि एक अभिनव असा उलगडा वाचावयास मिळाला. द्यूत म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर, फासे, कवड्या, पट, सोंगट्या यांचे सहाय्याने खेळला जाणारा, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वाना रंजविणारा खेळ येतो. ‘या सोंगट्या भांडण लाविताती, होई न तत्संगति सौख्यदाती’ या ओळी काहीना आठवतील. पण कधी कपट केलेले आठवणार नाही. महाभारतातील द्यूत म्हणजे हा खेळ नव्हेच. या खेळाची हार-जीत तासन् तास चालते. याउलट महाभारतातील द्यूताचा प्रत्येक डाव चुटकीसारखा शकुनीने जिंकला! १०-१२ पण व डाव युधिष्ठिराला सर्वस्व हरण्यास पुरले. मग हा काय खेळ होता? श्री. गोडबोले म्हणतात – खेळाणार्या दोन व्यक्तीना ‘कितव म्हणत. त्यातल्या एका कितवाने पण लावावयाचा. मग त्याने हाताच्या ओंजळीत ‘अक्ष’ घ्यायचे. (अक्ष चा अर्थ फासे असा लावला जातो पण अक्ष म्हणजे बेहेड्यासारख्या मोठ्या आकाराच्या बिया असत) व ते उंच उडवायचे. या क्रियेला ‘देवन’ असे म्हणत. (कदाचित द्यूतातील दान’ हा शब्दप्रयोग ‘देवन’पासून आला असेल!) दोघांच्या मध्ये असलेल्या रिंगणात पडलेल्या बिया मोजावयाच्या व त्या सम कीं विषम यावरून पण लावणाराचा जय-पराजय ठरे. सम असेल तर कृत म्हणत व विषम असेल तर कलि. छाप-काटा सारखाच हा प्रकार असल्यामुळे दोघानाहि समसमान जिंकण्याची संधि असे. हे साधे द्यूत युधिष्ठिराला प्रिय होते व त्याला तेच खेळायचे होते. शकुनि हा द्यूतकुशल होता, त्याला हे सरधोपट द्यूत नको होते. त्यामध्ये ‘कपट’ हवे! म्हणजे काय? तर एकाने बिया उडवल्यावर त्या रिंगणात पडण्यापूर्वी दुसर्या पक्षाने चापल्ल्याने त्यातील काही बिया हवेतच झेलून रिंगणात विषम बिया उरतील असे करणे! या क्रियेला ‘निकृति’ असा शब्द वापरलेला आहे. त्याच शब्दाचा ‘कपट’ असा दुसराहि अर्थ आहे! पुढे निकृतिचा मूळ अर्थ मागे पडून ‘कपट’ असाच अर्थ राहिला! धृतराष्ट्राच्या आमंत्रणाप्रमाणे कौरव दरबारात पांडव व कौरव-शकुनि असे द्यूतासाठी उपस्थित झाले. भीष्म,द्रोण,धृतराष्ट्र,विदुर वगैरे आलेले नव्हते. युधिष्ठिर प्रथम म्हणाला कीं मला कपटविरहित (म्हणजे निकृति’शिवाय) द्यूत खेळायचे आहे. पण शकुनीने युधिष्ठिराला म्हटले कीं ‘निकृतीत वाईट ते काय? हा तर द्यूतातील कौशल्याचा भाग आहे, त्यासाठी खेळणाराकडे, चापल्य, तीक्ष्ण दृष्टि, अचूक गणनज्ञान असे अनेक गुण हवेत. जसे जास्त बुद्धिवान मनुष्य वादात जिंकेल वा जास्त शस्त्रकुशल युद्धात जिंकेल तसेच निकृति जाणणाराच द्यूतात जिंकेल. बुद्धिवानाला वा शस्त्रकुशलाला वादात वा युद्धात जिंकल्याबद्दल कोणी वाईट म्हणत नाही मग तूं अशा द्यूतात जिंकणारालाच दोष कां देतोस? तूं घाबरतोस काय?’ असे म्हटल्यावर अतिशय अनिच्छेने व दैवाला दोष देत युधिष्ठिर निकृतिसह द्यूताला तयार झाला. त्यानंतर भीष्मद्रोण वगैरे उपस्थित झाले व द्यूत सुरू झाले त्यामुळे सर्व जण समजले कीं युधिष्ठिर ‘कपट’द्यूताला स्वखुषीने तयार आहे! (पुढे भीष्माचे तोंडीं असा उल्लेख आहे कीं ‘ शकुनीने मला फसवले’ असे युधिष्ठिर म्हणत नाही!’ बलरामानेहि अखेरपर्यंत कायम युधिष्ठिरालाच शकुनीसारख्या कपटद्यूतप्रवीण व्यक्तीशी बेभानपणे द्यूत खेळल्याबद्दल दोषी ठरवले. ) खेळ सुरू झाला व मग अर्थातच युधिष्ठिर कायम हरतच राहिला. महाभारतात काही पणांच्या वर्णनात अक्ष’ उडवल्यावर लगेच निरखून शकुनि ‘मी जिंकलो’ असे म्हणाला म्हणजे त्याला ‘निकृति’ म्हणजेच कपट’ करण्याची गरज पडली नाही तर काही वेळा अक्ष उडवल्यावर त्यातले काही झेलून मग ‘जिंकलो’ म्हणाला अशा वेळी तो ‘कपटानेच’ जिंकला असे म्हटले आहे. गोडबोलेकृत हे द्यूतवर्णन अतिशय नाविन्यपूर्ण आहे. ‘कपट’ शब्दाचा ‘निकृति’ हा वेगळा मूळ अर्थ बाजूला पडून कपटी शकुनि असे त्याचे सर्रास वर्णन होऊ लागले. या द्यूतवर्णनासंदर्भात श्री. गोडबोले म्हणतात कीं काही जमातीत आजहि, देवाला कौल लावण्यासाठी ओंजळीत गुंजा घेऊन त्या उडवावयाच्या व सम विषम मोजून देवाचा कौल ठरवावयाचा असा प्रकार चालतो! अर्थात येथे ‘कपटा’ला वाव नाही. आणखी एक गोष्ट – मोहेंजोडारो-हरप्पा येथील उत्खननात काही सपाट अंगणासारखे प्रकार दिसतात व त्यात विटेची गोल रिंगणे आढळतात. ही जमिनीखालील गटारांचीं किंवा विहिरीचीं तोंडे असावी असे मानले जाते. तसे नसून ती द्यूतासाठी बांधलेली रिंगणे तर नव्हेत असा तर्क श्री. गोडबोले यानी मांडला आहे! आपल्याला काय वाटते? जिज्ञासूनी श्री. गोडबोले यांचे ‘महाभारत-संघर्ष व समन्वय’ हे पुस्तक जरूर वाचावे. पुस्तकात अर्थातच इतर अनेक विषय मांडलेले आहेत. सर्वच पटण्यासारखे आहेत असे नाहीं! पण हा विषय उद्बोधक आहे.

महाभारतातील ‘कपट-द्यूत’

प्रभाकर फडणीस
Chapters
महाभारतातील ‘कपट-द्यूत’