Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

काय आहे हा उल्लेख?

महाभारत ग्रंथात, भारतीय युद्ध एक दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना, काळ कसा वाईट आला आहे याचे काही श्लोकांमध्ये व्यास वर्णन करतात. त्या श्लोकांमध्ये कित्येक अवलक्षणे सांगितली आहेत, उदा. ‘चंद्राचा रंग तांब्यासारखा लाल झाला आहे’, त्यात एक अवलक्षण असे दिले आहे कीं ‘अरुंधती वसिष्ठाला मागे टाकून पुढे चालत आहे.’
हे मागे-पुढे काय प्रकरण आहे हे प्रथम पाहूं या.

उघड्या मैदानावर उभे राहून आकाशात पाहिले तर अनेक तारे व तारकापुंज व नक्षत्रे ध्रुवतार्याभोवती वा उत्तरध्रुवाभोवती फेर धरत दर रात्री पूर्वेकडून पश्चिमेकडे (Anticlockwise) एक फेरा करताना दिसतील. पाहणारा बरोबर उत्तरेकडे तोंड करून उभा असेल तर ध्रुवतार्यामधून व पहाणार्याच्या बरोबर डोक्यावरून (खपुष्प वा झेनिथ मधून) जाणारी आकाशातील एक काल्पनिक रेषा, जिला मेरिडियन म्हणतात, तिला एक-एक तारा ओलांडून जाताना दिसेल.
सप्तर्षि हे नक्षत्र आपल्याला परिचयाचे असेलच. ते ध्रुवतार्याच्या जवळ आहे व त्यातील पहिल्या दोन तार्यांच्या रेषेत ध्रुवतारा येतो. सप्तर्षीचे तारे असे मेरिडियन ओलांडताना सहजच दिसतात. त्या सात तार्यात एक तारा वसिश्ठाचा व त्याचे अगदी जवळ एक छोटी व अंधुक तारका आहे तिला अरुंधती म्हणतात.

मेरिडियन रेषेकडे स्थिर नजरेने निरखून किंवा टेलेस्कोप लावून ठेवून पाहत राहिले तर प्रथम वसिष्ठ व मग थोड्या वेळाने अरुंधती मेरिडियन रेषा ओलांडून जाताना दिसते. म्हणजे ‘अरुंधती वसिष्ठाच्या मागे चालते.’ गेली शेकडो वर्षे हेच दृष्य दिसते आहे व पुढेहि दिसत राहणार आहे.
पण मग व्यासांनी कां म्हटले आहे कीं ‘अरुंधती वसिष्ठाच्या पुढे चालत आहे’? हा उल्लेख हे एक मोठमोठ्या विद्वानाना न उलगडणारे कोडे आहे. भारताचार्य श्री. चिं. वि. वैद्य व म. म. पां. वा. काणे यांच्यासारख्यांनी याला महाभारतात मोठी भर घालणार्या सौतीचा बाष्कळपणा ठरवले होते. इतर अनेक संशोधकांनी तर या उल्लेखाकडे सरळ दुर्लक्ष केले आहे

श्री. ओक यानी या विशिष्ट उल्लेखाचा शास्त्रोक्त पाठपुरावा करून त्यांचे निष्कर्ष मांडले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी Computer and Software या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. आज अरुंधती निश्चितच वसिष्ठाचे मागे चालताना दिसते पण पूर्वी कधीतरी ती वसिष्ठाचे पुढे चालताना दिसत असेल काय याचा त्यानी शोध घेतला.