Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

रोमन सैन्याचा ताबा

हेरोडच्या मृत्यूनंतर हा किल्ला रोमनांच्या ताब्यात गेला व त्यानी तेथे मोठी शिबंदी ठेवली होती. रोमन राज्यकर्ते व ज्यू जनता यांचेमध्ये हेरोडनंतर फार काळ शांतता नांदली नाही. ज्यूंनी रोमनांविरुद्ध बंड केले. इ.स. ६६ मध्ये ज्यू बंडखोरानी मसाडा किल्ल्यावरील रोमन सैन्याचा पराभव करून त्याना हुसकावून लावून किल्ला ताब्यात घेतला. इ.स. ७० मध्ये जेरुसलेमचा रोमनांनी पाडाव केला, पवित्र देवळाचा विध्वंस केला व कत्तली केल्या. पळालेल्या लढवय्या लोकानी व त्यांच्या कुटुंबियानी मसाडा गाठले व तेथे आश्रय घेतला. पुढे दोन वर्षेपर्यंत त्यानी रोमनाना वारंवार हल्ले करून सतावले. अखेर रोमन गव्हर्नर जोसेफस सिल्वा याने ७३ साली मोठे सैन्य आणून किल्ल्याला वेढा घातला. अतिशय पद्धतशीरपणे मृतसमुद्राचे बाजूला एक मोठा कॅंप बनवला व किल्ल्याच्या सर्व बाजूंनी चक्क भिंतच बांधून दळणवळण पूर्णपणे बंद पाडले. मात्र किल्ल्यावर जाण्याला मार्गच नसल्यामुळे व किल्ल्यावर अन्न, पाण्याची कमतरता नसल्यामुळे किल्ला सहजीं पडणार नव्हता. त्या काळी तोफा नव्हत्या पण रोमनांकडे मोठाले दगड फेकणारीं कॅटॅपल्ट नावाची यंत्रे होती. त्यांचा पल्ला अर्थातच थोडा असल्यामुळे तीं बरीच वर चढविल्याशिवाय तटावर मारा करण्यासाठी उपयुक्त होत नव्हतीं. रोमन सैन्याबरोबर जेरुसलेमचे ज्यू युद्धकैदी स्त्री-पुरुष मोठ्या प्रमाणावर होते. त्या श्रमशक्तीचा अतिशय कल्पक पण निर्दय वापर रोमनानीं भर उन्हाळ्यात केला. किल्ल्याच्या पश्चिम बाजूला तुटलेल्या कड्यासमोरच वरपर्यंत जाणारी एक अवघड, अरुंद सोंड होती. तिच्या वर व दोन्ही बाजूने दगड-मातीचा प्रचंड भराव घालत, ती रुंद केली व सरळ वरपर्यंत चढत जाणारा चढणीचा रस्ताच बनवला! जणू रामाचा सेतूच! मात्र पाऊस नसल्यामुळे, ती दगडमाती २००० वर्षांनीहि  वाहून गेलेली नाही व तो रस्ता त्यामुळे आजहि सुस्थितीत आहे. त्याला Rampart असे म्हणतात.
हा रस्ता तयार झाल्यावर मग मात्र त्यानी आपले कॅटॅपल्ट वर नेऊन, तटावर मोठाल्या शिळा फेकण्यास सुरवात केली. त्यांचे प्रख्यात. Battering Rams हि वर आणले व भिंतीवर दणके बसू लागले.शिळांच्या मार्याचा तटाच्या बाहेरील भिंतीवर फारसा परिणाम होत नव्हता. ज्यूंनी तटाच्या बाहेर मोठे लाकडाचे सोट उभे गाडून संरक्षक भित बनवली होतीच. मात्र काही शिळा तटाच्या आतील व बाहेरील भिंतींवर असलेल्या छपरावर कोसळून विध्वंस होऊ लागला व खोल्यांतील कुटुंबीय बायकामुले मरूं लागलीं व इतर नुकसानीहि होऊं लागली. हळूहळू किल्ल्यावरील लोकाना भवितव्य दिसू लागले. किल्ल्यावर जवळपास हजार माणसे होतीं. अखेर किल्ला जाळावा, विध्वंस करावा व सर्वांनी मरून जावे पण रोमनाना शरण जायचे नाही असा सर्वांचा विचार ठरला.