Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

प्रास्ताविक


आपणा मराठी माणसाना किल्ला ह्या विषयाचे एक आकर्षण असते. आपल्या इतिहासात किल्ले, त्यांचे वेढे, तेथील लढे आणि त्यात गाजवलेल्या शौर्याच्या कथा आपल्याला भुरळ घालतात. महाराष्ट्रात इतर भारतापेक्षा जास्त प्रमाणावर किल्ले आहेत. कित्येक खूप जुने असणार पण शिवाजीमहाराजांनी बांधलेल्या रायगड, राजगड, प्रतापगड यासारख्या तुलनेने नवीन किल्ल्यांचीहि त्यात भर पडलेली आहे. रामदेवराव यादव व त्याच्या देवगिरीच्या किल्ल्याला पडलेला वेढा व अखेर किल्ल्याचा झालेला पाडाव ही कथा कदाचित आपल्या परिचयाच्या अशा अनेक कथांपैकी सर्वात जुनी असेल. अकबराने चितोडला घातलेला वेढा, किल्ल्याचा अखेर झालेला पराभव व राजपूत स्त्रियांनी केलेला जोहार त्यानंतर बर्याच काळानंतरचा. इतर प्रसिद्ध वेढ्यांमध्ये, पन्हाळ्याला सिद्दीजोहरने घातलेला वेढा, पुरंदर किल्ल्याला दिलेरखानाने घातलेला वेढा व तो मोडून काढण्याचा मुरारबाजी देशपांडेंचा जिगरबाज प्रयत्न आणि जिंजीचा सात वर्षे चाललेला वेढा यांची गणना करतां येईल. हल्लीच माझ्या वाचनात अशाच एका खूप जुन्या किल्ल्याची खूप जुनी कथा आली. ही कथा विलक्षणच आहे व चितोडच्या जोहाराशी तिचे काही साम्यहि आहे. ही कथा आहे इस्रायलमधील एका किल्ल्याची व त्याच्या वेढ्याची. ती जवळपास २००० वर्षांची जुनी आहे हे तिचे एक वैशिष्ट्य. या किल्ल्याला मसाडा असे म्हणतात. खरेतर मसाडा म्हणजेच ज्यूंच्या हिब्रू भाषेत किल्ला. रोमनानी या किल्ल्याला घातलेला वेढा, ज्यूंचा अखेर झालेला पराभव व चितोड्सारखा तेथील प्रकार याची ही कथा आहे.