Get it on Google Play
Download on the App Store

रामायण बालकांड - भाग ५

यापुढच्या सर्ग १७ मध्ये अनेक देवांनी याचवेळी अनेक वानरवीरांना जन्म दिला असा खुलासेवार उल्लेख केला आहे. त्यांत सर्व प्रमुख वानरवीरांचा उल्लेख आहे. यातील अद्भुतरस मी सोडून देतो. वाली हा इंद्रपुत्र व सुग्रीव हा सूर्यपुत्र असे म्हटले आहे. त्यावरून ते जुळे भाऊ नव्हते हें उघड आहे. मात्र ते दिसावयास अतिशय सारखे असल्यामुळे पुढे द्वंद्वयुद्ध करणार्‍या दोघांपैकी वाली कोण व सुग्रीव कोण हे रामाला ओळखू येईना व प
हिल्या प्रयत्नाचे वेळी वालीला मारता आले नाही असे वर्णन केले आहे. पुन्हा द्वंद्व करताना सुग्रीवाने गळ्यात पुष्पमाला घातली व मग रामाला वालीवर बाण सोडतां आला. या प्रसंगामुळे ते जुळे भाऊ असावेत असा समज होतो तो खरा नाही. पुढे महाभारतात अर्जुन हा इंद्रपुत्र व कर्ण हा सूर्यपुत्र असे वर्णन आहे मात्र त्यांना कोणी वाली-सुग्रीवांचे अवतार मानत नाही! कारण ते पडले वानर! दोन्ही ठिकाणी इंद्रपुत्र जास्त प्रबळ वर्णिला आहे.
यज्ञाच्या प्रभावाने म्हणा कीं यदृच्छेने म्हणा पण दशरथाला राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न असे चार पुत्र पाठोपाठ झाले. त्यांच्या वयामध्ये किती फरक होता याचा स्पष्ट उल्लेख कोठेच केलेला नाही. सुमित्रेने लक्ष्मण व शत्रुघ्न यांना जन्म दिला असे म्हटले आहे पण ते जुळे होते असे स्पष्ट म्हटलेले नाही. पण पाठोपाठ जन्म झालेले असल्यामुळे ते जुळे असलेच पाहिजेत. यज्ञानंतर एक वर्षाने रामाचा जन्म झाला व चौघांचाहि नामकरण विधि एकदमच झाला असे म्हटले आहे. लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर व कर्कलग्नी झाला या वर्णनावरूनहि ते जुळे असले पाहिजेत याला दुजोरा मिळतो. तसें नसतें तर एकाच नक्षत्रावर जन्म घेण्यासाठी त्यांच्या वयात एखाद्या वर्षाचा फरक पडला असता. राम व भरत या दोघांच्याहि जन्मराशि व जन्मनक्षत्रे दिलीं आहेत. राम पुनर्वसु नक्षत्रावर व कर्कलग्नीं तर भरत पुष्य नक्षत्रावर व मीनलग्नीं जन्मला. रामाचा जन्म माध्यान्हीला झाला हे सर्वमान्य आहे. भरताची जन्मवेळ दिलेली नाही. एवढ्या माहितीवरून त्यांच्या जन्मवेळेत किती फरक होता हे ठरवतां येते काय हे मला निष्चित माहीत नसल्यामुळे थोडेफार ज्योतिष जाणणार्‍या एका व्यक्तीशी चर्चा केली त्यावरून असे दिसून आले कीं भरत हा रामजन्माच्या दुसर्‍या दिवशी सकाळच्या सुमारास म्हणजे रामानंतर १७-१८ तासांनी जन्मला. लक्ष्मण-शत्रुघ्नांच्या जन्मनक्षत्र-राशीवरून असेच गणित करून ते रामजन्मानंतर दोन दिवसांनी दोन-प्रहरी जन्मले. म्हणजे ते रामाहून दोन दिवसांनी लहान होते. ज्योतिषाची आवड व अभ्यास असणारांनी यावर अधिक प्रकाश टाकावयास हरकत नाही. रामायण काळी आपल्याकडे राशी होत्या काय याबद्दल शंका आहे. त्या बर्‍याच पुढे, वराहमिहिराच्या काळी आल्या (ग्रीकांकडून?) राशिनामे आपलीं व ग्रीकांची एकच आहेत. कोणी कोणाकडून घेतली? मात्र, रामायणानंतर दीर्घकाळाने झालेल्या महाभारतकाळीहि अधिक मासांचे गणित- आजच्याप्रमाणे-राशिसंक्रमणाशी जुळवलेले नव्हते. ५८ चांद्रमासांनंतर दोन अधिक चांद्रमास एकदम घेतले जात. यावरून, महाभारतकाळीहि राशिकल्पना व राशि-संक्रमण-दिन निश्चिति माहीत नव्हती म्हणावे लागते. सूक्ष्म वेध घेण्याच्या पद्धति आटोक्यात येईपर्यंत ते शक्यहि नव्हते. रामायणात हे जन्मराशींचे उल्लेख मागाहून घातले गेले काय? हा प्रष्न मी वाचकांवरच सोडतो!