Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

कृष्णशिष्टाई -भाग २

दृपदाचा पुरोहित कौरवांकडे गेला न गेला तोंच सैन्य जमा करण्याचा उद्योग दोन्ही पक्षांकडे सुरू झाला. आमच्याकडे शेवटी या असे कृष्णाने स्पष्ट सांगितले असूनहि, सुरवातीलाच, अर्जुन व दुर्योधन दोघेही एकाच वेळी कृष्णाकडे गेले असे महाभारत म्हणते. कृष्ण स्वत: दुर्योधनाला मिळणे शक्यच नव्हते. मात्र बलरामाशी वितुष्ट टाळण्यासाठी काहीतरी तडजोड करणे भागच होते. त्यामुळे साहजिकच, सैन्यची मदत दुर्योधनाला व स्वत: फक्त नि:शस्त्र सहायक म्हणून अर्जुनाकडे, अशी वाटणी अनिवार्य होती. प्रचंड सैन्य स्वत:ला मिळाले व कृष्ण स्वत: युद्धात उतरणार नाही असा दिलासा मिळाला म्हणून दुर्योधन खूष झाला. अर्जुनाला कृष्णाच्या सारथ्याची व सल्ल्याची किंमत ठाऊक होती. त्याला हवे ते मिळाले. कृष्णाच्या निर्णयाचा मुख्य फायदा म्हणजे बलरामाने युद्धापासून पूर्णपणे दूर राहाण्याचे ठरवले. कृष्ण-बलराम वितुष्ट टळले. इतर अनेक यादववीरहि स्वस्थ बसले. सात्यकी व कृतवर्मा यानी आपल्या आवडीप्रमाणे पांडव व कौरवांचा पक्ष एकेक अक्षौहिणी सैन्यासह घेतला. अर्जुन व दुर्योधन एकाच वेळी कृष्णाकडे आले तेव्हा तो झोपला होता, दुर्योधन डोक्याशी व अर्जुन पायांशी बसला वगैरे प्रसंग मात्र अगदीच हरदासी आहे! जे निर्णय कृष्णाने घेतले ते अनिवार्यच होते!
इतर कित्येक राजे आपापल्या विचारांप्रमाणे एकेका पक्षाला मिळाले. त्यांत नकुलसहदेवांचा मामा शल्य कौरवपक्षाला मिळाला हे एक नवलच. त्याचा खुलासा अज्ञातवासावरील माझ्या लेखात केला आहे. पांडवानी त्याचे सहाय्य गृहीत धरले असावे. त्याला आपल्या बाजूला वळवण्यात दुर्योधनाचा मुत्सद्दीपणा दिसून आला. कौरव सैन्याचा सेनापति भीष्म होणार हे उघड होते. त्याखालोखाल द्रोण, कर्ण, कृप, अश्वत्थामा होते. या सार्‍यांना डावलून शल्य कौरवांचा सेनापति होणे शक्यच नव्हते. तरीहि दुर्योधनाने शल्याला तूं सेनापति हो अशी विनंति केली. भीष्म-द्रोण युद्धविन्मुख राहिले तर? अशी कदाचित त्याला शंका असावी! या सन्मानाचा शल्याला मोह पडला असे दिसते.
द्रुपदाचा पुरोहित कौरवदरबारात पोचला. त्याने मुद्दे मांडले कीं धृतराष्ट्राने मुळात कौरवांच्या राज्याचा हिस्सा पांडवाना दिलाच नव्हता! इंद्रप्रस्थाचे नवे राज्य पांडवानी स्वपराक्रमाने मिळवले. द्यूतामुळे ते कौरवांच्या ताब्यात गेले. आता पांडवानी द्यूताची अट पुरी केली आहे तेव्हा ते त्याना परत मिळाले पाहिजे. त्यानी मोठे सैन्य जमा केले आहे व ते स्वत:ही फार प्रबळ आहेत तेव्हा युद्ध झालेच तर त्यांचा विजय ठरलेलाच आहे! तेव्हा आपल्या वचनाप्रमाणे विनाविलंब त्यांचे राज्य त्याना परत द्या!
उत्तरादाखल भीष्म काही बोलत असतानाच त्याला अडवून कर्णाने मुख्य मुद्दा मांडला की अज्ञातवास पुरा होण्यापूर्वीच पांडव ओळखले गेले तेव्हा राज्य मागण्यापूर्वी त्यानी पुन्हा बारा वर्षे वनवास भोगावा. पांडवांच्या युद्धाच्या धमकीला आम्ही मुळीच घाबरत नाही. भीष्माला कर्णाच्या आगाऊपणाचा राग आलेला पाहून, धृतराष्ट्राने त्याला चुचकारून, दूताला सांगितले की आम्ही तुझ्या म्हणण्याचा विचार करून मग संजयाला युधिष्ठिराकडे आमचा दूत म्हणून पाठवतो. हा निरोप घेऊन द्रुपदाचा पुरोहित परत गेला. द्रुपदाच्या अपेक्षेप्रमाणे कौरवपक्षात फूट पडू लागली! संजयाला धृतराष्ट्राने काय पढवून पाठवले हे पुढील भागात पहा.