Get it on Google Play
Download on the App Store

महाराणा प्रताप


महाराणा प्रताप मेवाड प्रांताचा एक हिंदू राजपूत राजा होता. राणा प्रतापच्या बरोबरच्या बाकी सर्व राजपुतांनी मोघल सम्राटांची गुलामी स्वीकारली होती, ज्यांच्यात राणा प्रतापचे दोन भाऊ देखील सामील होते. बादशाह अकबराने राणा प्रतापकडे ६ वेळा तहाचा निरोप पाठवला परंतु राणा प्रतापाने प्रत्येक वेळी विनम्रतेने तो धुडकावून लावला. त्याने सांगितले की सिसोदिया राजपुतांनी अजून पर्यंत कोणत्याही विदेशी शासनकर्त्याला स्वतःवर राज्य करू दिलेले नाही, आणि यापुढेही करू देणार नाही. काही विद्वानांचे असे म्हणणे आहे की राणा प्रतापने अकबर बादशाह बरोबर मैत्री केली असती. परंतु चीतोर इथे अकबराने ३०,००० हिंदू राजपूत लोकांना स्त्रिया आणि मुलांसकट, धर्मपरिवर्तन केले नाही म्हणून ठार केले. या गोष्टीने राणा प्रताप अकबरावर चिडलेला होता. त्याने निश्चय केला की अकबरासारख्या नीच आणि क्रूर शासकासमोर आपण कधीच गुडघे टेकणार नाही. अकबराने या गोष्टीला आपला अपमान मानून राणा प्रतापाला धडा शिकवण्याचा निश्चय केला.
२१ जून १५७६ ला महाराणा प्रताप आणि अकबर हल्दीघाटी इथे युद्धासाठी समोर आले. राणा प्रतापाजवळ १०,००० सैन्य होते. परंतु मोघल सैन्य त्याच्या ८ पट एवढे होते. ही लढाई केवळ ४ तास चालली. पण राणा प्रतापाच्या सैनिकांनी युद्धभूमीवर अनेक करामती दाखवल्या. या युद्धाचा मोघल सैन्यावर फार मोठा परिणाम झाला. त्यांना जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणावर सोसावी लागली. डोंगराच्या कडे कापऱ्या यांच्यामध्ये लपून राणाच्या सैन्याने मोघल सैन्याला खूप मोठे नुकसान पोचवले. राणा प्रतापने त्या पहाडी मधून बाहेर यावे म्हणून अकबराने आणखी ३ संदेश पाठवले, परंतु ते सर्व विफल ठरले.
राणा प्रतापाने शपथ घेतली होती, की जोपर्यंत आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवून देत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. त्याने जवळपास आपले संपूर्ण राज्य स्वतंत्र केले होते, परंतु दुर्दैवाने १५९७ च्या जानेवारीमध्ये एका शिकार दुर्घटनेत राणा जखमी झाला आणि २९ जानेवारी १५९७ ला वयाच्या ५६ व्या वर्षी त्याने चावंड इथे देहत्याग केला. तो आपला देश, आपली माणसे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या स्वाभिमानासाठी लढत मरण पावला.